चांदागडला प्राचीन काळापासून घनदाट जंगले होती. त्या जंगलात राहणाऱ्या आदिवासींचा ‘तारू’ नावाचा राजा होता. त्या जंगलात अनेक जंगली जनावरे होती. त्यामध्ये वाघ हा प्रमुख होता. वाघाचा फार त्रास त्या परिसरात राहणाऱ्या आदिवासींना; तसेच, इतर लोकांना होत असे. वाघाचा अचानक सामना होऊन आदिवासींचे जीव जात असत. तारु हा राजा पराक्रमी होता. तो नरभक्षक वाघांना ठार करू शकत असे. तारू राजाला वनौषधींचीही माहिती होती. तो जखमी झालेल्या लोकांवर उपचार करत असे. म्हणून, परिसरात राहणारे आदिवासी राजाला तारणहार, तारणारा म्हणजेच तारुबा असे म्हणत आणि त्याला देव मानत. कालांतराने, तारुबाचा अपभ्रंश होऊन तारोबा आणि पुढे, तो परिसर ‘ताडोबा’ म्हणून नावारूपास आला. ‘तारू’ राजा लोकांचे जीव वाचवताना ताडोबात असलेल्या तलावाकाठी वाघाशी झुंज देतानाच मरण पावला. आदिवासींनी ज्या ठिकाणी राजा वाघाशी झुंज देऊन मरण पावला त्या तलावाकाठी राजाची समाधी आणि मंदिर अशा वास्तू बांधल्या. त्या मंदिराला ‘ताडोबादेव मंदिर‘ म्हणतात.
त्या मंदिरात पूर्वी पौष महिन्यात पूजेसाठी जंगलातील, आसपासच्या परिसरातील आदिवासी जमाती; तसेच, विविध धर्मांचे लोक मुलाबाळांसोबत पायी, बैलगाड्यांनी आणि अन्य विविध साधनांनी वाजतगाजत येत. कारण तेथे पूजा केल्याने शेतीवरील किंवा त्यांच्या कुटुंबांवरील अरिष्ट दूर होते, अशी त्यांची श्रद्धा होती. आपापल्या कुवतीनुसार, कोणी तेथे साधे जेवण बनवायचे, तर कोणी बकऱ्याचा किंवा कोंबड्याचा भाव द्यायचे. त्याला आदिवासी बांधव ‘ताडोबादेव’ किंवा ‘बडादेव’ म्हणायचे. त्या नावाने महिनाभर यात्रा चालायची.
ताडोबाला अभयारण्याचा दर्जा मिळाला; वाघ संरक्षित करणे गरजेचे झाले; अनेक नवीन कायदे अस्तित्वात आले. ती यात्रा लोकांच्या; तसेच, वाघांच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून बंद करण्यात आली.
ताडोबा अभयारण्य हे चंद्रपूरपासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे. ताडोबा अभयारण्य वाघांकरता स्वर्ग आहे. ताडोबा अभयारण्याचे पूर्ण नाव ताडोबा आणि अंधारी दोन्ही मिळून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प असे आहे. ते जवळपास सहाशेपंचवीस चौरस किलोमीटरमध्ये विस्तृत पसरलेले आहे. त्याचे ‘कोअर झोन’ आणि ‘बफर झोन’ असे दोन विभाग 1995 साली केले गेले. मोहरली गेट ते ताडोबापर्यंतचा सर्व भाग ‘कोअर झोन’ म्हणून गणला जातो. ताडोबाच्या बाहेरील भाग हा ‘बफर झोन’ म्हणून गणला जातो.
हा ही लेख वाचा – अतुल धामणकर – वन्यजीवनाचे भाष्यकार
ताडोबा अभयारण्याला लागून फार मोठे ‘ईरइ’ धरण आहे. तसेच, फार मोठा ताडोबा तलावही आहे. त्या तलावात बऱ्याच मगरी होत्या. ताडोबा येथे ‘मगर प्रजनन केंद्र’ही होते. ते नंतर बंद करण्यात आले. ताडोबा अभयारण्यात अनेक प्रकारचे पशू-पक्षी आहेत. तेथे जवळपास दोनशेपाच जातींचे पक्षी पाहण्यास मिळतात. जवळपास चार हजार हरणे, अनेक सरपटणारे प्राणी, फुलपाखरे, झाडांच्या अनेक जाती आणि जंगली जनावरे आहेत. त्यात वाघ हा प्रमुख प्राणी आहे.
ताडोबा येथे जाण्याच्या रस्त्यावर ‘आगरझरी’ या ठिकाणी सुंदर मनोहर ‘बटरफ्लाय गार्डन’ तयार करण्यात आले आहे, तसेच, शैक्षणिक दृष्टिकोनातून ताडोबा अभयारण्य हे केवळ चांदागडचे वनवैभव न राहता ते देश-विदेशातील अभ्यासु पर्यटकांकरता विद्यापीठ व्हावे त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
धर्मेंद्र कन्नाके 9405713279
kannakedharmendra1971@gmail.com
छान माहीती.आमच्या गावातुन…
छान माहीती. आमच्या गावातील काही लोक ताडोबादेव अंगात येतो असे सांगून वाजत गाजत ताडोबापर्यंत जायचे.
Comments are closed.