फिलाडेल्फियातील गणेशोत्सव – ‘या सम हा’

0
57
carasole

लहानपणापासून आपण जे जे चांगले अनुभवले ते ते आपल्या मुलांना अनुभवायला मिळावे, ही आंतरिक इच्छा कमीअधिक प्रमाणात सर्व पालकांमध्ये दिसून येते. शिवाय, पुन:प्रत्ययाचा आनंद कोणास नको असतो? म्हणून वेळ मिळताच, आपण आपले व मुला-नातवंडांचे फोटोआल्बम काढून बघतो आणि गतकाळातील आठवणींत रमून जातो. गणपतीचे आणि शिवाजी महाराजांचे केवळ नाव घेताच उत्साहाचे भरते येणारी मराठी माणसे, निव्वळ व्हिडिओ किंवा फोटोंमध्ये गुंतून न राहता, त्यांची भावसृष्टी नाटके व उत्सव यांच्या माध्यमातून सातत्याने पुनश्च उभी करतात.

अमेरिकेतदेखील हे वेड कमी नाही. तीनशे वर्षांपूर्वी युरोपातून आलेल्या स्थलांतरित मंडळींनी येथे जागोजागी छोटी इटाली, छोटे आयर्लंड, नवे इंग्लंड स्थापन करून, येथील गावांना युरोपातील गावांची नावे देऊन गतकाळाशी धागा जोडला आहे. केवळ इतके करून थांबतील तर ते पक्के अमेरिकन कसले? अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धातील व अंतर्गत युद्धातील निवडक लढायांच्या जागी जंगलात जाऊन त्या लुटूपुटूच्या स्वरूपात का होईना, पुन्हा लढण्याचा व  अनुभवण्याचा छंदही हौशी मंडळी गेली कित्येक दशके जोपासत आहेत. अशा हौशी लोकांच्या सहवासात राहून, जात्याच उत्साही असलेल्या मराठी माणसांचे गुण द्विगुणित होणे हे ओघाने आलेच!

