परतवाड्याचे सार्वजनिक वाचनालय

शंकर वामन गुरूजी यांनी परतवाड्यात वाचनप्रेमींना एकत्र आणून वाचनालयाची मुहूर्तमेढ 6 सप्टेंबर 1866 रोजी रोवली. त्या दिवशी गणेश चतुर्थी होती. त्याला दीडशे वर्षे होऊन गेली आहेत. वाचनालयाच्या स्थापनेत इंग्रज अधिकारी मेजर मॅकेन्झी यांचा पुढाकार होता. परतवाड्यात इंग्रज सैन्याची छावणी होती. तेथे इंग्रज अधिकारी असत. त्यांच्यापैकीच एक मॅकेन्झी. परतवाडा हे अचलपूरचे उपनगर म्हणावे असे गाव आहे. परंतु तेथील इंग्रज सैन्याच्या छावणीमुळे त्यास काही काळ महत्त्व अधिक लाभले. खुद्द अचलपूरचे वाचनालयही स्थानिक प्रयत्नांतून 1893 मध्ये सुरू झाले. त्यात स्थानिकांचा पुढाकार होता.

परतवाड्याचे वाचनालय बाजार आळीतील मोतीलाल चंपालाल यांच्या इमारतीलगतच्या एका कौलारू खोलीत सुरू झाले. त्या प्रयत्नांत गावकरीही सहभागी झाले- कोणी टेबल, कोणी बेंच, कोणी कपाट तर कोणी पुस्तके दिली. प्रकाशव्यवस्थेकरता खाण्याच्या तेलाचे दिवे ठेवले होते. ती जागा कमी पडू लागली तेव्हा गावकऱ्यांनी वाचनालयाची स्वतंत्र इमारत असावी म्हणून लोकवर्गणी गोळा केली. ब्रिटिश सत्तेचा सहभागही घेतला. वाचनालयाची इमारत 1881 मध्ये बांधली गेली. वाचनालय नव्या स्वतंत्र इमारतीत 27 मार्च 1882 रोजी दाखल झाले. मेजर मॅकेन्झी यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन समारंभ पार पडला. वाचनालयाची ती इमारत परतवाडा पोलिस स्टेशनलगत, नगरपरिषद हायस्कूलसमोर उभी आहे. प्रथम कार्यकारी मंडळात प्रमुख विठ्ठल बळवंत, नारायण बल्‍लाळ व कोषाध्‍यक्ष किसनदास साहू, अमरचंद जोधराज हे होते.

वाचनालयाचे नाव आरंभी ‘नेटिव्ह जनरल लायब्ररी’ असे होते. नंतर ‘मॅकेन्झी लायब्ररी’ असे नाव पुढे आले. त्‍याचे नामकरण सार्वजनिक वाचनालय, परतवाडा असे 1941 साली झाले. वाचनालयाची पूर्ण जबाबदारी शंकर वामन गुरूजी यांनी 1866 पासून सांभाळल्यानंतर मेजर मॅकेन्झी यांनी 1882 मध्ये तर मेजर रॉबर्ट्स यांनी 1900 मध्ये वाचनालयाचे अध्यक्षपद स्वीकारले होते. इमारतीच्या पूर्व व पश्चिम बाजूच्या दोन खोल्या, वऱ्हांडा व कंपाऊंड बांधण्याचे आणि आवारात झाडे लावण्याचे काम 1883 च्या सप्टेंबर अखेरपर्यंत ‘मेजर मॅकेन्झी’ यांच्या कारकिर्दीत केले गेले. त्या वेळी झालेल्या वृक्षारोपणापैकी कडुनिंबाची झाडे उभी आहेत. त्या इमारतीत भिंतीवर लागून असलेल्या धातूच्या एका जाड आयताकार प्लेटवर ‘दी मॅकेन्झी लायब्ररी, म्युनिसिपल हॉल, पब्लिक इन्स्टिट्यूट, बिल्ट, 1881’ असे कोरलेले आहे.

