नागपूरचे आर्किटेक्ट अशोक जोशी नवीन माणूस भेटला की प्रश्न विचारत, तुमचे चरितार्थाचे म्हणजे उपजीविकेचे साधन काय? तो माणूस उत्तर देई, मी पत्रकार आहे किंवा प्राध्यापक आहे किंवा सरकारी नोकरी करतो वगैरे… मग जोशी विचारत, की ही झाली उपजीविका. मग तुमची जीविका काय? तो माणूस चक्रावत असे. जोशींना सुचवायचे एवढेच असायचे, की माणूस जगतो तो काही उद्देशाने. ते त्याचे स्वप्न असते, ध्येय असते, उद्दिष्ट असते किंवा आणखी काही. त्यासाठी तो चरितार्थाची साधने जमवून जीवन सुकर करत असतो. या लेखमालिकेत जीवनाची साधने उत्तम रीत्या उभी केलेल्या, परंतु त्याचबरोबर अधिक व्यापक जीवनोद्दिष्टाचा पाठपुरावा करणा-या व्यक्तींचा जीवनक्रम आणि त्यांचे विचार सादर करण्यात येतात.
जयराज साळगावकर – ‘रिनेसान्स’ मॅन
ज्येष्ठ साळगावकरांपेक्षा जयराज सर्वार्थांनी वेगळा आहे. त्या दोघांची अभ्यासक्षेत्रेच वेगवेगळी आहेत. जयंतराव ज्योतिर्भास्कर व त्यामुळे धर्माचरणातील अधिकारी व्यक्ती मानले जातात, तर जयराज हा आधुनिक विद्यांमध्ये पारंगत. नव्या तंत्रज्ञानाचा कट्टर पुरस्कर्ता, मानवी सुधारणांचा चाहता. परंतु बापलेकांनी मिळून ‘कालनिर्णय’ चा झेंडा मात्र गेली पस्तीस वर्षे सतत उंच ठेवला आहे. कारण दोघांमध्ये एक समान मोठा गुण आहे तो लोकसंग्रहाचा. जनसंपर्क हा विषय म्हणून जेव्हा जन्माला आला नव्हता त्या काळात जयंतरावांना महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रांतील पुढारी वश होते. त्याचे एक कारण त्यांची ज्योतिष सांगण्याची हातोटी हे सांगितले जाते. जयराज त्यांच्या पुढे काकणभर गेला. त्याने मिडिया आणि जाहिरात ही क्षेत्रे काबीज केली व ‘कालनिर्णय’चा वरचश्मा कायम ठेवला.
तेवढ्यात, जयराजचा आणखी एक इंजिनीयर मित्र तिथे आला आणि त्यांची चर्चा सुरू झाली ती इमारत पावसाळ्यात गळते त्याबद्दल. त्यांच्या बोलण्यात छतांचे विविध प्रकार, त्यांमध्ये आलेली आधुनिकता, मंगलोरी आणि गावठी कौलांची खासियत, मंगलोरी कौलांचा नाद आणि त्यामधून प्रकट होणारा त्यांचा टिकाऊपणा असे विविध पोटविषय उमटत गेले. मला गंमत वाटत होती, की जयराज त्याच्या घरी दुरुस्तीच्या कामाकरता आलेल्या कंत्राटदारांशीदेखील किती चोखंदळपणे चर्चा करत आहे!
