प्रवास शब्दांचे आणि अर्थांचे

शहाणे शब्द

नंदिनी आत्मसिद्ध या बहुभाषाविद्वान आहेत. त्यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत या भाषांवर प्रभुत्व आहे. त्याचबरोबर त्यांचा कन्नड, बांग्ला, उर्दू आणि फार्सी या भाषांचाही अभ्यास आहे. त्या ‘मोगरा फुलला’च्या वाचकांसाठी शब्दांच्या व्युत्पत्ती, त्यांचा प्रवास याविषयी लिहिणार आहेत. या मालिकेचे शीर्षक आहे ‘शहाणे शब्द’. त्यातला हा पहिला लेख.

प्रवास शब्दांचे आणि अर्थांचे

आपण भारतीय मंडळी मुळातच बहुभाषक असतो. आपली मातृभाषा, इंग्रजी, हिंदी या भाषा तर आपल्याला येतच असतात शिवाय आसपास बोलली जाणारी दुसरी एखादी भाषा आपल्या परिचयाची बनते. थोडीफार समजायला लागते. संस्कृत भाषाही अनेकांना शाळेत शिकल्यामुळे माहीत असते. महाराष्ट्रापुरतं बोलायचं, तर आपलं राज्य हे गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश यांच्या शेजारातलं. हिंदीचं साहचर्यही आपल्याला लाभलं आहे. हिंदीमुळे तिची बहीण म्हणावी अशी उर्दू भाषा कधी परकी नव्हतीच. आपली चित्रपटसृष्टीही हिंदीसोबत नकळत उर्दूचे धडे देतच असते. उर्दू भाषेचा इतिहास पाहिला, तर ती जनसहभागातून निर्माण झालेली एक अर्वाचीन भाषा आहे. उर्दू या शब्दाचा अर्थ सैन्याचा तळ असा आहे. दिल्लीतल्या मुसलमानी राजवटीत तिचा जन्म झाला. पठाण, मुगल, इराणी, अरब असे विविध लोक पूर्वी भारतात येऊ लागले व परस्परसंपर्काची एक भाषा त्यांच्या आपसातील संभाषणातून तयार होत गेली. तिला स्थानिक खडी बोलीचा आधार मिळाला व त्यातून उर्दू ही भाषा निर्माण झाली. मात्र ती कारभाराची भाषा कधीच झाली नाही. सुरुवातीला तिला तेवढी प्रतिष्ठाही नव्हती, पण हळूहळू तिचा प्रसार होत गेला. मुस्लिम, हिंदू, शीख, ख्रिस्ती अशा सर्वांनीच तिला आपलंसं केलं. इथल्या जनमानसात फार्सी भाषेचं महत्त्वाचं स्थान नेहमीच राहिलं. उर्दू साहित्य व विशेषतः शायरी भारतातच नव्हे, तर जगभरात अनेकांना वेड लावणारी ठरली. आजही उर्दू भाषेचे व तिच्या नज़ाकतीचे चाहते कमी झालेले नाहीत.

उर्दू शिकताना अरबी व फार्सी भाषांमधले शब्द वारंवार समोर येतात. पण उर्दू शायरी व हिंदी चित्रपटगीतांची जवळीक असली, तर त्यातले बरेचसे शब्द ओळखीचेही असतात. उर्दूचा मुख्य आधार असलेल्या अरबी व फार्सीया दोन्ही भाषांची लिपी एकच आहे. लिहिण्याची पद्धत किंचित इकडे तिकडे असेल-नसेल, अशी. अर्थात फ़ारसीची मूळ लिपी वेगळी होती आणि अरब आक्रमणानंतर अरबी लिपी फार्सीवर लादली गेली. मात्र एक आहे, इराण्यांनी अरबी लिपी स्वीकारली, पण आपली भाषा तीच ठेवली. तेथील राज्यकारभारासाठी अरबांना फार्सी आत्मसात करावी लागली…