तशातच ‘डायव्हर्सिटी’च्या खुल्या अमेरिकन युगात तर जगातील अनेक देशांतून आलेल्या मंडळींना त्यांच्या त्यांच्या संस्कृतीचा जलसा साजरा करण्याचे प्रोत्साहन मिळते. त्यामुळे अमेरिकेत प्रत्येक शहरात उत्सव, मेळावे, नाटक व बॉलिवुड सिनेमे यांची धामधूम असते. येथील मराठी लोकही आपली संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी आपले सण-उत्सव साजरे करण्याचा प्रयत्न करतात… गणेशोत्सव साजरा करणारी काही मंडळेदेखील अमेरिकेत आहेत.
अमेरिकेतील दहा दिवसांचा पहिला गणेशोत्‍सवआम्हा फिलाडेल्फियाकरांचा ‘फिलाडेल्फिया गणेश फेस्टिव्हल’ मात्र केवळ ‘या सम हा’ असाच आहे. यंदा गौरवशाली नववे वर्ष साजरे करणारा हा गणेशोत्सव अमेरिकेतील पहिला, सर्वात मोठा दहा दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव म्हणून ओळखला जातो. शेजारच्या न्यू जर्सी राज्याइतकी दहा-बारा हजार कुटुंबे फिलाडेल्फिया भागात नाहीत. तरीदेखील असा मोठा उत्सव सातत्याने साजरा करण्याची कमाल आम्ही करू शकतो याचे श्रेय उत्सवाच्या सामाजिक आणि नैतिक अधिष्ठानाला आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व आर्षविद्या गुरुकुलचे संस्थापक आणि प्रख्यात वेदांत भाष्यकार स्वामी दयानंद सरस्वती यांच्या प्रेरणेने फिलाडेल्फिया गणेश फेस्टिव्हल २००५ साली सुरू झाला. फिलाडेल्फियाकरांनी २००४ साली झालेल्या महाभयंकर त्सुनामी प्रलयानंतर मदतकार्यासाठी बासष्ट लाखांचा निधी जमवला. त्यासाठी येथील भारतीयांना एकत्र आणताना मराठी, तेलगू, तामिळ, पंजाबी, गुजराथी अशा भाषिक संघटनांच्या पुढाऱ्यांना एकीचे बळ स्पष्ट जाणवले. १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीला जेमतेम पन्नास टाळकी, अशी तुरळक उपस्थिती दाखवणाऱ्या भारतीयांनी त्सुनामीग्रस्तांना मदत करण्याच्या उदात्त भावनेने भारावून जाऊन, हजारोंच्या संख्येने जमून भरघोस निधी जमवला. त्याच वर्षी, येथील भारतीय मंदिराच्या स्थापना उत्सवादरम्यान स्वामी दयानंदजींनी, भारतीय मंदिरांना केंद्रबिंदू मानून एकत्र होण्याने सर्वांची भौतिक, आध्यात्मिक व राजकीय प्रगती कशी होईल याचा मंत्र, येथील ज्युईश लोकांचे उदाहरण मांडून दिला. त्यामुळे वेगवेगळ्या भाषिक गटांमध्ये विखुरलेल्या भारतीयांना केवळ अधेमधे, नैसर्गिक आपत्ती आल्यावरच नव्हे तर दरवर्षी सातत्याने एकत्र आणण्याच्या हेतूने २००५ मध्ये फिलाडेल्फिया मराठी मंडळाचा विश्वस्त म्हणून मी मुकुंद कुटे व भारतीय मंदिराचे अध्यक्ष नंद तोडी यांच्या प्रयत्नांतून दहा दिवसांच्या भरगच्च अशा फिलाडेल्फिया गणेश फेस्टिव्हलची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. भारतीय मंदिराच्या प्रांगणात दरवर्षी उत्सव करण्याचे ठरले. प्रथम पूजनाचा मान असलेला व शैव, शाक्त, वैष्णव, अमेरिकन अशा सर्वांनाच भावला. ‘धर्मो रक्षति रक्षित:’ या वचनावर श्रद्धा ठेवून, गणेशभक्तांच्या सेवेतून गणेशाची सेवा व त्यातून सर्व भारतीय समाजाची प्रगती व कल्याण हे कार्यकर्त्यांचे ब्रीद ठरले.

