दाभोळचा इतिहास – मक्केचा दरवाजा !

0
230

दाभोळ हे दापोली तालुक्यातील महत्त्वाचे बंदर आहे. ते महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम किनाऱ्यावर असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येते. दाभोळ हे नाव दालभ्य ऋषींच्या नावावरून अथवा दाभ्य जंगल किंवा दाभिलेश्वर या नावांवरून पडले. दाभोळचा उल्लेख ‘पालीपाटमे’, ‘पेरीप्लस ऑफ इथिरियन सी’ या ग्रंथात आहे.

भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर मौर्य साम्राज्याची राजवट होती. त्या काळी पुढील बंदरांचा उल्लेख आहे – भ्रुगुकच्छ म्हणजे भरूच, शुर्पारक म्हणजे सोपारा, कलीएण म्हणजे कल्याण, सेमुल्ला म्हणजे चौल. दाभोळ बंदराची गणना त्यांतच केली जाते. दाभोळ बंदरात उतरलेला माल दक्षिण भारतातील बाजारपेठांत वितरीत केला जात असे. त्या प्रदेशांत अश्मक, मुलक, अपरांत, कुंतल, ऋषिक, भोगवर्धन यांसारखी जनपदे असल्याचे मत अभ्यासकांनी मांडले आहे.

कोकणातील बंदरे सातवाहन काळात भरभराटीस आली. त्याबद्दलचे उल्लेख स्ट्रॅबो, टॉलेमी, प्लिनी व पेरिप्लस या भूगोलवेत्त्यांनी तर हुएनस्तंग, इब्नबतुता, अल्बेरुनी यांसारख्या प्रवाशांनी त्यांच्या लिखाणात केलेले आहेत. कोकणातील बंदरांतून रोम, इजिप्त, अरेबिया, इराण या देशांशी व्यापार चालत असे. इसवी सनपूर्व दुसरे शतक ते इसवी सन 50 या अडीचशे वर्षांच्या काळात रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तर भागात महत्त्वाची बौद्ध केंद्रे होती. ते अनुमान चिपळूण येथील लेण्यांवरून काढण्यात आले आहे. दापोलीजवळ असणारी पन्हाळेकाजी येथील बौद्ध लेणी ही इसवी सनपूर्व पहिल्या शतकात तर शैव लेणी दहाव्या-अकराव्या शतकात कोरलेली आहेत. त्या लेण्यांच्या माथ्यावर शिलाहारकालीन किल्ला आहे. जुनागड येथील इसवी सनपूर्व दीडशेच्या शिलालेखात क्षत्रप राज्यकर्ता रुद्रसेन (पहिला) याने ‘अपरान्त’ जिंकून घेतल्याचे म्हटले आहे.

तो प्रदेश यज्ञश्री सातकर्णीने इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात जिंकून त्याच्या अधिपत्याखाली आणला. सातवाहनांचे राज्य पश्चिम किनारपट्टीपासून कृष्णेचा त्रिभुज प्रदेश ते दक्षिणेस उत्तर तामिळनाडूपर्यंत दुसऱ्या शतकाच्या शेवटी पसरले होते. रत्नागिरी जिल्हा हा कमीत कमी शंभर वर्षे तरी सातवाहन साम्राज्याचा भाग होता. त्या नंतरचा जवळपास सहाशे वर्षांचा इतिहास ज्ञात नाही.

दाभोळजवळील जमिनीत खोदलेले चंडिकेचे मंदिर हे इसवी सनाच्या सहाव्या शतकातील असावे. चालुक्यांचे शासन सहाव्या शतकाच्या मध्यापासून आठव्या शतकाच्या मध्यापर्यंत त्या जिल्ह्यावर होते. कुलाब्यातील मुरुड-जंजिरा येथे सापडलेल्या इसवी सन 993 मधील शिलाहार नृपती अपराजितदेव अथवा अपरादित्य याच्या ताम्रपटात उत्तरेस असलेल्या लाट देशापासून दक्षिणेस चंद्रपूर म्हणजे सध्याच्या गोव्यातील चांदोरपर्यंतच्या परिसरावर शिलाहार राज्यकर्त्यांचे राज्य असल्याचे म्हटले आहे.