भारतासारख्या विशाल देशात कैक भाषा आणि त्यांच्या लिपी आहेत. पैकी बहुतेक देवनागरीवर आधारित असल्या, तरी त्या सहजपणे वाचता येत नाहीत. फार्सी भाषाही म्हणून मराठी माणसाला अपरिचित असली, तरी अनेक शतकांच्या कारभारातील वापरामुळे त्यातले बरेच शब्द आपल्या ओळखीचे असतात. इतकंच काय, पण ते आपण वापरतही असतो. थोडा अर्थ इकडे-तिकडे. मराठी भाषेत आज इंग्रजी शब्दांचा सुळसुळाट झाला आहे, अशी तक्रार केली जाते. पण मराठीतले सत्तर-पंच्याहत्तर टक्के फार्सी शब्द थेटपणे आहेत, हे सांगितलं तर आश्चर्य वाटेल. म्हणजे पूर्वी फार्सी ही आजच्या इंग्रजीच्या स्थानी होती. मराठीत त्यातले शब्द बेमालूमपणे मिसळले. असे बरेच शब्द फार्सी अभ्यासताना कधी त्याच अर्थाने तर कधी वेगळे अर्थ-संदर्भ घेऊन समोर येतात, तेव्हा खूप मौज वाटते. ‘कमी, बदल, तयारी, तारीख, बाकी, मलूल, माल, दररोज, पैदा’ हे आणि असे नेहमीच्या वापरातले कैक शब्द फार्सीतून आले आहेत. पण आपल्याला त्याची कल्पना नसते… दुसरीकडे, भारतीय भाषा फार्सीप्रमाणे इंडो आर्यन गटातल्या. फार्सीची पणजी शोभणारी, इराणमधली जुनी अवेस्ता भाषा व वेदकालीन संस्कृत या समकालीन होत्या, त्यामुळेही परस्पर सांस्कृतिक व भाषिक प्रभाव पडला असावा. मुस्लिम राजवटींमुळे तत्कालीन सरकारी चाकरीसाठी ती भाषा शिकून घेणं आवश्यक बनलं. कायदेशीर कागदपत्रांसाठीही ती अनिवार्य बनली. दक्षिणेत इस्लामी राजवट स्थिरावल्यावर इस्लामी कला, कारागिरी व स्थापत्यशास्त्र, शस्त्रनिर्मिती वगैरे गोष्टींमुळेही फार्सीचा वापर वाढला. या क्षेत्रांमधील फार्सीशब्द मराठीत सामावले गेले. फर्मान, ज़मीनदार, कारकून, सवार, हरामज़ादा, रोशन असे अनेक शब्द मराठीत आले. वकील, इरादा, बाग, पोशाख, अंदाज हे शब्दहीही तिथूनच आले. फार्सी शब्द हळूहळू रोजच्या भाषेतही रूळले… मराठीत मराठी व संस्कृत भाषेतील शब्द असावेत, फ़ारसीचा प्रभाव असू नये, असा आग्रह अनेकांनी धरला. काही शब्द तयार करून (‘सिद्ध’ करून म्हणायला हवं…) रूढ करण्याचा प्रयत्नही केला. पण असे किती शब्द बदलणार? नी स्वीकारले जाणार? एकदा लोकांनी शब्द स्वीकारले, की ते त्या भाषेचेच होऊन जातात, आपण त्यांना आपल्या भाषेचा वेश चढवून वापरतो, हे आपण विसरूनच जातो.

भाषांमधली अशी नाती व बंध लक्षात आले, की एकूणच मानवी व्यवहारांच्या परस्परसंबंधांचा उलगडा झाल्याप्रमाणे वाटतं. सांस्कृतिक जवळीक कशी शतकांपासून चालत आली आहे, याचं नव्याने भान येतं. मला हा आनंद विशेषतः फार्सी शिकताना मिळाला. सुदूर पसरलेला प्राचीन भारत व त्याचे तेव्हाचे शेजारी देश, यामुळे जी सांस्कृतिक व भाषिक साम्यस्थळं आजही टिकून आहेत, ती लोभस वाटतात.