पहिली राजधानी, पहिले रुग्णालय, पहिले प्राणिसंग्रहालय अशा अमेरिकेतील अनेक पहिल्यावहिल्या उपक्रमांसाठी प्रसिद्ध असलेल्या फिलाडेल्फिया शहराच्या भारतीयांना अमेरिकेतील पहिला दहा दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव यंदापासून सुरू होणार ही बातमी समजताच मदतीचा आणि कार्यकर्त्यांचा ओघ सुरू झाला. बघता बघता, पंधरा दिवसांत तेलगू, तामिळ, पंजाबी, गुजराथी, बालविहार आदी अकरा संस्थांनी आपापल्या सभासदांसमवेत उत्सवात सहभाग घेण्यास होकार दिला. मराठी मंडळाने तर एकतीस वर्षांपासून चालवलेला त्यांचा एक दिवसाचा गणपती उत्सवच या सार्वजनिक गणेश उत्सवात विलीन केला. सध्याच्या गणेशोत्सवाप्रमाणे रोषणाई वा देखावे न ठेवता, तेथील व विदर्भातील जुन्या गणपती उत्सवात ठेवत त्याप्रमाणे दरदिवशी संगीत, नकला, नाटके, नृत्य अशी काहीतरी एक सेवा गणरायाला अर्पण करण्याचे ठरले. सर्व भाषिकांना एकत्र बांधण्यासाठी एके दिवशी भरतनाट्यम, दुस-या दिवशी हिंदी वाद्यवृंदाचा कार्यक्रम, अन्य दिवशी कथ्थक नृत्य, कर्नाटकी व हिंदुस्थानी संगीत, ओडिसी, सिनेमा, मराठी-हिंदी-इंग्लिश नाटके अशा निरनिराळ्या कार्यक्रमाची आखणी झाली. धार्मिक कार्यक्रमांमध्ये अभिषेक, अथर्वशीर्ष, सहस्रावर्तन, अर्चना तसेच शैव परंपरेप्रमाणे आरतीपात्रातून नक्षत्रदीप व अलंकारदीपातून छत्र, चामर इत्यादींसह होणार राजोपचार यांचा सहभाग ठेवला.
गणेशाची आरासवर्षातून जेमतेम तीन दिवसच आणि तेही सुट्टीच्या दिवशी मंदिराकडे फ़िरकणा-या लोकांना दहा दिवस दररोज आकर्षित कसे करावे हा बिकट प्रश्न होता. चांगले कार्यक्रम होतेच; पण मराठी व गुजराथी माणूस तेलगू भाषिकांच्या कुचिपुडी नृत्याच्या कार्यक्रमाला का येईल, अशी शंका उभी राहिली. नोक-या करणा-या मंडळीना सायंकाळी घरचा स्वयंपाक करून, कामे आटोपून येणे दुरापास्तच. मात्र चांगल्या कामाला मदतीचा नाही तोटा, हेही खरे आहे. येथील लग्न कार्यालयाचे तेलगू मालक वेंकट रेड्डी यांनी पुढची तीन वर्षे गणेशोत्सवाच्या दहाही दिवस दररोज सर्वांना महाप्रसाद भोजन देण्याचे आश्वासन दिले. गणपती उत्सव, चांगले कार्यक्रम व सोबत दररोज महाप्रसाद भोजन यामुळे लोकांचा सहभाग वाढत गेला. पहिल्याच वर्षी पाच हजार लोकांनी उपस्थिती लावली. आमचा गणेशोत्सव गणपती दूध पितो किंवा नवसाला पावतो अशी अंधश्रद्धा वाढवणारी भूमिका टाळतो. आमच्या गणपतीला हि-यामाणकांची, जडजवाहराची नव्हे तर भक्तीची चमक आहे. भारतीय मूल्ये व संस्कृती आमच्या मुलांमध्ये रूजावी, स्वत:च्या आध्यात्मिक प्रगतीस गती मिळावी आणि भाषिक, राष्ट्रीय वा जातीय भेदभावविरहित सेवेतून गणरायाची पूजा बांधावी असा साधासरळ संदेश दिल्याने सार्वजनिक गणेश उत्सवाला गेली आठ वर्षे  लोकांचा भरभरून पाठिंबा मिळत आहे.

विविध भारतीय प्रांतांचे प्रतिनिधित्व करणारी माणसे एकत्र आल्याने उत्सव विविधतेने नटलेला असतो. अगदी गणपतीला वाहायच्या फुलपत्रींचे उदाहरण पुरेसे ठरेल! तामिळ भक्त चेन्नईहून विमानाने आपल्याकडे मारुतीला वाहतात त्या अर्क (तामिळ भाषेत इरूक्कू) झाडाच्या फुलांचे हार गणरायासाठी मागवतात. हैदराबादहून केवडा, पुण्याहून जास्वंद, फ्लोरिडाहून बेलपत्री व दूर्वा अशा गोष्टी मोठ्या उत्साहाने लोक मागवतात. प्रसादाचीही तीच त-हा. मराठी लोक उकडीचे किंवा गव्हाच्या कणकेचे मोदक आणतात. तामिळ/तेलगू मंडळी पुरणाचे मोदक व तिरुपतीच्या प्रसादासारखे लड्डू बनवतात. तर गुजराती, पंजाबी मंडळी थाळ्या भरून चुरम्याचे, बुंदीचे, रव्याचे लाडू आणतात. मंदिरातील गणरायाचा अलंकारही दररोज वेगवेगळा असतो. कधी फळांनी, कधी फळभाज्यांनी तर कधी हरित पत्री यांनी गणपतीला मढवले जाते. शिवाय – कधी हळदीने, कधी विभूतीने, कधी कुंकुम-लोणी-नवधान्य-नोटा-सुका मेवा-फुले यांनी गणपतीला सजवून सर्व चराचरात गणपती वसला आहे ही शिकवण देण्याचा प्रयत्न होतो.

