तुळसण – निसर्गाच्या कुशीतील ऐतिहासिक गाव (Tulsan)

_Tulsan_1_0.jpg

तुळसण हे कराडच्या पश्चिमेस बावीस किलोमीटर अंतरावर दक्षिण मांड नदीच्या काठावर निसर्गाच्या कुशीत सह्याद्रीच्या पर्वतरांगांत वसलेले गाव; ते सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यात आहे. गावाची लोकसंख्या पाच हजारापेक्षा जास्त आहे. ते दोन किलोमीटरपर्यंत पसरले आहे. तुळसण गावाच्या पूर्वेला लांडा डोंगर, पश्चिमेला भागुबाईचा डोंगर, उत्तरेला विठ्ठलाईदेवी मंदिर व दुधथानीचा डोंगर आणि दक्षिणेला महादेव मंदिर (शेवाळेवाडी) आहे.

तुळसण हे गाव सातारा संस्थानात होते. गावाच्या इशान्येला आगाशिवची लेणी, दक्षिणेला सवादे गावचे थोर संत सद्गुरू बाबा महाराज यांची समाधी, उंडाळेत कृष्णत बुवा यांची समाधी आहे. ते दादा उंडाळकर यांचे गाव आहे. पूर्वेला ओंड तर उत्तरेला कोळेवाडी ही गावे आहेत. गांवाच्या पश्चिमेला बागेचा ओढा तर पूर्वेला जानाईदेवीचा ओढा आहे. त्यांच्या संगमावरच गाव वसले आहे. गावाच्या इशान्येला गावातील संत नाथा बुवा यांची संमाधी आहे. ते पंढरपूरला जाण्यासाठी त्या ठिकाणी थांबत. थोर संत निरंजन स्वामी यांचाही जन्म तुळसण गावी झाला होता.

तुळसण हे कासारांचे गाव म्हणून सोळाव्या-सतराव्या शतकात ओळखले जाई. कासार समाजाचे लोक ज्या खिंडीतून गाव सोडून निघून गेले, त्या भागाला कासारदरा म्हणून ओळखले जाते. तर भागुबाई मंदिर डोंगराच्या सवादे गावाकडील दऱ्यास बाशिंगदरा म्हटले जाते. नवरा-नवरी व लग्नातील व-हाडी बाशिंगासह अचानक गायब तेथे पूर्वीच्या काळी झाले म्हणून, द-याला बाशिंगदरा म्हटले जाते. डोंगराच्या एका भागाला, तेथे मोरांचे प्रमाण जास्त असल्यामुळे मोरटेक म्हटले जाते.

तुळसण गाव कारली, वांगी व पानमळे यासाठी एके काळी प्रसिध्द होते. एकूण जमिनीचे क्षेत्र आठशेबेचाळीस हेक्टर, त्यापैकी पाचशे हेक्टर जमीन बागायती तर एकशेपंचेचाळीस हेक्टर डोंगरपड आहे. शेतीसाठी सध्या येवती, म्हासोली धरणाचे पाणी व विहिरींचे पाणी वापरले जाते. मुख्य पिके – ज्वारी, गहू, ऊस ही आहेत. शेतांना नांगरे माळ फाटा, नागझरी, माळ, मुलाणकी गोडाई, लिंबकाटा, वाण्याचा तळ, किंजळ, गडदू, पाळाक, देसकत अशी नावे आहेत. पूर्वी तेथील लोक बाजारासाठी काले, नांदगाव उंडाळे, येळगाव, कुंभारगाव व ढेबेवाडी येथे जात असत. नांदगाव हेच ब्रिटिश काळात पोलिस स्टेशन होते.