अचलपूर कॅम्प (परतवाडा) म्युनिसिपल कमिटीचे कार्यालय वाचनालयाच्या इमारतीत 1906 पर्यंत होते. ती कमिटी 1893 मध्ये अस्तित्वात आली. ‘रिक्रिएशन  लॉज’ नामक संस्था 1911-12 ते 1920 पर्यंत वाचनालयाच्या इमारतीतच होती. वाचनालयाच्या दिवाणखान्यात (हॉल) ‘बिलियर्ड’चे टेबल व आवारात ‘टेनिस कोर्ट’ होते.

वाचनालयाची नियमावली माधवराव मराठे यांनी 1895 मध्‍ये तयार केल्‍याचा  उल्‍लेख आहे. परंतु नियमांचे पुस्‍तक त्‍यावेळचे सचिव भालचंद्रपंत सहस्त्रबुध्‍दे यांनी 1920 साली छापून घेतले. त्‍यात काही अडचणी वाटल्‍यामुळे अण्णासाहेब अभ्यंकर, दादासाहेब कानेटकर, कृष्णराव खांडेकर, महाजन, सहस्त्रबुद्धे व खापरे वकील यांचा समावेश असलेली लोकसमिती वाचनालयाचा कारभार पाहण्यासाठी स्थापन झाली होती. समितीने वाचनालयाच्या नियमांत सुधारणा केल्या. अण्णासाहेब चिपळूणकर, महाजन आणि तात्यासाहेब धर्जन यांच्या समितीने त्या नियमांचे भाषांतर इंग्रजीत केले. ते सर्व काम 1932 पर्यंत चालू होते. त्या नियमांना रीतसर मंजुरी 1933 मध्ये मिळाली.

वाचनालयाचे युरोपीयन सभासदही असत. त्यांना वर्गणी दरमहा तीन रुपये आकारण्यात येत असे. इतर वर्गणीदारांचे चार वर्ग पाडण्यात आले होते- त्यांना वर्गणी अनुक्रमे दोन रुपये, एक रुपया, आठ आणे व चार आणे अशी होती. चार आणे वर्गणी देणाऱ्यांना फक्त वाचनालयात बसून कोणतेही पुस्तक वाचण्यास मिळे. त्या नियमांत 1922 मध्ये बदल केला गेला. तीन रुपये व दोन रुपये वर्गणी असलेल्या वर्गणीदारांना रोज एक वर्तमानपत्र घरपोच वाचण्यास मिळत असे.

वाचनालयाचे अध्यक्षपद ब्रिटिशेतरांनी दोन वेळा सांभाळले- 1941 पासून अॅडव्होकेट बाळासाहेब पांगारकर हे वाचनालयाचे अध्यक्ष तर आप्पासाहेब मुऱ्हेकर हे उपाध्यक्ष होते. दादासाहेब तोंडगावकर हे अध्यक्ष 1956 साली झाले. डॉक्टर पां.म. धर्माधिकारी हे अध्यक्ष म्हणून 1990 ते 2007 तर अनिल अभ्यंकर व दिवाकरराव कुळकर्णी यांनी दीर्घकाळ सचिवपदी मोलाचे योगदान दिले. 2007 नंतर बाळासाहेब मोरे अध्यक्ष तर धुंडीराज बर्वे हे सचिव म्हणून 2017 पर्यंत होते. सध्या बर्वे अध्यक्ष व गजानन देशपांडे सचिव आहेत.

वाचनालय हिंदी, इंग्रजी, मराठी, संस्कृत भाषांतील मासिके, ग्रंथ साहित्य, शब्दकोश आदींनी समृद्ध होते आणि आहे. एका उर्दू वर्तमानपत्रासह इंग्रजी नेटिव्ह ओपिनियन, मराठी बेळगाव समाचार, जगन्मित्र मासिक, केसरी, नवाकाळ, महाराष्ट्र, विजयी मराठा, संग्राम, टाइम्स ऑफ इंडिया, बॉम्बे क्रॉनिकल, हितवाद फॉर्वर्ड, अमृतबझार पत्रिका, लिबर्टी (कोलकाता), इंडियन स्टोरीलेटर, इंडियन डेली मेल, नागपूर मेल, वीकली टाइम्स, अलाहाबाद लीडर, गांधीजींचा यंग इंडिया, फ्री प्रेस, डेली एक्सप्रेस, मराठा, पायोनिर ही वर्तमानपत्रे वाचनालयात येत असत. मात्र जुनी वर्तमानपत्रे मागे पडली असून त्यांची जागा नव्या वर्तमानपत्रांनी घेतली आहे. वाचनालयातील पुस्‍तके केवळ वर्गणीदारांना दिली जातात, पण वर्तमानपत्रे/मासिके वगैरे सर्वांना मोफत वाचण्‍याकरता ठेवली जातात.

