Home वैभव इतिहास छत्र-खांबगावचा परचुरे यांचा वाडा

छत्र-खांबगावचा परचुरे यांचा वाडा

0

पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील छत्र-खांबगाव येथील परचुरे यांचा पंधरा खणी चौसोपी वाडा सुमारे दोनशेतीस वर्षांपूर्वीचा आहे. तो पुणे-पानशेत रस्त्यावरील खानापूर या गावापासून वेल्हे या ठिकाणी जाणार्या  पाबे घाटात छत्र-खांबगाव येथे आहे. सागवानी तुळया आणि खांब यांवर उभी राहिलेली, सुस्थितीतील एकशेवीस *खणांची ती प्रचंड इमारत पाहिल्यावर मन थक्क होते. इमारतीचे क्षेत्र मागील पडिक वाडा धरून दीड एकरांचे असावे. तो वाडा चौकोनी विटा व घडीव दगड यांनी बांधलेला आहे. वाड्याच्या दरवाज्याआत मध्यभागी चौक आणि चारही बाजूंस *दुघई सोपे आहेत. ते बांधकाम आणि लाकूडकाम इतकी वर्षें तग धरून राहिल्याचे आश्चर्य वाटते. समोरच्या सोप्यातून बाजूस असलेले स्वयंपाकघर आणि देवघर दिसू शकते. वाड्याची वैशिष्ट्ये म्हणजे छोटा दिवाणखाना, बैठकीचा सोपा आणि तळघर ही आहेत. रेखीव तुळशी वृंदावन मागील दाराच्या पडवीबाहेर आहे. वाड्याच्या छतावर मंगलोरी कौले आहेत. पूर्वी तेथे साधी भाजकी कौले होती. परचुरे यांच्या वंशजांनी त्या कौलांचा नमुना म्हणून काही कौले जपून ठेवली आहेत. आतील भिंतींना असलेला मातीचा गिलावा भंग पावलेला नाही. आखीवरेखीव पद्धतीच्या त्या वाड्याने हजारो लोकांची वर्दळ अनुभवली आहे.

तो वाडा म्हणजे एकेकाळी अन्नछत्र होते. परचुरे घराण्यातील त्र्यंबकभाऊ नारायण परचुरे (त्र्यंबक नारो) हे पुरुष उत्तर पेशवाईमध्ये प्रसिद्ध होते. त्यांनी भोरच्या पंत सचिवांच्या हद्दीत मौजे पुरंदरे येथे जागा खरेदी केली व तेथे असलेल्या पुरंदरेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. तेथे धर्मशाळा, विहीर इत्यादी बांधले. काही ब्राह्मण मंडळी दक्षिणेसाठी पुण्यात श्रावणमासात येत असत. ते कोकणातून मढे घाटातून येत. त्र्यंबक नारो यांनी त्यांच्या खांबगाव येथील वाड्यात अन्नछत्र प्रवासी मंडळींना वाटेत अन्न मिळावे म्हणून 1789 मध्ये सुरू केले. त्यांनी स्वखर्चाने ते अन्नछत्र पन्नास वर्षें चालवले. त्यांनी अन्नछत्राच्या खर्चाची व्यवस्था सरकारातून व्हावी यासाठी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांकडे विनंती केली. त्यांनी असनोली (तालुका शहापूर, जिल्हा ठाणे, साकुर्ली, नेरळ, मौजे गोर्हेम -सिंहगडजवळ) या गावातून काही इनाम मिळवले. त्र्यंबक नारो यांच्या अन्नछत्रासंबंधीची पेशवे दफ्तरातील काही कागदपत्रे प्रसिद्ध झाली आहेत. त्यातील अन्नछत्राच्या हिशोबासंबंधीचा सालवारीने मिळालेला ताळेबंद पाहिल्यावर प्रतिवर्षी किती माणसे जेवत असत, किती माणसांना शिधा दिला, एकूण किती खर्च झाला ही माहिती कळते व आश्चर्य वाटते. उदाहरणार्थ, “इसवी सन 1789 – तेवीस हजार एकशेपंधरा माणसे जेवली. सात हजार तीनशेअठरा लोकांना शिधा दिला. एकूण खर्च चार हजार सत्तेचाळीस आला. अठ्ठावीस हजार नऊशेअठरा माणसे 1813 साली जेवली, दोनशेपंच्याण्णव लोकांना केवळ शिधा दिला, एक हजार सातशेचौऱ्याहत्तर रुपये साडेसहा आणे खर्च झाला.” अन्नछत्रासाठी मिळालेल्या मदतीच्या सनदेचा एक नमुना पाहा –

