माझ्या आईच्या आत्म्याची यात्रा !

0
106

मनाची पोकळी खूपच मोठी असते. विश्वाच्या व्यापाएवढी. तशी ती भरून काढणे फार अवघड. मनुष्य कितीही विज्ञाननिष्ठ असला तरी तो कोठेतरी थांबतोच. त्याला अजून पलीकडे काहीतरी आहे याची जाणीव असते- प्रसंगाप्रसंगाने होते. ती पोकळी भरून काढण्याची शक्ती ज्याच्या त्याच्या श्रद्धेवर अवलंबून असते. काहींना श्रद्धा ह्या निरूपद्रवी अंधश्रद्धाच वाटतात. परंतु या श्रद्धा म्हणा- अंधश्रद्धा म्हणा, त्यांचा मनाला मोठा आधार असतो. भारतात अनेक चालीरीती, परंपरा जन्ममृत्यूच्या बाबतीत दिसून येतात. काहींना ती भारतीय संस्कृती वाटते- काहींना त्या परंपरा त्यामुळे जतन कराव्याशा वाटतात. काहींना ते कर्मकांड वाटते.

श्रद्धा गूढ शक्तीची भक्ती करतात- विज्ञान गूढ शक्तीचा वेध घेते. दोन्ही प्रवास निरंतर चालू राहणार आहेत. पूजा, प्रार्थना या मनाच्या आत्यंतिक गरजा आहेत. आम लोक त्यांपासून दूर जाऊ शकत नाहीत. क्वचित अपवाद वेगळा.

भारतात विज्ञाननिष्ठ लोकांचे प्रमाण, नास्तिकांचे प्रमाण हे एक टक्क्यापेक्षाही कमी आहे. मी सुद्धा शंभर टक्के विज्ञाननिष्ठ नाही. मी अनेक चालीरीती, परंपरा सांभाळत असतो आणि काही धार्मिक विधी करत असतो. माझ्या आईचे एकशेतीनव्या वर्षी 26 नोव्हेंबर 2022 रोजी निधन झाले. आम्ही दशक्रिया विधी तिसऱ्या दिवशी केला. त्या विधीतील एकच गोष्ट मला महत्त्वाची वाटली. ती म्हणजे पूर्वजांचे स्मरण करणे. त्या विधीच्या वेळी माणूस आजोबा, पणजोबा, खापरपणजोबा यांच्यापर्यंतची आठवण करतो. त्यांच्या पलीकडची नावे त्याला आठवत नाहीत. पूर्वी तशी नावे लिहून ठेवण्याची व्यवस्था कोठे नव्हती. स्वतःच्या जन्मतारखाही लोक नीट लिहीत नव्हते. अनेकांना तर त्यांच्या जन्माच्या फक्त तिथी माहीत होत्या. तारीख आणि सालही माहीत नव्हते. अनेकांच्या बाबतीत शाळांत नोंदलेली जन्मतारीख एक जून ही असते. माझीही शाळेतील जन्मतारीख एक जून आहे. आता, त्या जन्मतारखेनुसार आणि खऱ्या तारखेनुसारसुद्धा ज्योतिष कॉम्प्युटरमधून आलेले सगळ्यांचे एकसारखे असते. तरी प्राक्तन मात्र वेगवेगळे असते. आपण त्या प्राक्तनापुढे नतमस्तक असतो.

आयुष्यात घडणाऱ्या सुखद घटना जर कर्मामुळे असतील तर मग दुःखद घटनांचा दोष प्राक्तनाला कशाला? ती अस्ताकडे जाण्याबद्दलची भीती तर असत नाही ना? देह सोडून जाणारी आत्म्याची ही यात्रा अगम्य का वाटते?

रामदास फुटाणे 9820254279 phutaneramdas1@gmail.com

—————————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here