जंगलवाटाड्या ऋतुराज जोशी

3
20
carasole

जंगलातून वाट फुटेल तिकडे भटकणे; निसर्गाचे – त्यातील प्राणी-पक्षी-वनस्पती यांचे निरीक्षण करणे; हिमालय कुमाऊंच्या टेकड्या-लेह-लडाख अशा ठिकाणी ट्रेकला जाणे, बाईकवरूनही अनेक सफरी करणे, निसर्गातील विविध पक्ष्यांचे -निसर्गाचे फोटो काढणे हे ऋतुराजचे पॅशन आहे आणि तेच त्याचे करिअर आहे. ऋतुराज जेमतेम तिशीच्या आसपासचा, त्याला वन्यजीवांविषयी लहानपणापासून प्रेम व आवड. ऋतुराज हा ठाणे जिल्ह्यातील बदलापूरचा. तो पारंपरिक खेळांमध्ये कधी रमला नाही. त्याला जंगलातील डोंगरवाटा खुणावत असायच्या. तो मैलोन् मैल जंगलवाटा तुडवताना तहानभूक विसरून जायचा. तो पक्षिनिरीक्षण करणे, आवाजावरून पक्ष्यांना ओळखणे अशा गोष्टींत रमू लागला.

ऋतुराजची वृत्तीप्रवृत्ती ‘हटके’ आहे हे त्याच्या आई-वडिलांनी वेळीच ओळखले. त्यांनीही त्याच्या जंगलवाटा हीच करिअर करण्याच्या निर्णयाला प्रोत्साहन दिले. ऋतुराज त्‍याचे वडिल श्‍यामसुंदर जोशी यांना स्फूर्तिस्थान मानतो ते त्यामुळेच.

ऋतुराजने पर्यावरणासाठी काम करणाऱ्या एस.पी.सी.ए., बी.एन.एच.एस. अशा संस्थांशी जोडून घेतले. त्यांच्याबरोबर कामे सुरू केली. त्या कामातून प्रेरणा घेऊन त्याने ‘निसर्ग ट्रस्ट’ नावाची; तसेच, ‘जैवविविधता संवर्धन आणि सामाजिक जागृती’ या संस्था सुरू केल्या. त्याने त्या संस्थांच्या माध्यमातून प्रथम ठाणे जिल्ह्यातील झाडांची गणना करून तेथे सुमारे एक लाख चाळीस हजार झाडांचे अस्तित्व नोंदले. मग त्याने जंगलातील झाडे वाचवून त्यांचे संवर्धन करण्यासाठी लोकांमध्ये जाऊन त्यांच्यात जागृती करणे हे काम ‘निसर्ग ट्रस्ट’च्या माध्यमातून हाती घेतले. त्याचप्रमाणे त्याने 2000 सालापासून अनेक पक्षी, प्राणी आणि साप यांना वाचवून त्यांचे संगोपन आणि संवर्धन करण्याचे काम ‘निसर्ग ट्रस्ट’च्या माध्यमातून सुरू केले.

जंगलातील प्राण्यांच्या जगण्याचे निरीक्षण हा त्याचा आवडता छंद. तो म्हणतो, की “बाकी प्राण्यांचे आयुष्य साधे असते. पक्ष्यांचे तसे नसते. पक्ष्यांचे आयुष्य हे अधिक ग्लॅमरस आणि चॅलेंजिंग असते. त्यांचे आयुष्य गूढ असते. एक तर ते उडतात, त्यांना वेगवेगळे आकर्षक रंग असतात. त्यांच्या प्रजातींत वैविध्य खूप आहे. त्यांची लाईफस्टाईल ही वैविध्याने भरलेली असते.”

तो पक्ष्यांविषयी त्याचे निरीक्षणे मांडताना म्हणतो “पक्ष्यांचे आकार, रंग, शरीराची ठेवण यांत विविधता आढळते. झाडावर, पाणथळीच्या ठिकाणी, जमिनीवर, पाण्यात अशा कोठल्याही ठिकाणी पक्षी आढळतात. कोठल्याही पक्ष्यांचे जीवनमान हे दुसऱ्या पक्षासारखे नसते. परंतु त्यांचे आपापसातील संबंध हे एकमेकांना पूरक असतात. त्यांची घरटीही कॉलनीसारखी असतात. कोतवाल नावाचा पक्षी हा साळुंकीसारख्या छोट्या पक्ष्यांचे संरक्षण करतो. सापासारखा प्राणी हा अंडी घालून निघून जातो. तो ना त्याच्या अंड्यांचे संरक्षण करतो, ना त्याच्या पिलांना भरवत बसतो. निसर्गात आढळणारे कितीतरी प्राणीही त्यांच्या पिलांचे संगोपन करत नाहीत. त्यांच्या एकदम उलट पक्ष्यांमध्ये असते. पक्ष्यांत घरटे बांधण्यापासून अंडी उबवेपर्यंतची कामे नर-मादी जबाबदारीने वाटून घेतात. ते त्यांच्या पिलांचे त्यांना उडता येईपर्यंत संगोपन करतात, त्यांच्या चाऱ्याची सोय करतात.”

