दत्त देवतेचे विविधांगी दर्शन

भगवान दत्तात्रेय ही भारतीय संस्कृतीतील अद्‌भुत निर्मिती आहे ! ते अत्री व अनसूया यांचे पुत्र आणि विष्णूचे अंश होत. दत्तात्रेयांचा प्रभाव शैव, वैष्णव, शाक्त या तिन्ही प्रमुख उपासना प्रवाहांना व्यापून उरणारा आहे. दत्तात्रेयांविषयीचा उत्कट श्रद्धाभाव महानुभाव, नाथ, वारकरी, समर्थ अशा वेगवेगळ्या संप्रदायांतही आहे. दत्तात्रेयांची चरित्रकथा अनेक पुराणांत वर्णन केलेली आहे. दत्तात्रेयांचे उल्लेख महाभारतात आढळतात. दत्तात्रेयांनी सहस्रार्जुन या त्यांच्या शिष्यावर कृपा केल्याचा उल्लेख महाभारताच्या वनपर्वात, शांतिपर्वात, अनुशासनपर्वात येतो. एक विशेष उल्लेख अनुशासनपर्वाच्या एक्याण्णव्या अध्यायात आला आहे. “अत्रीच्या वंशात जन्मलेल्या दत्तात्रेयाला निमी नावाचा पुत्र होता आणि निमीला श्रीमान नावाचा पुत्र होता.” दत्तात्रेयांचे स्वत:चे गृहस्थ जीवन असे क्वचितच कोठे प्रकट झाले असेल.

भविष्यपुराणातील कथेनुसार ब्रह्म-विष्णू-महेश हे तिन्ही देव अतिथींच्या रूपात अत्री आश्रमाच्या दारी येऊन उभे राहिले व त्यांनी अनसूयेला इच्छाभोजन मागितले. तिने पतीचे चिंतन करून अतिथींवर तीर्थ शिंपडले. त्याबरोबर तिघांची तीन बालके झाली. अनसूयेने अत्री यांच्यासमोर ती तिन्ही बालके ठेवून “स्वामिन्‌, देवेन्‌ दत्तम’ असे म्हटले. तिन्ही देवांनी त्यांची मूळ रूपे धारण केली. ब्रह्मा चंद्र झाले, शिव दुर्वास झाले. ते तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले. विष्णू मात्र अत्री व अनसूया यांच्या इच्छेनुसार दत्तरूपाने तेथेच राहिले. त्यांनी त्यांच्या सहा हातांत तिन्ही देवांचे प्रतीक म्हणून ब्रह्मदेवाचा कमंडलू आणि जपमाला, शंकराचा त्रिशूल आणि डमरू, विष्णूचे चक्र आणि शंख धारण केले.

दत्त म्हणजे ज्याने त्याच्या भक्तांना सर्वस्व दिले आहे असा. ‘दत्तात्रेय’ हा शब्द दत्त अत्रेय असा बनला आहे. अत्रेय म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा. अत्री यांची इच्छा ईश्वर त्यांना पुत्ररूपाने लाभावा अशी होती. भगवंताने त्यांच्यावर प्रसन्न होऊन म्हटले, “मी स्वतःला तुला देऊ (दत्त) केले आहे!’ त्यामुळे त्या अवताराला दत्त’ असे म्हणतात.

अत्री ऋषींचा उल्लेख ऋग्वेदातील पाचव्या मंडलात आहे. त्यांनी ग्रहणकाळातील सूर्याचे निरीक्षण केले होते. ते अग्निपूजक, सूर्योपासक होते. त्यांचे पर्जन्यसूक्त प्रसिद्ध आहे. अत्रिसंहिता व अत्रिस्मृती असे दोन ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. त्यांच्याविषयीचा कथाभाग गोपथ ब्राह्मण ग्रंथात आला आहे.

दत्तमाता सती अनसूया म्हणजे कर्दम ऋषी आणि देवहूती यांच्या कन्या. अनसूया धर्मपरायण तपस्विनी होत्या. कपिल मुनी हे त्यांचे बंधू.

