पागोटे हे लांबलचक वस्त्र असते; म्हणजे कापडी पट्टाच तो. पागोटे डोक्याला गुंडाळतात. वस्त्र मस्तकाभोवती नुसते गोलाकार गुंडाळलेले असते. त्यालाच पटका, फेटा, रुमाल, साफा, कोशा, मंदिल, मुंडासे अशी अन्य नावे आहेत. जी प्राचीन शिल्पे मरहूत, भाजे, बोधगया, सारनाथ, सांची, मथुरा इत्यादी ठिकाणी सापडली आहेत, त्यांतील स्त्रीमूर्तींच्या मस्तकांवर शिरोवेष्टने दिसतात. मात्र स्त्रियांचे शिरोवेष्टन चौथ्या शतकानंतरच्या शिल्पांत आढळत नाही. त्यांचा वापर त्यानंतर बंद झाला असावा. कालांतराने, भारतीय पुरुषांच्या शिरोवेष्टनाचे दोन प्रकार झाले – 1. एक पागोटे. म्हणजे प्रत्येक वेळी मस्तकाला गुंडाळून बांधण्याचे वस्त्र, व 2. पगडी. म्हणजे पागोटेच, पण ते विशिष्ट आकार-प्रकारात कायमस्वरूपी बांधून ठेवले गेलेले असते व ते तसेच डोक्यावर चढवले जाते.
निरनिराळ्या जातींचे व पेशांचे पुरुष पागोटी वेगवेगळ्या प्रकारे बांधतात व त्यांना भिन्न भिन्न नावे देतात. काहींची पागोटी खूप उंच व फुगीर असतात, तर काहींची घट्ट बांधलेली व बसकी असतात. त्यांच्या रूपांतही प्रदेशपरत्वे फरक असतो. पागोट्यांत व्यक्तिपरत्वेही अनेक रूपे होतात. मराठे लोकांच्या घट्ट बांधलेल्या पागोट्याला मुंडासे असे म्हणतात. संत तुकारामाचे पागोटे प्रसिद्ध आहे.
पागोट्याचा पृष्ठभाग एका बाजूला उंच व दुसऱ्या बाजूला उतरता असला, की त्याला पटका म्हणतात. त्याच्या दोन्ही बाजू उंच व मधील भाग खोलगट असला, तर त्याला फेटा म्हणतात. पागोट्याची एक बाजू कानापर्यंत खाली गेली असली, तर त्याला साफा म्हणतात. सरदार व संस्थानिक यांनी त्यांच्या फेट्यांचे त्यांना विविध आकार व रूपे देऊन अनेक प्रकार निर्माण केले आणि त्यांना कोशा, मंदिल अशी नावे दिली. महाराष्ट्रातील फेटा राजस्थानी फेट्याच्या मानाने लहान असतो. फेट्याच्या वस्त्राचे एक टोक मध्यभागी खोवून टाकलेले असते किंवा त्याचा तुरा काढलेला असतो व दुसरे टोक पाठीवर सोडलेले असते. राजपूतांसारखे लढवय्ये लोक तसा फेटा वापरत व त्याला एक रूबाब असे. तो नंबर त्यांच्या लष्करी गणवेशाचा घटकच बनवला गेला होता. पहिला बाजीराव स्वारीवर जाताना तसा फेटा बांधत असे. फेटा हाही प्रतिष्ठेचे प्रतीक ठरला आहे. रुमाल म्हणजे बारा हात लांबी-रुंदीचा कपडा घेऊन, तो व्यक्तीच्या एका कर्णाभोवती गुंडाळून बनवलेले पागोटे होय. तो डोक्याभोवती बांधल्यानंतर त्याचे कोणतेही टोक मोकळे राहत नाही. रुमाल व्यवस्थित बांधला असता, त्याला मागे, पुढे व बाजूंना टोके आलेली दिसतात. दक्षिण भारतात तशा प्रकारचा रुमाल बांधणे प्रचलित आहे. त्याला तमिळ भाषेत उरुमाली असे नाव आहे. त्यावरून रुमाल हा शब्द आला असावा. शिखांचा फेटाही रूमालाप्रमाणे डोक्याला विशिष्ट पद्धतीने बांधलेला असतो, तो मागे व पुढे निमुळता झालेला असतो. शीख मंडळी त्यासाठी रंगीत वस्त्र वापरतात. सर्वसामान्य लोक पांढऱ्या रंगाची पागोटी किंवा रुमाल वापरतात. मात्र ते सणा समारंभाच्या वेळी रंगीत व जरीचे रुमाल बांधतात. श्रीमंतांचे फेटे रेशमी व जरतारी असतात. त्यांच्या रचनेत प्रतिष्ठेप्रमाणे रुबाबही असतो. कुस्तीगीर, शाहीर अशा पुरुषांचे पटके तितके उंची नसले, तरी रुबाबदार व मोठे असतात. त्यांचे तुरे-शेमलेही सुंदर दिसतात. पटका एका बाजूला कललेला असेल तर तो अधिक शोभिवंत दिसतो.
– नितेश शिंदे
(भारतीय संस्कृति कोश – खंड पाचवरून उद्धृत, संस्कारित)
तुम्ही लिहिलेले सर्वच लेख…
तुम्ही लिहिलेले सर्व लेख फारच छान असतात. फक्त लेखकाचे नाव आणि संपर्कही जोडत जा बहुतेक वेळा तोच नसतो.
-राजेश दौंडकर
रुबाबदार, सुंदर दिसणे किन्वा…
रुबाबदार, सुंदर दिसणे किन्वा uniform म्हणून वापर ह्याशिवाय ऊन, वारे, थंडी ह्यापासुन संरक्षण हा पगडी, पटका वगैरेचा मुख्य उपयोग असावा. अर्थात हल्ली काही पुढारी वापरतात ते बुजगावन्यासारखे दिसतात. आपण दिलेली माहिती उपयुक्त आहे.