पी. व्ही. मंडलीक : सार्वजनिक कार्याचा आदर्श (P V Mandalik- Doctor with socialistic ideals)

1
107

वासुतात्या मंडलीक यांच्या दोन मुलांनी नाव काढले- पैकी डॉ. पुरुषोत्तम वासुदेव (पी.व्ही.) मंडलीक यांनी मुंबईत प्रॅक्टिस केली आणि मोठे सार्वजनिक काम उभे केले. त्यांचा जन्म 1898 साली झाला. त्यांनी दापोलीच्या शाळेतून शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर, मुंबईत सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये, न्यायमूर्ती एम.सी. छागला दोन वर्षे त्यांच्यासमवेत होते. पी.व्ही. यांनी वैद्यकीय शिक्षणासाठी ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि ती परीक्षा 1924 साली पास होऊन त्यांनी खेतवाडी परिसरात आठव्या गल्लीच्या नाक्‍यावर वैद्यकीय व्यवसाय सुरू केला.

पी.व्ही. यांच्या आई-वडिलांनी त्यांचे लग्न त्या काळाच्या रीतिरिवाजाप्रमाणे दापोली तालुक्यातील हर्णे गावचे गोळे यांच्या मुलीशी ठरवले. डॉक्टरांचा त्या लग्नाला विरोध होता, कारण मुलगी फारशी शिकलेली नव्हती. पण ते लग्नाला तयार, वासुतात्यांच्या आत्महत्येच्या धमकीने आणि त्यांच्या मातोश्रीच्या आग्रहामुळे झाले. त्यांचे लग्न 1928 साली झाले. डॉक्टरांनी त्यांच्या पत्नीला त्यांच्या ओळखीच्या शिक्षिकेकडून इंग्रजीचे शिक्षण लग्नानंतर दिले. पुढे, त्यांना गिरगावातील म्हसकर सुतिकागृहात नर्सिंगचे शिक्षण देऊन उत्तम नर्स बनवले. त्यांनी निवृत्त होईपर्यंत तेथेच नोकरी केली. त्यामुळे त्यांना काम व स्वातंत्र्य दोन्ही मिळाले. डॉक्टरांनी आयुष्यभर त्यांचा उत्तम रीतीने सांभाळ केला. त्यांच्या निधनानंतरही पत्नीची उत्तम व्यवस्था होईल याची तजवीज केली.

डॉक्टरांची धाकटी बहीण सुभद्रा यांना लहानपणीच क्षयाची बाधा झाली. सुभद्रा त्या आजारातून वाचल्या, परंतु तज्ज्ञ डॉक्टर कोहियार यांनी त्यांना लग्न न करण्याचा सल्ला दिला. डॉ.पी.व्ही. यांनी बहिणीची सर्व जबाबदारी शेवटपर्यंत घेतली. त्यांनी त्यांच्या डेअरीत सुभद्रा यांना भागीदार केले होते. त्या डेअरीच्या दुधाचा हिशोब ठेवण्याचे काम करत. डॉक्टरांचा दृष्टिकोन महिलांना समानतेने आणि स्वतंत्रपणे काम करण्यासाठी वाव देण्याचा कायम होता. त्यांच्या मोठ्या दोन बहिणींच्या मुलांचे शिक्षण, लग्नकार्य करून देण्याचे काम डॉ. पी.व्ही. आणि डॉ. जी.व्ही. (आप्पा) यांनी आत्मीयतेने केले. ती जबाबदारी फार मोठी होती.

संबंधित लेख –
दापोलीचे सुजाण मंडलीक घराणे

रावसाहेब मंडलिक – अव्वल इंग्रजी अमदानीतील रामशास्त्री
जी.व्ही. – आप्पा मंडलिक – गरिबांचे डॉक्टर

पी.व्ही. यांनी स्वातंत्र्य चळवळीत प्रत्यक्ष भाग घेतला नसला तरी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणारे अच्युतराव पटवर्धन, साने गुरुजी, एसेम, अरुणा असफअली भूमिगत असताना त्यांच्याकडे येत-जात असत. डॉक्टर भूमिगतांना लागणारी मदत करत. सर्व पटवर्धन बंधू आणि एस एम हे डॉक्टरांचे जवळचे मित्र झाले, अगदी शेवटपर्यंत.

