बदनापूर संशोधन केंद्र हे अखिल भारतीय कडधान्य सुधार प्रकल्पातील एक प्रमुख केंद्र आहे. हे केंद्र जालना जिल्ह्यात येते. त्याचा कारभार मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत चालतो. तेथे महाराष्ट्रातील महत्त्वाची कडधान्ये, विशेषत: तूर, मूग, उडीद आणि हरभरा या पिकांवर संशोधन केले जाते. पैकी संशोधन केंद्रातील तुरीचे दीपाली हे वाण विलक्षण लोकप्रिय ठरले आहे. रोगप्रतिबंधक आणि जास्त उत्पादन देणारे सुधारित वाण म्हणून बी.डी.एन-1 आणि बी.डी.एन -2, बी.डी.एन-7 या ही जाती भारतात अग्रेसर मानल्या गेल्या आहेत.
केंद्राचे कृत्रिम पीकरोग चाचणी प्रक्षेत्र (म्हणजे चाचणी करण्यासाठी तयार केलेले शेत) हे भारतात मान्यताप्राप्त आहे. या कृषी संशोधन केंद्राबद्दल डॉ.स्वामिनाथन व डॉ.ए.बी जोशी यांच्यासारख्या शास्त्रज्ञांनी गौरवोद्गार काढले आहेत. सुजाण शेतकरी आणि देशीविदेशी पाहुणे यांनाही केंद्रातील संशोधन कार्याचा प्रत्यय आला आहे. शेतकऱ्यांनी तेथील पीक लागवडीचे तंत्र अजमावून पाहिले आहे. बदनापूरच्या कृषी संशोधन केंद्रात पंधरा शास्त्रज्ञ विविध योजनांच्या अंतर्गत संशोधन करत आहेत. कर्मचारीवर्ग एकूण दीडशेच्या आसपास आहे.
बदनापूर कृषी संशोधन केंद्राचा आरंभ 1951 साली झाला. सुरुवातीला गहू, विशेषतः कोरडवाहू, जिरायती पिकांवर संशोधन करण्यात आले. पण बदनापूर येथील गहू तज्ज्ञ अधिकाऱ्यांचे प्रमुख कार्यालय नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे 1956 साली हलवण्यात आले. अर्थात तरीही बदनापूर संशोधन केंद्रामध्ये गहू, कापूस, ज्वारी आणि तेलबिया यांवर संशोधन सुरू आहे. तेथे संशोधलेला ‘अजिंठा बदनापूर 519’ या जातीचा गहू मराठवाडा विभागात मान्यता पावला आहे.
कडधान्य पिकाचे क्षेत्र मराठवाडा विभागात बरेच आहे. ते लक्षात घेऊन भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने बदनापूर संशोधन केंद्रावर काही जबाबदाऱ्या टाकल्या आहेत. तेथे अखिल भारतीय कडधान्य सुधार समन्वय प्रकल्प 1970 साली सुरू केला. कडधान्य पिकावरील संशोधन त्या प्रकल्पात चालते. महाराष्ट्र शासनाने तो प्रकल्प 1981 साली मंजूर केला. तसेच, केंद्र शासनाने संपूर्ण भारताचे पर्जन्यमान आणि जमीन यांवर आधारित (एम.ए.आर.बी.) केलेल्या विभागणीप्रमाणे बदनापूरच्या संशोधन केंद्राचा खात्रीलायक पर्जन्यमान विभागात समावेश होतो. त्यामुळे कडधान्य संशोधनाला बळकटी यावी म्हणून एक प्रकल्प 1985 साली सुधार समन्वय प्रकल्पाशी संलग्न केला.
बदनापूर संशोधन केंद्रावर पुढील प्रमुख योजना कार्यान्वित आहेत :
- गहू-ज्वार योजना (1951), 2. औरंगाबाद-बीड कापूस सुधार योजना (1952)
- गळीत धान्य अनुसुधार प्रकल्प (1970), 4. कडधान्य पीक योजना
- अखिल भारतीय समान्वित कडधान्य सुधार प्रकल्प (1970),
- अखिल भारतीय संशोधन प्रकल्प (एन.ए.आर.पी. 1985)
संशोधन केंद्राकडे एकशेएकेचाळीस हेक्टर जमीन आहे. त्यावर संशोधन प्रकल्प कार्यान्वित करणे आणि तूर, मूग, उडीद, हरभरा, ज्वारी, कापूस, तेलबिया व इतर पिके यांच्या बियाण्यांचे शुद्धतागुणन करणे ही प्रमुख कामे होत असतात. उपलब्ध जमिनींपैकी एकशेनऊ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे.
तूर हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे कडधान्य. देशाच्या एकूण तूर क्षेत्रापैकी चोवीस टक्के क्षेत्र महाराष्ट्रात आहे. परंतु, त्या पिकावर मर रोग ही कीड वारंवार त्रास देई. त्यावर उपाययोजना म्हणून केंद्राने ‘बदनापूर 1’ व ‘बदनापूर 2’ या जातींची लागवडीसाठी शिफारस 1977 साली केली. ते वाण कमी कालावधीत म्हणजे एकशेसाठ दिवसांत कापणीस येते आणि मर रोगास बळी पडत नाही. त्या दोन्ही वाणांपैकी ‘बदनापूर 2’ हे वाण प्रामुख्याने गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यांत लोकप्रिय झाले आहे. साठ ते पासष्ट टक्के तूर त्या वाणाखाली आहे. ‘प्रगती’ हे तुरीचे वाणही लोकप्रिय आहे.
केंद्र शासनाच्या योजनेनुसार राज्यातील परभणी, अकोला, अमरावती, यवतमाळ व वर्धा या जिल्ह्यांत शेतकऱ्यांना मार्गदर्शनपर विशेष पथदर्शक कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. बी.डी.एन.7 ही अधिक उत्पादन देणारी जात 1989 साली प्रसारित करण्यात आली. त्या बरोबरच नवीन बी.एस.एम.आर.175 ही, वांझ आणि मर या रोगांना प्रतिबंध करणारी; तसेच, तुरीचे अधिक उत्पादन देणारी जात विकसित करण्यात आली आहे.
मर रोगाचा प्रादुर्भाव तुरीप्रमाणेच हरभऱ्यातदेखील दिसून येतो. त्यास प्रतिबंधक म्हणून बदनापूर 9-3 हे वाण 1981 साली प्रसारित करण्यात आले. महाराष्ट्रात त्या वाणाची शिफारस कोरडवाहू लागवडीकरता करण्यात आली. त्यातून हेक्टरी वीस ते तीस क्विंटल उत्पादन घेता येणे शक्य झाले.
तूर व हरभरा ही केंद्राच्या संशोधन कार्यातील प्रमुख पिके असली तरी त्या व्यतिरिक्त मूग, उडीद, वाटाणा या पिकांवरही संशोधनकार्य हाती घेतले आहे. संशोधन केंद्रातर्फे मूग एस-8, उडीद टी-9, कुलथी, दिपाली; तसेच, वाटाणा रचना या वाणांची शिफारस करण्यात आली आहे.
संकलन – नितेश शिंदे 9323343406 niteshshinde4u@gmail.com
आधार : आपला जालना जिल्हा – भगवानराव काळे
————————————————————————————————————————-