जयराज हा ‘रिनेसान्स मॅन’ आहे. त्याला गेल्या दोन-चारशे वर्षांत निर्माण झालेल्या विद्याकलांमध्ये आस्था आहे. त्याची त्यांमधील जाणकारी अद्यावत आहे व ती तशी ठेवण्यास तो धडपडत असतो. जयराजचे मला सतत तेच वैशिष्ट्य वाटत आले आहे. मी त्याला गेली तीस-पस्तीस वर्षे पाहतो आहे. त्याला अनेक विषयांमध्ये जिज्ञासा आहे आणि ती पुरी केल्याखेरीज तो शांत बसत नाही. तो सुस्थित-सुसंपन्न आहे. त्याची वाटेल तो ऐषोआराम करण्याची आर्थिक क्षमता आहे. परंतु आनंद कोठे मिळतो याचा त्याने विचार केलेला आहे. तशी उद्योग – छंदयुक्त जीवनशैली त्याने जपली आहे. तो पुस्तके –चित्रपट –संगीत यांचा विशेष छंदाभ्यास सतत चालू ठेवतो. त्या तऱ्हेची समाजाची जागरूक अवस्था म्हणजे ‘रिनेसान्स’ ती प्रक्रिया आहे समाजाच्या प्रबोधनाची. मानवी इतिहासात समाज दोन वेळा अशा विलक्षण जिज्ञासू अवस्थेत जगला. एक – वैदिक काळ. तो कोणता हे ढोबळ मानाने सांगता येते. दुसरा म्हणजे युरोपातील सतरावे ते एकोणिसावे शतक. ते ‘रिनेसान्स’ या संज्ञेनेच ओळखले जाते.
जयराज सांगतो की तो अठरा वर्षांचा असतानाच वडिलांबरोबर नव्या उद्योगात सामील झाला. “एका बाजूला रुइया कॉलेजमध्ये शिक्षण आणि दुस-या बाजूला ‘मराठा’ वर्तमानपत्रामधील आमचा अड्डा. बाबा ‘मराठा’साठी अनेक कामे करत. त्यांचा आचार्य अत्र्यां शी जवळचा संबंध होता. ते व्यकंटेश व शिरीष पै यांच्यादेखील बैठकीतील होते.” जयराज त्यांच्या पाठोपाठ तिथे जाई. “त्यातून आम्हा तरुण मंडळींचा तिथे ग्रूप झाला. अनिल बर्वे, नामदेव ढसाळ यांच्याबरोबर माझे दिवसच्या दिवस जात. रुइया कॉलेजमध्ये भरतकुमार राऊत, सुहास फडके, नीना राऊत हे माझे मित्र. तेथील अड्डा हे एक वेगळेच प्रकरण होते. त्यांच्या पलीकडे माझा कॉस्मोपॉ़लिटन मित्रसमूह होता. मला सतत जाणवे, की मी इंग्रजी संभाषणात कमी पडतो. मुंबईत व्यवसाय वाढवायचा तर इंग्रजी बोलता यायला हवे. ती उणीव मी कॉस्मोपॉलिटन मित्रमैत्रिणींच्या मदतीने भरून काढली.”
जयराज पुढे इकॉनॉमिक्स घेऊन एम.ए. झाला. तो प्रा. ब्रम्हानंद यांचा लाडका विद्यार्थी. त्याची इकॉनॉमेट्रिक्स ही विशेष आवडती विषयशाखा. त्याने ‘कालनिर्णय’चे आर्थिक गणित मोठ्या पातळीवर नेले, ते त्यांमधील जाहिरातींची संख्या वाढवून. तो म्हणाला, की माझी अठरा जणांची मार्केटिंग टीम होती. तिच्या साहाय्याने मी नॉनमराठी क्षेत्रामध्ये शिरकाव केला. मोठमोठ्या कंपन्यांच्या जाहिराती मिळवल्या. त्यासाठी माझी स्वत:ची अॅड एजन्सींमध्ये उठबस असे.
जयराज जितका अभ्यासू आणि जिज्ञासू आहे तितकाच छांदिष्टही आहे. किंबहुना त्याची संवेदना व निर्मितिशीलता त्या बाजूनेही व्यक्त होते. तो एकाच वेळी व्यावहारिक असतो आणि आत्ममग्नही असतो आणि त्यामुळे तो व्यवहाराचे बोलत असताना कुठेतरी हरवलेला भासतो. तो काही वेळा त-हेवाईकपणानेही व्यक्त होतो. त्याने तीसएक वर्षांपूर्वी स्वत:च्या कविता ट्रेसिंगपेपरवर लिहून त्या छापून काढल्या. त्या तंत्रामध्ये त्यावेळी अभिनवता होती. त्याने संग्रहाच्या प्रती तयार झाल्यावर प्रकाशन समारंभ जाहीर केला. तो तागडी घेऊन व्यासपीठावर उभा राहिला आणि त्याने रद्दीच्या भावात कवितासंग्रहाचे वितरण सुरू केले! त्याला तो विक्षिप्तपणा त्या काळात हौसेपुरता परवडला, परंतु त्याच्याकडे ‘कालनिर्णय’ची जबाबदारी आल्यावर त्याने पोक्तेपणा धारण केला. अभ्यास, व्यवसाय आणि छंद यांची यथार्थ सांगड घातली.
