Home वैभव ट्रेण्डी पुणेरी पगडी (Trendy Puneri Pagdi)

ट्रेण्डी पुणेरी पगडी (Trendy Puneri Pagdi)

0
डोक्यावर फेटा किंवा पगडी घालण्याची गरज ऊन, वारा, पाऊस; तसेच, शत्रूंच्या वारापासूनही (हल्ला)डोक्याचे रक्षण व्हावे म्हणून भासली असावी. ती गरज नंतर परंपरा म्हणून मान्यता पावली. पुरुष डोक्यावर पगडी, फेटा, मुंडासे घातल्याशिवाय घराबाहेर पडत नसत. पगडी पुढे पुरुषांच्या समाजात असलेल्या दर्ज्याचेमानक बनली.

ती माणसाच्या आर्थिक, सामाजिक, अस्मितेची ओळख बनत गेली. स्त्री र बिचारी घरकामास जुंपलेली. तिच्या मस्तकाच्या संरक्षणार्थ केशसंभार होता! पगडी, मुंडासे, फेटा यांमध्ये प्रांताप्रमाणे विविधता आली. पगडी बांधण्याच्या पद्धती गुजरात, राजस्थान, पंजाब या राज्यांत वेगवेगळ्या आहेत. त्यामधून मग पगडी ही माणसाच्याधर्माची, प्रांताची ओळख मिरवू लागली. माणसा डोक्यावरील पगडी पाहून सहजपणे सांगता ये, की ती व्यक्ती शीख, मारवाडी आहे की पुणेरीआहे. काळ बदलत गेला, त्याप्रमाणे लोकांच्या गरजा, अभिरूची यांमध्ये बदल घडत गेला. पगडी घालण्याचे प्रमाण शहरात हल्ली सणासमारंभापुरते उरले आहे. ग्रामीण भागात टोपी, फेटे आढळतात; पण पगडी नाही.

महाराष्ट्रात पगड्या अनेक प्रकारच्या वापरल्या जातात. ऐतिहासिक काळात व्यक्ती ज्याप्रमाणे पगडी वापरत असे त्याप्रमाणे पगड्यांची ओळख निर्माण होत गेली. उदाहरणार्थ- नाना फडणवीस, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक… त्या विद्वानांच्या पगड्या त्या त्या व्यक्तीची ओळख म्हणून संबोधल्या गेल्या. महादेव गोविंद रानडे यांनी एकोणिसाव्या शतकात पुणेरी पगडी वापरण्यास सुरुवात केली असावी. ते न्यायमूर्ती होते व त्यांचा वावर सार्वजनिक सभा-समारंभात असे. त्यामुळे त्यांच्या पगडीस वेगळे सामाजिक स्थान लाभले. पुणेरी पगडी घालून, टांग्यात बसून स्वतःला मिरवणे हे पुण्यात राहणार्‍यांच्या प्रतिष्ठेचे लक्षण 1960 सालापर्यंत मानले जात होते. रँग्लर र.पु.परांजपे हे त्यांपैकी प्रसिद्ध नाव. अर्थात परांजपे यांच्या विद्वत्तेमुळे आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून असलेल्या स्थानामुळे पगडीलाच प्रतिष्ठा प्राप्त झाली.

सर्वसामान्य माणसाची मावळी पगडी, महाराष्ट्रात वारकरीर्तनकार वापरतात ती तुकाराम पगडी, महात्मा ज्योतिबा वापरत ती फुले पगडी, त्याचप्रमाणे पेशवाई पगडी, टिळक पगडी, मराठे सरदारांची शिंदेशाही पगडी (ही पगडी बनवण्यासाठी प्रचंड म्हणजे जवळपास साठ मीटर कापड लागते), शाही फेटा इत्यादीप्रकार पगडीचे आहेत. पगडी अलिकडे बुद्धिजवी वर्गापुरती न राहता सणसमारंभ, गणेश आगमन-विसर्जन मिरवणुका, निवडणुकांच्या मिरवणुका, कॉलेजात साजरे होणारे विविध डे, वाढदिवस वगैरे साजरे करण्यासाठी घालण्याचा ट्रेण्डला आहे. विजय तेंडुलकर यां्या ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकातही विविध पगड्यांचा वापर केला गेला. त्याचप्रमाणे संजय लिला भन्साळी यांच्या बाजीराव मस्तानीमधील बाजीरावामुळे पगडी भारतीय जनमानसात गेली.

