डॉ. तात्यासाहेब लहाने यांनी ‘सकाळ’ वृत्तपत्राने योजलेल्या त्यांच्या डोंबिवलीतील व्याख्यानात त्यांची बालपणापासूनची कहाणी सांगितली. ते किती कठीण परिस्थितीतून या पदापर्यंत पोचले ते ऐकले की आपण स्तिमित होतो. मग मनात येते, की आपण आपल्या अडीअडचणी, संकटे यांचा उगाच बाऊ करतो. त्या किरकोळ व तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात. आपल्याला लहाने यांच्यासारख्यांच्या जीवनाकडे बघून जीवन जगण्याचा उत्साह-उमेद मिळतात. जीवन समरसून कसे जगावे हे कळते. सर्वसामान्य माणसांना ही माणसे मार्गदर्शक वाटतात.
डॉ. तात्यासाहेब लहाने हा गोष्टीवेल्हाळ माणूस आहे. ते ठरावीक न बोलता आजुबाजूला निरीक्षण करत बोलत जातात :
‘सकाळ’ वृत्तपत्राचा बॅनर व सिंबॉल निळ्या व पाढंर्या रंगांत दाखवला आहे. त्याचे कारण म्हणजे निळ्या रंगाचे reflection इतर रंगांपेक्षा शरीरात आतपर्यंत झिरपते. पांढरा रंग निर्भेळतासूचक आहे. साहजिकच, हे वृत्तपत्र भेसळ नसलेले वृत्तपत्र आहे. ‘सकाळ’ सामाजिक कार्य करणारे वृत्तपत्र असून दुष्काळ पडल्यावर गुरांसाठी छावण्या उभारणारे वृत्तपत्र आहे. अशा वृत्तपत्रातर्फे बोलावले, की मी महाराष्ट्रात कोठेही जातो.
भोवताली निराशाजनक परिस्थिती असली तरी लोकांची जगण्याची उमेद वाढावी म्हणून मी व्याख्याने व अनुभव कथन करतो.
आपल्या आईबद्दल ते म्हणाले, देव कोणीच पाहिलेला नाही. तो आहे की नाही हे माहीत नाही. पण जशी हवा आहे पण दिसत नाही तसा, देव असावा. मी आई म्हणजे देवाचे रूप आहे असे मानतो. माझ्या वयाच्या चाळिसाव्या वर्षी दोन्ही किडन्या निकामी झाल्या. मुंबईला डायलेसिससाठी आलो. येथील डॉक्टर उमेद देतील असे वाटले होते. उलट, ते म्हणाले, की ‘तुम्ही जास्तीत जास्त एक वर्षं जगाल. सगळ्यांना भेटून घ्या. आयुष्य मर्यादित आहे’. त्यांनी पुढे विचारले, की ‘घरी कोण कोण आहेत?’ मी सांगितले, की ‘बायको, दोन मुले, चार बहिणी, दोन भाऊ, आई-वडील आहेत’. मी घाबरलो. सगळ्या नातेवाईकांना भेटलो. ‘ही आपली शेवटची भेट आहे’ असे त्यांना सांगितले. पण त्यानंतर एक वर्ष झाले तरी मी मेलो नाही. ते १९९५ साल असावे. त्यावेळी आईने मला एक किडनी दिली. त्यावेळी किडनी हृदयाच्या पिंजर्यातून काढावी लागे. किडनीच्या ऑपरेशनमध्ये देणार्याला जास्त टाके पडतात. आईला दीडशे टाके पडले होते! मला फक्त बारा. ती दोन दिवसांनी शुद्धीवर आली. लगेच, तिने डॉक्टरांना विचारले, ‘माझा मुलगा कुठे आहे!’ त्यांनी ‘पलीकडच्या वॉर्डमध्ये’ असा निर्देश केला. आई आपले प्रचंड बँडेज धरून तडक उठली. मला बघायला पलीकडच्या वॉर्डमध्ये आली. मी काचेच्या पेटीमधून तिला हात केला. मी बरा आहे हे बघून तिला समाधान व आनंद मिळाले. त्यामध्ये ती आपले दुखणे विसरली!