पूर्वी गणेशोत्सव काळात गावाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाई. गणेशोत्सवात हनुमान मंदिरासमोर मातीची मोठी गणेशमूर्ती बनवून तिची पूजा करून गणेशोत्सव साजरा केला जात असे. उंडाळे, रेठरे, कोळेवाडी व तुळसण या गावांची गणपतीची यात्रा एकाच दिवशी साजरी केली जाई. ग्रामदेवी निनाईदेवीला आदिमाया, अंबिका, तुळजाभवानी, महालक्ष्मी, काळम्मादेवी आदी देवतांच्या नावाने संबोधले जाते. निनाईदेवीचे मूळ स्थान उदगीर (तालुका शाहुवाडी) येथील आहे. देवीच्या मंदिराजवळ ऐतिहासिक तळे असून पूर्वी कोणत्याही सण-समारंभाच्या वेळी देवीची पूजा केल्यास त्यातून भांडी निघत होती, अशी वदंता होती. निनाईदेवी मंदिराचा व शिखराचा जीर्णोद्धार ग्रामस्थांनी 1988 मध्ये केला आहे. निनाईदेवीच्या दक्षिणमुखी भव्य मंदिरात देवीच्या दोन मूर्ती घडीव पाषाणाच्या आहेत. त्यापैकी मुख्य मूर्तीची झीज होऊ लागली आहे.

आश्विन शुद्ध अष्टमी या दिवशी जागर साजरा केला जातो. जागराच्या दिवशी नवीन कपडे घालून दंडस्नान घेणारे ग्रामस्थ व भाविक देवीच्या दर्शनासाठी जातात. गोंधळी वाद्ये वाजवतात. त्यामुळे मंदिराचा परिसर दुमदुमून जातो. दुस-या खंडेनवमीच्या दिवशी शेतीच्या अवजाराची पूजा घरोघरी केली जाते. तिस-या विजयादशमीच्या दिवशी सीमोल्लंघन साजरे केले जाते. सायंकाळी निनाईदेवीची पालखी व छबिना विठ्ठलवाडी येथे विठोबाला भेटायला जाऊन त्यानंतर गावाच्या वेशीत पूर्वेला असणा-या जानाईदेवी यांच्याशी निनाईदेवीची भेट होते. दरवर्षी अंदाजे दहा लाख रुपयांच्या फटाक्यांची आतषबाजी केली जाते. त्यावेळी मुंबईकडील ग्रामस्थांच्या बरोबर सांगली-विटा-कोल्हापूर परिसरातून भाविक उपस्थित असतात.

_Tulsan_3.jpgटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत सकाळी व रात्री एकवीस ठिकाणी आरती केली जाते. रात्रीच्या वेळी मंदिरात गोंधळ घातला जातो. त्यावेळी गावातील मानक-यांच्या मानाच्या मशाली पेटवून नाचवल्या जातात व गोंधळ घालण्याचा मान परंपरेनुसार मनव (तालुका कराड) येथील गोंधळी समाजाचा आहे. गावात भगवान शंकराचा अवतार असलेले जगन्नाथ, विठ्ठल-रुक्मिणी, हनुमान, दत्तात्रय, महादेव, लक्ष्मी, यशोदा आदी मंदिरे आहेत.

गावाला तुळजाभवानी नावावरूनच तुळसण नाव पडले असावे. तसेच ‘तुळासुर’ नावाच्या राक्षसाच्या नावावरून तुळसण हे गावाचे नाव पडल्याची दुसरी आख्यायिका आहे.