जयराजचे जगण्याचे तत्त्वज्ञान सोपे, सरळ आहे. तो सर्व त-हेचे प्रभाव स्वीकारण्यास खुला असतो. परंतु ते ग्रहण करताना चिकित्सक राहतो. तो म्हणतो, सावरकरांनी मला दोन संस्कृतींची तुलना करून पाश्चात्य संस्कृतीमधील अद्ययावत राहण्याची संथा दिली. सावरकरांना त्यांच्या अनुयायांनी ‘हिदुत्वा’त बांधले. ते त्याहून खूप मोठे होते. त्यामुळे मी सतत आधुनिक काय आहे ते पाहून त्यामधील सर्वोत्तम ते टिपतो. आचार्य अत्र्यांनी ‘मी कोण आहे?’ या लेखामधून मनुष्यमात्र म्हणजे जिज्ञासा हा मंत्र मला दिला. मनुष्य जर चौकस नसेल, त्याच्या मनात कुतूहल नसेल तर त्याच्या जिवंत असण्याला अर्थ नाही हे आचार्य अत्र्यांच्या त्या निबंधामधून मला प्रत्ययकारी रीत्या भिडले. पु.ल.देशपांडे यांनी मला रसिकतेचे आनंदनिधान दिले. मी हे जग सुंदर करून जाईन हे त्यांचे विधान स्फुरण देणारे आहे. म्हणून मी सतत जिज्ञासू असतो. त्या ओघात आजच्या दिवसाशी संबद्ध असतो आणि जग जाणून घेण्याच्या त्या प्रक्रियेत आनंद भोगतो.
जयराजची उंची आहे जेमतेम पाच फूट, त्याचे शरीरही स्थूलत्वाकडे झुकणारे आहे. त्याचे वय पंचावन्नच्या आसपास आहे. तो थोड्या जुन्या ब्रिटिश वळणाचा पोशाख – पॅंटचे पट्टे दोन्ही खांद्यांवरून घेऊन पॅंट कमरेवर स्थिर ठेवायची (सस्पेंडर्स) – घालतो. त्यामुळे त्याच्या व्यक्तिनमत्त्वास संशोधकाची डूब लाभते. त्याची पत्नी भारती लाघवी स्वभावाची आहे. त्या दोघांच्या सांस्कृतिक, विशेषत: सार्वजनिक क्षेत्रातील उत्साही वावरामुळे ती दोघे प्रेमविवाहित वाटतात. परंतु त्यांचे लग्न योजून झाले आहे. त्यांना दोन मुली. मोठी मुलगी शक्ती ही मिडियामध्ये आहे. ती सध्या इंग्रजी वर्तमानपत्रांत काम करते. पण तिने वडिलांचा लेखनगुण घेतला आहे. तिची इंग्रजी कादंबरी ‘Imperfect Mr.Right’ अलिकडेच प्रकाशित झाली. कांदबरीचे वेगवेगळ्या गावी प्रमोशन चालू आहे आणि शक्ती त्यासाठी उत्साहाने प्रत्येक गावी जात असते. दुसरी मुलगी नानी अमेरिकेत जाहिरातक्षेत्रात आहे.