दापोलीजवळ जालगाव येथे ताम्रपट इसवी सन 1202 चा मिळाला. तो प्रदेश त्यावेळी जैत्र सामंताच्या अधिपत्याखाली होता. ते सामंत शिलाहार राजवटीतील असावेत. मात्र ते समजण्यास पुरावे उपलब्ध नाहीत. शिलाहार राजवटीत दापोलीजवळील पन्हाळेकाजी येथील शैव लेणी कोरण्यात आली. त्या लेण्यांच्या माथ्यावरील प्राणलदुर्गही त्याच काळात अपरादित्य याने त्याचा मुलगा विक्रमादित्य याच्यासाठी बांधला. यादवांची सत्ता संपूर्ण महाराष्ट्रावर चौदाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात होती. ते रामचंद्र यादव यांच्या 1310 च्या पुरुषोत्तमपुरी ताम्रपटात दिसून येते. संगमेश्वर व खेड यांचे उल्लेख त्या ताम्रपटात आहेत. त्यानंतर तो परिसर विजयनगर साम्राज्याचा भाग झाला. तसे ‘अंजनवेलची वहिवाट’मध्ये म्हटले आहे. त्या काळात त्या परिसरात गुढे, माणिकदुर्ग, कासारदुर्ग यांसारखे किल्ले बांधले गेले.

दाभोळचा तेराव्या शतकापर्यंतचा इतिहास चालुक्य, शिलाहार, यादव यांसारख्या हिंदू राजवटींचा इतिहास आहे. त्या बंदरावर समुद्रमार्गे पोर्तुगीज, डच, हबशी, तुर्क, इराणी यांची सतत आक्रमणे त्यानंतर होऊ लागली. तेराव्या शतकाच्या मध्यापासून सोळाव्या शतकाच्या अखेरपर्यंत जवळपास तीनशे वर्षांहून अधिक काळ मुसलमानी सत्तांचा अंमल दाभोळवर राहिला होता. त्यांतील काहींनी त्यांच्या सत्तेत आणि कारभारात येथील लोकांना सामावून घेतले. मुस्लिम सत्ताधीशांनाही बाहेरच्या तुर्की, हबशी, शिया यांच्याशी युद्धे करावी लागली आणि येथे हजारोंची कत्तल वेळोवेळी झाली. त्यामुळे दाभोळच्या बहुसंख्य भागात जिकडेतिकडे कबरीच कबरी दिसतात. दाभोळच्या पश्चिमेला समुद्रकिनारी आणि डोंगरावर शिया मुसलमानांची असंख्य थडगी दिसतात.

          अल्लाउद्दिन खिलजी याने यादव साम्राज्याचा नाश चौदाव्या शतकाच्या सुरुवातीला केला. अल्लाउद्दिन खिलजीचा सेनापती मलिक काफूर याने 1312 साली स्वारी करून माहीम, चौल, दाभोळ हा प्रदेश काबीज केला. मलिक काफूरला त्या नंतर अल्लाउद्दिन खिलजीने दिल्लीत बोलावून घेतले. काफूरच्या अनुपस्थितीत संगमेश्वर, दाभोळ येथे स्वतंत्र राज्ये अस्तित्वात आली. संगम घराण्यातील हरिहर व बुक्क यांनी विजयनगर साम्राज्याची स्थापना 1336 मध्ये दक्षिणेत केली. तेव्हा तेथील स्थानिक राजांनी विजयनगरचे मांडलिकत्व पत्करले. त्यामुळे तो प्रदेश विजयनगरच्या अधिपत्याखाली विनासायास आला.

