Home गावगाथा पुरोगामी विचारांचा वारसा – सासकल

पुरोगामी विचारांचा वारसा – सासकल

फलटण तालुक्यातील सासकल हे एक छोटेसे गाव. त्या गावातील ग्रामस्थ ग्रामविकासाबाबत सजग आहेत. पारंपरिक धर्मभावनेला आधुनिक विचारांची जोड देणाऱ्या सासकल या गावाने त्याचा ठसा क्रीडा क्षेत्रातही आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला आहे…

सासकल हे सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील दोन हजार लोकवस्तीचे गाव! ते फलटण-दहिवडी रस्त्यापासून आत दोन किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. ते फलटणपासून दहा किलोमीटरवर येते. वारुगड व संतोषगड हे किल्ले गावाच्या जवळ आहेत. गावाच्या तिन्ही बाजूंनी ओढे आहेत. पूर्वेकडील ओढा बांधोळा येथून निघतो. पश्चिमेकडील ओढा हा शंभू महादेव डोंगर रांगेच्या पायथ्याशी असणाऱ्या धुमाळवाडी या गावातून येतो. तो सर्वांत मोठा ओढा आहे. त्या ओढ्यावर तीन मोठे साकव (पूल) बांधण्यात आले आहेत. गावाच्या हद्दीत जुने असे दोन पाझर तलाव आहेत. तेही आमराई व बांधोळा तलाव या नावाने ओळखले जातात. ते 1972 च्या दुष्काळात रोजगार हमी योजनेतून तयार झाले.

गावाच्या पूर्वेकडील ओढ्यावर व पश्चिमेच्या ओढ्यावर असे दोन बंधारे महाराष्ट्र शासनाच्या वतीने बांधण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती बायजी जगताप यांच्या काळात पिंप्रद व सासकल या दोन गावांतील मागासवर्गीय समाजाकरता जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलसिंचन संस्था (सासकल)’ची स्थापना करण्यात आली होती. त्या योजने अंतर्गत स्वतंत्र विहीर खोदून त्यावर मागासवर्गीय समाजाच्या शेतजमिनीला जलसिंचनाची सोय करण्यात आली होती. परंतु सदर योजना संचालक मंडळाच्या अनास्थेमुळे बंद पडली आहे.

गावात बहुसंख्य मराठा समाज असून अधिकतर लोकांचे आडनाव मुळीक आहे. त्यांच्या खालोखाल बौद्ध समाजाचे प्रमाण असून त्यांचे आडनाव घोरपडे आहे, त्यानंतर धनगर समाजाची चांगण मंडळी आणि आडके व मदने हे रामोशी समाजाचे लोक गावात आहेत.

गावात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे नीरा देवधर आणि धोम बलकवडी या दोन धरणांचे पाणी ओढ्यांना सोडण्यात येते. माजी आमदार कै. चिमणराव कदम यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत गिरवी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना निर्माण करण्यात आली. दुधेबावी व भाडळी खुर्द यांच्यामध्ये मोठे तळे बांधून त्यावर पाणी शुद्धिकरण सयंत्र बसवले आहे. दुधेबावी‌‌‌‌‌ गण, कोळकी गट यांमधील सासकलसह इतर गावांना पिण्याचे पाणी पुरवले जाते. परंतु काही गावांमध्ये इतर पाणीपुरवठ्याच्या योजना झाल्यामुळे या गिरवी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेत विद्युत बील थकल्याने विद्युत पुरवठा खंडित होतो. त्यावर आता उपाययोजना म्हणून महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच महाऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथे भेट दिली असून सौर प्रकल्प बसवून त्यावर ही योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे सासकलसह आजूबाजूच्या इतर गावांवर अतिरिक्त वीजबिलाचा ताण पडणार नाही. त्यासोबत सासकल गावी कै. दादासाहेब मुळीक सरपंच असताना त्यांच्या पुढाकाराने बांधोळा येथील पाझर तलावाच्या खालील बाजूला सार्वजनिक विहीर खोदून त्या मधून गावाला पाणीपुरवठा होतो. त्याच विहिरीवर दलित वस्ती सुधार योजनेतून तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये खर्च करून ती योजना पुन्हा कार्यान्वित केली आहे. तसेच, गावात एक आड आहे, त्याचेही पाणी घरगुती वापरासाठी सोडण्यात येते.

