नंदीबैलाला कोकणात पांगुळबैल म्हणतात. त्याला रंगवून, सजवून गावागावातील घरांच्या अंगणासमोर आणला जातो. त्याच्यासोबत असतो लयदार आवाजातील संबळीचा सूर. संबळाऐवजी कधी पिपाणी, तुणतुणे किंवा ढोलके वाजवले जाते आणि ‘बुगूबुगूऽऽऽ..’ अशा वाद्याच्या आवाजाची किनार वातावरणात आणखी रंग भरते. पांगुळबैलांचे दर्शन दुर्मीळ होत चालले आहे.
दान देवाच्या नावानं
आपल्या देवाच्या नावानं
भोळ्या भगतानं केलं दान
दस बोटानं कमावून
पाच बोटानं केलं दान
रवळनाथ देवाच्या नावानं
असा पैसा दिला दान
तुझा पैसा कुठं गेला
रवळनाथ देवाच्या पायाला
तुझा दान पावन झाला…
ठाकर समाजातील कलावंत त्यांची पारंपरिक लोकगीते गुणगुणत पांगुळबैलासह घराघरात पोचतात. दिवाळी संपल्यानंतर माघ महिन्यापर्यंत त्यांची सफर गावागावात सुरू असते. पांगुळबैल फिरवणारे कमी झाले; पांगुळबैलाला प्रशिक्षण देणेही दिवसेंदिवस अवघड होऊन बसले आहे. पांगुळबैल उपलब्ध नसल्यास कधी हातात केवळ तुणतुणे घेऊन, ते ही परंपरा जपण्याचा कसोशीनं प्रयत्न करत आहेत.
ढोलकीच्या तालावर घुंगराचा झंकार करत, नंदीबैल दारोदारी हजेरी लावतो. तो अंगणात आल्या आल्या स्वत:भोवती प्रदक्षिणा घालतो. अंगणात तुळस असेल तर त्याच वेळी त्याची तुळशीभोवतीची प्रदक्षिणाही सुरू होते. पांगुळ कलाकारासोबत दुसरा कलाकार असतो, तो ढोलकीचा बुगूबुगूऽऽऽ..’ आवाज काढतो आणि बतावणी सुरू होते. सपादणी (गाण्यातून एकमेकांना दिली जाणारी साथ)चे सूर उमटू लागतात.
हे महादेवाचा नंदी आला
सौभाग्याच्या दारात..
आला बरा मागायला
मग दुसरा ठाकर सपादणी करू लागतो.
येरे येरे ढवळया माझ्या
पुण्यवंतांच्या दारात
यांच्या घराच्या दारासमोर..
पुण्यवंतांना बरा मागा
बाबा बांधवांच्या जोड्या राख जन्मावर
जनसंपत्तीचा वाटा माझा महादेव देईल
खोटानाटाकरणी करतूत पायतळी घालशील
सगळा किलेस पायातळी घालीन…
बतावणी सुरू असताना सुवासिनी पांगुळाची पूजा करतात. त्याच्या पायांवर पाणी ओतून ते धुतले जातात. मस्तकावरच्या शिवलिंगाला कुंकू लावून फुले, तांदूळ वाहतात. त्या वेळी जमिनीला वंदन केलं जातं. घरातील मंडळींच्या इच्छेनुसार पांगुळ कलाकार पुढे बोलू लागतो. नाहीतर, तो मिळालेला शिधा, दक्षिणा घेऊन पुढील घराकडे रवाना होतो.
पांगुळबैल वाडीवर आला म्हणजे लहान-मोठे सारेच एकत्र जमायचे. मग शक्यतो जवळपासचे एखादे मोठे अंगण असलेले घर निवडून तेथे बैलाबरोबरचा खेळ रंगत असे. बैलाला अंगावर खेळवलं जायचे. राम-सीतेची कथा रंगवली जायची. प्रेक्षकवर्ग भरपूर असल्याने कलाप्रकार सादर करणाऱ्यालाही हुरूप यायचा.
ठाकर बांधवाची ही संस्कृती विलोभनीय अशीच म्हणायला हवी. पांगुळबैलाला शिकवण्याची, त्याची तालीम करून घेण्याची पद्धत कौशल्यपूर्ण असते. सर्वप्रथम त्याला एका खड्डयात ठेवलं जातं आणि पांगुळ कलाकार त्याला वेगवेगळ्या खुबी शिकवून त्या बैलाकडून करवून घेतो. काही दिवसातच बैल कलाकाराच्या इशाऱ्याप्रमाणे हालचाल करू लागतो. ढोलकी वाजवणाऱ्याला काही सकारात्मक बोलायचे असल्यास पांगुळबैलाला मान हलवायला सांगतो. होकार म्हणताच, नायकाच्या आज्ञेप्रमाणे बैल डोके वर-खाली करू लागतो. तर ‘वळख’ म्हणताच, बैलाला नको असे शिकवलेले असल्याने तो नकारार्थी मान हलवतो. ‘हातोडी’ म्हणताच बैल डावा पाय उचलतो. ‘मुंडी’ म्हणताच बैल पुढचे पाय गुडघ्यातून दुमडून वाकतो. ‘मोटवळे’ म्हणताच बैल गुडघे टेकून खेळू लागतो.