अल्लाउद्दिन बहामनी याने दिल्लीचा सुलतान महंमद बिन तुघलक याचे स्वामित्व 1347 मध्ये झुगारले. त्याने बहामनी साम्राज्याची स्थापना केली. अल्लाउद्दिन हसन याने समुद्रकिनाऱ्याचे महत्त्व ओळखून विजयनगर साम्राज्याचे कोकणातील प्रदेश ताब्यात घेतले. त्याचे साम्राज्य वाढवण्यास सुरुवात केली. दाभोळपासून गोव्यापर्यंतचा कोकण प्रदेश 1470 पर्यंत संगमेश्वरच्या राजाच्या ताब्यात होता. मलिक उत्तुजारने दक्षिण कोकणात केलेल्या स्वारीची धुळदाण शिर्के व संगमेश्वरचा राजा जाखुराय यांनी उडवली. त्यामुळे बहामनी सत्ता दाभोळच्या खाली पसरू शकली नाही. महंमद गवान याने बहामनी सत्तेखाली उर्वरित कोकण किनारपट्टी 1471 मध्ये आणली. बहामनी साम्राज्यात त्या शहराचे नाव बदलून ‘मुस्तफाबाद’ ठेवण्यात आले होते. पुढे, तेथे असणाऱ्या अजमखान नावाच्या सरदाराच्या मुलाने ते नाव बदलून ‘हामजाबाद’ असे ठेवले. बहामनी साम्राज्याचे विभाजन झाल्यावर अहमदनगरचा निजाम, विजापूरचा आदिलशहा व गोवळकोंड्याचा कुतुबशहा यांच्यात बहामनी साम्राज्यातील प्रदेश विभागला गेला, त्यावेळी तो प्रदेश विजापूरकरांच्या ताब्यात आला. विजापूरच्या आदिलशहाचा सरदार मुस्ताफाखान याने तेथील सरदार पवार यांच्यावर हल्ला करून पवारांच्या ताब्यातील सर्व ठाणी जिंकून उद्ध्वस्त केली व तो परिसर ताब्यात घेऊन दाभोळ येथे त्याचे मुख्य ठाणे वसवले.

          शिवाजी महाराजांनी कोकणात स्वाऱ्या करून तो प्रदेश त्यांच्या अंमलाखाली 1651 नंतर आणला. महाराजांनी वाशिष्ठी नदीपर्यंतचा दाभोळ वगैरे प्रदेश 1652 पूर्वी जिंकून घेतलेला होता. औरंगजेबाने 1657 मधील एका फर्मानात महाराजांनी जिंकलेल्या दाभोळ परगण्यास मान्यता दिलेली दिसते. महाराजांच्या फौजेने दाभोळ 1660 मध्ये ताब्यात घेतले. तेव्हा तेथे अफजलखानाची तीन जहाजे होती. त्यांनी ती ताब्यात घेतली. पुन्हा काही काळ तो प्रदेश आदिलशाहीत गेला. मराठी आरमाराचा वीस संगमेश्वरी जहाजांचा काफिला 1659 साली सिद्ध झाला. महाराजांनी तो परिसर दोन वेळा 1660 आणि 1661 मध्ये लुटून राजापूर, दाभोळ, चिपळूण, संगमेश्वर हे प्रदेश स्वराज्यात सामील केले. संभाजी महाराजांच्या वधानंतर तो प्रदेश मुघल सत्तेच्या ताब्यात गेला. औरंगजेबाचा मृत्यू 1707 मध्ये झाल्यावर तो प्रदेश सिद्दीच्या आणि पेशव्यांच्या ताब्यात होता. दाभोळ पेशव्यांच्या ताब्यात 1734-35 मध्ये सिद्दी विरूद्धच्या मोहिमेत आले. तो सर्व प्रदेश 1818 मध्ये इंग्रजी सत्तेच्या ताब्यात गेला.