डॉक्टरांनी काही बंधने आयुष्यभर पाळली. त्यांपैकी वर्षानुवर्षे गार पाण्याची आंघोळ, घोंगडीवर झोपणे, भरपूर व्यायाम, वक्तशीर रूग्णभेटी, संमोहनतज्ज्ञ म्हणून काम करणे आणि निर्व्यसनीपणा ही होत. डॉक्टर होमगार्डमध्ये अधिकारी म्हणून अनेक वर्षे कार्यरत होते. डॉक्टरांनी कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून 1924 ते 1948 ही दोन तपे राष्ट्रसेवा साधना केली. भगिनी सुभद्रा ऊर्फ मावशी यांचे त्यांना त्या कामात सहाय्य झाले. मावशींनी स्वतः घराची सर्व जबाबदारी हाती घेतली होती. डॉ.बाबा कलगुटकर डॉक्‍टरांना दवाखान्यात मदतनीस म्हणून आले होते.

डॉक्टरांना राजकारणात रस होताच. ते कौटुंबिक जबाबदारी कमी झाल्यावर, 1952 साली मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. ते पाच वर्षे जबाबदार व कार्यक्षम नगरसेवक म्हणून मुंबई महापालिकेत कार्यरत होते. संयुक्‍त महाराष्ट्राचा लढा 1955/56 मध्ये सुरू झाला. डॉ. मंडलीक 1957 सालच्या विधानसभा निवडणुकीत, दापोली-मंडणगड मतदार संघातून प्रजासमाजवादी पक्षातर्फे उभे राहिले आणि मोठ्या मताधिक्याने निवडून आले. त्यामध्ये त्यांचे धाकटे बंधू डॉक्टर आप्पा (जी.व्ही.) व त्यांच्या पत्नी शैला या दोघांचे अपार कष्ट कामी आले. डॉक्टरांनी विधानसभेची निवडणूक दापोली-गुहागरमधून 1962 साली लढवली आणि ते निवडून आले. त्या वेळीही डॉक्टर आप्पा व शैला या दोघांचे संघटनाचातुर्य आणि अनमोल सहाय्य त्यांच्या कामी आले.

डॉक्टरांनी त्यांच्या प्रश्नोत्तरांनी विधानसभेतील दहा वर्षे गाजवली. डॉक्टरांनी विधानसभेत विचारलेल्या प्रश्नांचा अभ्यास केला तर त्यांना भूगोलाच्या किंवा विषयाच्या मर्यादा नव्हत्या. नागपूर-भंडाऱ्यापासून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व कोकण अशा सर्व भागांतील अनेक अडचणींना, समस्यांना, शासनाच्या नाकर्तेपणाला मंडलीक यांनी विधानसभेत तोंड फोडले. डॉक्टर मुंबईच्या खेतवाडी परिसरातून 1967 साली निवडणुकीसाठी उभे राहिले. पण निवडून येऊ शकले नाहीत. ते समाजवादी विचाराच्या अनेक संस्थांशी जोडलेले होते. डॉक्टर हे राष्ट्र सेवा दल, साधना साप्ताहिक, युसूफ मेहरअली विद्यालय, ताडदेवचे जनता केंद्र, देवरुखचे मातृमंदिर, दापोलीचे ए.जी. ऊर्फ आल्फ्रेड गँडने हायस्कूल या संस्थांचे मोठे आधारस्तंभ होते. डॉ. पी.व्ही. मंडलीक यांना मूलबाळ नव्हते, परंतु त्यांनी सर्व कुटुंबाकडे बारीक लक्ष ठेवले. ते मंडलीक कुटुंबाचा आधार होते.