सासकल ग्रामपंचायतीची स्थापना 1957 साली झाली. ग्रामपंचायत ही नऊ सदस्यांची मिळून बनलेली आहे. पंचायत राजव्यवस्थेमध्ये तालुका स्तर व जिल्हा स्तर यांमधील लोकप्रतिनिधी निवडणुकीसाठी गण आणि गट महत्त्वाचे असतात. त्यात पंचायत समितीचे गण व जिल्हा परिषदेचे गट आहेत. गावात दोन अंगणवाड्या एकात्मिक बाल विकास योजने अंतर्गत आहेत. पहिली ते सातवीपर्यंतची जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आणि आठवी ते दहावीपर्यंतचे माध्यमिक शिवशंकर विद्यालय अशा शाळा आहेत.

भैरवनाथ हे सासकलचे ग्रामदैवत आहे. गावात त्याशिवाय हनुमान, लक्ष्मीआई, कर्मयोगी अर्जुनतात्या, योगी बालकदास बाबा, दुर्गादेवी, मरीआई, पावतका, भवानी माता अशी मंदिरे आहेत. गावात रामनवमी ते हनुमान जयंती या कालावधीमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. अखंड हरिनाम सप्ताह हा 2022 सालचा वेगळा ठरला. कारण तो रौप्यमहोत्सवी कार्यक्रम होता. त्यामुळे तो साजरा करण्याच्या पारंपरिक पद्धतीत बदल करण्यात आला. त्या सप्ताहात ‘हरिनाम’ कार्यक्रमाबरोबरच वृक्षारोपण सोहळा साजरा झाला. त्यामुळे पारंपरिक धर्मभावनेला आधुनिक विचाराची जोड मिळाली. ती कल्पना रघुनाथ गणपत मुळीक यांची होती. ती गावाने उचलून धरली. अखंड हरिनाम सप्ताह संपला, की गावकऱ्यांना वेध लागतात ते भैरवनाथ यात्रेचे! गावात भैरवनाथ यात्रा, अखंड हरिनाम सप्ताह, आंबेडकर जयंती, शिवजयंती, गणेशोत्सव यांसारखे उत्सव आनंदाने साजरे केले जातात. पश्चिम महाराष्ट्रात शिखर शिंगणापूरची यात्रा ही अतिप्रसिद्ध! तेथे धार पडली, की फलटण तालुक्यातील व तालुक्याच्या आजूबाजूच्या गावांमध्ये एप्रिल-मे दरम्यान यात्रा-जत्रांना सुरुवात होते (शंभू महादेव डोंगर रांगेवर वसलेल्या शिंगणापूर येथील शंभू महादेव यात्रेत मानाच्या पाण्याने भरलेल्या कावडी मुंगी घाटातून वर येतात. त्या पाण्याचा अभिषेक महादेवाला घातला जातो. त्याला धार पडणे असे म्हणतात).

