Home वैभव दक्षिणी सांबाराची मराठी कहाणी (Has South Indian Sambar Marathi Origin?)

दक्षिणी सांबाराची मराठी कहाणी (Has South Indian Sambar Marathi Origin?)

सांबार
सांबार हा शब्द इडली-वडा-डोसा यांच्याबरोबर जोडून येतो. दक्षिण भारतातील तमिळनाडू, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, तेलंगण या प्रांतांतील खासीयतअसलेले इडली सांबार, वडा सांबार हे पदार्थ जगभरात पोचले आहेत. त्यातील सांबार संभाजी राजे यांच्या नावाबरोबर आले व त्याचे मूळ मराठी डाळीच्या आमटीत आहे असे कॉंग्रेस खासदार शशी थरूर यांनी एका समारंभातील भाषणात सांगितले. याचा अधिक शोध घेता कळले ते असे-  तमिळ भाषेत सांबार शब्द हा विशिष्ट आमटीसाठी वापरतात. तमिळ शब्दकोश सांबार हा शब्द मराठी भाषेतून तमिळमध्ये आला असे नमूद करतो. म्हणजे जसे तमिळमधील बरेच शब्द मराठीत आले आहेत व त्यांचा वापर सर्वजण करत असतात तसाच हा मराठी शब्द तमिळ भाषेने स्वीकारला आहे.
          हा शब्द तमिळ भाषेत कसा आला याबद्दल चेन्नईच्या नंदिताकृष्ण या विदुषीने इंग्रजीमध्ये लिहिलेला लेख हाती लागला. लेखात तंजावरचे महाराज एकोजी भोसले यांचा मुलगा शहाजी भोसले यांना आमटी खाण्याची इच्छा झाल्याने आणि आमटीत घालण्यासाठी कोकम उपलब्ध नसल्याने चिंच घालून आमटी केली आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजी तंजावरला आला तेव्हा त्यांनाही ती खाऊ घातली. त्यांना ती खूप आवडली म्हणून संभा+आहार = सांबार अशी त्याशब्दाची व्युत्पत्ती सांगितली आहे. नंदिताकृष्ण यांनी तंजावरच्या सरस्वती महाल ग्रंथालयातील मराठी पंडित भीमराव यांनी सदरची गोष्ट सांगितली व त्या संदर्भात ग्रंथालयातील एका मोडी कागदाचा आधार दिला असे म्हटले आहे.         
          त्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा संभाजी महाराज तंजावरला गेल्याचा ऐतिहासिक दाखला मिळत नाही असे कळले. म्हणून प्रसिध्द शिवचरित्र – संभाजी चरित्र व्याख्याते प्रा.प्रशांत देशमुख यांच्याकडे विचारणा केली तर त्यांनी संभाजी महाराज तंजावरला गेले नव्हते पण तिरूचिरापल्लीपर्यंत गेले होते असा ऐतिहासिक दाखला पाठवला.         
          नंदिताकृष्ण यांनी सरस्वती महाल या ग्रंथालयातील मोडी कागदाचा दाखला दिला असल्याने त्या ग्रंथालयात काम करणारे माझे मित्र विवेकानंद गोपाळ यांच्याकडे चौकशी केली. विवेकानंद हे तमिळ मातृभाषा असलेले तमिळ भाषेत एम.ए. केलेले आणि नंतर पुण्याच्या पश्चिमी भाषा केंद्रात मराठी शिकून मराठीतून पुणे विद्यापीठाची एम.ए. पदवी धारण करणारे – मोडी पंडित आहेत. त्यांनी बारा वर्षे सरस्वती महालमध्ये काम केले आहे. ते महाराष्ट्र सरकारच्या भाषा विकास मंडळातर्फे तंजावरच्या मोडी कागदपत्रांचे डिजीटलायझेशन करण्याचे काम करत आहेत. त्या कामासाठी त्यांनी व तंजावरचे विद्यमान महाराज शिवाजीराजे भोसले यांनी खास प्रयत्न करुन महाराष्ट्र सरकारकडून आर्थिक मदत मिळवली आहे. आतापर्यंत चार लाख कागदपत्रे डिजीटल करण्यात आली आहेत. त्यांच्याकडे विचारणा केली असता सा कोणताही पुरावा सरस्वती महालमधील मोडी कागदपत्रांत त्यांना सापडलेला नाही असे विवेकानंद यांनी सांगितले. अर्थात संभा+आहार = सांबार हा संबंध भीमराव पंडि यांनी कसा लावला ते कळत नाही.
          आता,सांबार हा शब्द मराठीत कसा वापरतात? विदर्भात कोथिंबिरीला सांभार म्हणतात. कोथिंबीरवडीला सांभारवडी म्हणतात. मग कोथिंबिर घालून केलेल्या आमटीला सांबार म्हणतात का? तर त्याचे उत्तर नाही असे आहे.
          कोकणात वडीचे सांबार असा आमटीचा एक प्रकार आहे. हरभऱ्याच्या डाळीच्या पीठात मसाले घालून त्याच्या सांजणीसारख्या लहान थाळीत थापून मोदकाच्या करंड्यात उकड काढून वड्या पाडतात. त्या वड्या घालून मसालेदार आमटी करतात. त्याला सांबार म्हणतात. त्यासांबार पदार्थावरून आमटीत असे काही टाकले, की त्याला सांबार म्हणतात. म्हणून विविध भाज्या घालून केलेल्या, चिंच घातलेल्या आमटीला सांबार असे नाव दिले गेले असावे.
