मी शिकागोच्या नेपरव्हिल नावाच्या उपनगरात गेली सत्तावीस वर्षे राहत आहे. मी म्हणजे आम्ही – माझा नवरा सतीश आणि मुलगी गार्गी भारतातून अमेरिकेला आलो. भारतात मी ‘कोशीश स्कूल फॉर द डेफ’ ह्या मालाड येथील बहिऱ्या मुलांच्या शाळेत शिक्षिका 1987 ते 1993 पर्यंत होते. मी अमेरिकेत आल्यानंतर येथील प्रिस्कूलमध्ये आणि नंतर हायस्कूलमध्ये टीचिंग असिस्टंट म्हणून नोकरी काही वर्षे केली. मला परत स्पेशल एज्युकेशन शिक्षिका व्हावेसे वाटत होते. मी अमेरिकेत स्पीच अँड लँग्वेज पॅथॉलॉजीचा अभ्यासक्रम पूर्ण केला व त्या विषयातील असिस्टंट म्हणून इलिनॉईस राज्याच्या अर्ली इंटरव्हेन्शन अंतर्गत काम करते. माझ्या घरापासून पंचवीस मैलांच्या परिघात शून्य ते तीन वर्षे वयापर्यंतच्या मुलांना घरी जाऊन स्पीच थेरपी देते. मी हे काम पंधरासोळा वर्षे करत आहे.
अमेरिकेत सर्व प्रकारची अपंग मुले एकाच शाळेत जातात. त्यांना प्रत्येकासाठी वैयक्तिक अभ्यासक्रम आखून शिकवले जाते आणि त्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार स्पीच, ऑक्युपेशनल, फिजिकल, बिहेविअर थेरपी दिली जाते. ह्या सर्व सेवा तीन वर्षे वयापासून उपलब्ध असतात. त्यापूर्वी, मुलाच्या जन्मापासून ते तीन वर्षांचे होईपर्यंत मुलांच्या घरी जाऊन त्या सेवा पुरवल्या जातात.
अमेरिकेत मुले पाच वर्षांची झाली की सरकारी म्हणजे ग्रामपंचायतीच्या शाळेत बालवर्गात जातात. त्या शाळेत बारावीपर्यंत फी नसते. सनतचा म्हणजे माझ्या मुलाचा जन्म अमेरिकेत झाला. सनत तीन वर्षांचा झाला तेव्हा मॉंटेसरी नामक खाजगी शाळेत घालण्याच्या विचाराने गेले आणि एका संधीचे दालन माझ्यासाठी उघडले गेले ! शाळेच्या संचालिकेने शाळेत मदतनीस म्हणून काम करशील का? असे विचारले. मी लगेच हो म्हटले. माझ्या त्या पहिल्या नोकरीत नवजात बाळे ते पाचवीच्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली.
एका दुपारी शाळेतून परस्पर मॉंटेसरीत येणाऱ्या मुलांपैकी एका मुलीने मला गणिताच्या गृहपाठासाठी मदत मागितली. मी तिला व्यवस्थित समजावले आणि गंमत म्हणून तशी काही अजून गणिते एका कागदावर लिहून दिली. ती तिने चुटकीसरशी सोडवली आणि मला मिठी मारली ! शाळेची संचालिका तिच्या ऑफिसमधील कॅमेऱ्यामधून हे पाहत होती. तिने मला बोलावले आणि म्हणाली, “तुला गणित येते, मग तू येथे काय करत आहेस? मी तुला येथील स्कूल डिस्ट्रिक्टमध्ये रेकमेंड करते, तुला तेथे सहज जॉब मिळेल.”
खरोखरच, मला नेपरव्हिल गावाच्या हायस्कूलमध्ये स्पेशल एज्युकेशन विभागात मदतनीस शिक्षिका म्हणून नोकरी मिळाली ! तेथून माझ्या नवनवीन अनुभवांचे सत्र सुरू झाले. अमेरिकेत सर्व प्रकारची अपंग मुले नॉर्मल मुलांच्या शाळेत जातात. फक्त त्यांना ज्या थेरपी किंवा वैयक्तिक अभ्यासक्रमाअंतर्गत जे शिकवायचे असेल त्यानुसार ती त्या वर्गात जातात. त्या मुलांच्या वेळापत्रकानुसार त्यांना त्या वर्गात नेणे, गृहपाठात मदत करणे. वाचून दाखवणे. Modified प्रश्नपत्रिका तयार करणे. व्हीलचेअरमधील मुलांना त्यांच्या वर्गात नेणे हे सारे केले जाते.