वाचनालयात जुने Charles Knight, Adam & Charles Black, Encyclopedia, World War History, विश्‍वकोश असे महत्त्वाचे दुर्मीळ ग्रंथ आहेत. तसेच वेद, उपनिषदे, तत्त्वज्ञान या संबंधीचे ग्रंथ उपलब्‍ध आहेत. दरवर्षी वेगवेगळया प्रकाशनांची पुस्‍तके विकत घेण्‍यात येतात. सध्‍या वाचनालयाची पुस्‍तक संख्‍या पंधरा हजारच्या वर आहे.

वाचनालयाचा शताब्‍दी महोत्‍सव 23 डिसेंबर 1966 ते 26 डिसेंबर 1966 या चार दिवसांत साजरा करण्‍यात आला. त्‍यामध्‍ये न.र. फाटक, पु.भा. भावे, मधुकर केचे अशी मंडळी येऊन गेली. महाराष्ट्र शासनाचा शतायु ग्रंथालयाचा पाच लाखांचा पुरस्कार वाचनालयास 11 मे 2006 रोजी मिळाला आहे.

वाचनालयाने एकूणच वाचनाबरोबर व्याख्यानांची संस्कृती जोपासली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर, वीर वामनराव जोशी, दादासाहेब खापर्डे, शिवाजीराव पटवर्धन, दादा धर्माधिकारी, राम शेवाळकर, गजानन कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवरांची व्याख्याने वाचनालयात झाली आहेत. अजूनही वाचनालयात व्याख्यानमाला आयोजित केल्या जातात. परंतु एकूण वाचन व व्याख्याने याबद्दल समाजात औत्सुक्य राहिलेले नाही. कोरोनामुळे त्यासाठी चांगले निमित्त तयार झाले. लोक एकमेकांना भेटण्यापासून दूर राहू लागले. वाचनालयाचे सध्या पन्नास आजीव सभासद व शंभर मासिक वर्गणीदार आहेत. त्यांचा कलदेखील एकदम चारपाच पुस्तके घेऊन जाण्याकडे असतो. त्यामुळे ते आठआठ पंधरापंधरा दिवस येत नाहीत. मराठी मासिके-साप्ताहिके बंद पडत आहेत. त्यांचा वाचकही कमी झाला आहे. फ्री रीडिंग रूममध्ये वर्तमानपत्रे वाचण्यास येणाऱ्या लोकांची संख्या घटली आहे. व्याख्याने योजण्याची हौस असते, पण वाचक पसंतीचे वक्ते मिळणे दुरापास्त असते.

शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष कार्यकारी मंडळाने 6 सप्टेंबर 2015 ते 10 सप्टेंबर 2016 साजरे केले. त्याचे उद्घाटन 3 ऑक्टोबर 2015 ला अमरावतीचे पालकमंत्री प्रविण पोटे यांच्या हस्ते रमेश बुंदीले व रंगलाल नंदवंशी यांच्या उपस्थितीत झाले.

वाचनालयाला सरकारी अनुदानाव्यतिरिक्त‍ उत्पन्न नव्हते. उत्पन्नाकरता संकुल बांधकाम करण्याचे ठरवले. अध्य‍क्ष डॉ. पां. म. धर्माधिकारी, अण्णाजी पार्डीकर व सचिव दिवाकरराव यांच्या नेतृत्वात ते संकुल उभे राहिले आहे. त्याचे लोकार्पण जन्माष्टमीला 14 ऑगस्ट 98 ला झाले. त्यामुळे वाचनालयाला मासिक उत्पन्न मिळू लागले. त्यातून बराचसा खर्च भागवला जाई. उत्पन्न अव्याहत सुरू आहे. गावामध्ये शारदा महिला मंडळ आहे. ते प्रभाताई पट्टलवार व मंगला बर्वे यांच्या नेतृत्वात सुरू आहे. त्यामार्फत प्रायमरी मराठी शाळा चालवली जाते. त्यांना इमारत नव्हती. त्यांच्या सोयीकरता इमारत बांधून देण्यात आली. तेही वाचनालयाच्या उत्पन्नाचे साधन ठरले आहे. शारदा महिला मंडळाला ऐंशी वर्षे पूर्ण झाली आहेत. शिक्षण क्षेत्राला मदत करण्याकरता वाचनालयाचे सदस्य अग्रेसर असतात.