          सांबारात टोमॅटो, बटाटा, भोपळा, शेवग्याच्या शेंगा, वांगे आणि अन्य अशा भाज्या घालून त्यांचे कालवण केले जाते. स्थलपरत्वे आणि स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीसापेक्ष मसाल्यांतील काही पदार्थ व त्यांचे प्रमाण बदलल्यामुळे सांबाराची चव ही वेगवेगळ्या ठिकाणी थोडीफार वेगवेगळी असते. परंतु, एक नक्की की त्यात (मराठी) आमटीचा आंबटपणा येण्यासाठी चिंच हा पदार्थ वापरला जातो. महाराष्ट्रात बहुधा सर्वच ठिकाणी चिंच, कोकम किंवा आमरोशी (कच्च्याआंब्याच्या सुकवलेल्या फोडी) यांचा पदार्थातील आंबटपणासाठी वापर होतो. कोकम वाळवून, पावडर करूआमरोशीची पावडर करून त्याचा वापर आमटीत केला जातो. आंबट वरण किंवा मच्छीच्या प्रकारात आंबट पदार्थ आवडीनुसार किंवाउपलब्धतेनुसार वापरले जातात.
          अर्थात सांबार म्हणा किंवा सांभार, त्याची व्युत्पत्ती पाहत बसण्यापेक्षा त्याची चव महत्त्वाची आणि तमिळनाडूचा डोसा, वडा, इडली यांचे सांभारशी असलेले नाते हे तमिळनाडू आणि महाराष्ट्र यांच्यातील चविष्ट नाते आहे. या चवदार नात्यात संशोधकांच्यामत-मतांतराचा विचार येऊ नये हेच खरे. शिवाजी विद्यापीठातील स्क्रिप्टालॉजिस्ट नेर्लेकर देसाई  हेच म्हणतात, की अधिकारी, सांबार आवडतो ना मग इडलीडोसावडा याबरोबर मजा घ्या. त्याच्या व्युत्पत्तीच्या भानगडीत न पडणे बरे. नेर्लेकर हे मराठी विकास मंडळाची तंजावरच्या मोडी कागदपत्रांचे काम पाहणारी जी समिती आहे त्या समितीवर शिवाजी विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून काम पाहतात.
          जर दस्तऐवज सापडत नाही तर सांबाराबद्दलची अशी कथा तंजावरच्या भोसले राजवंशात सांगितली जाते का याविषयी तंजावरचे विद्यमान महाराज शिवाजीराजे भोसले यांच्याजवळ चौकशी केली. ते म्हणाले, की “आमची आजी बोलताना असे म्हटल्याचे आठवते की हे नाव मराठीतून आले आहे आणि ते संभाजी राजांवरून आले आहे असे म्हणतात. मात्र त्यांनी दाखला देताना सरस्वती महालमधील त्याच मोडी कागदाचा उल्लेख केला. त्याच कागदाचा संदर्भ त्या इंग्रजी लेखात दिला आहे. मात्र शिवाजीराजे यांनी त्यात अधिक भर घातली, ती अशी की त्रिवेंद्रमला (तिरुअनंतपुरमला) तंजावरच्या भोसले घराण्यातील एक व्यक्ती राज दरबारी काम करत होती. त्यांनी हा शब्द केरळमध्ये नेला अशी माझी ऐकीव माहिती आहे.
          येथे एक गोष्ट प्रामुख्याने नमूद करणे गरजेचे आहे. इसवी सनाच्या सोळाव्या शतकाच्या पूर्वी म्हणजे भोसले वंशाचे राज्य तंजावरला स्थापन होण्यापूर्वी तमिळ भाषेतील साहित्यामध्ये सांबार या शब्दाचा उल्लेख किंवा वापर करण्यात आलेला आढळून येत नाही. आपण डाळीची जी आमटी किंवा वरण करतो त्याला तमिळमध्ये परप्पुकोळंबु असे म्हणतात. म्हणून मराठीतून तमिळमध्ये आलेला हा शब्द याच वंशाकडून आला असे मानण्यास प्रत्यवाय नसावा.
श्रीप्रकाश अधिकारी 9423806792/9273047889
shriprakashadhikari@gmail.com
श्रीप्रकाश अधिकारी हे गोरेगांव रायगडचे. ते रायगड मिलीटरी स्कूलचे निवृत्त प्राचार्य आहेत. त्यांचा जन्म 18 सप्टेंबर 1945ला झाला. त्यांनी संस्कृत, मराठी, इकॉनॉमिक्स आणि इंग्लिश या विषयांत एम.ए केले. त्यांनी बी.एड केले आणि तमिळ भाषेचा डिप्लोमाही केला आहे. त्यांनी कावेरी, काव्यमणैवी, स्नेहिदी या तीन तमिळ कादंबऱ्यांचे, मुकेडोळे या तमिळ कवितासंग्रहाचे आणि एका तमिळ कथासंग्रहाचे मराठी भाषांतर केले. तसेच, दोन मराठी पुस्तकांचेही इंग्रजी भाषांतरही प्रसिद्ध केले.
————————————————————————————————————————————

About Post Author

2 COMMENTS

  1. व्वा! सांबार कहाणी एकदम मस्त! अगदी समोर इडली सांबारची प्लेट असल्यासारखा सुगंध आला.त्यातून आम्हा सिकेपी लोकांच्या वडीच्या सांबाराचा उल्लेख सुखावून गेला. लेखकही चांगले खवय्ये दिसतात!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version