त्या शाळेत एक वर्ष पूर्ण केल्यावर दुसऱ्याच वर्षी एक संधी परत चालून आली, ती म्हणजे एका सेरिब्रल पाल्सी मुलीची मदतनीस म्हणून शाळेत जबाबदारी दिली गेली. प्रथमच मला वाचा नसलेले, अत्यंत बुद्धिमान एक शरीर (Nonverbal, wheelchair bound, intelligent) चाकाच्या खुर्चीत जखडलेले आढळले ! त्या मुलीबरोबर दोन वर्षे मिळाली. त्या दोन वर्षांत मला अशा मुलांशी कसे वर्तन असावे याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळाले. शब्दांशिवाय कसे बोलावे, स्वत:च्या नैसर्गिक गरजांसाठी दुसऱ्याला विनंती कशी करावी, तिच्या सर्व नैसर्गिक गरजा भागवण्यासाठी तिला जी मदत करावी लागली अगदी मलमूत्र विसर्जनापासून ते अन्न भरवणे, व्हीलचेअरमधून बाथरूमच्या पॉटवर बसवणे अशा अनेक क्रिया ! ती मुलगी लॅपटॉपसारखा एक दृक्श्राव्य डिव्हाईस वापरायची, त्याच्यात नवीन शब्दांचा डेटा फीड करणे, तिला प्रत्येक विषयाच्या अनुषंगाने वाचून दाखवणे, परीक्षेत तिची लेखनिक बनणे… तिच्या सर्व विषयांच्या वर्गात मला तिच्याबरोबर जावे लागे. त्यामुळे मला हायस्कूलचा नववीचा आणि दहावीचा अभ्यासक्रम पूर्णपणे समजला… इंग्रजी, गणित, इतिहास, भूगोल, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र… तिच्यासाठी फिजिकल थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी मिळायची, त्याचेही दोन वर्षे जवळून निरीक्षण करता आले.
ह्या निरीक्षणामुळे मी स्पीच थेरपिस्ट म्हणजे वाचा चिकित्सक बनू शकले. तेथील शैक्षणिक धोरणानुसार मी ज्या काउंटीत राहते तेथील कॉलेज पुढील शिक्षणासाठी निवडले. तेथे वाचा चिकित्सेमधील असोसिएट पदवी घेतली आणि वाचा चिकित्सक म्हणून काम सुरू केले. ते शिक्षण घेत असताना त्यातील महत्त्वाचा विषय म्हणजे ध्वनी निर्माण (sound production). त्यावेळी मला माझ्या इतर भारतीय भाषांनी भरपूर मदत केली. मी भारतीय देवनागरी मुळाक्षरांचा तक्ता वैज्ञानिक कसा आहे हे सिद्ध करणारा निबंध लिहिला. माझ्या डिपार्टमेंटचे प्रमुख असलेल्या प्रोफेसरांनी मला दुभाषा होण्याची परीक्षा देण्यास सांगितले. मी त्यानुसार मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू ह्या भाषांची परीक्षा देऊन दुभाषा म्हणूनपण काम करू लागले. वाचा चिकित्सक आणि दुभाषा असे माझे काम सुरू झाले. मी भारतीय देवनागरी मुळाक्षरांचा तक्ता वैज्ञानिक कसा आहे हे सिद्ध करणारा निबंध लिहिला. त्या निबंधात केवळ माझी निरीक्षणे आहेत !
अ. देवनागरी मुळाक्षरांचा तक्ता पाहिल्यास, सर्वात वरच्या ओळीत बारा स्वर आहेत. अ पासून अः पर्यंत कोणत्याही स्वराच्या उच्चारात मुखयंत्रातील जीभ, टाळू/तालु, दात, यांचा वापर होत नाही. नवजात बालकात हे मुखयंत्रातील अवयव अजिबात विकसित झालेले नसतात, त्याच्या घशातून जे ध्वनी निघतात – अगदी रडण्याचे धरून, ते अ , ॲ, अँ ते स्वरांशी साधर्म्य दाखवतात.
ब. त्यानंतर असतात कंठय वर्ण … बालकाची गिळण्याची प्रक्रिया जन्मानंतर लगेच सुरू होते. क, ख, ग, घ, ङ ह्यांच्याही उच्चारणात मुखयंत्रातील कोणताही अवयव कार्यरत नसतो, एकदा का गिळण्याची क्रिया सुरू झाली की घशाची जाणीव अधिकतेने कार्य करू लागते, म्हणून दुसरी ओळ कंठ्य वर्णाची आहे.
क. तिसरी ओळ दन्त्य वर्णांची… साधारणपणे तिसऱ्याचौथ्या महिन्यात बालकाचे वरचे किंवा खालचे दोन दात दिसू लागतात, जिभेच्या टोकाला त्यांचा सहज स्पर्श होतो. त्यामुळे च, छ, ज, झ यांचे उच्चार करण्यासाठी मुखयंत्रातील अवयवांच्या विकासानुसार ही ओळ दिसते.
ड. चौथी ओळ तालव्य वर्णांची … ट , ठ , ड , ढ , ण. पाचव्यासहाव्या महिन्याच्या वयाला आता टाळू/तालु घट्ट होते. तिचा उपयोग तालव्य वर्णाच्या उच्चारांसाठी होतो.
इ. पाचवी ओळ दन्त तालव्य वर्णांची … त, थ , द , ध , न . बालकाला सातव्या महिन्याच्या सुमाराला अजून दात येतात, हिरड्या-तालू प्रसारण पावते, जीभेचा टोकामागील भाग सहजपणे वरच्या दातांच्या मागे आणि तालूला पुरेसा दाब देऊन या उच्चारांसाठी तयारी होते.