भैरवनाथ यात्रेसंबंधी आख्यायिका आहे. भैरवनाथ (काळभैरव) हे मूळचे काशिखंडाचे दैवत आहे असे मानले जाते. काशीमध्ये आधी काळभैरवाचे दर्शन घेतात आणि नंतर काशी विश्वेश्वराचे! सासकलचे ग्रामदैवत असलेले भैरवनाथ हे मूळ न्हावी भोगवली गावाचे आहेत. ते गाव सासकलपासून पस्तीस किलोमीटरवर आहे. ते माळी समाजातील ‘नाळे’ या सद्पुरुषांच्या भक्तीला भुलून सासकल गावी आले. गावात माळी समाजाची आठ घरे आहेत. सासकल गावातील हे नाळे सद्पुरुष अमावस्या, पौर्णिमा, रविवार आणि त्याशिवाय जेव्हा त्यांच्या मनात येईल तेव्हा न्हावी भोगवलीला भैरवनाथाच्या दर्शनासाठी जात. भैरवनाथाचे नाव ‘मंडोबा’ आहे असे त्या ठिकाणी मानले जाते. ‘नाळे’ यांनी एकदा दिवसभर खूप काम केल्यानंतर रात्री त्यांच्या मनात विचार आला, की न्हावी भोगवलीला भैरवनाथांच्या दर्शनाला त्या समयीच जावे. त्यांनी भोगवलीच्या मार्गाने खांद्यावर धोतर, हातात तांब्या घेऊन अमावस्येच्या रात्री सोसाट्याचा वारा, जोरदार पाऊस अशा परिस्थितीत चालण्यास सुरुवात केली. त्याच वेळी त्यांनी मनात भैरवनाथांचा धावा केला आणि त्याला सांगितले, की “हे भैरवनाथा, मी तुझा भक्त आहे. तुझे दर्शन व्हावे एवढीच इच्छा आहे!” नाळे जेव्हा नीरा नदीकाठी आले तेव्हा नदी दुथडी भरून वाहत होती. त्यांनी भैरवनाथाचे नाव घेऊन नदीत उडी मारली आणि ते सुखरूप नदीच्या पैलतीरी पोचले! नाळे यांना मनोमन असे वाटले, की ते केवळ भैरवनाथांच्या कृपादृष्टीमुळे मंदिरात सुखरूप पोचले! भैरवनाथांनीही त्यांना तेथे दर्शन दिले. नाथ गालातल्या गालात हसून म्हणाले, “भक्ती म्हणजे सुळावरची पोळी याची आज तुला खात्री पटली. अरे वेड्या, तू घरातून निघालास तेव्हापासून मी तुझ्याबरोबर होतो! तुला जे हवे असेल ते माग, मी तुझ्यावर प्रसन्न आहे!” त्यावर नाळे म्हणाले, “देवा, मला संपत्ती नको. मला फक्त तू हवा आहेस आणि तुझी सेवा माझ्या हातून घडू दे.” त्यावर भैरवनाथ म्हणाले, “ठीक आहे. मी येतो तुझ्याबरोबर! फक्त, तू मागे वळून पाहू नकोस. मी उद्या सकाळी कुंभारटेक (सासकल गावातील भैरवनाथ मंदिर जेथे आहे ते ठिकाण) येथे प्रकट होईन! तेथेच तू माझी सेवा कर!”

नाळे माळी निघाले. सासकल गावाजवळ आल्यावर त्यांच्या मनात विचार आला, की भैरवनाथ मागून येत आहेत ना ते पाहवे. म्हणून त्यांनी त्यांची मान हळूच मागे वळवून भैरवनाथांना पाहण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी भैरवनाथ गुप्त झाले आणि तेथे त्यांची पावले उमटली. म्हणून त्या ठिकाणाला ‘पावतका’ असे म्हणतात. दरवर्षी त्या ठिकाणी भैरवनाथ व जोगेश्वरी देवी यांचा विवाहसोहळा साजरा होतो. प्रथेप्रमाणे, सप्तमीला हळद आणि अष्टमीला विवाहसोहळा पार पडतो. त्यावेळी सासकलचे भैरवनाथ व भाडळी बुद्रुक येथून जोगेश्वरी देवीची सासनकाठी येते. तो मान भाडळी बुद्रुक गावच्या डांगे परिवाराला आहे. नंतर दुसऱ्या दिवशी बकरी पाडतात (देवाला बकऱ्याचा बळी दिला जातो) व त्यानंतर देवाचा छबिना म्हणजेच ग्रामप्रदक्षिणा निघते. छबिना नेत्रदीपक असतो.

