पंढरपूरचा कैकाडी महाराज मठ

8
363
carasole

कुठल्याही एका देवाची अथवा महाराजांची प्रामुख्याने उपासना करणारे मठ असतात. कैकाडी महाराजांचा मठ त्या परंपरेला अपवाद आहे. कैकाडी महाराजांनी अनेक वर्षे जमिनीला पाठ न लावता ध्यानसाधना केली. त्यानंतर जेव्हा त्यांचा भक्तगण वाढू लागला आणि गुरूंना काय देऊ असे विचारू लागला तेव्हा त्यांनी भक्तांना नामजप लेखन देण्याचा आग्रह केला. त्यातही विशिष्ट नाम असा आग्रह नव्हता. त्यांनी ज्याचे जे उपासना दैवत त्याचे नाम त्याने लिहावे व तो जपसंग्रह महाराजांना द्यावा असे सुचवले. अशा प्रकारे, सहस्र कोटी नामजप त्यांच्याकडे संकलित झाला असे सांगतात.

त्या नामजपाचे मंदिर उभारावे अशी इच्छा कैकाडी महाराजांनी त्यांचे धाकटे बंधू तुकारामकाका महाराज यांच्याकडे व्यक्त केली. तुकारामकाकांच्या कल्पनेतून तो वेगळ्या प्रकारचा मठ पंढरपुरात उभा राहिला. मठाचे बांधकाम जवळ जवळ आठ वर्षे चालले. चक्रव्युहासारखा प्रदक्षिणा मार्ग व उजव्या बाजूला विविध पुतळे अशी चार मजली रचना मठाची आहे. एकदा मठात प्रवेश केला, की मध्येच ती प्रदक्षिणा सोडता येत नाही. सर्व दालने बघून झाली, की बाहेर पडता येते. त्‍यामुळे प्रदक्षिणेचा अवधी काही तासांवर जातो. प्रदक्षिणा किंवा दालनफेरी अगदी जलद करायची म्हटली तरी पस्तीस ते पंचेचाळीस मिनिटे लागतात.

दालनांची सुरुवात मातृपूजेने होते. म्हणजे श्रीराम, परशुराम यांच्या मातांपासून. शिवाजी महाराज व महात्मा गांधी यांच्या मातांच्या प्रतिमा त्या दालनात आहेत. रामायण, महाभारत, पुराणे, ऋषिमुनी ते भारताच्या स्वातंत्र्य इतिहासातील नेते या सर्वांना मठात स्थान आहे. इतकेच नव्हे तर ‘युनो’ची संसदही त्या दालनात आहे! नेहरू, पटेल, गांधी, सावरकर, इंदिरा गांधी यांच्या सोबतीने भीम-अर्जुन, आदिमानव, पुराणातील प्रसंग, वेद यांच्याही प्रतिमा मठात आहेत.

दालनांची रचना अशी आहे, की प्रेक्षकाला सर्वकाळ उभे राहूनच रांगेतून सरकावे लागते. कोठे कोठे बैठक व्यवस्था आहे, पण त्या निमित्ताने आलेल्या प्रेक्षकांनी काही काळ तरी बाकीचे विचार सोडून महात्मा-विभूती यांच्या प्रतिमा पाहत राहवे व प्रदक्षिणा पूर्ण करावी असा संयोजकांचा प्रयत्न आहे. प्रदक्षिणेच्‍या मार्गात अनेक प्रवेशद्वारे आहेत. उदाहरणार्थ, प्रदक्षिणेचा मार्ग कधी आगगाडीतून जातो, कधी तो गायीच्‍या पोटातून अथवा गरुडाच्‍या छातीतून बाहेर पडतो. अशी अनेक आकर्षणे प्रदक्षिणा मार्गात आढळतात.

कैकाडी महाराजांचे पुतणे श्री रामदास महाराज हे त्या मठाचे व्यवस्थापन पाहतात. कुतूहल असलेल्या प्रेक्षकांना त्यांच्याशी बोलून त्यांच्या शंकांचे निरसन करून घेता येते. रामदास महाराज मठाची जन्मकथा व तिचा उद्देश प्रभावीपणे सांगतात. मठात वर्षभर विविध कार्यक्रम साजरे होत असतात.

– प्रसाद घाणेकर

Last Updated On – 05th July 2017

About Post Author

8 COMMENTS

  1. Think Maharashtra Ni
    Think Maharashtra Ni Pandharpurcha Kaikadi Maharaj Yancha Math Prashid Kelya Badal Mi Tyancha Abhari Ahe.

  2. महाराजांचे चरित्र का कोणी…
    महाराजांचे चरित्र का कोणी लिहित नाही जसे गाडगे महाराजांचे

  3. केकड़ी महाराज यांच्या पंढरपुर…
    केकड़ी महाराज यांच्या पंढरपुर येथील मठाला माघ एकादशी निमित्त भेट देण्याचा योग आला . तेथे मला त्यांचा गाथा मिळावा अशी अपेक्षा होती पण तेथे काहीही व्यवस्था नव्हती . त्यांचे साधे च्ररित्र सुद्धा उपलब्ध नव्हते ही खेदाची गोष्ट आहे. त्याचा गाथा सुद्धा उपलब्ध नव्हता . मठा madhe दर्शन मंडप येथे देणगी घेत नाहीत पण स्व खुशीने पैसे दया असे सांगतात . ते पैसे रोख स्व रूपात घेतले जातात पण त्याचा विनियोग कुठे केलेला दिसत नाही . मि 20 वर्षा पूर्वी पाहिलेला आणि आताचा परिसर जश्यच तसा आहे . बर्याच मुर्त्या भंग पावलेल्या आहेत . सरकारने वरील गोष्टीत लक्ष घालायला हवे आहे .