गावातील वीर पाटील भावकीचे मूळ पुरुष गोंदजी वीर पाटील यांचा जन्म 1566 साली झाला. त्यांचा वंशविस्तार होऊन थोरली व धाकटी अशा दोन भावक्या तयार झाल्या आहेत. त्यांच्या जन्मापासूनची वंशावळ उपलब्ध आहे. तसेच, ब्रिटिश काळातील 1886 च्या 7/12 उता-यानुसार त्यांचा वीर पाटील असा उल्लेख आहे. ते उतारे काही ग्रामस्थांच्या घरी उपलब्ध आहेत. गोंद्जी यांचे एक वंशज बंडू पांडू वीर (पाटील) यांच्याकडे निनाईदेवीची पालखी दस-याच्या दिवशी मंदिराजवळ आल्यानंतर पालखीला ओवाळण्याचा व पूजण्याचा मान आहे. निनाईदेवीला वारा (चौरी) घालण्याचा दुसरा मान विलास उर्फ उत्तम पाटील यांच्याकडे आहे. तर तिसरा मान बयाबाई नाना वीर यांनी हनुमान (मारुती) मंदिरासमोर व त्यांच्या घराजवळ बांधलेल्या तुळशी विवाहाचा, गावात पहिल्यांदा तुळशीचे लग्न लावण्याचा आहे. त्या दोन्ही तुळशींचे लग्न लागल्याशिवाय गावातील कोणत्याही तुळशीचे लग्न मान्य नाही. हा मान बाबा नाना वीर पाटील व परसू रावजी वीर पाटील यांच्याकडे आहे. गुढीपाडव्या दिवशी होणा-या विठोबाच्या वाडीतील यात्रेत पहिल्यांदा गाडी पळवण्याचा चौथा मान उमाजी नारू नाथा वीर यांच्या वंशजाकडे आहे. त्यांची मानाची बैलगाडी पळवल्यानंतर इतर लोकांच्या बैलगाड्यांच्या शर्यती लावल्या जातात. कोल्हापूरच्या कुलदैवत जोतिबाला मानाची सासनकाठी जात होती असे सांगितले जाते.

डॉ. निवृत्ती गोविंद वीर यांनी डॉक्टरीचे शिक्षण प्रतिकूल परिस्थितीत घेतले. त्यांच्या आई-वडिलांनी दोन एकर जमीन विकून त्यांना डॉक्टर केले. त्यांनी इंग्लंडमध्ये वीस वर्षें वैद्यकीय व्यवसाय केला. त्यांनी इंग्लंडचे नागरिकत्व स्वीकारले होते. त्यांनी दापोली (जिल्हा रत्नागिरी) येथील कुसुम यांच्याशी दादर येथे विवाह केला. दुसरा विवाह युरोपीयन महिलेशी केला होता. डॉ. निवृत्ती परत आल्यानंतर, त्यांनी कोयनानगर येथे बंगला बांधला. यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना राजकारणात येण्याचे निमत्रण दिले होते. तसेच, कराड येथे सुरु करण्याचा आग्रह केला. ते राजकारणात काही गेले नाहीत, परंतु त्यांनी दवाखाना कराड एस.टी. स्टॅण्डसमोर काही वर्षे सुरू ठेवला. त्यांचे वयाच्या पासष्टाव्या वर्षी 1992 मध्ये मिरज येथे निधन झाले. त्यांची इंग्लंड येथील कोट्यवधीची संपत्ती सरकारजमा झाली.

तुळसण येथे ऐतिहासिक गावविहीर आहे. तिला निनाईदेवीची विहीर म्हणून ओळखले जाते. विहिरीचे बांधकाम तुळसण गावाचे समाजसेवक, मार्गदर्शक नेते  कै. ज्ञानू काशिबा वीर यांच्या पुढाकाराने व ग्रामस्थांच्या वतीने 1955 मध्ये पूर्ण करण्यात आले. विहिरीचा वापर नळपाणी पुरवठा योजनेसाठी 1989 मध्ये सुरू झाला. विहिरीच्या वरील बाजूस नवीन काढण्यात आलेल्या विहिरी, पावसाचे कमी प्रमाण आणि नवीन मारलेली बोअरिंग, वाढलेली लोकसंख्या यांमुळे गावविहिरीचे पाणी कमी झाले. विहिरीची डागडुजी केल्यास जून  ते फेब्रुवारी या काळात पाणीसाठा सर्वासाठी उपलब्ध होईल. विहिरीवर स्त्री-पुरुषांना आंघोळीसाठी वेगवेगळ्या खोल्या बांधल्या आहेत.

