तुर्भे बुद्रुक (Turbhe Budruk)

0
53

रायगड जिल्ह्याच्या पोलादपूर (महाड) तालुक्यातील तुर्भे पंचक्रोशीमधील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला भूभाग म्हणजे तुर्भे बुद्रुक. ते एकशेसाठ घरांचे नऊशे लोकसंख्या असलेले गाव आहे. गावाचे बुद्रुक आणि खुर्द असे दोन भाग नदीमुळे होतात. बुद्रुक गावात सात वाड्या आहेत. वाड्यांमध्ये शिंदे, गोळे, पवार, वाडकर, मरगजे अशी सात आडनावे असलेली घराणी आहेत. त्यांना आवाड असे म्हणतात. प्रत्येक वाडीत एक देऊळ आहे. प्रत्येक घराण्याचे कुलदैवत वेगळे असून त्याचे प्रतिष्ठान एका घराण्यातील एकाच घरात आहे. तेथील प्रसिद्ध कुलस्वामिनीचे नाव झोलाई देवी असे आहे. झोलाईदेवीच्या पूजेचे आयोजन वर्षातून एकदा केले जाते.

गावात होळी व शिवजयंती उत्सव मोठ्या दिमाखात साजरे केले जातात. गावदेवीची यात्रा त्याच काळात असते. होळीच्या आधी रोज दहा दिवस होम असतो. मोठी होळी अकराव्या दिवशी असते. देवीची पालखी त्यानंतर निघते. पालखीचा मुक्काम मानाच्या घरात असतो. पालखी नाचवण्याची परंपरा इतर कोकणी गावांप्रमाणेच असते. गावात 1966 मध्ये श्री लक्ष्मी नारायण देवतेची मूर्ती असलेले कौलारू मंदिर बांधले गेले. वारकरी समुदाय सुरूवातीला दोन ते चार टक्के होता. तो सत्तर टक्क्यांपर्यंत पोचला आहे! बहुतांश लोक उदरनिर्वाहासाठी मुंबई-पुणे यांसारख्या मोठ्या महानगरात गेलेले आहेत. सर्वसाधारणपणे, स्त्रिया नऊवारी साडी आणि पुरूष सदरा-पायजमा परिधान केलेले असतात.

उन्हाळ्यात कडक ऊन असते. पावसाळ्यात खूप पाऊस पडतो. गावात तांदूळ हे प्रमुख पीक घेतले जाते. त्याचबरोबर तृणधान्य, कडधान्ये, भाजीपाला यांचे घरोघरी कौटुंबिक गरजेप्रमाणे उत्पादन घेतले जाते. तुर्भे बुद्रुक गावात ऐशी टक्के लोक शेती करतात. त्याचबरोबर तेथे जोडव्यवसाय कुक्कुटपालन, मत्स्यशेती हे आहेत. त्या करता सरकारी अनुदान मिळते. गावात बाजार भरत नाही. त्यासाठी गावातील लोकांना पाच किलोमीटरवर असलेल्या पोलादपूर येथे जावे लागते. काही निवडक गोष्टींसाठी तर महाडपर्यंत प्रवास करावा लागतो. गावातून सावित्री नदी वाहते.

‘रयत शिक्षण संस्थे’चे हायस्कूल गावात आहे; जिल्हा परिषदेची शाळाही आहे. पुढील शिक्षणासाठी पोलादपूर किंवा महाडपर्यंत प्रवास करावा लागतो. गावातील पुतळाजी शिंदे या जवानास त्यांच्या शौर्याबद्दल मरणोत्तर ‘परमवीर चक्र’ प्राप्त झाले आहे. गावात कोकणी बोलीभाषा बोलली जाते. गावापासून पंधरा किलोमीटर अंतरावर झुलता पूल आहे, गावापासून बारा किलोमीटर अंतरावर बाजिरे धरण आहे.

गावाच्या आजूबाजूला करळी, सरवली, तुर्भे खुर्द, लोहारे, दिवी ही गावे आहेत.

माहिती स्रोत : श्वेता शिंदे – 9967462183

संकलन – नितेश शिंदे

About Post Author