दाभोळचा कालपट बघता अनुक्रमे इसवी सनपूर्व सहावे शतक ते इसवी सनपूर्व चौथे शतक या कालखंडात महाजनपदे होती, त्यानंतर इसव सनपूर्व चौथे शतक ते इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकात मौर्य साम्राज्याचा भाग होते. त्यानंतर इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकापासून इसवी सनाच्या तिसऱ्या शतकाच्या मध्यापर्यंत हा प्रदेश सातवाहन आणि क्षत्रप राज्यकर्त्यांच्या अमलाखाली होता. नंतरची जवळपास तीनशे वर्षे त्या प्रदेशावर नेमक्या कोणत्या राजवटीचे साम्राज्य होते हे आज सांगता येत नाही, कदाचित, तो प्रदेश त्या काळात राष्ट्कुट व चालुक्य साम्राज्याचा भाग असावा. सहाव्या शतकानंतर तेथे शिलाहार, यादव, विजयनगर राजवटी नांदत असल्याचे इतिहासावरून दिसते. चौदाव्या शतकाच्या सुरुवातीस येथे दिल्लीच्या खिलजी घराण्याने त्यांची सत्ता प्रस्थापित केली. दिल्ली सुलतानांच्या नंतर त्या प्रदेशावर बहामनी राज्यकर्त्यांनी त्यांचा अंमल बसवला. बहामनी साम्राज्याचे विघटन इसवी सन 1490 मध्ये झाले. त्यानंतर तो प्रदेश अहमदनगरच्या निजामशाहीकडे गेला. दाभोळचे स्वामित्व इसवी सन 1633 मध्ये निजामशाही बुडाल्यावर विजापूरच्या आदिलशाहीकडे आले. इसवी सन 1651-52 मध्ये दाभोळ छत्रपती शिवाजी महाराजांनी जिकून घेतले. तो प्रदेश मोगलांच्या ताब्यात 1689 मध्ये, छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर गेला. दाभोळ जंजिरेकर सिद्दीच्या ताब्यात इसवी सन 1707 ते 1734 पर्यंत होते. पेशव्यांनी दाभोळ 1735 मध्ये छत्रपती शाहू महाराजांतर्फे जिंकून घेतले. अखेर, इसवी सन 1818 ते 1947 पर्यंत म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत दाभोळ इंग्रजांच्या ताब्यात राहिले.

‘अंजनवेलची वहिवाट’ : ही पालशेत येथे मिळालेल्या एका जुन्या हस्तलिखिताची नक्कल असल्याचे द.वा. पोतदार यांनी म्हटले आहे. सदर हस्तलिखित भारत इतिहास संशोधक मंडळाच्या शके 1835 (इसवी सन 1913) सालच्या अहवालात प्रसिद्ध झाले आहे.

          दाभोळचे महत्त्व आदिलशाही आमदानीत खूप वाढले. तेथे आदिलशाही काळात लारी नावाचे नाणे पाडले जात असे. दक्षिण हिंदुस्थानातील मुस्लिम जन मक्केला जाण्यासाठी त्या बंदराचा वापर करत असत. त्यामुळे दाभोळ शहरास ‘मक्केचा दरवाजा’ अथवा ‘बाबूल-ए-हिंद’ असे संबोधले जात असे. अरबस्थानातून घोड्यांची आयात त्या बंदरात होत असे. आदिलशाही राजवटीत तेथे काही वैशिष्ट्यपूर्ण इमारती बांधल्या गेल्या. त्यात प्रामुख्याने दाभोळचा किल्ला, जामा मशीद, अंडा मशीद अथवा मासाहेबा मशीद, फरमान चबुतरा, फताह मशीद, अलीमशीद, सादत अली मशीद यांचा समावेश होतो.

संदीप प्र. परांजपे 9011020485 sparanjape0665@gmail.com

——————————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here