मी पत्नीला सांगितले, की ‘माझा दुसरा जन्म झाला! तोही आईमुळे मिळाला. तो मी लोकांची सेवा करण्यात घालवीन’. वास्तविक, किडनी बदललेला माणूस केव्हाही मरू शकतो. पण मी गेली चौदा वर्षे जिवंत आहे. रोज चौदा ते अठरा तास काम करतो. हे सर्व एका किडनीवर चालू आहे. मग मी जिवंत कसा? तो बहुधा बरे होणार्या रुग्णाच्या आशीर्वादामुळे असावा! जेथे विज्ञान थांबते तेथे आशीर्वाद-दुवा यांचे विश्व सुरू होते. असा एकही दिवस जात नाही की एकतरी रुग्ण मला ताजी फुले, मिठाई देत नाही.
‘माझी विमा पॉलिसी पुढील वर्षी मॅच्युअर होणार आहे’ असे लहाने यांनी गमतीत सांगितले. चांगल्या कामाचा संचय प्रत्येक माणसाच्या खात्यात जमा होत असतो. मी शस्त्रक्रियेचे पैसे घेत नाही. बरे होणारे मला बेंबीच्या देठापासून आशीर्वाद देतात. मी त्यांच्या जीवावर जिवित आहे. मी ‘आनंदवना’त अठरा-अठऱा तास काम करतो. बाबा आमटे यांना मी सामाजिक कार्यात गुरू मानतो. मी अनेक कुष्ठरोग्यांवर शस्त्रक्रिया केल्या आहेत. बाबा पाच हजार कुष्ठरोगी व दोनशे अपंग लोकांना जीवन जगण्याचा आनंद देतात. त्यांचे काम आमच्यापेक्षा एक हजार पट मोठे आहे.
राजकीय जीवनात, माझी शरद पवारांवर श्रद्धा आहे. त्यांचा वाढदिवस १२ डिसेंबरला असतो. त्या निमित्त मी अनेक ठिकाणी मेडिकल कॅंप लावतो. मी एकेका दिवशी दोनशे-अडीचशे शस्त्रक्रिया करतो. डोळ्यांच्या शस्त्रक्रियेला वेळ लागत नाही, एक पुरी करतो तोपर्यंत दुसरा दुसर्या बाजूला तयार असतो. माझ्याकरता स्पेशालिस्ट डॉक्टर व सदुसष्ट स्टाफ मेंबर रोज पाच-सहा तास फुकट काम करतात; ते सरकारी नोकर असूनही वेळ संपल्यावर काम करतात. मी त्यांना विचारतो, की तुम्ही हे का करता? त्यांचे उत्तर आहे, की त्यांनाही मानसिक समाधान मिळते! जीवनात अनेकदा चांगले अनुभव येतात. त्यापासून काम करण्याची प्रेरणा मिळते. माझ्या दोन्ही मुलांना देणगी वगैरे काही न देता मेडिकलला प्रवेश मिळाला.
मी सर्व डॉक्टरांना सांगतो, की महिन्याचे अठ्ठावीस दिवस तुम्ही पैसे घेऊन शस्त्रक्रिया करा, पण दोन दिवस त्या मोफत करा किंवा रोज फक्त दोन शस्त्रक्रिया मोफत करा. बघा, तुम्हाला किती चांगले अनुभव येतील! समाधान-आनंद मिळेल!
माझे कँपमधील अनुभव विलक्षण आहेत :
एक म्हातारे गृहस्थ आंधळे झाले म्हणून मुलांनी त्यांना गोठ्यात ठेवले, कारण त्यांचे सर्व विधी अंथरुणावर होत, ते गुरांच्या शेजारी होते. मी त्यांची शस्त्रक्रिया केली, त्यांना दिसू लागले. मग ते गोठ्यातून घरामध्ये आले!