दत्तात्रेय यांचा अवतार अत्री ऋषी व सती अनसूया अशा दाम्पत्याच्या आश्रमात झाला. मात्र दत्तजन्म वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. तो एकमुखी दत्त मंदिरात मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीच्या माध्यान्हकाळी झाला असे गृहित धरले जाते. दत्तजन्म अन्य ठिकाणी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषसमयी झाला असे मानतात. दत्तात्रेयांची मूर्तिवर्णने अग्निपुराण, विष्णुधर्मोत्तर पुराण, दत्तात्रेयकल्प या ग्रंथांत आढळतात. दत्तात्रेय हे त्रिमुख आणि षड्भुज, एकमुख आणि षड्भुज, एकमुख आणि द्विभुजही आहेत. ‘श्रीदत्तहृदय’ नावाच्या ग्रंथात तीन मुखे आणि दहा हात असलेल्या दत्त ध्यानाचे वर्णन आले आहे. दत्ताच्या त्रिमूर्तीची कल्पना पुराणकाळात रूढ झाली. दत्तात्रेयाचे सूचन ‘पृथ्वीपती’, ‘स्वर्णसिंहासनस्थ’ या विशेषणांवरून राजयोगी म्हणून होते. ब्रह्मा-विष्णू-महेश, सत्त्व-रज-तम, उत्पत्ती-स्थिती-लय, जागृती-स्वप्न-सुषुप्ती या तिन्हींच्या वर्णनाची परंपरा प्राचीन काळापासून प्रचलित आहे. त्रिमूर्तीची वर्णने ‘उत्तरकामिकामगम्‌’, ‘रूपावतार’, ‘रूपमंडन’, ‘शिल्परत्न’ आदी ग्रंथांतून आढळतात.

श्रीदत्तांना गिरिकंदरांमध्ये एकांतात वास्तव्य करणे फार आवडते. ते ‘सह्याद्री-निलय:, ‘श्रीमेरूनिलय:’, ‘श्रीशैलवनचारी’, ‘गिरीनारवासी’ आदी त्यांच्या विशेषणांवरून सूचित होते. त्यांच्या वास्तव्याचे पर्वत प्राय: त्रिकूट अथवा त्रिशिखर अशा स्वरूपाचे आहेत. औदुंबर वृक्षाने अश्वत्थ, तुलसी, बिल्व या तिन्ही वृक्षांचे स्थान कलियुगामध्ये घेतले असल्याची समजूत आहे. त्यामुळे त्याला कलियुगातील कल्पवृक्ष असे समजले जाते. त्यासाठीच जेथे जेथे श्रीदत्तमूर्ती व पादुका असतील तेथे तेथे औदुंबर वृक्ष असल्याचे दृष्टीस पडते. त्यांच्या पाठीमागे गाय उभी दिसते. पृथ्वी आणि कामधेनू हे त्या गायीचे स्वरूप आहे. त्यांच्याभोवती चार श्वान दिसतात. ते चार वेदांचे प्रतीक आहेत. दत्तात्रेयांच्या खांद्याला झोळी असते. झोळी हे ते संचयरहित असल्याचे व त्यांच्या निरहंकारित्वाचे, संन्यस्त वृत्तीचे प्रतीक आहे.

हरिवंशाच्या पहिल्याच पर्वात म्हटले आहे, की दत्तात्रेयांचा अवतार विश्वकल्याणाकरता झाला असून ते क्षमाशील आहेत. तो अवतार अन्य अवतारांप्रमाणे दुष्टांचा नाश करून समाप्त होणार नाही. तो अवतार उपदेशाने जगाचा उद्धार करत चिरंजीव राहणारा असा आहे. दत्तात्रेयांचा समावेश वैष्णव धर्मांतर्गत पाच रात्र संप्रदायाच्या ‘अहर्बुध्न्य संहिते’त ‘विभव संकल्पने’त केलेला आहे.

दत्तात्रेयांचा महिमा गणेश, मुद्गल, कूर्म, वायू, अग्नी, शिव, विष्णु, विष्णु धर्मोत्तर, स्कंद, मार्कंडेय, ब्रह्म, ब्रह्मवैवर्त, ब्रह्माण्ड, महाभागवत, देवीभागवत, हरिवंश, भविष्य या सर्व पुराणग्रंथांतून मुक्त कंठाने वर्णन केला आहे. “दत्तात्रेय माहात्म्य’ या नावाचे पासष्ट अध्यायांचे दत्तपुराण ब्रह्मांड पुराणात आहे. दत्तात्रेयांची ओळख गुरुतत्त्वाचा सर्वोच्च आदर्श अशीच आहे ! ते ‘श्रीगुरुदेवदत्त’ या नामघोषावरून सिद्ध होते. त्यांनी स्वतः चोवीस गुरू केलेले आहेत. अवधूत आणि त्यांचा भक्त यदुराज यांचा संवाद श्रीमद्भागवतातील अकराव्या स्कंधाच्या सात ते नऊ या अध्यायांत आहे. त्यात चोवीस गुरूंचे प्रकरण आले आहे. ते अवधूत म्हणजे प्रत्यक्ष दत्तात्रेयच होत ! चोवीस गुरूंची नावे म्हणजे ती त्या त्या शक्तीची प्रतीके आहेत. दत्तात्रेय हे गुरू असल्याचे वर्णन शांडिल्योपनिषद, अवधूतोपनिषद्‌, जाबालदर्शनोपनिषद, भिक्षुकोपनिषद्‌, दत्तात्रेयोपनिषद आदी उपनिषदांतून केलेले आहे. त्यांच्या स्वरूपाचे, सामर्थ्याचे, केलेल्या उपदेशांचे वर्णन त्यात आले आहे.