_Tulsan_5.jpgतुळसण पंचक्रोशीतील सर्व देवांच्या पालख्या श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी कृष्णामाईच्या भेटीसाठी पाचवड येथे जातात. फक्त निनाईदेवीची पालखी त्या भेटीसाठी जात नाही, कारण तळ्याचे पाणी हे कृष्णामाईचे असून ती कृष्णामाईच असल्यामुळे पालखी नेण्याची गरज नाही असे सांगितले गेले.

गावात गुढीपाडवा, रामनवमी, नागपंचमी, गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, तुकारामबीज व दत्तजयंती हे सण  साजरे केले जातात.  नागपंचमीला बाबुराव  लखू कदम व बाबा  तुका कदम यांच्या घरी मातीचा मोठा नागोबा तयार करून जानाईदेवीच्या ओढ्याजवळ नागदेवतेच्या स्थानापर्यंत वाजतगाजत नेला जातो. त्याच दिवशी सकाळी लहान तरुण मुले उठून डोंगरात जाऊन ‘कार’ नावाचे बोरासारखे दिसणारे फळ तोडून आणतात. त्यानंतर बांबूपासून (कळक) ‘मेपटे’ नावाचे साधन बनवले जाते. नागोबा मंदिरासमोर मेपटयातून कारे उडवली जातात. हे गावाचे व नागपंचमीचे वैशिष्ट्य आहे. त्यावेळी मुली-स्त्रिया झिम्मा-फुगडी खेळतात.

संपत कोंडिबा वीर यांच्या घरी तुकारामबीज गेली ऐंशी वर्षे साजरी केली जाते. कोंडिबा वीर हे वारकरी संप्रदायात होते. त्यांनी तुळसण ते पंढरपूरपर्यंत लोटांगण घातले होते. संपत कोंडीबा वीर यांनी नवीन गाव विहिरीसाठी 1989 साली चार गुंठे जागा मोफत दिली होती. राजाराम बंडू माने यांच्या घरी गेली नव्वद वर्षे रामनवमी साजरी केली जात आहे. तर दादाजी बाळाजी वीर यांनी दत्तसंप्रदायाचा प्रसार करण्यासाठी त्यांच्या घराजवळ  दत्तमंदिर बांधले. बाबुराव बाळा वीर व कुंडलीक बाबू  खोत यांनी एकनाथ महाराजांच्या भारूडाच्या माध्यमातून काही वर्षे समाजप्रबोधन व मनोरंजन केले. गावात यशवंत नाट्यमंडळाची स्थापना  1965 साली झाली .मंडळाने गावचा सांस्कृतिक वारसा जोपासून काही कलाकार निर्माण केले. त्या काळात बाळकृष्ण विठू वीर (पोस्टमास्तर) यांनी रावबहाद्दूरची भूमिका अजरामर केली होती.

तुळसण ग्रामपंचायतीची स्थापना 1953 साली झाली. पहिले सरपंच  कै. गजाराम भाऊ माने हे होते. दुसरे सरपंच कै. जागरू विष्णू माने यांनी त्यांच्या आईचे दागिने गहाण ठेवून  ग्राम पंचायतीची जुनी इमारत बांधली.

स्वातंत्र्य सैनिक शामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेची शाखा गावात 5 संप्टेंबर 1994 रोजी सुरु करण्यात आली. शाखेची उलाढाल ‘बारा कोटी’ रुपयांची आहे.  शाखेमुळे गावाचे आर्थिक मान उंचावले. जिल्हा बँकेच्या ओंड उंडाळे व सवादे शाखांतून आर्थिक व्यवहार होतात. जिल्हा बँकेची शाखा चार वर्षांपूर्वी मंजूर झाली आहे. तसेच, निनाईदेवी नागरी पतसंस्था (मुंबई), निनाईदेवी ग्रामीण बिगरशेती पतसंस्था (तुळसण) अशा दोन संस्था  देवीच्या नावाने कार्यरत आहेत.