पांगुळ कलाकार त्याची कला विविध पैलूंनी सादर करतात. पहिली म्हणजे बैलाची सजावट, त्याला ‘शिणगार’ म्हटले जाते. रंगीबेरंगी कपडयांची केलेली झूल त्याच्या पाठीवर घातली जाते. लहान-लहान भिंगाची गोल चौकोनी तुकडे असलेली लाल, निळ्या मण्यांची माळही झुलीवर टाकली जाते. त्यास ‘उपलन’ म्हणतात. वशिंडाजवळ लहानशी आकर्षक झूल बांधतात. त्याला ‘खानोटी’ म्हणतात. शिंगं रेशमी रंगीबेरंगी कपडयांनी कलात्मकतेने गुंडाळून त्याच्या टोकास पितळेच्या शेमल्या बांधतात. त्यातून खालच्या बाजूस रंगीत गोंडे लोंबत ठेवतात. बैलाच्या मस्तकावर त्रिकोणी बाशिंग बांधतात. बाशिंगावर मध्यभागी छोटेसे शिवलिंग आणि शिवलिंगावर फणा काढून बसलेला नाग असतो. गळ्यात घुंगरांच्या, कवड्यांच्या माळा असतात. त्यास ‘गॅज’ म्हणतात. शेपटीच्या खाली छोट्या घुंगरांची माळ असते. गळ्यात घंटा बांधतात. पाठीवर वशिंडाजवळ एकमेकांना छेदून मोरपिसांचे तुरे बांधतात. दोन शिंगांमध्ये मोरपिसांचा तुरा बांधतात. तुऱ्यांना ‘कुचा’ म्हणतात. पांगुळबैलाचा शृंगार पूर्ण झाल्यावर, तो नंदी राजासारखा ऐटीत चालू लागतो. गळ्यातील घंटा आणि घुंगरू यांच्या संमिश्र नादाने वातावरणनिर्मिती होते.
राजे, सरदार, सधन व्यापारी यांच्या घरी कोणाचा मृत्यू झाल्यास, त्याच्या बाराव्याच्या विधीच्या दिवशी बैल अथवा गाई धार्मिक विधी करून मृतांच्या नावाने सोडले जात असत. देवालयाचा जीर्णोद्धार झाल्यावर तेथील देवाच्या नावानेही बैल सोडला जात असे, त्याला ‘वसू’ म्हणत. पांगुळ कलाकार वसू गावोगाव घेऊन जायचे. त्याला पोसण्याचे आणि कामही करण्यास शिकवायचे. वसू कोणी सोडण्याची पद्धत बंद आहे. त्यामुळे परंपरा टिकवण्यासाठी, बैल खरेदी करावा लागतो आणि त्याच्या चारा-पाण्याची तजवीज करावी लागते. ते शक्य होत नाही. परिणामी पांगुळबैलाची भ्रमंती कमी झाली आहे.
बैल घेऊन फिरणारे भारतातील इतर प्रदेशातही आढळतात. त्यांना काही प्रदेशात तिरमल या नावाने ओळखले जाते. हे नाव कसे पडले याबद्दल तज्ज्ञांमध्ये एकमत नाही. मात्र तो समाज तिरूपतीच्या व्यंकटेशाचे भक्त असल्यामुळे त्यांना तिरमल या नावाने संबोधले जात असावे असा अंदाज बांधला जातो. ती जमात सुमारे नऊशे वर्षापूर्वी आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात आली असावी आणि तेच आज महाराष्ट्रातील नंदीबैलवाले म्हणून ओळखले जातात, असाही एक कयास आहे. त्यांच्या भटकण्याची कक्षा विवक्षित असून त्या कुंटुबानुसार आखलेल्या असतात.
फार पूर्वी हा समाज महाराष्ट्रात भटकत असताना एक नंदी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात वडापूरी येथे मरण पावला. त्यानंतर त्या समाजाने त्या गावाला देवस्थान मानले. दरवर्षी आषाढ – श्रावणात वडीपुरीत तो समाज दैवतांच्या पूजेसाठी व पितृपूजेसाठी एकत्र जमतो. त्यावेळी नवस फेडणे, षष्ठी देणे, लग्नविधी उरकणे, भांडणतंट्याचा निकाल लावणे आदी कामे उरकली जातात.
मंगेश पाडगावकर यांची ‘सांग सांग, भोलानाथ’ ही कविता नंदीबैल पद्धतीचा गोडवा व त्यामधील भ्रमपण छान मांडते. नंदीबैलांना प्रशिक्षण नीट नसल्याने व गुंतागुंतीचे आधुनिक प्रश्न आल्याने बैल मालकाला हातात कासरा पकडून व त्याला ओढ देऊन बैलाची मान होकारार्थी, नकारार्थी हलवावी लागते.
– किशोर राणे
(मूळ लेख – ‘दैनिक प्रहार’ १९ मार्च २०१४)
dhule nandurbar jalgon
dhule, nandurbar, jalgon distic madhy mothya pramanath tirmal nandiwale samaj aahe.
Comments are closed.