मी शेतकर्यांची ऑपरेशनं बिनटाक्यांनी करतो. त्यामुळे प्रत्येक शेतकरी आठ दिवसांत शेतात काम करू शकतो. रोग्याला टाक्याच्या ऑपरेशनमध्ये बरे होण्यासाठी चाळीस दिवस लागतात. मग तो शेतात काम कसे करणार?
मी अजूनही स्वत:ला शेतकरी समजतो. माझी पंधरा एकर जमीन आहे. कारण माझे लहानपण शेतात गेले आहे. मी रोज सकाळी गुरे चरण्यासाठी घेऊन जाई. दहा वाजता परत येई. त्यावेळी आमच्या गावाला शाळा नवीन निघाली होती. वर्गांत कमीत कमी वीस मुले पाहिजेत, म्हणून मला शाळेत बळेच घातले गेले. मी चौथीच्या वर्गांत पहिला आलो. मग मला वरच्या वर्गांत घातले गेले. सुदैवाने, मी दहावीच्या केंद्र परीक्षेत पहिला आलो. सरांनी सांगितले, म्हणून सायन्सला गेलो. आमची घरची अडीच एकर कोरडवाहू जमीन. चार बहिणी व दोन भाऊ. म्हणून मी सावकाराच्या शेतात मजुरी करी. रोज एक रुपया मजुरी मिळे. त्यांतून मी वह्या-पुस्तकांचा व इतर खर्च भागवी. माझे ध्येयच होते, ‘कमावा आणि शिका’. मी दर आठवड्याला बागेला पन्नास घागरी पाणी घाली. त्याचा महिना तीस रुपये पगार मिळे.
मी दहावी-अकरावी-बारावीला पहिला आलो व मला एम.बी.बी.एस.ला प्रवेश मिळाला. पुढे, मी पदव्युत्तर शिक्षणासाठी डोळ्यांची परीक्षा निवडली, कारण त्यावेळी फक्त विषयाच्या अभ्यासासाठी शिष्यवृत्ती होती. मी जे.जे.ला नोकरीला लागलो. पण माझे इंग्रजी उच्चार ग्रामीण होते माझा तोंडी असे. मला डॉ. भालचंद्रसारखे गुरू मिळाले. मी त्यांची शिकवणी लावली. दोन वर्षे, मी इंग्रजी शिकलो. त्यांनी मला फार चांगले ज्ञान दिले व व्यावहारिक गोष्टी शिकवल्या. मी इंग्रजीचे पाच हजार शब्द पाठ केले. डॉ. कुलकर्णी माझी रोज ट्युशन घेत असत. कारण आपण ज्या भागात काम करतो ती भाषा येणे गरजेचे आहे. शेवटी, त्यांनी डोळ्यांना होणारे विविध आजार, विशेषत: मोतिबिंदू, काचबिंदू म्हणजे काय? ते कसे होतात? त्यांची काळजी कशी घ्यावी? वगैरे गोष्टी सांगितल्या. मधुमेहाची पुढची पायरी म्हणजे डोळे जातात; तरी मधुमेह कसा आटोक्यात आणावा तरच डोळे टिकतील ते सांगितले. लहान मुलांना भूल देऊन सहा वर्षांपर्यंत ऑपरेशन केले तर डोळे वाचतात नाही तर पुढे उपयोग होत नाही.
