Home व्यक्ती देशातील पहिले अशोकचक्र विजेते सैनिक बचित्तर सिंह (Memorial Needed For Marathwada War...

देशातील पहिले अशोकचक्र विजेते सैनिक बचित्तर सिंह (Memorial Needed For Marathwada War Hero)

2
बचित्तर सिंह
बचित्तर सिंह हे देशातील पहिले अशोकचक्र विजेते सैनिक. निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त करण्यासाठी कामी आलेल्या शीख रेजिमेंटच्या हवालदार बचित्तर सिंह यांना अशोकचक्र देऊन सन्मानित करण्यात आले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मराठवाडा तेरा महिने पारतंत्र्यात होता. रझाकारांच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी अनेकांनी प्राणाची बाजी लावली. त्यात हवालदार बचित्तर सिंह यांचे शौर्य अभूतपूर्व आहे. प्राणपणाने झुंजणाऱ्या बचित्तर सिंह यांच्या बलिदानाचा इतिहास मराठवाड्यात आजही दुर्लक्षित आहे.
बचित्तर सिंह त्यांच्या दोन तुकड्यांसह सोलापूरमार्गे 13 सप्टेंबर 1948 रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास नळदुर्गजवळ पोचले. समोर नाकाबंदी करण्यात आली होती. त्याच वेळी, समोरून दोन मोठ्या गाड्या त्यांना त्यांच्या दिशेने येताना दिसल्या. बचित्तरसिंह यांनी त्यांच्या साथीदारांना फायरिंगचे आदेश दिले. दोन्ही बाजूंनी अंदाधुंद गोळीबार सुरू झाला. बचित्तर सिंह यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जवानांनी शौर्याच्या जोरावर दोन्ही वाहनांवर ताबा मिळवला. त्याच वेळी शत्रुसैन्याने सुरक्षित जागा पाहून बचित्तर यांच्या तुकड्यांवर गोळ्यांची बरसात सुरू केली. मोठ्या धैर्याने बचित्तर सिंह यांनी शत्रूला सामोरे जात त्यांच्या गोळ्यांचा मुकाबला केला. बंदुकीची गोळी त्यांच्या पायाच्या मांडीत सर्रकन येऊन घुसली. त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत पाऊलही पुढे टाकता येईना. समोरून एलएमजी गोळ्यांचा पाऊस सुरू होता. त्यांनी एकट्याने स्वतःला जमिनीवर फरफटत नेऊन शत्रूला गारद केले. गंभीर जखमी असताना रांगत जाऊन शत्रूच्या तळावर हातगोळे फेकले. ती जीवघेणी जखम अखेर जीवावर बेतली. पण निजामाच्या सैनिकांना पराभवाची धूळ चारून तो पंजाबी सरदार कामी आला. गंभीर जखमी असतानाही रणांगण न सोडता बचित्तर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना प्रोत्साहित केले. हवालदार बचित्तर सिंह यांचे शौर्य आणि त्यांची प्रेरणा यांच्यामुळे भारतीय सैन्याने निजामाला शरण येण्यास भाग पाडले. मराठवाडा निजामाच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी अमूल्य शौर्य गाजवून मृत्यूला मोठ्या धैर्याने सामोरे गेलेले हवालदार बचित्तर सिंह शांतता काळातील सर्वोत्तम पुरस्कार पटकावणारे देशातील पहिले अशोक चक्र विजेता ठरले!
देशाला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 रोजी मिळाले. त्यावेळी देश संस्थानांमध्ये विखुरलेला होता. देशभरातील पाचशेपासष्टपैकी पाचशेबासष्ट संस्थांनांनी स्वतंत्र भारतात सामील होण्यासाठी सहमती दर्शवली. मात्र काश्मीर, जुनागड आणि हैदराबाद यांनी स्वतंत्र भारतात विलीन होण्यास नकार दिला. शीख रेजिमेंटच्या जवानांवर हैदराबादच्या निजामाचा नि:पात करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. उस्मानाबाद तुकडीचे नेतृत्व करत होते हवालदार बचित्तर सिंह.
बचित्तर सिंह यांचा जन्म पंजाबमधील लोपो नावाच्या एका छोट्या गावात झाला. ते आई-वडिलांना एकुलते एक. ते वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी सैन्यदलात दाखल झाले. त्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळायचे होते. त्यांनी त्यांच्या शौर्याची चुणूक ब्रिटिश सैन्यासाठी ग्रीसमध्ये आणि दक्षिण आफ्रिकेत दाखवून दिली होती. त्यांनी दुसऱ्या महायुद्धात दक्षिण आफ्रिकेत गाजवलेल्या शौर्याचे दाखले दिले जातात. मराठवाड्यातील बहुतांश नागरिकांची इच्छा असतानाही निजाम मात्र स्वतंत्र भारतात सामील होण्यास तयार नव्हता. निजामाला शरण आणण्याची जबाबदारी भारतीय सैन्यदलातील शीख रेजिमेंटवर सोपवण्यात आली. त्या विशिष्ट तुकडीचे नेतृत्व हवालदार बचित्तर सिंह यांच्याकडे होते.
बचित्तर सिंह यांच्या बलिदानाचा इतिहास जिवंत करणारे स्मारकउभारणीसाठी व्यापारी नाविक संजय सहस्त्रबुद्धे प्रयत्न करत आहेत. पंजाबचेविद्यमान मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे त्यासाठी अनुकूल आहेत. ते शीख बटालियनचे सैनिक राहिले आहेत. स्मारकाबाबत सहस्त्रबुद्धे यांनी त्यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. शीख बटालियन आणि भारतीय सैन्यदल यांच्या सहकार्यामधून स्मारक उभारणी करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. स्मारकासाठी उस्मानाबाद-सोलापूर परिसरातील नागरिकांनीही पुढाकार घ्यायला हवा असे मत सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केले आहे.
– रवींद्र केसकर94046 19287
osdsanchar@gmail.com
रवींद्र केसकर हे लोकसत्ताआणि संचारया वृत्तपत्रांचे उस्मानाबाद जिल्हा वार्ताहर आहेत. त्यांनी इंग्रजी आणि मराठी या विषयांत एम ए केले आहे. ते उस्मानाबादमध्ये आयोजित केलेल्या त्र्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे प्रमुख कार्यवाह होते. ते कवी आहेत. त्यांची पत्नी भाग्यश्री केसरकर या ही कवयित्री आहेत. ते चाळीस वर्षाचे आहेत. त्यांना सफल आणि प्रबल या दोन मुली आहेत.
——————————————————————————————————–

About Post Author

2 COMMENTS

  1. अशोक चक्र विजेता (पहले)बचित्तरसिंह हयांचेस्मारक झालेच पाहिजे.आपला डाक्टर विजय दामोदरराव पांगरेकर औरंगाबाद महाराष्ट्र आपला भारत देश.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version