उद्योगपती कै. भवरलाल जैन यांच्या संकल्पनेतून ‘अनुभूती निवासी शाळा’ निर्माण झाली. शाळेने २०१७ मध्ये दहा वर्षें पूर्ण केली. ‘पुस्तकी ज्ञानाला अनुभवाची जोड देऊन विद्यार्थी हा नोकरी मागणारा नव्हे; तर नोकऱ्या देणारा उद्योजक, नैतिकता असलेला उत्तम नागरिक व्हावा’ हा त्यांचा शाळा-स्थापनेमागील हेतू होता. संस्थेची जडणघडण तशीच झाली आहे. भवरलाल जैन म्हणत, विद्यार्थी या शाळेतून शिकतील, संस्कारित होतील आणि ते या स्पर्धेच्या युगात तेथे मिळवलेल्या ज्ञानाचा, अनुभवाचा उपयोग देशाच्या विकासासाठी सुसंस्काराने व कल्पकतेने करतील.
‘अनुभूती स्कूल’ खानदेशात जळगाव येथील पाचोरा रस्त्यावर ‘जैन इरिगेशन’च्या आंतरराष्ट्रीय शेती संशोधन व प्रात्यक्षिक केंद्रासमोर (‘जैन हिल्स’) शंभर एकरावर उभी आहे. तेथे साधारणतः एक लाख विविध वृक्षराजी आहे. स्कूलची सुरुवात 07 -07- 2007 या वैशिष्ट्यपूर्ण तारखेला झाली. स्कूलमध्ये पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षणाची सोय आहे. भवरलाल जैन यांनी स्कूलच्या स्थापनेपूर्वी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील, गुणवत्तेच्या दृष्टीने कीर्तिमान प्रमुख शाळांना भेटी दिल्या होत्या. तेथील नावीन्यपूर्ण शिक्षणपद्धत भारतीय संस्कृतिसंवर्धन होऊ शकेल, अभ्यासाचा विषय आकलन होईल अशा पद्धतीने आखली आहे. विद्यार्थी प्रत्यक्ष फील्डवर जाऊन अभ्यासाचा भाग म्हणून अनुभवाने शिकतात. शाळेच्या आवारात शेती आहे. शाळेसाठी लागणारे धान्य, भाजीपाला हे सगळे त्या शेतीतून येते. विद्यार्थी शेतात काम आनंदाने करतात व श्रमसंस्कृतीचा वसा, वारसा जपतात आणि जोपासतात. त्यांच्या स्वत:च्या श्रमांतून निर्माण झालेला भोपळा-काकडी-भेंडी जेवणामध्ये खात असताना त्यांना लागणारी चव आणि त्यातून त्यांना मिळालेला आनंद काही औरच असतो!
शाळेत तीनशे विद्यार्थी आहेत. ते बारा राज्यांमधून येतात. महाराष्ट्राखालोखाल मध्य प्रदेश व झारखंड या राज्यातील मुले जास्त येत असतात. त्याखेरीज गुजरात, कर्नाटक, ओरिसा, राजस्थान, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश या राज्यांतील विद्यार्थी शाळेत आहेत. मुलांसाठी वर्षाला दोन लाख पासष्ट हजार रुपये व मुलींसाठी दोन लाख पन्नास हजार रुपये आहे. मुले दहावीसाठी – आयसीएससी आणि बारावीसाठी – आयएससी बोर्डाच्या परीक्षा देतात. त्यांच्या मुलांच्या शिक्षकांना पगार पंचवीस हजार ते पन्नास हजार रुपये दरम्यान दिला जातो. त्यांच्यासाठी निवास व भोजनव्यवस्था ‘कँपस’वरच असते. शिक्षणाची व्यवस्था (इयत्ता पाचवी ते बारावी) देखील स्कूलच्या आवारात, तीही विनामूल्य केली जाते. या दर्ज्याच्या अन्य शाळांशी तुलनेत उत्तम सेवासुविधा फीची माफक आकारणी आहे असे ‘जैन इरिगेशन’च्या अधिकार्यांलनी सांगितले.