रयत सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक-संचालक म्हणून उंडाळे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्रीपती आबा वीर यांनी काम पाहिले, तर रघुनाथ वीर (पाटील) रयत सहकारी साखर कारखान्याच्या रयत कृषी ओद्योगिक वाहतूक संस्थेचे चेअरमन आहेत.

नवरंग गणेश मंडळ, बालगणेश मंडळ, जयहिंद गणेश मंडळ, ज्ञानदीप गणेश मंडळ, निनाईदेवी महिला मंडळ,  निनाईदेवी सार्वजनिक मोफत वाचनालय आदी सोळा मंडळे आहेत. बालगणेश मंडळ हे सर्वात जुने. त्याची स्थापना 1979 मध्ये झाली. त्यानंतर लगेच, 1980 साली नवरंग गणेश मंडळ स्थापन झाले. बालगणेश मंडळाच्या वतीने गणपती मंदिर बांधण्यात आले आहे. गावात चार ते पाच दुधसंघ आहेत.

संस्थापक आमदार विलासराव (काका) पाटील यांनी ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे निनाईदेवी माध्यमिक विद्यालय 1997 मध्ये सुरू केले. तुळसण सोसायटीचे माजी अध्यक्ष हरी ज्ञानू वीर ऊर्फ तात्या पाटील  यांनी त्यांचे घर भाडे न  घेता, सुरुवातीला दहा वर्षे हायस्कूलसाठी वापरण्यास दिले होते. नवीन इमारत 2007 मध्ये सुमारे वीस लाख रुपये खर्चून बांधण्यात आली आहे. जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते सातवी ही प्राथमिक शाळा असून तिची स्थापना 1918 साली झाली. एप्रिल 2018 मध्ये शाळेला शंभर वर्षें पूर्ण झाली आहेत. ती भागातील सर्वात मोठी व उपक्रमशील शाळा मानली जाते.

_Tulsan_2.jpgगावात कै. बुवाजी पिलाजी पाटील हे ज्योतिषी होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या घरात ज्योतिष विषयाची शेकडो पुस्तके व पंचांगे सापडली. त्यांचे शिक्षण सातवीपर्यंत झाले होते. त्यांना देवनागरी व मोडी लिपीचे ज्ञान होते. ते पोलिस पाटील होते. कै. जगन्नाथ विठू वीर हेही प्रसिध्द ज्योतिषी होते. शिवाजी आनंदा वरकड विविध प्रकारच्या रोगांवर  झाडपाल्याचे औषध प्रत्येक मंगळवारी मोफत देतात. त्यांच्याकडे पूर्ण पश्चिम महाराष्ट्रातून लोक येतात. निवृत्ती हिरवे हे लहान मुले, शेळ्या यांचे मोडलेले हात-पाय गावठी उपाय करून बरे करतात. माजी सैनिक पांडुरंग बाबुराव साळुंखे हे गावातील भजनी मंडळाचे प्रमुख  आहेत. ते भजनासाठी मिळालेली देणगी साठवून ती सामाजिक कामासाठी वापरतात. त्यांनी महादेव मंदिर जीर्णोद्धारासाठी मदत केली आहे, तर शंकर रामा कोळी यांच्या घरी चुनखडीपासून चुना तयार केला जातो. त्यांच्या चुन्याला कराड व शिराळा या तालुक्यांतून मागणी आहे. महंमद मुल्ला हे भजनात कलाट वाजवतात. त्यांच्या वाजवण्यामुळे भजनाची रंगत वाढते. त्यांनी ती परंपरा गेली चाळीस वर्षे जोपासली आहे. अपेक्षा वीर ही टी.व्ही. मालिकेत काम करते. तिने ‘कमला’ मालिकेत चांगला अभिनय केला होता. बाजीराव आनंदा वीर यांनी पंचवीस वर्षांपूर्वी गाई पाळलेल्या होत्या. ते दररोज धार काढण्यापूर्वी त्यांच्या मनोरंजनासठी टेपरेकॉर्डर लावत. त्याची गाईना इतकी सवय लागली की टेपरेकॉर्डर बंद असला की गायी कमी दूध देत. त्या घटनेला ‘ग्रामोध्दार’ व ‘पुढारी’ या दैनिकांनी प्रसिद्धी दिली होती.