वाचनालयास म्युनिसिपल कमेटी व सरकार यांच्याकडून अनुदान व संकुल भाडे असे दोन मार्ग वगळल्यास मोठे असे उत्पन्न नाही. वाचनालयाचा हॉल कार्यक्रमांकरता नव्या काळात लहान पडतो. वाचनालयाची जागा भरपूर आहे. तेथे प्रशस्त हॉल बांधला जाऊ शकतो. तसेच, काळानुरूप संगणकीकरण करणे, उच्च‍ शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकरता अद्ययावत साधनसामुग्री, डिजिटल लायब्ररी उपलब्ध करून देणे ही कामेही प्रलंबित आहेत. त्याकरता शासनाकडून स्वतंत्र निधी मिळावा अशी अपेक्षा आहे.

अचलपूर शहरातील वाचनालयही 1893 पूर्वीच अस्तित्वास आले. कारण स्थानिक शहर पालिकेने इमारतीकरता जागा 1893 साली दिली होती. बाबासाहेब देशमुख यांनी वाचनालयास इमारत असावी म्हणून पुढाकार घेतला होता. तेव्हाही लोकवर्गणी गोळा केली होती. नवी स्वतंत्र इमारत उभी राहिली. अचलपूर शहराच्या नव्या इमारतीतील वाचनालयाचे उद्घाटनही मेजर मॅकेन्झी यांच्याच हस्ते पार पाडले गेले. यावरून अचलपूर व परतवाडा या दोन्ही शहरांतील सांस्कृतिक जीवनात त्या दरम्यान मेजर मॅकेन्झी यांचे वर्चस्व असल्याचे दिसते. त्या वाचनालयाच्या एका हॉलमध्ये टेनिस क्लब होता. बाबासाहेब देशमुख यांनी स्वतः बरीच वर्षे त्या वाचनालयाचे काम पाहिले. वाचनालयाचे काम 1918 नंतर रावसाहेब देशमुख यांच्याकडे आले. त्या वाचनालयाच्या भरभराटीकरता राम शेवाळकर, कृ.वा. उर्फ दादा तारे, पुं.द.बारबुद्धे यांचे कार्यही उल्लेखनीय राहिले. त्या वाचनालयानेही व्याख्यानाची परंपरा जोपासली.

धुंडीराज बर्वे 9860199595

———————————————————————————————

About Post Author

8 COMMENTS

  1. आजही वाचनालय व्यवस्थित सुरू आहे.मी त्याचा भरपूर फायदा घेतो आहे.

  2. परतवाडा, अचलपूर दोन्ही वाचनालयाची माहिती छान मिळाली.आता मी तिकडे जाऊ शकत नाही .नाहीतर नक्कीच गेले असते आणि वाचनालयाला भेट दिली असती.

  3. माझे शहराचा सुसंस्कृत वारसा अन इतिहास वाचावयाचे भाग्याचा क्षण अन स्फूर्तीदायी माहीती आपण दिलीत बर्वेज़ी. धुंडीराज़ज़ी मी आपला मनापासून आभारी आहे. 🙏🙏