कोणतीही भाषा शिकताना केवळ भाषाच तेवढी शिकायची, असं होत नाही. कारण भाषा ही एक स्वतंत्र गोष्ट नाही. तिला इतर अनेक गोष्टी चिकटलेल्या असतात. इतिहास, संस्कृती, धर्म, सामाजिक बाबी नि आणखीही बरंच काही. दुसऱ्या भाषांशी प्रत्येकच भाषेचे संबंध आलेले असतात. त्यांचा अन्वयार्थ लावताना मजा येते. फार्सीवर अरबी भाषेचाही प्रभाव आहे. त्यामुळे अनेक अरबी शब्द फार्सीत गेले आहेत आणि आपल्याकडील भाषांमध्ये ते फार्सीच्या माध्यमातून आले आहेत. माधवराव पटवर्धन यांनी फार्सी-मराठी कोशाच्या प्रस्तावनेत असा उल्लेख केला आहे. इतर भाषांचाही मराठीवर थोडाफार परिणाम घडलाच आहे. मराठीचाही इतर भाषांवर घडला असेल. असं विविध भाषा-शब्दांमधलं नातं आणि संबंध समजण्यातला आनंद काही वेगळाच असतो. भाषा ज्या शब्दांनी बनते, त्या शब्दांचा आणि त्यांना चिकटलेल्या अर्थांचा प्रवासही तितकाच गमतीदार असतो. विविध शब्दाचं अस्तित्व अनेकदा मनाला चकित करत राहतं.

शब्दांच्या या प्रवासाला निघण्यापूर्वी शब्दांना वाहिलेली नि अर्थात शब्दांचीच बनलेली एक कविता-

कागदाचे कपटे लीलया भिरकावून द्यावेत,
तसे शब्द भिरकावता येत नाहीत.
आकाशाला अनावर सुचणाऱ्या पावसाप्रमाणे,
ओसंडणाऱ्या शब्दांना अडवणंही अशक्यच असतं.

‘अनादि’ आणि ‘अंत’
हे शब्द आता फारच जुने झालेत.
तरीपण
शब्दांना वय नसतं.

चिरंजीव शब्द
अर्थागणिक
मरणाला सामोरे जातात.

जेव्हा लहर येते तेव्हा,
निरर्थकतेचं कफन ओढून
शब्द खुशाल झोपी जातात.

– नंदिनी आत्मसिद्ध 9920479668 nandini.atma@gmail.com
———————————————————————————————-

About Post Author

9 COMMENTS

  1. खूप दिवसांनी तुझा लेख वाचला. खूप छान! तुला आणि सुनंदाला धन्यवाद. ती मला आठवणीने link पाठवते.

  2. मराठीतील फार्सी, उर्दू शब्दांचा वावर हा एवढा सहजपणे झाला आहे की, आपण त्यास सरावलो आहोत. एखाद्या भाषा ही जितकी संमिश्र होत राहील, तेवढा तिचा विकास असतो. लेख आवडला आहे.

  3. अप्रतीम माहिती आणि खूपच छान लेख नंदिनी. धन्यवाद ,👌👌👍

  4. झकास लेख.
    भाषा हा खरंच खूप मजेशीर असा विषय आहे .विशेषतः सीमेवरती राहणाऱ्या लोकांना दोन्ही बाजूच्या भाषा उत्तम येत असतात
    माझा एक मित्र कासारगौडला राहत असे. त्याला मल्याळम कानडी तमिळ तुळू हिंदी इंग्रजी इतक्या भाषा सहज येत असत.
    ” इस्पिट होघाडलास नव्हं ? असं म्हणून लहानपणी माझी आजी मला एक रट्टा देत असे .

  5. शब्द लेखा साठी आभार. शब्द व्युत्पत्ती हा औत्सुक्याचा विषय आहे. आपण ही भूक भागवत आहात. शतश: आभार.

  6. छान लेख.
    ‘शहाण्या शब्दां’च्या या संपूर्ण मालिकेबद्दल मनात फार उत्कंठा आहे.
    मनःपूर्वक आभार.

  7. शब्द आणि भाषा हा माझ्यासाठी कुतूहलाचा विषय आहे. ते कुठून आणि कसे आले हे समजून घ्यावे असे फार वाटत असे. त्यात हा लेख वाचनात आला आणि इच्छा पूर्तीचा योग आहे असे जाणवले. पुढच्या लेखाची वाट पाहत आहे

  8. खूप छान आणि माहितीपूर्ण लेख. पुढील लेखांची वाट पहाते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here