विठोबाची वाडी (विठ्ठलवाडी) व पाचपुतेवाडी या दोन वाड्यांना स्वतंत्र महसुली गावांचा दर्जा देण्यात आला आहे. पण त्या वाड्या गावाचा अविभाज्य घटक आहेत. विठोबाची वाडी येथील यात्रा गुढीपाडव्याच्या दिवशी भरवली जाते. तेथे नाट्यपरंपरा जोपासली जाते. बापुराव करांडे यांनी पंचक्रोशीतील ग्रामीण रंगभूमी गाजवली होती. तसेच, निवृत्ती भणगे व सेवानिवृत्त शिक्षक बबनराव जामदार यांनीही नाट्यचळवळ पुढे नेण्यासाठी योगदान दिले. मातंग समाजातील शाहीर सिद्राम ऊर्फ सदाशिव चव्हाण यांनी पोवाडे, लावण्या, प्रवचन आदी माध्यमातून कराड तालुक्यात नावलौकिक प्राप्त केला होता. कै. तुकाराम मारुती चव्हाण, सीताराम मारुती चव्हाण हे बंधू एकतारी भजनासाठी प्रसिद्ध होते. कै. महादेव बापू चव्हाण वा सध्या बाजीराव काळुराम चव्हाण हे कराड परिसरातील विविध तमाशांत काम करतात. वाडीत बारा बलुतेदारांपैकी मातंग, चर्मकार व धनगर समाजाचे लोक राहतात. तेथील केरसुणींना परिसरात मोठी मागणी आहे. पाचपुतेवाडी डोंगराच्या कुशीत वसले आहे. तेथे  तुकाराम बीजेला जत्रा भरते. म्हसोबा, संत तुकाराम व स्थानिक संत नाना चंदू मोरे यांचे अशी मंदिरे आहेत. दोन्ही वाड्यांत पहिली ते चौथीपर्यंत शिक्षणाची सोय आहे. गावात  बारा बलुतेदार राहतात. ‘आपला सातारा जिल्हा’ या पुस्तकात 1970 पूर्वीच्या अभ्यासक्रमात पुरवठ्याच्या सोयीसंदर्भात गावाचा ‘आदर्श गाव’ असा उल्लेख आहे. पुरातन म्हटले जाणारे शिलालेख गावात आहेत. गावात येण्यासाठी एस. टी. ची सोय नाही, परंतु गावात जीपगाडीची व्यवस्था आहे. गावातील पन्नास टक्के लोकांचा शेती हा व्यवसाय प्रमुख आहे. काही लोक कराड एमआयडीसीमध्ये काम करतात. ड्रायव्हर, वकील, एलआयसी एजंट असे काही व्यावसायिक आहेत. गावातील अरविंद माने नावाचे शिक्षक यांनी निवृत्तीनंतर पेन्शनच्या पैशांतून गावात वृक्षारोपण केले. त्यांनी वडगांव, दहिवडी या गावांतदेखील वृक्षारोपण केले. त्यांनीच गावात ‘एनआरडीएफ फाउंडेशन’ची स्थापना केली आहे. ते गावातील युवकांना संघटीत करून ग्रामविकासाचे कार्य करत आहेत. तीन-चार किलोमीटर परिसरात शिंदेवाडी, कोळे, सवादे, कुसूर ही आजूबाजूची गावे आहेत.

संकलन -दिलीपकुमार रघुनाथ वीर-पाटील,
मु.पो. तुळसण, ता. कराड, श्री संत घाडगेनाथ हायस्कुल कोळे, ता. कराड, जि. सातारा.

About Post Author

2 COMMENTS

Comments are closed.