डोळे दान करण्याचे महत्त्वही त्यांनी सांगितले. भारतात दरवर्षी सत्तर-ऐंशी लाख लोक मरण पावतात, पण त्यातले फक्त एकोणचाळीस हजार लोक नेत्रदान करतात. हे प्रमाण फार कमी आहे. इतर देशांत हे प्रमाण जास्त आहे. आपल्याकडे अंधश्रद्धा आहे की डोळे दान केले तर दुसरा जन्म मिळत नाही. माणूस भूत होतो. ते सर्व खोटे आहे. आपल्याला दहा लाख डोळ्यांची आवश्यकता आहे. आपण मेल्यावर आपल्या डोळ्यांनी गरजू अंध लोकांना दिसणार असेल तर आपण नेत्रदान का करू नये? डॉ. लहाने या माणसाला जीवनाचे ध्येय कळले असावे (ध्येय कळणारी फार थोडी माणसे असतात). एकदा ते कळले की ती माणसे (दिवस-रात्र) निष्ठेने कामे करतात. आपल्या जीवाची पर्वा करत नाहीत. जीव ओतून काम केले की यशाची अनेक शिखरे, बघता बघता, पादाक्रांत होतात. त्यांच्या पायाशी सर्व पुरस्कार-पारितोषिके लोटांगण घालतात. ते समाजसेवेची नवीन चौकट निर्माण करतात. परमेश्वर बहुधा अशा माणसांचा प्रत्येकी एकच साचा बनवत असावा. तो माणूस मेल्यावर तो साचा मोडून पडतो. पण अशी माणसे असेपर्यंत सर्वसामान्य माणसांच्या जीवनांत स्वर्ग निर्माण करतात. अशा माणसांचे विचार ऐकले की जीवन जगण्यात मजा आहे हे कळते पण डोळसपणे त्यांच्याकडे बघण्याची गरज आहे. भारताला महासत्ता बनण्यासाठी असे आधारस्तंभ जगात आपली मान उंचावण्यात निश्चित मदत करतील.
लहाने यांनी आपल्यासारखे सर्वसामान्य लोक अंमलात आणू शकतील अशा अनेक सूचना केल्या. त्या जर पाळल्या तर जीवन सुसह्य होईल.
मोटारीमधील माणूस काच खाली करतो व थुंकतो, तो सुशिक्षित असतो पण स्वच्छतेचे नियम पाळत नाही. तोच मनुष्य परदेशात गेला की चॉकलेटचा कागद खिशात ठेवतो, बाहेर टाकत नाही.
परदेशामध्ये वाटेत कुठलाही छोटा प्राणी मेला तर कारवाला त्याला लगेच कागदात गुंडाळतो. पुढील कचराकुंडीत नेऊन टाकतो. मी नाशिकला कँपसाठी जातो. दरवेळी वाटेत चार-पाच मेलेली कुत्री दिसतात, त्यावरून शेकडो गाड्या जातात पण कोणी त्याला उचलत नाही.
इस्रायलला गेलो असताना रस्त्यावर अपघात झाला व दोन-तीन माणसे मेली. त्यांच्याभोवती गर्दी जमली नाही. आपल्याकडे गाडीचा धक्का कुणाला लागला की भोवती शेकडो लोकांची गर्दी जमते. त्यावर चर्चा सुरू होते. कारण येथे लोकांना काम नाही, काम असले तरी ते करत नाहीत. आपल्यात काम करण्याची वृत्तीच नाही. परदेशात लोक कार्यालयात आठ-आठ तास जीव ओतून काम करतात, मग मजा करतात. आपल्याकडे प्रत्येक काम सरकांरने, महापालिकेने करावे अशी अपेक्षा ठेवतात. सरकार तरी किती व काय करणार?
अशा बर्याच छोट्या गोष्टी सगळ्यांनी केल्या तर सर्वांचे जीवन निश्चित सुखी होईल. स्वच्छतेचे नियम पाळले, नागरिकांनी आपली कर्तव्ये पाळली तर बघता बघता, आपला देश महासत्तेच्या मार्गावर धावू लागेल नाहीतर ती वल्गना ठरेल.
– प्रभाकर भिडे
बी-२०९, ओम यमुना माधव सोसायटी
सावरकर रोड, डोंबिवली (पूर्व)
भ्रमणध्वनी : (0251) 2443642
————————————————————————————–