ढोल ताशांच्‍या गजरात गणरायाचे स्‍वागतगणपती उत्सव करायचा म्हणजे ढोल-ताशांच्या तालावर नाचत-गात गणरायाची मिरवणूक आलीच! पुण्यात यशवंतराव नाईक यांच्याकडे ताशा वाजवण्यात तयार झालेल्या आमच्या एका कार्यकर्त्याने पंधरा दिवसांत पुण्याहून ढोल-ताशे मागवून बारा जणांचे पथक तयार केले. आता ख-या अर्थाने उत्सवाला महोत्सवाचे रूप आले. येथील आमिष सुतारांकडून पालखी बनवून घेतली. पेणहून दरवर्षी गणरायाची इको फ्रेंडली मूर्ती विमानाने मागवली जाते.. पुण्याच्या मुरुडकरांनी मिरवणुकीसाठी झेंडे, अबदागि-या बनवून पाठवल्या. तरुणाईला व शाळकरी मुलांना सामावून घेण्यासाठी मिरवणुकीचा चांगलाच उपयोग होतो. मात्र पालखी खांद्यावर घ्यायची तर भक्तिभावाने अनवाणी पायानेच चालले पाहिजे असा दंडक घातला गेला. गणरायाच्या स्वागतासाठी तीन-चार ठिकाणी पालखी थांबवून सहभागी, रविवारच्या हिंदूशाळांचे बालगोपाल विद्यार्थी नाचतात-गातात-फेर धरतात. मात्र तेथेदेखील पायघड्या घालून त्यावर अनवाणी पायांनी वावर असतो. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा या न्यायाने मग आबालवृद्ध, भगिनीवर्ग इत्यादी सर्वच लेझीम-झिम्मा-फुगडी या माध्यमातून लहानपणीचा आनंद पुन्हा लुटतात. अगदी आमचे अमेरिकन व्हिजिटर्सदेखील त्यात सामिल होतात. महाराष्ट्राच्या अनेक गावांतून उन्हाळ्यात मुलांना भेटण्यास येणारे आमच्या कार्यकर्त्यांचे आईवडील, निखळ भक्तिभावाने व कसलाही भेदभाव न बाळगता साज-या होणा-या या उत्सवाचे नेहमीच तोंड भरून कौतुक करतात. आताशा भारतात गणपती उत्सवामध्ये दारू पिऊन, येणा-या-जाणा-यांवर गुलाल उडवण्याच्या, छेडछाड करण्याच्या किंवा मुलींना धक्काबुक्की होण्याच्या तक्रारी फार वाढल्या आहेत असे कळते. सुदैवाने, आमचे कार्यकर्ते सर्व गणेशभक्तांमध्ये साक्षात गणपती बघून त्यांची सेवा करण्याचे भान ठेवतात, ही जमेची बाब आहे.

