नाथ संप्रदाय व त्याचा प्रभाव

2
158
_nath_sanpraday

नाथ संप्रदाय हा भारतातील प्राचीन लोकप्रिय असा धर्मपंथ आहे. तो मध्ययुगीन उपासना पंथ आहे. नाथसंप्रदायाचे महत्त्व महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात अनन्यसाधारण आहे. नाथपंथाचा प्रभाव महाराष्ट्रातील वारकरी, दत्त, आनंद, समर्थ या साधनासाधक संप्रदायांवर पडलेला दिसून येतो. मराठीतील आद्यकवी मुकुंदराज, ज्ञानेश्वर, निवृत्तिनाथ हे नाथपंथीय होते. नाथपंथ नेपाळ, आसाम, बंगाल, पंजाब, उत्तरप्रदेश या भूभागांपासून श्रीलंकेपर्यंत पसरलेला होता. नाथ संप्रदायाचे विशेष अद्वैतभाव, योगभक्ती, कृष्णभक्ती, गुरुनिष्ठा, देशीभाषेतील साहित्यनिर्मिती हे होत. त्या संप्रदायाने सगुण-निर्गुण या दोन्ही प्रकारच्या उपासनेला महत्त्व दिले. त्या संप्रदायाची ख्याती सर्वसंग्राहक व समन्वयवादी अशीही आहे.  

नाथसंप्रदाय व इतर संप्रदाय यांचा संबंध जवळचा आहे. नाथसंप्रदायाचा प्रभाव वारकरीमहानुभव या दोन्ही संप्रदायांवर जाणवतो. गोरक्षनाथ यांनी नाथ संप्रदायाची पायाभरणी केली. त्या संप्रदायाला त्यांच्यापासूनच संस्थात्मक स्वरूप प्राप्त झालेले दिसते. अतिरेकी भोगवादाची प्रतिक्रिया म्हणून, गोरक्षनाथांचा भर आत्यंतिक मनोनिग्रह, अपरिग्रह, आचारशुद्धता यांवर होता. 

नाथ संप्रदायात सिद्धांत आणि साधनापद्धत यांवर चर्चा करणारे अनेक ग्रंथ आहेत. ते संस्कृत व हिंदी भाषांत आहेत. पंथाचे धोरण लोकभाषेतून प्रचार करण्याचे असल्याने हिंदी भाषेच्या विविध स्वरूपांत त्या रचना झाल्या आहेत. सिद्ध सिद्धांतसंग्रह, हट्योग प्रदीपिका इत्यादी ग्रंथांस त्या संप्रदायात महत्त्व आहे. गोरक्षनाथ यांच्याकडे गोरक्षगीता, गोरक्ष अमर संवाद, महार्थमंजिरी, परास्तोत्रम, कुंडलाभरणम या ग्रंथांचे कर्तृत्व नोंदले गेलेले आहे. गोरक्षनाथ यांनी सिद्धांत मांडण्यासाठी संस्कृत भाषेचा स्वीकार केला; लोकांना उपदेशासाठी मात्र लोकभाषा, बोलीभाषा स्वीकारली. लोकभाषेचे तेच तत्त्व नंतरच्या काळात महानुभव, वारकरी या संप्रदायांनी स्वीकारले. त्यामुळे महानुभाव व वारकरी संप्रदायांच्या लेखकांनी मराठी भाषेतून निर्मिती करून मराठी भाषेला वाङ्मयीन भाषेचे स्वरूप प्राप्त करून दिले.

नाथ संप्रदायाचा प्रभाव बाराव्या-तेराव्या शतकात मोठ्या प्रमाणात झाला. तो सर्वात जुना संप्रदाय असल्याने उत्तरकालीन संप्रदायांनी नाथ संप्रदायाकडून काही गोष्टी स्वीकारल्या. त्यामध्ये तत्त्वज्ञान, बोलीभाषेचा वापर या विशेष महत्त्वाने जाणवतात. अमरनाथ, गहिनीनाथ, चांगदेवराऊळ, गुंडमराऊळ, चक्रधर, मुकुंदराज, निवृत्तिनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव, मुक्ताबाई, सत्यमलनाथ, गैबीनाथ, चांदबोधले, जनार्दनस्वामी, एकनाथ अशा अनेकांवर नाथसंप्रदायाचा प्रभाव होता हे त्यांच्या साहित्यरचनेवरून दिसून येते. 

गुरूभक्ती, योगसाधना, लोकभाषेचा स्वीकार, शरीरनिग्रह, जातिभेदापासून दूर, लोकाभिमुखता हे नाथपंथांचे विशेष नंतरच्या सर्व संप्रदायांनी स्वीकारले. त्यामुळेच ते जनमानसात रूजलेले दिसतात. नाथसंप्रदायाचे बरेचसे वाङ्मय उपलब्ध नाही.  महाराष्ट्रातील विविध सांप्रदायिक कवींनी पंथनिष्ठेतून पंथीय विचार सांगण्यासाठी काव्यनिर्मिती केली. त्यामुळे त्यात पंथीय तत्त्वज्ञान, आचार, पंथातील महापुरुष, पंथीय देवता यांना स्थान बरेच आहे. त्या लेखक-कवींनी त्यासाठी तत्कालीन समाजात रुढ असलेल्या विविध आविष्कारपद्धती स्वीकारल्या आहेत. मध्ययुगीन मराठी वाङ्मय नाथ, महानुभव, वारकरी, समर्थ लिंगायत या संप्रदायांबरोबरच वाढले आणि विस्तारले आहे. मराठी वाङ्मयाला विविध धर्मसंप्रदायांचा आधार मिळाल्यामुळे त्यात विविधता निर्माण झाली आहे.

