श्री शारदा मंडळाला पंच्याऐंशी वर्षे पूर्ण होऊन गेली आहेत. मंडळ माई करकरे आणि त्यांच्या खास जिवलग व जिद्दीने काम करणाऱ्या मैत्रिणी – मामी गोरे, बाई नवरे, काकू पराडकर, नमू अभ्यंकर व प्रमिला मुजुमदार – यांच्या प्रयत्नाने व एकीमुळे पुढे आले. त्या मंडळाचा विस्तार बराच झाला आहे. त्या सर्व मैत्रिणी करकरे यांच्या घरी चौरस, पत्ते खेळत असत. त्यांच्या भरपूर गप्पाही होत, त्या वेळी गप्पा करता करता शारदेची स्थापना करून काही कार्यक्रम करावे असे ठरले. लगेच- विचार अंमलात आणून शारदा महिला मंडळ 1937 साली स्थापन झाले व त्या महिलांनी कार्य सुरू केले.
मंडळाने केलेले कार्य माझ्या शब्दांत मावण्यासारखे नाही. मंडळाची स्थापना झाल्यावर अध्यक्ष, सचिव व इतर सभासद हवेत. ताई कानेटकर, सुशिला देशमुख, तारा बर्वे, विमल बर्वे इत्यादी होत्या. पहिल्या अध्यक्ष सुशिला देशमुख झाल्या. त्यांनी सर्व कारभार उत्तम रीत्या सांभाळला.
प्रथम, शारदेची स्थापना सार्वजनिक वाचनालयात झाली. त्या वेळेला वाचनालयाचे अध्यक्ष बाळासाहेब पांगारकर व सचिव दादासाहेब खापरे होते. शारदा तेथे दरवर्षी बसू लागली. शारदेची स्थापना शाळा, बालक मंदिर बांधल्यावर तेथे सुरू केली. शारदेची स्थापना देवीच्या नवरात्रांत पहिल्यांदा काही वर्षे होत असे, पण पुढे ती दसऱ्यानंतर बसू लागली. तेथे वर्षातील सर्व भारतीय सण होत. त्यातील तो शारदेचा उत्सव असे. शारदा तीन-चार दिवस बसवत.
शारदेची मिरवणूक वाजतगाजत रिक्षामधून- रिक्षा पाना-फुलांनी सजवून सकाळी आठ वाजता सर्व भगिनींसह निघते. जेथे शारदेची स्थापना होते तेथे सडा घालून रांगोळी स्वागताला तयार असते. नंतर आरती करण्यात येते. तो उत्सव तीन ते चार दिवस चालतो. पहिल्या दिवशी कीर्तन असते व पुढील दोन-तीन दिवसांत व्याख्यान, भजन स्पर्धा असे वेगवेगळे कार्यक्रम असतात. त्या उत्सवात नाटक बसवले जाई. ते श्याम टॉकिजमध्ये होत असे. नाटक बसवण्याकरता दिग्दर्शक वसंतराव रायपूरकर व बापुसाहेब खरे यांची मदत होई. श्याम टॉकिजचे मॅनेजर बाबासाहेब भोकरे यांचीही मदत झाली. तसेच, चैत्रगौरीचे हळदीकुंकू, आवरण, कोजागिरी, कांदे नवमी हे कार्यकम उत्साहाने पार पाडले जात. एकत्र जेवणाचा कार्यक्रम असे. कोजागिरीला स्पर्धा होत.
शीतला मंदिराजवळील जागा पुढे, 1979 साली घेण्यात आली. तेथे खाली एक हॉल व वर एक हॉल बांधून 1972 साली बालक मंदिर सुरू केले. बालक मंदिर स्वत:ची जागा होईपर्यंत कोठे कोठे भरवले जात असे. त्यास प्रतिसाद चांगला मिळाला. सुरुवातीला श्रीमती पत्की, स्वाती नवरे, नानीबाई तिडके यांची त्या कामी साथ मिळाली. अचलपूरमध्ये खाजगी प्राथमिक शाळा नव्हती, म्हणून प्राथमिक शाळा सुरू करण्याचे मनात आले. पण बालक मंदिर कोठे भरवावे हा प्रश्न पडला. तो प्रश्न लगेच सुटला. नानासाहेब बर्वे यांनी त्यांचे वकील लाईनमधील घर त्यासाठी दिले. तेथे बालक मंदिर 1995 मध्ये हलवले गेले. ते घर काही वर्षांनी विकले गेले. तेव्हाही जागेचा प्रश्न उपस्थित झाला. पण वाचनालयाचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी कडेची मोकळी जागा भाडे तत्त्वावर दिली. तेथे पाच खोल्या व इतर सोयींनी युक्त सर्व गोष्टी बांधून शाळा सुरू केली. शाळेचा कारभार शिक्षिकांच्या सहकार्याने उत्तम सुरू आहे.
शाळेत अभ्यासाबरोबरच इतर काही गोष्टी पाहिजेत; जेणेकरून मुलांच्या अंगी धीटपणा येईल या उद्देशाने गीता पाठाचा कार्यक्रम सुरू केला. पोळा सण मोठा असल्याने मुलांना मातीचा बैल सजवून आणा असे सांगण्यात येते. त्यातून त्या मुलांच्या कलागुणांना वाव मिळत गेला. महिलांची सहल दिवाळीनंतर निघते. मंडळ पंजीकृत 1968 मध्ये झाले व मंडळाच्या अध्यक्ष म्हणून सुशिलाबाई देशमुख, वसुधा कानेटकर, प्रभा पट्टलवार यांनी वर्षांमागून वर्षे काम पाहिले आहे. त्यानंतर अध्यक्ष म्हणून नीरजा करकरे व सचिव म्हणून मी- मंगला बर्वे असे आम्ही काम पाहिले. मंडळाला पंच्याहत्तर वर्षे नोव्हेंबर 2012 साली पूर्ण झाली. तो महोत्सव तीन दिवस विविध कार्यक्रमांनी मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला. सध्या वृंदा देशपांडे अध्यक्ष आहेत, माझे (मंगला बर्वे) सचिवपद कायम आहे. सक्षम महिला मंडळ, बालक मंदिर व शारदा प्रायमरी शाळा परिसरात प्रसिद्ध पावली आहेत.
– मंगला बर्वे 9860199595
——————————————————————————————-