फिलाडेल्फिया मराठी मंडळाचा विश्वस्त मुकुंद कुटेदोन भारतीय माणसे एकत्र आली की भांडतात व तीन जण एकत्र आले की ते तीन वेगवेगळ्या संस्था काढतात, असे चेष्टेने म्हटले जाते. फाजिल अहंकार, भाईभतिजागिरी, आपल्या प्रयत्नामुळे दुस-याचे भले न सहन होणे, ही वैगुण्ये सर्वच समाजात आढळतात. त्यामुळे आमच्या उत्सवाचेही चार-पाच वर्षात बारा वाजतील अशी भीती काहींना होती. अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धाच्या काळापासून, एकत्र येऊन मोठे ध्येय साध्य करणे, विनावेतन समाजकार्य करणे, कामात शिस्त आणून चेक्स आणि बॅलन्स ठेवणे हे येथील नागरिकांमध्ये रुजवले गेले आहेत. आपल्याकडे वारकरी संप्रदायामध्येसुद्धा हे गुण दिसून येतात. त्यामुळेच वारीची परंपरा गेली कित्येक शतके सुरू आहे. त्यांच्यापासून हे गुण जर आपण शिकलो नाही तर दहा दिवसांच्या उत्सवाच्या फंदात पडूच नये असा इशारा पहिल्याच वर्षी कार्यकर्त्यांना दिला गेला. वर्गणीतून खर्च वगळता वाचणारा पैसा मंदिराला दान देण्याची परंपरा पहिल्याच वर्षी सुरू केल्याने पैशांमुळे होणारे वादविवाद उभेच राहिले नाहीत. दर दोन वर्षांनी गणेशोत्सवाची धुरा नवीन कार्यकर्त्याकडे दिली जाते व निवृत्त स्वयंसेवक पुन्हा लहान-मोठी कामे करतात व योग्य वेळी सल्ला देतात. लहान – मोठा असा भेद ठेवला जात नाही. वाचलेल्या पैशांतून दरवर्षी काही रक्कम अमेरिकेतील व भारतातील सामाजिक संस्थांना दिली जाते. उत्सवाच्या सर्व समित्यांच्या प्रमुखांना जमा खर्च दाखवला जातो. नवीन आलेल्या कुटुंबांना सामावून घेतले जाते. त्यामुळे हा गणेश उत्सव  म्हणजे कार्यकर्ते घडवण्याचा एक कारखानाच ठरला आहे. चार – पाच वर्षांत बारा वाजण्यापेक्षा गौरवशाली बारावे वर्ष साजरा करण्याच्या उंबरठ्यावर हा उत्सव उभा आहे!

उत्सवाच्या भावनेशी प्रामाणिक राहिल्याने त्याचा परिणाम एक-दोन वर्षांमध्येच दिसू लागला. आयपॉड, गेम बॉय आणि वी मध्ये मग्न असलेली आमची मुले चक्क आरत्या गुणगुणतात, भारतीय संस्कृती व अमेरिकन संस्कृती यांमध्ये ओढाताण सहन न होऊन अंतर्मुख झालेली मुले जोराने ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणून आरोळ्या ठोकताहेत, भारतीय मित्र जमवताहेत, रविवारच्या भाषिक शाळेत मारून मुटकून कशीबशी जाणारी मुले आता मंदिरात कधी जायचे म्हणून लकडा लावताहेत, इत्यादी बदल पाहून पालकही मे महिन्यापासूनच उत्सवाच्या तयारीत सहभागी होतात व त्यांच्या आचरणातून मुलांनाही सेवेचे महत्त्व दाखवून देतात. अमेरिकेमध्ये लग्नांना बहुतेक मोठ्या माणसांनाच बोलावले जाते; मुलांना घेऊन जाऊ नये असा संकेत आहे. भारतीय लोकसुद्धा त्याचे अंधानुकरण करतात. अगदी शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांनादेखील मुलांना आणू देत नाहीत. आमच्या गणेश उत्सवात मात्र मुलांना मुक्त प्रवेश असतो. आतबाहेर होतात; मात्र मुलांवर संस्कार हे उत्सवाचे ध्येय असल्याने तो त्रास खपवून घेण्याची विनंती पं. राजन साजन मिश्रांसारखे मोठे कलाकारदेखील आनंदाने मान्य करतात. यंदा उत्सवात गणेश विवाह कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे मुलांना विवाहात होणारे विधी, त्याची महत्ता यांचा उलगडा होईल व पुढील आयुष्यात त्याचा निश्चितच उपयोग होईल असा विश्वास आहे. अर्थातच गणपतीला दोन बायका का? आताच्या कायद्याप्रमाणे एकच का नाही? मुलांकडून येऊ घातलेल्या अशा अनेक महाकठीण प्रश्नांची समर्पक उत्तरे शोधण्यास आत्ताच लागलेले बरे!

मुकुंद कुटे,
इमेल – mukund.m.kute@gmail.com

About Post Author