जयराज स्वत:च्या लेखनाला वळण मिळाले ते कुमार केतकर यांच्यामुळे असे कृतज्ञतेने सांगतो. एरवी जयराजच्या बोलण्यातील व वर्तनातील भाव औपचारिक रीत्या व्यक्तत होत असतात. परंतु कुमार आणि शारदा यांचा विषय निघाला, की तो एकदम सुह्रदपणाने व्यक्त होतो. तो त्या दोघांचे प्रगल्भ वाचन-लेखन-संभाषण याबद्दल आदराने बोलतोच, परंतु त्यांच्याबद्दलच्या जिव्हाळ्याने हळवाही असतो. जयराज म्हणाला, “मी एका टप्प्यावर बहकणार होतो. मला उद्योगात ब-याच गोष्टी करायच्या होत्या, मी मोठी स्वप्ने पाहात होतो, पण अडचणी निर्माण झाल्या, मर्यादा येत गेल्या. मती कुंठित होते की काय असे वाटू लागले. दारू पिण्याचे प्रमाण वाढले. तो कोंडमारा विलक्षण होता. कुमारने त्यावेळेस माझ्यावर विश्वास टाकून मला ‘लोकसत्ते’ मध्ये लिहायला लावले. ते वळण माझ्यासाठी मोठे महत्त्वाचे ठरले. मी गंभीररीत्या विचार करू शकतो-लिहू शकतो-बोलूही शकतो हे लोकांना कळले. माझ्याबद्दलचा बभ्रा विरून जाऊ लागला आणि मी आत्मविश्वासाने पूर्ववत स्थितीला आलो. तो साधारणपणे पंधरा वर्षांपूर्वीचा काळ. कुमारने मला त्यावेळी सांभाळून घेतले.”
जयराज उद्योग-व्यवसायाच्या नेटवर्कमधून असा – तसा भिडत असतो. त्याचवेळी समांतरपणे तो त्याच्या मित्रमंडळींना आणि इच्छुकांना त-हेत-हेचे अभ्याससाहित्य, छंद साहित्य, कलाविचारसाहित्य पुरवत असतो. त्याचे ते इमेल अथवा प्रिंट आऊट म्हणजे मोठी मेजवानी असते. त्यासंबंधात एखादा मुद्दा काढून त्याला छे़डले, की तो आणखी सजग होतो आणि भरभरून संदर्भ देऊ लागतो. त्यावेळी त्याची विविध विषयांमधील गती जाणवते. तिचा पाया त्याची जागरूकता, जग जाणण्याचे कुतूहल हाच असतो.
जयराज उद्योग उत्तम सांभाळतो. तेथे तऱ्हतऱ्हेची धाडसी पावले उचलतो. त्याचबरोबर सामाजिक-सांस्कृतिक वातावरणात मन:पूर्वक रमतो. त्याची स्वत:ची निवड चोखदंळ असली तरी अनेकविध कार्यक्रमांना तो आणि भारती यांची हजेरी असते.
जयराजला कॉलेजमध्ये गिर्यारोहणाचे वेड लागले. त्याने ते बरेच पुढे नेले व १९९८ साली तो एव्हरेस्टच्या बेस्ट कॅंपपर्यंत जाऊन आला. तो म्हणतो, की त्याला गिर्यारोहणाने जेवढे शिकवले तेवढे धडे शाळा-कॉलेजमध्येही मिळाले नाहीत. तसेच, तो विकास धोरणाच्या बाजूचा असल्यामुळे त्याने ‘एन्रॉचन’ व्हावे यासाठी जसा आग्रह धरला त्याच प्रकारे जैतापूर अणुप्रकल्पाच्या बाजूने जोरदार प्रचार चालवला आहे. जयराजला सामाजिक भान असल्यामुळे तो ‘ग्रंथ संग्रहालय बचाओ’ सारख्या मोहिमांतदेखील सामील असतो.
कधी कधी वाटते, की जयराज आणि त्याच्यासारखे तंत्रज्ञानाच्या आधुनिकतेचे चाहते यांना क्रांती घडण्यासाठी ‘रिनेसान्स’चे प्रबोधन साधण्यासाठी आधुनिक विद्याकला आणि त्यांचेच अपत्य असलेला मिडिया यांच्या ध्यासामध्ये तत्त्वज्ञानाची, सिद्धांताची, सांस्कृतिकतेची गरज तेवढीच तीव्र असते याची जाणीव का होत नाही?
– दिनकर गांगल, ९८६७११८५१७
thinkm2010@gmail.com