ऋतुराजला जंगल निरीक्षणातून पक्ष्यांचे फोटो काढण्याचा छंद जडला. तो संशोधन करण्याच्या दृष्टीने त्याकडे बघू लागला. तो म्हणतो, “फोटोग्राफी ही दोन कारणांसाठी केली जाते. एक म्हणजे सौंदर्य टिपण्यासाठी; एखादी गोष्ट छान दिसते म्हणून माणूस फोटो काढतो आणि दुसरे म्हणजे रेकॉर्ड ठेवण्यासाठी. जेणेकरून मागेपुढे त्या गोष्टीचा उपयोग होऊ शकतो. माझा कल ब्यूटीपेक्षा रिसर्चकडे जास्त होता. म्हणून रेकॉर्ड राहवे यासाठी फोटोग्राफी करू लागलो.” भारतात जवळ जवळ बाराशेऐंशी जातींचे पक्षी आहेत. त्यातील सुमारे आठशे प्रकारचे पक्षी ऋतुराजच्या माहितीत आहेत.

ऋतुराजने काही संकटग्रस्त पक्ष्यांच्या प्रजाती शोधून काढल्या आहेत. ऋतुराजने गरूड खरूची नावाचा शिकारी पक्षी, त्यातील पाकोळी खरूची तसेच ऑस्प्रे, छोटा पाणडुबा, तलवार बदक, चक्रवाक, पाणकावळा अशा परिचित-अपरिचित पक्ष्यांबद्दल माहिती करून घेऊन त्यांचा अभ्यास केला आहे. त्याने पक्ष्यांच्या विविध भावमुद्रा टिपणारी छायाचित्रे काढली आहेत. त्याचप्रमाणे, तो तरुण मुलांना पक्षी निरीक्षणासाठी प्रवृत्त करण्याचे कामही करतो. त्याने जवळ जवळ सोळा राज्यांमध्ये पर्यावरण अभ्यास शिबिरांसाठी व पक्षिनिरीक्षणासाठी हौशी पर्यटकांना फिरवून आणले आहे. त्यासाठी ‘स्लाइड शोज’चे आयोजन करून त्यांना येणाऱ्या शंकांचे निरसनही तो करतो.

एकदा, ऋतुराज हिमालयामध्ये असताना त्याच्या कॅमेऱ्यासहित बर्फावरून चालत जात होता. तेथे त्याला एक पक्षी चालताना दिसला, ऋतुराज त्याचे फोटो घेत त्याच्या मागे मागे फिरत राहिला. त्यात दोन-तीन तास निघून गेल्याचे त्याच्या लक्षातही आले नाही. त्याच्या सोबत कोणीही नव्हते. तो पक्षी लहान आणि हलका असल्यामुळे बर्फातून सहज चालत निघून जात होता. दरम्यान, ऋतुराज मात्र बर्फात असलेल्या एका क्रेऑस (बर्फातील खड्डा) मध्ये सापडला. क्रेऑसची खोली चार-साडेचार फूट खोल असल्यामुळे त्याने आपली सुटका करून घेतली; बर्फातून मार्ग काढणे, त्यातील वाटा-आडवाटा यांबद्दल त्याला बऱ्यापैकी माहिती आहे, पण त्याच्यासाठी तो कधीच विसरता न येणारा अनुभव झाला.

ऋतुराज म्हणतो, ‘आजुबाजूला इतका सुंदर निसर्ग आहे, की तो समजून घ्यायला एक आयुष्य पुरे पडणार नाही! महत्त्वाचे म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट मनुष्य बघतो, तेव्हा तो ती समजून घेऊ शकतो.’ पक्ष्यांच्या काही जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्याचा दोष, तो माणसांनाच देतो. तो म्हणतो, “माणसाने फार मोठ्या प्रमाणावर निसर्गात प्रत्येक गोष्टींमध्ये लुडबूड केली आहे. त्यामुळे प्राणी-पक्षी कमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. उदाहरण, गिधाड या पक्ष्याचे घेता येईल. त्यांची संख्या कमी होत चालली आहे. याचे कारण त्यांना नैसर्गिकपणे जे खाण्यास लागते ते मिळणे मुश्कील झाले आहे. मग ते नामशेष होणारच!”

ऋतुराज जोशी
अर्जुनसागर बिल्डिंग़, मच्छिमार्केट, रेल्वे स्टेशनजवळ, बदलापूर (पूर्व)
9320034154/9158266904, riturajjoshi@gmail.com

– मंगला घरडे 9763568430

(मूळ प्रसिद्धी, ‘पुणे पोस्ट’, जून २०१५)    

About Post Author

3 COMMENTS

  1. Lekh aawdla. Solapur yet he
    Lekh aawdla. Solapur yet he Solapur neture watch pakhi mitra group aahe. Mihi chote chote kame karto. Aaplaya Kamas shubhechya.

  2. ऋतुराज.. अप्रतिम काम.
    ऋतुराज.. अप्रतिम काम..आपल्यासारख्या धडपडणाऱ्या तरूणांची सध्या फार गरज आहे या समाजाला. असेच कायम काम करत रहा. भावी आयुष्यासाठी व आपल्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा…थिंक महाराष्ट्र व मंगला ताईंचे सुध्दा आभार. चांगल्या कामाची दखल घेऊन खूप चांगल्या पध्दतीने प्रोत्साहीत करण्याचे काम ते करत आहेत. रोशन सावंत. ९८७०७ ९०११२

  3. ऋतुराज,

    ऋतुराज,
    आजच मी सूचिकांत यांच्या ज्ञानभाषा मराठी या समुहामध्ये तुमच्याबद्दल वाचलं.
    खुप लहान वयात आपण हे लोकोत्तर कार्य करत आहात. अभिमान वाटतो आम्हाला आपला.

Comments are closed.