  4. साधारण वयाने दहा बारा वर्षांचा असताना पासून या वाचनालयाचा व माझा संबंध आहे. त्यावेळेस स्व. राजाभाऊ सहस्रबुद्धे ग्रंथपाल होते. वाचनालय उघडण्याआधीच आम्ही मुलं पायरीवर येउन बसून असायचो ते वाचनालयाची तिसरी घंटा वाजून आम्हाला ‘बाहेर निघा’ असे म्हणे पर्यंत आम्ही तिथे असायचो. त्यावेळी किशोर, मुलांची मासिके , चांदोबा, अमृत, किर्लोस्कर ई. मासिके येत असत. तेंव्हा ना. धों. चे खडकावरला अंकुर, गोटया, व्यंकटेश माडगुळकर, अत्रे, पुलं, व.पू, शिवाजी सावंत, पू.भा. भावे, रणजित देसाई, गोनिदां ई. ची अनेक पुस्तके वाचली, त्या नंतर स्व. सुरेश उपाख्य बंडुभाऊ पट्टलवर ग्रंथपाल होते. या अश्या 156 वर्ष पूर्ण झालेल्या सार्वजनिक वाचनालयाच्या कार्यकारी मंडळात सध्या माझा सक्रीय सहभाग आहे याचा मला सार्थ अभिमान आहे.
    – श्री निखिल करकरे .

  5. परतवाडा येथील ही वास्तू शहराची ऐतिहासिक वारसा देणारी अलौकिक देणं आहे. वाचनालय बद्दलचा हा इतिहास आपल्या जन्मभूमीबद्दलची आपली आन बान अन् शान गौरवाने उंचावतो असे म्हंटले तर वावगे ठरू नये.
    आजच्या पिढीला करमणुकीचे साधन म्हणून आभासी माध्यम जसा एकमेव पर्याय आहे तसाच आमच्या लहानपणी वाचनालयातील व्याख्यानमाला हे खरोखरच उत्सववर्धक, शैक्षणिक असे एकमेव विरंगुळा सहित शिक्षेचे स्त्रोत होते व त्याच दिवसाची चलचित्र पुनश्च लोचनी तरळली. त्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल मनस्वी आभार. तसेच ही वास्तू निरंतर असेच प्रेरणेचे स्थान म्हणून राहो ही सदिच्छा. मिलिंद गिरगांवकर.

  6. खूप छान माहिती! परतवाड्याच्या सार्वजनिक वाचनालयाने अनेक पिढ्या घडविल्यात. आमच्या लहानपणी रोज संध्याकाळी परेड ग्राऊंडवर खेळणे आणि येताना सार्वजनिक वाचनालयात जाऊन भरपूर वाचन करणे हा आमचा कार्यक्रम असायचा. चांगल्या वाचनाचे संस्कार वाचनालयाने केलेत. तेथेच प्रथम पु.ल., चि. वि.जोशी, भा.रा.भागवत, मिरासदार इत्यादींचे लेखन वाचून माझ्यातला लेखक घडला असे वाटते. त्याकाळातील नवीन मासिके चांदोबा, कुमार, किशोर, टारझन बिरबल वर आम्ही तुटून पडायचो. त्या. काळात टी. व्ही. इंटरनेट, मोबाईल नसल्याने वाचन हाच फक्त एक करमणुकीचे आणि ज्ञानसंपादनाचा मार्ग होता. सार्वजनिक वाचनालयाचे आमच्या पिढीवर अनंत उपकार आहेत! खरंतर हा लेख वाचून बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्यात!

  7. खूप छान माहिती! परतवाड्याच्या सार्वजनिक वाचनालयाने अनेक पिढ्या घडविल्यात. आमच्या लहानपणी रोज संध्याकाळी परेड ग्राऊंडवर खेळणे आणि येताना सार्वजनिक वाचनालयात जाऊन भरपूर वाचन करणे हा आमचा कार्यक्रम असायचा. चांगल्या वाचनाचे संस्कार वाचनालयाने केलेत. तेथेच प्रथम पु.ल., चि. वि.जोशी, भा.रा.भागवत, मिरासदार इत्यादींचे लेखन वाचून माझ्यातला लेखक घडला असे वाटते. त्याकाळातील नवीन मासिके चांदोबा, कुमार, किशोर, टारझन, बिरबल इत्यादी दिसली की आम्ही तुटून पडायचो. सार्वजनिक वाचनालयाचे आमच्या पिढीवर अनंत उपकार आहेत! त्या काळात टी व्हीं, इंटरनेट, मोबाईल नसल्याने वाचन हाच करमणुकीचा आणि ज्ञान संपादनाचा एकमेव मार्ग होता. हा लेख वाचून बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्यात!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here