श्री,
        अखंडित लक्ष्मी आलंकृत राजमान्य राजश्री सदासीव केशव गोसावी यांसी सेवक बाजीराव रघुनाथ प्रधान नमस्कार सु|| (सुहूरसेन) समान तीसैन मया अलफै (अ. 1718) मौजे खांबगाव ता. कर्यात मावल येथे त्रिंबकराव नारायण परचुरे याणी धर्मशाळा बांधोन अन्नछत्र घातले आहे व श्री पुरंदरेश्वर महादेव याचे देवालय बांधले त्यास अन्नछत्राचे बेगमीस व देवपूजा नैवेद्यास साल म|| पासून ता. नेरळ पौ|| पैकी रुपये 1500 (पंधरासे) रुपयाची नेमणूक करार करून देऊन हे सनद सादर केले असे. तरी सदरहू पंधरासे रुपये तालुके मारपौ|| साल देत जाणे दर साल नवीन सनदेचा आक्षेप न करणे जाणीजे छ. 13 साबान आज्ञा प्रमाण. मोर्तब असे.
नकलेची नकल रुजू पाहणार
बापूजी गणेश कारकून
नि|| हुजूर दफ्तर, जिल्हा पुणे

_Chatra-Khamgaoncha_ParchureVada_1.jpgअन्नछत्रासाठी लागणाऱ्याफ मोठ्या भांड्यांपैकी मोठी दोन तपेली तेथे आहेत. त्या अन्नछत्रामुळे गावास छत्रखांबगाव असे नाव पडले. सव्वादोनशे वर्षांपूर्वी सुरू केलेले ते अन्नछत्र म्हणजे त्या काळातील परचुरे घराण्यातील दिलदारपणाचे दिव्य दर्शनच होय! संस्थापक त्र्यंबक नारो यांच्या पुण्याईचे फळ म्हणून परचुरे घराण्यातील काही मंडळी पुण्यात विद्वतमान्य झाली आहेत. डॉ. चिं.ना. ऊर्फ बंडोपंत परचुरे हे इतिहाससंशोधक ग.ह. खरे यांचे शिष्य होते. त्यांचे बंधू डॉ. सुरेशराव परचुरे यांनी अन्नछत्राच्या त्या वाड्याची देखभाल उत्तम प्रकारे ठेवली आहे.

जनाई हे त्या गावाचे ग्रामदैवत. गावात आणखी काही घराणी असून, ते लहान गाव गुण्यागोविंदाने नांदत आहे. त्या गावातून पेटाऱ्याचा डोंगर, गुरटुंगीचा डोंगर आणि हनुमानाचा माळ पाहण्यास मिळतो. वाड्याशेजारचे पुरंदरेश्वर महादेवाचे सुस्थितीतील मंदिर लक्षवेधक आहे. तेथे प्रतिवर्षी महाशिवरात्रीस उत्सव असतो. मंदिरातील महादेवाची पिंड घोटीव पाषाणाची असून, पिंडीवर सतत अभिषेक चालू असतो. त्यासाठी परचुऱ्यामनी पुजारी नेमला आहे. त्र्यंबक नारो यांनी पुढे काशी क्षेत्री जाऊन तेथे एक वाडा, एक बाग आणि एक घाट बांधला.

* खण – खण याचा अर्थ घराचा पाच फूट रुंद दहा फूट लांब असा खोलीवजा भाग. ही मोजमापे थोडी कमीजास्त असू शकतात.

* दुघई – दुघई म्हणजे दोन भाग. दुघई सोपा म्हणजे दोन भागांचा सोपा, दालने अशी तिघाई, चौघई असू शकतात.

– डॉ. सदाशिव शिवदे

About Post Author

Previous articleअसाध्य आजारावर जयंत खेर यांनी केली मात
Next articleकोपरगाव येथील पेशवेकालीन वाडे
डॉ. सदाशिव सखाराम शिवदे हे 'अखिल महाराष्‍ट्र इतिहास परिषदे'चे अध्‍यक्ष होते. त्‍यांनी पशुवैद्यक पदविका (D.Vet) मिळवली होती. त्यांनी मराठी आणि इतिहास या विषयांत एम.ए.ची पदवी तर. इतिहास-संस्‍कृत या विषयांत पी.एच.डी. मिळवली होती. त्‍यांनी संभाजीराजे, महाराणी येसूबाई, कान्‍होजी आंग्रे, हंबीरराव मोहिते, शिवाजी महाराजांच्‍या पत्‍नी सईबाई, अशा अनेक ऐतिहासिक व्‍यक्तिमत्त्वांवर संशोधन ग्रंथ लिहिले. त्‍यांची आतापर्यंत संशोधन ग्रंथ, शोधनिबंध, अनुवादित, ऐतिहासिक कादंबरी, कथासंग्रह या प्रकारांत एकूण अठरा पुस्‍तके प्रकाशित आहेत. त्‍यांच्‍या 'माझी गुरं-माझी माणसं' या ग्रामीण कथासंग्रहातील कथांचे आकाशवाणीवर वाचन झाले. शिवदे यांना त्‍यांच्‍या लेखनाकरता अनेक पुरस्‍कारांनी सन्‍मानित करण्‍यात आले होते. शिवदे यांचे ७ एप्रिल २०१८ रोजी निधन झाले. लेखकाचा दूरध्वनी 9890834410

Exit mobile version