इंदिरा गांधी यांनी 26 जून 1975 रोजी आणीबाणी लादून अनिष्ट पाऊल उचलले. डॉक्टरांनी त्या आणीबाणीच्या काळात किती आघाड्यांवर कसे काम केले हे पाहणे हे उद्बोधक आहे. डॉक्टरांचे स्थानबद्धांना भेटणे, त्यांना व त्यांच्या नातेवाईकांना वैद्यकीय मदत देणे, स्थानबद्धांना पत्रे लिहिणे, जेपी यांच्या तब्येतीची काळजी घेणे व भूमिगतांना मदत करणे असे बहुविध कार्य सुरू होते. ‘राजबंदी परिवार सहायता निधी’बाबत पत्रक 1976 साली प्रसिद्ध झाले. नागरिकांनी त्यांच्या त्यांच्या ऐपतीप्रमाणे आर्थिक मदत करून राजबंदींच्या कुटुंबीयांचा योगक्षेम चालवण्यासाठी मदत करावी असे आवाहन प्रसिद्ध झाले. त्या आवाहनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. डॉक्टर मंडलीक यांचा पत्ता दिला होता. त्यामुळे टोपीवाला मँन्शनमध्ये छोट्यामोठ्या देणग्यांचा ओघ सुरू झाला. डॉक्टर मंडलीक यांच्यावर त्या निधीच्या वाटपाची जबाबदारी सोपवण्यात आली. ती फार मोठी जबाबदारी होती. कोणत्या स्थानबद्धाच्या घरी किती पैसे पाठवण्याची गरज आहे त्याबद्दल डॉक्टरांकडे पत्रे येत.

दरमहा साधारणपणे दहा ते बारा हजार रुपये राजबंद्यांच्या नातलगांना पोचत असत. डॉक्टरांच्या घरातील सर्वजण महिन्याच्या पंधरा तारखेपासूनच मनिऑर्डरचे फॉर्म्स लिहिण्यास सुरुवात करत. ज्या स्थानबद्धांच्या कुटुंबीयांना मध्यान्ह कशी भागवायची हा प्रश्न सतावत होता त्यांना महिन्याच्या एक तारखेच्या सुमारास हातात काही रक्कम पडत असे हे फार दिलासादायक वाटे. डॉक्टरांना आलेली कृतज्ञता पत्रे त्याचीच साक्ष देतात.

आणीबाणीनंतर, लोकसभेची निवडणूक होऊन सत्ता जनता पक्षाच्या हाती 20 मार्च 1977 साली आली. डॉक्टरांनी केलेली जयप्रकाशजींची सेवा, स्थानबद्धांशी संपर्क, भूमिगतांना सहाय्य व आणीबाणीतील स्थानबद्धांच्या कुटुंबीयांना केलेली आर्थिक मदत हे काम अनमोल आणि चिरंतन स्मृती ठेवून जाणारे होते. दुर्गा भागवत डॉक्टरांना जवळून ओळखत असत. डॉक्टरांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त झालेल्या गौरव सभेत त्या म्हणाल्या, “डॉक्टर म्हणजे द्रौपदीची थाळी आहेत. आणीबाणीत असंख्य संसार उद्ध्वस्त होऊ नयेत म्हणून ते दक्ष राहिले. त्यांनी त्यांच्या थाळीचा वारसा आम्हाला द्यावा.” डॉ.पी.व्ही. मंडलीक यांचे निधन 28 सप्टेंबर 1978 साली झाले.

नीला पटवर्धन 9869620946 patwardhanneela6@gmail.com

———————————————————————————————

About Post Author

1 COMMENT

  1. 1962,मी दाभोळ येथील शाळेत होतो,आणि मी त्यांच्या निवडणूक प्रचाराच काम केलं होतं।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here