नाळे हे देवाने सांगितल्याप्रमाणे सकाळी कुंभारटेक येथे देव प्रकट झाले ना हे पाहण्यासाठी गेले असता, त्यांना तेथे पाषाणातील मूर्ती, चाफ्याची ताजी फुले व अक्षता दिसल्या! त्यांनी तेथे भैरवनाथांची पूजा केली. कालांतराने सर्व समाजातील लोक भैरवनाथाची भक्तिभावाने पूजा करू लागले. ग्रामस्थांनी दगडी मंदिर, लाकडी मंडप, सभामंडप त्या ठिकाणी उभारला. मंडपात एक नंदादीप आहे. त्या नंदादीपामध्ये दिवा लावला जातो. ‘भैरवनाथ’ सासकल गावचे ग्रामदैवत झाले ते असे. गावकऱ्यांनी सभामंडप विद्युत रोषणाई करून सजवलेला आहे. तसेच, मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या लोकांसाठी व सभामंडपात होणाऱ्या कार्यक्रमांसाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत.

देवाची विधिवत पूजा नाळे माळी यांचे नातेवाईक फरांदे हे करतात. पूजा सकाळी पाच वाजता धूप, दीप, चंदन, सुवासिक फुले, हळदीकुंकू, गुलाल लावून केली जाते. पूजेच्या आधी भैरवनाथ व देवी जोगेश्वरी यांना पाण्याचा अभिषेक केला जातो. नंतर पूजेला सुरुवात होते. देवाला नैवेद्य सकाळी दहा वाजता दाखवला जातो. देवासमोर दिवा संध्याकाळी लावून त्या वेळी खडीसाखरेचा नैवेद्य दाखवला जातो. माळी समाजातील नाळे परिवार जरी उद्योग व्यवसायानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी विखुरला असला, तरी ते सर्व लोक भैरवनाथाचे दर्शन घेण्यासाठी अमावस्या, पौर्णिमा, अष्टमी, दसरा यांसारख्या दिवशी आवर्जून येतात.

यात्रेच्या काळात करमणुकीचे विविध कार्यक्रम असतात. देवाची पालखी पारंपरिक वाद्यांच्या सूरात निघते. वाद्यांच्या मागे सासनकाठ्या व त्यांच्यामागे पालखी असा क्रम असतो. प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे नियोजन केले जाते. कधी भारुड, तर कधी व्यसनमुक्ती युवक संघाच्या कलापथकाचा कार्यक्रम ठेवला जातो. भैरवनाथ व जोगेश्वरी यांच्या विवाह सोहळ्याच्या दिवशी गावकऱ्यांच्या मनोरंजनासाठी संध्याकाळी लावणी नृत्य (तमाशा) सादर केले जाते. कुस्त्यांचा फड शेवटच्या दिवशी रंगतो. कुस्त्या झाल्यानंतर पालखी पुन्हा वाजतगाजत मंदिरात नेली जाते. सुवासिनी देवांना ओवाळतात आणि गुलाल-खोबऱ्याची उधळण करत पालखी सोहळा दिमाखात निघतो. छबिण्यासाठी पालखी सकाळी साधारणतः सहा वाजता निघते आणि दुपारी बारा वाजता पुन्हा, गावाच्या मध्यभागी पारावार विसावते. त्यानंतर यात्रा कमिटी यात्रेचा जमाखर्च गावापुढे सादर करते आणि यात्रेची सांगता होते. गावामधील मनमोहक लेझीम पथक, नवरात्रातील टिपरी नृत्य यांचा प्रत्यय यात्रा व नवरात्र यांच्या काळात प्रामुख्याने येतो.