ई. सहावी ओळ ओष्ठ्य वर्णांची … प, फ, ब, भ, म मूल आठव्यानवव्या महिन्यांत बसू लागते, तोंडात अन्न गेल्यावर ओठ मिटून चावण्याची प्रक्रिया सुरू होते. ओठांच्या एकमेकांवर दाब देण्याच्या प्रक्रियेतून ओष्ठय वर्णांचे उच्चार साध्य होतात .
उ. सातवी म्हणजे शेवटची ओळ … य , र, ल , व, श, ष , स , ह, ळ , क्ष, ज्ञ. ह्यांना मराठीत मिश्र वर्ण आणि इंग्रजीत Liquids and Glides असे म्हणतात. मूल रांगण्यास, चालण्यास लागले की हे उच्चार होऊ लागतात.
ऊ. म्हणजे बालकाच्या शारीरिक विकासासारखा भाषेच्या मुळाक्षरांचा तक्ता विकसित झालेला दिसतो. कोणत्याही भारतीय भाषेत मुळाक्षरे ह्याच अनुक्रमाने लिहिलेली दिसतात. हा वैज्ञानिक दृष्टिकोन मला भारतीय देवनागरी लिपीमध्ये दिसतो.
अनेक भारतीय लोक घरी इंग्रजीव्यतिरिक्त मातृभाषा बोलतात. त्यांच्या मुलांना ‘स्पीच थेरपी” देताना मातृभाषेत संभाषण सुरू केले तर मुलांचे प्रतिसाद पटकन आणि सहज येतात. सर्वसाधारणपणे वाचा चिकित्सा (स्पीच थेरपी) जन्मजात बहिरेपण, जन्मजात टाळूला भेग असणे, कानामध्ये जंतुसंसर्ग होणे, बुद्धिमंदता, गिळण्याच्या प्रक्रियेत अडथळा… अशा अनेक कारणांनी दिली जाते. मला माझ्या मराठीव्यतिरिक्त इतर भारतीय भाषा येत असल्यामुळे त्या मुलांशी आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधणे सोपे जाते. मुलांचे पालक नोकरी करत असल्यास आजी-आजोबा मुलांना सांभाळतात, त्यांना कदाचित इंग्रजी येत नाही किंवा अमेरिकन उच्चार समजत नाहीत, एखादे मूल दुसऱ्या थेरपी घेत असेल तर त्या थेरपिस्टसाठी दुभाषा म्हणून मी काम करते. सर्वसाधारपणे, ती मुले ऑटिस्टिक, गतिमंद, शारीरिक दृष्ट्या अपंग, मानसिक रोगी असतात. अशा वेळी त्यांना जन्मल्यानंतर लवकरात लवकर थेरपी देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न सर्वतोपरी सरकारकडून होतो. मी त्या सरकारी योजनेअंतर्गत काम करते.
गेली काही वर्षे दुभाषा म्हणून मी पुनर्वसन केंद्र (Rehabilitation center), मूल्यमापन (Evaluation of stroke patients), न्यायालये (Courts), वृद्ध संगोपन (Adult Care), इमिग्रेशन, राजकीय आश्रय ह्यांच्या मुलाखती, व्यसन मुक्ती, बाल शोषण (Child Abuse), घरगुती हिंसा (Domestic Violence) … वगैरे ठिकाणी, जेथे आवश्यकता असेल तेथे मराठी, हिंदी, गुजराती आणि उर्दू ह्या भाषांची दुभाषा म्हणून काम करते. माणसे ज्या अडचणीतून जातात, कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात- धडपडतात- गुन्हेगारीकडे वळतात- चुकीच्या निर्णयाचा बळी ठरतात ते पाहून मी अस्वस्थ होते.
परंतु शून्य ते तीन ह्या वयोगटांतील मुलांना बोलते करणे, त्यांच्या संवाद साधण्याच्या बाबतीत येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करून खेळाखेळांतून थेरपी देणे या प्रक्रियेत सतत सृजनशील असावे लागते; नाविन्याची कास धरून नित्यनवीन कल्पनांना सत्यात आणावे लागते; मुलांशी त्यांच्या वयाचे होऊन राहवे लागते. त्यावेळी स्वत:चे गेलेले बालपण परत जगता येते… तो आनंद अवर्णनीय असतो. मुलाचा पहिला प्रतिसाद हा अतिशय आनंददायी, यशदायी असतो. सृजनशीलतेकडे घेऊन जाणारा माझा हा व्यवसाय मला पासष्टाव्या वर्षीसुद्धा माझ्या जगण्याला अर्थ देतो. पासष्टाव्या वर्षाच्या आयुष्यात मागे वळून पाहताना माझ्या आयुष्याला योग्य मार्गावर नेण्यात भेटलेली माणसे ही माझी पुंजी आहे.
– पद्मिनी दिवेकर psdivekar@yahoo.com