अवधूतगीता, प्रबोधचन्द्रिका, स्वात्म संवित्युपदेश हे ग्रंथ भगवान दत्तात्रेयकृत समजले जातात. ते दत्तात्रेय आणि कार्तिकेय यांच्या संवादरूपात आहेत. दत्तात्रेय हे श्रीविद्येचे अन्विक्षिकी, मधुमती इत्यादी विद्यांचे प्रवर्तक आहेत. दत्तात्रेयांनी भार्गवकुलोत्पन्न भगवान श्री परशुराम यांना श्रीविद्येची (श्रीललिता महात्रिपुरसुंदरीदेवीची) उपासना दिली. दत्तात्रेयांनी देवर्षी नारद यांनाही भक्तिमार्गाचा व योगमार्गाचा उपदेश करून अनुग्रहित केले. शांडिल्यभक्तिसूत्रे, नारदभक्तिसूत्रे या दोन ग्रंथांचा आविष्कार दत्तात्रेय यांच्याच कृपेने झालेला आहे.

नारद यांनी नारदपुराणात ‘श्रीदत्तात्रेय स्तोत्र’ ग्रथित केलेले आहे. ते अठरा श्लोकांचे स्तोत्र दत्तसंप्रदायात लोकप्रिय आहे. दत्तप्रभूंनी आद्य शंकराचार्यांना स्वप्नात दृष्टान्त देऊन त्यांच्या सहस्रनामस्तोत्राचा उपदेश दिला. आचार्यांनी ते स्तोत्र जागे झाल्यावर जसेच्या तसे लिहून काढले. ती घटना आचार्यांनी प्रस्तुत स्तोत्रामध्ये नमूद केलेली आहे. नागार्जुन यांनी श्रीदत्तांची आराधना शैलपर्वतावर केली. दत्तांनी त्यांना दृष्टान्त देऊन रसविद्येचा उपदेश केला. रस म्हणजे पारा. त्यांनी ‘नागार्जुनतंत्र’ आणि ‘नागार्जुनीय’ हे ग्रंथ लिहिले. त्यामुळे त्यांना रसशास्त्रज्ञ म्हणून मान्यता प्राप्त झाली. दत्त हे अनेक देवतांच्या रूपाने नटलेले असल्यामुळे अनेक देवतांचे भक्त त्यांचे अनुयायी झालेले आहेत. योगाभ्यास करू इच्छिणारे अनेक साधकही त्यांचे भक्‍त झाले. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र असलेल्या सनकसनंदनापासून विद्यमान काळातील सर्व लोकांनी दत्तांचे अनुयायित्व स्वीकारले असल्याचे आढळून येते. काही संप्रदाय हे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे दत्त संप्रदायालाच अनुसरतात.

दत्तशिष्यांची परंपरा प्राचीन आहे – ऐलपुत्र आयु, अलर्क, प्रल्हाद, यदु, सहस्त्रार्जुन, भार्गवपरशुराम, सांकृती.

श्रीदत्त यांच्या दैनिक भ्रमणातील स्थळ आणि काळ यांत मतभेद आहेत, तरी ते त्रिभुवनात संचार करणारे आहेत. दत्त त्यांचा दिनक्रम जीवांचा उद्धार करत पूर्ण करतात. ते स्मरणगामी, स्मर्तृगामी या विशेषणांनी सूचित होते. दत्तात्रेयांचे सोळा अवतार म्हणजे- योगिराज, अत्रिवरद, दत्तात्रेय, कालाग्निशमन, योगिजनवल्लभ, लीला विश्वंभर, सिद्धराज, ज्ञानसागर, विश्वंभर, मायामुक्‍तावधूत, आदिगुरु, शिवरूप, देवदेवेश्वर, दिगंबर, कृष्णश्यामकमललोचन.