          पुणे हे पेशवेकाळात राजधानीचे शहर होते. पुणे शहर पुढे शिक्षणाचेमाहेरघर, स्मार्ट सिटी अशी बिरुद मिरवत गेले आहे. त्यापुण्यात ट्रेण्डी म्हणून व्यक्तीचा गौरव पुणेरी पगडीघालून केला जातो. ती पुण्याची सांस्कृतिक ओळख मानली जाते. परंपरा कालानुरूप सुधारून येते ती अशी. पगडी एकेकाळी बुद्धिमत्तेचे, सुसंस्कृततेचे चिन्ह होती. ती फॅशनच्या सद्य प्रभावकाळात ट्रेण्डी बनली आहे. धुनिक काळाल पगडी सुटसुटीत आणि सहज वापरता येणारी आहे. ती तयार स्वरूपात डोक्यावर चढवण्यासाठी मिळते. पगडी पूर्वी कापड घेऊन बांधली जात असे. ज्या व्यक्तीसाठी पगडी तयार करायची त्या व्यक्तीच्या डोक्याचे माप घेऊन त्या आकाराचा साचा बनवला जात असे. त्यासाठी माती किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर करत. त्यावर विणकर समाजातील कारागीर घरोघरी जाऊन सुती कापडाची लाल रंगाची पट्टी बांधून देत असत. तीबांधलेली पगडी बरेच दिवस टिकत असे. त्यासाठी लाल रंगाच्या पट्टीचा वापर केला जात असल्यामुळे पुणेरी पगडीचा रंग लाल ठेवला गेला असावा. पगडीच्या वरच्या भागाला माथा म्हणतात. उजव्या बाजूला उंच भाग असतो, त्याला कोका आणि त्याच्या टोकाला चोच म्हणतात. पगडीची आकर्षकता ही चोचीवर अवलंबून असते. पगडीला जो गोंडा असतो त्याला जरतार वापरली जाे.पगडीच्या कडेला असलेल्या पट्टीला घेरा म्हटले जाते. घेर्‍याखाली कपाळावर येणार्‍या भागाला कमल, तर आतील भागाला गाभा असे म्हटले जाते. पुणेरी पगडी नव्या काळात ग्लोबल झाली आहे. पुण्यातील जे लोक कामानिमित्त परदेशी स्थायिक झालेले आहेत; त्यांनी पगडीला जगातील सुमारे चाळीसदेशांमध्ये पोचवले आहे.

पुण्यात पगडी तयार करणारे व्यावसायिक अनेक आहेत. त्यामध्ये मुरुडकर झेंडेवाले यांचे नाव प्रमुख आहे. पगडी लोप पावण्याच्या उंबरठ्यावर असताना मुरुडकर यांनी तिचे सांस्कृतिक वैशिष्ट्य जपले हे त्यांचे महात्म्य. त्यांनी तिला परंपरेचा मान मिळवून दिला. त्यांची तिसरी पिढी त्या व्यवसायात काम करत आहे. त्यांची स्वत:ची कार्यशाळा खास पगडी बनवण्यासाठी आहे. मुरुडकर झेंडेवाले हे त्यांची कार्यशाळा ‘रिसर्च अँड डेव्हलपमेंट’च्या तत्त्वावर चालवतात. त्यांच्या कारखान्यात चाळीस कामगार काम करतात. ते पगडी इकोफ्रेंडली बनवतात. त्यात स्थानिक पातळीवर मिळणार्‍या वस्तूंचा वापर केला जातो. वेणुताई’, एमआयटी यांसारख्या कॉलेजांमधील व्यावसायिक शिक्षण घेणारे विद्यार्थी त्यांच्या पगडी बनवण्याच्या तंत्रज्ञानाची माहिती शिकण्यासाठी त्यांच्याकडे येत असतात. पगडीचेआधुनिक रूप असा ‘शाही फेटा’ हे मुरुडकरांचे अनोखेइनोव्हेशन! हुबेहूब बांधल्यासारखा वाटणारा फेटा फोल्डिंग करून ठेवता येतो! तोप्रवासातही घेऊन जाता येतो.

          पुण्याचे भूषण मानला जाणारा दगडूशेठ हलवाई गणपतीही पुणेरी पगडी घालून आणखी मोहक दिसतो. ती खास पगडी मुरुडकर यांनी बनवली आहे. गणपतीसाठी फेटेही तयार केले जातात. शाही फेटा, जय गणेश फेटा, शिवशंभू फेटा, मयूर फेटा अशी त्यांची नावे. मुरुडकर यांनी पंढरीच्या पांडुरंगासाठीसुद्धा पगडी तयार केलेली आहे. काळानुरूप पगडीचे मूळ स्वरूप तसेच ठेवून रंग, कापड यांत बदल करून वैविध्य निर्माण केले जात आहे. पगडी फक्त लाल रंगात उपलब्ध नाही; ती गिऱ्हाइकाला हव्या त्या रंगात मिळू शकते. भगवी, जांभळी, गुलाबी, मोतिया रंग अशा विविध रंगांच्या पगड्या लक्ष वेधून घेतात. रेशीम आणि सॅटिन पगडीला तरुण वर्गाकडून अधिक पसंती मिळत आहे. मुंबईच्या डबेवाल्यांनी ब्रिटनच्या प्रिन्स चार्लला त्याच्या लग्नात्याला आणि त्याच्या राणीला हेर म्हणून पुणेरी पगडी आणि साडी अशा भेटवस्तू दिल्या होत्या. ती पगडी पुण्याच्या मुरुडकर यांच्या कार्यशाळेत तयार झाली होती. मुरुडकर गंमतीनेम्हणतात की, ब्रिटिशांनी भारतीयांना दीडशे वर्षें टोप्या घातल्या; पण भारताने मात्र त्यांना आवडीने पगडी घालण्या भाग पाडले आहे!
मंगला घरडे 9763568430
mangalagharade@gmail.com
———————————————————————————————-

 

मंगला घरडे
लेखक परिचय
मंगला भगवान घरडे या पुण्‍यात कात्रज परिसरात राहतात. त्‍यांनी पुणे विद्यापीठातून मराठी भाषेतून एम.ए.ची पदवी मिळवली आहे. त्‍यांनी यशवंतराव चव्‍हाण मुक्‍त विद्यापीठातून डिप्‍लोमा इन जर्नालिझमचा पद्व्‍युत्‍तर अभ्‍यासक्रम पूर्ण केला आहे. मंगला घरडे एका खासगी कंपनीत काम करतात. त्‍यांना वाचन आणि लेखनाचा छंद आहे.
लेखकाचा दूरध्वनी– 9763568430
——————————————————————————————————————-

 

About Post Author

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version