सिद्धसिद्धांतपद्धती हा ग्रंथ सिद्धमत किंवा सिद्धमार्ग या नावानेही संप्रदायात ओळखला जातो. त्या ग्रंथात संप्रदायाचे सिद्धांत आणि साधना यांचे शास्त्रीय विवेचन आहे. त्यात सहा अध्याय आहेत. त्याची श्लोकसंख्या तीनशेत्रेपन्न आहे. त्यात पिंडविचार, पिंडाधार, समरसीकरण इत्यादींचे विवेचन आहे. सहाव्या अध्यायात लिंगायत पंथाचा उल्लेख आला आहे. त्यामुळे तो ग्रंथ गोरक्षनाथांचा आहे, की नाही अशी शंका व्यक्त केली जाते.  

गोरक्षपद्धती हा ग्रंथ दोनशे श्लोकांचा आहे. त्यातील प्रथम शतक गोरक्षशतक या नावाने प्रसिद्ध झाले आहे. दुसऱ्या शतकाचे नाव योगशास्त्र असे आहे. त्या ग्रंथावर अनेक टीका आणि भाष्ये लिहिली गेली. त्या ग्रंथास पंथीय लोक मूळ ग्रंथ मानतात.

अमनस्कयोग या ग्रंथात ईश्वर व वामदेव यांच्या संवादातून तारकयोगाचे रहस्य, गुरूची लक्षणे, योगसाधनेच्या दृष्टीने योग्य स्थान, योगासने, क्रियायोग इत्यादींचे वर्णन आले आहे. मुनिश्रेष्ठ वामदेव कैलास पर्वतावर पोचल्यावर कैलासनाथाला प्रश्न विचारतात. कैलासपती त्यांच्या शंकांचे समाधान करतात अशी त्या ग्रंथाची रचना आहे. ती धर्मबाह्य गोष्टींमध्ये (उदाहरणार्थ भस्म, जटा, चिरगुटे, बाष्काळ) नाही. धर्म हा सर्व प्रकारच्या प्रलोभनांतून दूर होऊन त्या गोष्टींचा त्याग करण्यास शिकवतो.

_sanskrutik_nondiहठ्योग प्रदीपिका या सांप्रदायिक ग्रंथाचे कर्तृत्व योगींद्र स्वत्मरामाचे मानले जाते. ग्रंथात चार अध्याय (उपदेश) असून श्लोकसंख्या तीनशेब्याऐंशी आहे. मठलक्षण, यमनियम, आसने, योग्याचा आहारविहार, प्राणायम, योगमुद्रा, बंध, समाधिस्वरूप या विषयांवर ग्रंथात चर्चा केली आहे. ग्रंथाच्या सुरुवातीस आदिनाथ, मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ अशा बत्तीस सिद्धांची नावे आली आहेत. 

गोरक्षसिद्धांतसंग्रह हा ग्रंथ गोरक्षनाथांच्या सिद्ध सिद्धांतपद्धती या ग्रंथाच्या आधारे लिहिला गेला आहे. त्यात शंकराचार्यांच्या अद्वैत मताचा पराभव एका कापालिकाच्या द्वारे केल्याची कथा आली आहे. तसेच, विष्णूचे चोवीस अवतार धारण केल्यावर संतप्त श्रीनाथांनी चोवीस कापालिकांना पाठवून त्यांचा पराभव केल्याची कथाही त्या ग्रंथात आहे. गोरक्षसिद्धांतसंग्रह या ग्रंथाची भाषा संस्कृत आहे. त्यासाठी अवधूतगीता, सूतसंहिता या ग्रंथांचा आधार घेतला आहे. ग्रंथारंभी गुरुमहिमा वर्णन केला आहे.

सत्यमलनाथ हा संत ज्ञानेश्वर यांच्यानंतरचा नाथसंप्रदायामधील महत्त्वाचा पुरुष मानला जातो. सत्यमलनाथांनी सिद्धांतरहस्य या ग्रंथाचे लेखन केले. त्या ग्रंथाची श्लोकसंख्या सोळा हजार असून तो दहा प्रकरणांत विभागलेला आहे. त्या ग्रंथाची निर्मिती शके १६०२ च्या दरम्यान झाली. ग्रंथाचा उल्लेख ललित प्रबंध असाही केलेला आढळतो.

शिवदिनकेसरी हे केसरीनाथांचे शिष्य होते. त्यांनी कथाकीर्तने करत करत नाथपंथाचा प्रचार-प्रसार केला. त्यांनी ‘विवेकदर्पण’ व ‘ज्ञानप्रदीप’ या ग्रंथांची निर्मिती केली. त्यांनी श्लोक, पदे, अष्टके ह्यांचीही रचना केली. ठसकेबाजपणा हे त्यांच्या पदांचे खास वैशिष्ट्य आहे. त्यांची पदे ‘भाव धरा रे, अपुलासा देव करा रे, आजि तुम्ही ऐका, सखा सहोदर म्हणजे पैका’ अशी काही लोकप्रिय आहेत. शिवदिनकेसरी यांनी विठ्ठल, जगदंबा देवता यांवरही पदरचना केली आहे. त्यांच्या रचनेतून मराठी भाषेविषयीचा अभिमान दिसून येतो.

संकलित – नितेश शिंदे
(आधार – मराठी वाङ्मयाचा इतिहास – स.गं. मालशे, प्राचीन मराठी वाङ्मयाचे स्वरूप- प्रा. ह.श्री. शेणोलीकर)

About Post Author

2 COMMENTS

  1. दुर्मिळ अद्यात्म माहिती…
    दुर्मिळ अद्यात्म माहिती गरजेचे आहे !

Comments are closed.