Home वैभव टिंगरीवाला

टिंगरीवाला

0
_Tingrivala_3.jpg

माझ्या लहानपणी आमच्या गावात केव्हा केव्हा टिंगरीवाला येई. टिंगरी नावाचे वाद्य वाजवणारा तो टिंगरीवाला. टिंगरी हे ग्रामीण भटक्या आदिवासी जमातीचे वाद्य आहे. एका हातात टिंगरी धरून दुस-या हातातील छोट्या लाकडी धनुष्याने वाजवण्याचे वाद्य. टिंगरीवाले लोक वाद्य स्वत: बनवतात. अहिराणीतील टिंगरी अन्य बोली भाषेत किंगरी होते, तर प्रमाण मराठीत तिला सारंगीही म्हणता येईल.

आम्ही मुले टिंगरीच्या तालावर गाणे म्हणत दारोदार भटकणा-या टिंगरीवाल्या माणसामागून गावभर फिरत असू आणि त्याचे गाणे ऐकत असू. त्याच्या त्या गावभटकंतीला ‘गाव मागणे’ असा शब्दप्रयोग वापरला जाई. टिंगरीचे हेलकावणारे लयबद्ध सूर माझ्या कानात साठवले गेले आहेत.

टिंगरीवाल्याच्या अंगात पांढरा मळका सदरा, कंबरेखाली तसेच धोतर, नाही तर लेंगापायजमा. डोक्यात पांढरी मळकी टोपी आणि खांद्यावर रंगीत उपरणे असायचे. गळ्यात कसली तरी माळ. कपाळाला लाल टिळा. ‘गाव मागताना’ कोणी पैशांऐवजी धान्य दिले तर ते घेण्यासाठी खांद्याला एक जुनाट पिसोडी अडकावलेली असायची. (बहुतांश लोक ‘मागणारा’ घरापुढे आला, की त्याला धान्यच देत असत. रोकड पैसे कमीच असत.) पिसोडीत अनेक गाठोडी असायची आणि दोन्ही हात टिंगरी वाजवण्यासाठी मोकळे.

टिंगरी कशी असते? कशी बनवतात? नारळाच्या अर्ध्या नट्टीला (कवटीला) अंदाजे दीड-दोन फूट लांब व अंदाजे एक-दीड इंच जाड नक्षीदार लाकडी दांडा लावून नारळाच्या अर्ध्या उघड्या कवटीवर घोरपडीचे कातडे ताणून चिकटवतात. दांड्याला वरच्या बाजूला लहानशी लाकडी खुंटी बसवलेली असते. लाकडी खुंटीपासून नारळाच्या अर्ध्या नट्टीच्या वाटीवर चिकटवलेल्या घोरपडीच्या कातडीपर्यंत बारीक तार ताणून घट्ट बसवली जाते. नट्टीरवर बारीक चूक ठोकून तिला ती बारीक तार ताणून बांधली जाते. नट्टीवरील कातड्याला तारेचा स्पर्श होत राहिला तर ती छेडता येणार नाही- तारेचे कंपन न झाल्याने तिच्यातून सूर निघणार नाहीत. त्यासाठी तार आणि घोरपडीचे कातडे यांच्यात पाचर म्हणून छोटी काडकी (काटकी) आडवी बसवतात. म्हणजे ताणलेली तार कातड्यापासून अधांतरी राहते.टिंगरी हे वाद्य टिंगरीवाला त्याच्या डाव्या हातात धरतो आणि त्याच हाताच्या तीन बोटांच्या नखांनी खुंटीजवळची तार दाबतो. त्या दाबाच्या प्रमाणानुसार टिंगरीच्या स्वरांचा चढउतार होत राहतो. तारेचे कंपन होऊन तिच्यातून आवाज घुमतो. घोरपडीचे कातडे आणि आतील नट्टीच्या पोकळ भागामुळे त्यातून निघणारा संगीताचा आवाज गहिरा होत घुमतो.

उजव्या हातात धनुष्यासारखे आयुध दिसते. (पण ते आयुध नसून टिंगरी वाजवण्याचे उपवाद्य असते.) धनुष्यासारख्या थोड्या बाक दिलेल्या काठीला दोराऐवजी घोड्याच्या शेपटीचे केस बांधलेले असतात. त्या केसांची संख्या जास्त प्रमाणात (पंधरा ते वीसच्या आसपास) असते, म्हणून ते तुटत नाहीत. एखादा केस तुटला तरी बाकीच्या केसांच्या जुडग्याचे धनुष्य असतेच. घोड्याच्या केसांचे ते धनुष्य टिंगरीच्या उभ्या ताणलेल्या तारेवर मागेपुढे घासत सरकावले, की टिंगरीतून संगीत निर्माण होते. धनुष्यासारख्या त्या अर्धगोल काठीला घुंगरूही जोडलेले असतात. टिंगरीतून निघणारे संगीत आणि धनुष्य पुढेमागे होताना होणारा घुंगरांचा आवाज यातून संगीत सुरेख ऐकू येत राहते.

टिंगरीवाले टिंगरीवर अनेक पद्यमय कथा सांगत असतात. त्यांपैकी कंसाला मारण्यासाठी वैराळाचे (गल्लोगल्ली फिरून बांगड्या विकणारा- कासार) रूप धारण केलेला कृष्ण मथुरेत प्रवेश करतो आणि कपटाने कंसाचा वध करतो ती नाट्यात्मक कथा तर पुन्हापुन्हा ऐकावी अशी अप्रतिम. टिंगरीवाले लोक ती कथा गायचे त्यावेळी गावातील लहानथोर वृद्ध पुरुष-महिला कान देऊन ऐकत राहायची. टिंगरीवाल्यांच्या अशा अनेक गाण्यांपैकी दोन ओळी लक्षात आहेत – जुनं सारं गेलं भाऊ नवं नवं आलं… त्यात जुने काय काय- कसे कसे होते आणि त्या सगळ्यांचे आता काय झाले, राहणीमान कसे बदलले, वागणे कसे बदलले, स्वार्थ कसा वाढला, माणुसकीचा लोप कसा झाला, महागाई कशी वाढली आदी वर्णन असायचे. म्हणून वडीलधार्याे मंडळींना ते गाणे विशेष भावत असे.

– सुधीर रा. देवरे

About Post Author

Exit mobile version