  4. संपूर्ण जगाला बाबांचा संदेश

    संपूर्ण जगाला बाबांचा संदेश
    *”मानवांनो माणुसकीला जागा , माणुसकीला जागा ,
    जरा माणसांत मिसळोनी वागा.”*
    जगाला असा दिव्य संदेश देणारे महान तपस्वी संत राजाराम भागुजी जाधव म्हणजेच कैकाडी महाराज (कैकाडी बाबा) यांचा जन्म अहमदनगर जिल्हातील कात्राबाज मांडवगण या सिध्देश्वर महाराज व मांडव्यऋषी यांच्या गावात झाला . जुन्या काळातील ऋषीमुनी यांनी ६० हजार वर्षे तपश्चर्या करत असत , कलियुगात कैकाडी बाबांनी आपल्या आयुष्यात ६० वर्ष तरी तपश्चर्या करावी असा निर्धार केला .
    श्रीमंत भागुजी खंडूजी जाधव यांच्या घराण्यात थोरले बंधू ह.भ.प. श्री. पांडुरंग बुवा जाधव, स्वतः ह.भ.प. राजाराम महाराज व धाकटे बंधू ह.भ.प. श्री. कोंडीराम बुवा जाधव व एक बहिण . अशा कुटुंबात अचानक एक दिवस ह.भ.प. राजाराम महाराजानी सर्व अह्हिक सुखाचा त्याग करून घराबाहेर पडले. त्यानंतर त्यांना विश्वची माझे घर हि भावना निर्माण झाली व त्यांनी सर्वांसाठी देह चंदनासारखे जीवन झिजवले . संपूर्ण भारत भ्रमण केले त्यांना
    अनेक भाषा येत होत्या. अनेक ठीकाणी समाजप्रबोधन केले .
    कैकाडी बाबानी मौन पाळणे , पाठ जमिनीला न लावता झोपणे , असे तप केले. ५ वर्ष अज्ञात वासात जंगलात जाऊन ध्यानमग्न असताना एका लहान मुलाच्या रुपात त्यांना प्रत्यक्ष परमेश्वराने दर्शन दिले.
    कैकाडी बाबांचे वैशिष्ट्ये कि त्यांनी या क्षेत्रात कधी पैशाला हात लावला नाही. कमी कपडे ,साधी रहाणी , बाबा कधी अन्नाचा एक कण वाया जाऊ देत नसत. कधी कोणाला पाया पडू देत नसत.
    अशी व्यक्ती कित्येक युगानंतर जमिनीवर अवतरीत होते , असेच म्हणावे लागेल.
    *“तुम्ही देव होऊ नका , तुम्ही संत होऊ नका,
    तुम्ही फक्त माणसं व्हा माणसं.”*

    राष्ट्रसंत महान तपस्वी संत राजाराम भागुजी जाधव म्हणजेच
    कैकाडी महाराज (कैकाडी बाबा )

    वडील : श्रीमंत श्री. भागुजी खंडूजी जाधव ( मांडवगण)

    थोरले बंधू : ह.भ,प. श्री. पांडुरंग भागुजी जाधव ( मांडवगण)
    धाकटे बंधू : ह.भ.प. श्री. कोंडीराम बुवा जाधव (पंढरपूर)
    संपूर्ण नाव : ह.भ.प. श्री. राजाराम भागुजी जाधव (कैकाडी बाबा )
    जन्म : रामनवमी १९०७
    जन्मठिकाण : मांडवगण , ता.श्रीगोंदा, जि.अहमदनगर
    मृत्यू : २१.१०.१९७८ – पंढरपूर
    शिक्षण : २री
    पत्नी : विठ्ठलाई (कोंडाबाई)

    पुतणे : श्री. रामदास उर्फ शिवराज महाराज कोंडीराम जाधव (पंढरपूर)
    अध्यक्ष कैकाडी बाबा मठ , पंढरपूर

    पुतणे : श्री. भागुजी उर्फ भागवत पांडुरंग जाधव (मांडवगण-ह.मु.अहमदनगर)
    मो.न.: +91 76204 03410

    धन्यवाद
    नीरज भागवत जाधव (8888440431 मांडवगण-ह.मु.अहमदनगर)

  5. जय कुळो ,जय कुळो ,
    मी किसन…

    जय कुळो ,जय कुळो ,
    मी किसन जाधव रा मेहकर जिल्हा बुलढाणा
    ह मु औरंगाबाद
    राष्ट्र संत कैकाडी महाराजांना मनाचा मुजरा कैकाडी जात ही भारताच्या महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांतील एक भटकी विमुक्त जात आहे. ते मुळचे आंध्र प्रदेशचे रहिवासी होते व नंतर कर्नाटक व महाराष्ट्र यांत आले असावेत. त्यांच्या भाषेत कानडी आणि तेलुगू शब्दांचा भरणा असतो. काहींच्या मते ते तमिळनाडूमधून आले असावेत. तमिळ भाषेत हात कापणारे आणि हाताने कापणारे, असा कैकाडीचा अर्थ होतो. तेथे त्यांना कोरवा म्हणतात.

  6. जवळजवळ पन्नास-बावन्न…
    जवळजवळ पन्नास-बावन्न वर्षांपूर्वी माझ्या आईवडिलांनी हा मठ दाखवला होता. अजूनही बरंच काही लक्षात आहे. महाराजांचे दर्शन झाले होते. ते कोणालाही आपल्या पाया पडू देत नसत.

Comments are closed.