सासकल गावाने त्याचा ठसा क्रीडा क्षेत्रातही उमटवला आहे. गावातील भैरवनाथ व्हॉलिबॉल क्लबमधील खेळाडू आंतरराष्ट्रीय नावलौकिक प्राप्त आहेत. धीरज दत्तात्रय दळवी यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत संघाला दुबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय व्हॉलिबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून दिला. गावात विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटी, ग्रामपंचायत, नेहरू युवा मंडळ (आदर्शनगर), अर्जुनतात्या तरुण मंडळ, ओमसाई मित्र मंडळ, राजे उमाजी तरुण मंडळ, भिमाई वाचनालय व ग्रंथालय, शिवराज्य नवरात्र उत्सव मंडळ अशा विविध संस्था, संघटना, गट कार्यरत आहेत. गावातील सर्वसामान्य माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी व गावाच्या विकासासाठी आणि गावातील जैव विविधता व गौण खनिज यांचे संवर्धन, भ्रष्टाचारमुक्त राज्यकारभार करण्यासाठी सासकल जन आंदोलन समिती ही काम करते.

शेती हेच गावातील लोकांचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आहे. पिके वेगवेगळ्या ऋतूंनुसार घेतली जातात. डाळिंब, ऊस, मका ही नगदी पिके; तसेच, ज्वारी, बाजरी, गहू यांचेही पीक घेतले जाते. गावासाठी सात एकर गायरान आहे. त्यात रामोशी समाजबांधव वस्ती करून राहतात.

अर्जुनतात्या महाराज हे गावचे पुण्यपुरुष होत. त्यांचे वर्णन ‘जीवाचा जिव्हाळा चैतन्य पुतळा नित्य वसे निजधाम’ असे केले जाते. योगी पुरुष, निष्काम कर्मयोगी असेही त्यांच्याबद्दल म्हटले जाते. त्यांनी गावातच संजीवन समाधी घेतली आहे. ते पाटील घराण्याचे पूर्वज. अर्जुनतात्या महाराजांनी श्रद्धा-अंधश्रद्धा याच्या जंजाळापलीकडे जाऊन  मानवतेचा संदेश दिला. पाटील घराण्याच्या वतीने व सासकल ग्रामस्थांच्या उपस्थितीत भंडाऱ्याचा कार्यक्रम दरवर्षी होतो. त्या मंदिराचा जीर्णोद्धार, कलशारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठा असा सोहळा साजरा 2019 साली झाला. उत्सवाचा मुख्य हेतू लोकांनी एकत्र येऊन विचारविनिमय करावा, समाजात प्रेम-मैत्री-सद्भावना वृद्धिंगत व्हावी हा आहे. म्हणून त्या मंदिराला महत्त्व आहे. भाविक त्या ठिकाणी दर्शनासाठी येतात. नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेरगावी गेलेल्या लोकांना आपल्या मित्र मंडळींना भेटण्यासाठी व जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी यात्रा-जत्रा हे उत्तम माध्यम बनले आहे.

गावात राज्यस्तरीय व तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले माझ्यासह काही शिक्षक आहेत. त्यांत विजयकुमार चांगण, प्रा.डॉ.बाळासाहेब मुळीक, दतात्रय चांगण, वैशाली चांगण, राजश्री गायकवाड, कै.चंद्रकांत चांगण, सोपान मुळीक, राजेंद्रकुमार सस्ते, दत्तात्रय वारे, धनश्री वारे ही अन्य नावे सांगता येतील. गावाच्या रस्त्यांसाठी लढा देणाऱ्या लोकांमध्ये पद्मश्री लक्ष्मण माने, रामचंद्र घोरपडे, किरण घोरपडे, भानुदास घोरपडे, वाल्मिक मदने, लक्ष्मण मुळीक यांनी विशेष मेहनत घेतली. प्रकरण न्यायालयात घेऊन जावे लागले. सर्वांच्या प्रयत्नाला यश आले आणि गावाला न्याय मिळाला. रामराजे निंबाळकर यांच्या हस्ते त्या रस्त्याचे उद्घाटन झाले. सदर रस्ता गाव येण्या-जाण्यासाठी वापरत आहे! गावाच्या विकासासाठी कै.दादासाहेब ऊर्फ तुळशीदास तात्याबा मुळीक यांचे नाव आदराने घेतले जाते.

– सोमिनाथ घोरपडे 7387145407 sominathghorpade10@gmail.com

————————————————————————————————————————-

About Post Author

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version