परमहंस परित्राजकाचार्य श्रीवासुदेवानंद सरस्वतीटेंबे स्वामी यांनी त्यांच्या ‘श्रीदत्तात्रेयषोडशावतारचरितानी’ या ग्रंथांत सर्व अवतारांच्या जन्मकथा विस्तृतपणे दिलेल्या आहेत. श्रीवासुदेवानंद सरस्वती उपाख्य टेंबे स्वामी यांनी सर्व संस्कृत-प्राकृत ग्रंथांतून सामग्री एकत्र करून ‘दत्तपुराण’ या नावाचा एक संस्कृत ग्रंथ सिद्ध केला. त्यांची तीन कांडे ज्ञान, उपासना, कर्मयोग अशी आहेत. स्वामींनी ऋग्वेदातील मंत्रांच्या साहाय्याने दत्तपुराणात वेदपादस्तुती वर्णन केलेली आहे. ते दत्तसूक्त समजले जाते. त्याचे पठण दत्त अभिषेकाच्या प्रसंगी रुद्राप्रमाणे केले जाते. त्यांनी दत्तस्वरूपाची व्यापक कल्पना श्रीदत्तचम्पू, त्रिशती गुरुचरित्र, द्विसाहस्त्री गुरुचरित्र, गुरुसंहिता आदी ग्रंथांतून मांडली. मंत्रगर्भरचना करून अनेक संस्कृत दत्तस्तोत्रे रचली. त्यांच्या श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव । श्रीदत्तास्मान्पाहि देवाधिदेव | भावग्राह्य क्लेषहारिन्सुकीर्ते | घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते || या प्रासादिक श्रीदत्त प्रार्थनास्तोत्राला मंत्राक्षरत्व प्राप्त झाले आहे. त्यांच्या दत्तभक्तीचा प्रत्यय श्रीदत्तस्तोत्रम्‌, श्रीदत्तगुरुपंचकम्‌, श्रीदत्तभावसुधारसस्तोत्रम्‌ आदी स्तोत्रांतून येतो. त्यांनी ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ हा मंत्र तसेच श्रीसत्यदत्तपूजाही प्रचारात आणली. श्रीधर स्वामी हे समर्थ संप्रदायातील सत्पुरुषही दत्तभक्त होते. श्रीदत्तप्रार्थना, श्रीदत्तस्तवराज, श्रीगुरुदत्तात्रेयाष्टकम्‌ या त्यांच्या संस्कृतरचना श्रीदत्तकरुणार्णव: म्हणून प्रसिद्ध आहेत. दत्तात्रेयाचे वर्णन कालिदास, माघ कवी, श्रीहर्ष यांनी संस्कृत महाकाव्यात केले आहे.

संत एकनाथ हे दत्तसांप्रदायिक होते. त्यांचे समकालीन दासोपंत हेदेखील  दत्तसांप्रदायिक ग्रंथकार ! त्यांची काव्यरचना दत्तभक्तीने प्रेरित आहे. त्यांचा संस्कृत भाषेतील ‘दत्तात्रेय माहात्म्य’ हा ग्रंथ म्हणजे जणू काही दत्तपुराण आहे. सहजयोग, राजयोग, लययोग, ध्यानयोग, कर्मयोग, हठयोग या सहा योगांचे विवरण दत्त-अलर्क संवादातून केलेले आहे. त्यांच्या उत्कट दत्तभक्तीचा प्रत्यय दत्तात्रेय सहस्रनाम स्तोत्र, सिद्ध दत्तात्रेय स्तोत्र, दत्तात्रेय नामावली, गुरुस्तोत्र आदी रचनांमधून येतो. दासोपंत हे दत्तभक्त होते. त्यांच्या उपासना परंपरेत त्या सोळा अवतारांचे जन्मोत्सव साजरे केले जातात. ‘सर्वज्ञ’ नावाचा दासोपंतांचा सतरावा अवतार साजरा केला जातो.

दत्तात्रेयांच्या नावाने ॐ दत्तात्रेयाय विद्महे योगीश्वराय धीमही | तन्नो दत्तः प्रचोदयात्‌ | व ॐ अवधूताय विद्महे अद्वैताय धीमही | तन्नो दत्त: प्रचोदयात्‌ | असे दोन पारंपरिक गायत्री मंत्रही रूढ आहेत. गुरुभक्तीचा पर्यायाने दत्तांचा महिमा विविध गीतावाङ्मयातूनही वर्णन केलेला आहे. त्या संदर्भात गुरुगीता या ग्रंथातील पुढील श्लोक मननीय आहे.

गुरर्बह्या गुरुविष्णूविष्णुगुरुर्देवो महेश्वर: |

गुरुर्देव परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ||

यदंघ्रिकमलद्वंद्वं द्वंद्वतापनिवारकम्‌ |

तारकं सर्वदाऽऽ पद्‌भ्यः श्रीगुरुं प्रणमाम्यहम्‌ ||

ओमश्रीश श्रीदत्तोपासक 9604859509

(आकाशवाणी, पुणे केंद्रावरील ‘गीर्वाण भारती’ या कार्यक्रमातील भाषण, 21 डिसेंबर 2018)

————————————————————————————————————————–

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here