‘अनुभूती निवासी शाळे’चा विद्यार्थी पहाटे साडेपाच वाजता उठतो. त्याची सकाळ ते रात्री साडेदहा वाजेपर्यंतची दैनंदिनी वेळापत्रकानुसार शिस्तबद्धपणे ठरलेली असते. त्याच्याकडून सकाळी उठल्यावर योग, पीटी, कसरत असे शारीरिक व्यायाम करून घेतले जातात. त्याचा नाश्ता झाल्यावर विविध विषयांवर अभ्यासपूर्ण चर्चा असेंब्ली हॉलमध्ये होते. त्यानंतर तो शिक्षकांबरोबर अभ्यास करतो. दुपारी भोजनानंतर पुन्हा क्लास भरतात, अन्य शैक्षणिक उपक्रम चालतात. सायंकाळी खेळ, अभ्यास आणि रात्री भोजनानंतर साडेदहा वाजता झोपेपर्यंत अभ्यास असा नित्यक्रम असतो. विद्यार्थ्यांना वाटले, की बाहेर, हिरवळीवर झाडाखाली वर्ग व्हावे, तर त्या पद्धतीनेही वर्ग घेतले जातात!
भवरलाल जैन यांचा हा ध्यास आंत्रप्रिनरशिप होता. तो ठसा त्यांच्या मृत्यूनंतरही शाळेच्या महत्त्वाच्या उद्दिष्टांत आहे. त्यांच्यानंतर निशा जैन स्कूलच्या संचालक झाल्या आहेत. त्या विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय संस्कार व्हावे याबाबत प्रयत्नशील आहेत. उदाहरण पुष्कर यावलकरचे देता येईल. पुष्करने ‘अनुभूती स्कूल’मध्ये बारावीपर्यंत शिक्षण घेतले. त्याने जळगावमध्ये ‘कट्टी बट्टी’ हा अफलातून ‘फूड मॉल’ सुरू केला आहे. त्याने बटाट्यापासून चवदार आणि विविध डिझाइनचे परिपूर्ण असे खाद्यपदार्थ बनवले. त्याने कॉलेज परिसरात छोट्या जागेत स्क्रॅप वूडचा चपखल वापर केला आणि छान मांडणी केली. ते केंद्र तरुण-तरुणींच्या आकर्षणाचे ठरले आहे; त्याचे महाविद्यालयीन शिक्षण सुरू आहेच. त्याने तो व्यवसाय एका मित्राच्या भागीदारीत ऑगस्ट 2017 मध्ये सुरू केला. आणखी एक उदाहरण स्कूलचा माजी विद्यार्थी आणि सध्या मुंबईत शिक्षण घेत असलेला सागर नाथवाणी याचे देता येईल. त्याने ‘सेवन सिझन’ हा संगीत ग्रूप निर्माण केला आहे. त्याचा तो ग्रूप व्यावसायिक दृष्टीने प्रसिद्ध झाला आहे. त्याने शाळेच्या प्रती कृतज्ञता म्हणून संगीत कार्यक्रम सादर केला होता. सुदर्शन लाहोटी याने सुरू केलेले सामाजिक कार्य, वर्धा येथील अमेय ठाकरे, तेजस शिरोळे असे ‘अनुभूती’च्या पठडीत तयार झालेले विद्यार्थी काहीतरी अफलातून आगळेवेगळे कार्य करत आहेत. निशा जैन यांचा शाळेच्या दैनंदिन कामकाज, व्यवस्थापन, निर्णय घेणे, विद्यार्थी, शिक्षकांच्या समस्या सोडवणे, शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्नशील असणे अशा जबाबदार्यात निभावतात.
भिकचंद खंबायत 9422776726, 0257 2264600
http://www.anubhutischool.in/
– किशोर कुळकर्णी
Last Updated On 4th Oct 2018