गुणवंत नगरकर हे ‘बॉम्बे रिव्हायव्हलिस्ट स्कूल’ या, 1920 च्या दरम्यान सुरू झालेल्या भारतीय पुनरुज्जीवनवादी कला चळवळीतील एक महत्त्वाचे चित्रकार होत. ते जे.जे.स्कूल ऑफ आर्टमध्ये अध्यापक होते. त्यांनी त्यांचे स्वत:चे चित्रकलेतील प्रावीण्य पारदर्शक जलरंगांचे थर एकावर एक देऊन निर्माण होणाऱ्या ‘वॉश टेक्निक’ पद्धतीमध्ये मिळवले. त्यांनी ‘वॉश टेक्निक’ पद्धतीतील दर्जेदार चित्रनिर्मिती केली; त्या कलाशैलीचा विकास आणि प्रचार व प्रसारही केला.
गुणवंत हणमंत नगरकर हे मूळचे वर्हाडातील चांदूरबाजार गावचे रहिवासी. त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण नागपूर येथील नीलसिटी हायस्कूलमध्ये झाले. गुणवंत यांना शाळेतील चित्रकला शिक्षकांमुळे चित्रकलेत आवड निर्माण झाली. गुणवंत यांनी मुंबई शहर रेल्वेचे भाडे व थोडेसे पैसे घेऊन गाठले. मामा गोपाळराव देशपांडे यांनी त्यांचे मुंबईतील मित्र भोजराज यांच्याकडे गुणवंतची एका वर्षासाठी राहण्याची व्यवस्था करून दिली. त्यांना शिक्षण व पुढील कारकीर्द यासाठी घरचा आधार मिळाला, तो तेवढाच. गुणवंत यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. त्यांना काही काळातच मध्य प्रांत सरकारची शिष्यवृत्ती मिळू लागली व त्यांचा अभ्यास व्यवस्थित सुरू झाला.
सॉलोमन हे त्यावेळी जे.जे.चे प्राचार्य होते. विल्यम इव्हर्ट ग्लॅडस्टन सॉलोमन. त्यांची नेमणूक 1919 मध्ये झाली. सॉलोमन यांचे मत पुरातन भारतीय कलेचा पुनरुद्धार केला पाहिजे असे होते. त्यांनी कॉलेजमध्ये ‘न्यूड क्लास’ 1920 मध्ये सुरू केला. त्या योगे विद्यार्थ्यांना नग्न मानवी शरीराकृतीवरून थेट अभ्यास करता येऊ लागला. नगरकर यांना कलाविचारातील या स्थित्यंतराचा व सॉलोमन यांच्या उदार दृष्टिकोनाचा फायदा झाला. त्यांनी पाश्चिमात्य पद्धतीच्या मानवाकृतींचे लयदार रेषेतील रेखाटन आणि छायाप्रकाश यांचा वापर टाळून केलेले सपाट पद्धतीचे, भारतीय चित्रशैलीवरून प्रेरणा घेतलेले रंगलेपन अशी स्वत:ची शैली विकसित केली. सॉलोमन यांच्याच प्रोत्साहनाने नगरकर यांनी ‘रजनी’ (नाईट) हे भित्तिचित्र काढले. त्या चित्राला गव्हर्नरचे पारितोषिक मिळाले. त्या चित्राबद्दल ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या 15 फेब्रुवारी 1920 च्या अंकात म्हटले होते, “नगरकर यांच्या ‘नाईट’ या चित्रातील, स्वत:ची स्वप्ने प्रेक्षकांपुढे उलगडणारी, डोळ्यांमध्ये उत्सुकता व निरागस काव्यात्म वादळ असलेली ती म्हणजे निव्वळ एक खेडवळ मुलगी नाही; ते नुसते चित्र नाही तर कलेचे नवे विश्व आहे.”
नगरकर पदविका परीक्षा प्रथम क्रमांकाने 1920 मध्ये उत्तीर्ण झाले. त्यांना कलाशिक्षणातील प्रावीण्य व सातत्य यांबद्दलचे मानाचे ‘मेयो पदक’ 1921 मध्ये मिळाले. सॉलोमन यांनी म्युरल क्लास त्याच काळात सुरू केला होता. त्यांनी जे.जे.च्या भिंतीवर 16 फूट 9 इंच उंच व 33 फूट 8 इंच रूंद आकाराचे ‘कलादेव्या: प्रतिष्ठा’ हे भव्य भित्तिचित्र म्युरल क्लासच्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांकडून करून घेतले. नगरकर हे त्या गटात होते. भित्तिचित्राचे उद्घाटन गव्हर्नर लॉर्ड लॉइड यांच्या हस्ते झाले. लॉइड यांना ते काम एवढे आवडले, की त्यांनी त्या विद्यार्थ्यांना गव्हर्न्मेंट हाउसमधील दरबार हॉलच्या सजावटीचे काम दिले. त्यातही नगरकर यांचा वाटा महत्त्वाचा होता. नगरकर यांचा विवाह मनोरमा सावळापूरकर यांच्याशी 1922 मध्येच झाला.
नगरकर यांची जे.जे.त शिक्षक म्हणून नेमणूक 1923 मध्ये करण्यात आली. ते ‘फिगर कॉम्पोझिशन’ हा विषय शिकवत. त्यांच्या ‘भक्तिप्रताप’, ‘ट्रायंफ ऑफ डिव्होशन’ या द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगावरील चित्राला ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’चे विशेष पारितोषिक 1926 मध्ये तर त्यांच्या ‘द्रौपदी स्वयंवर’ या चित्राला मानाचे सुवर्णपदक 1927 मध्ये मिळाले. ब्रिटिश साम्राज्य प्रदर्शन वेम्बले येथे 1924 मध्ये भरले होते. नगरकर यांनी छतावरील सात घोड्यांच्या रथात बसलेले सूर्यदेवतेचे भव्य चित्र त्या प्रदर्शनासाठी रंगवले होते. नगरकर यांनी सातत्याने भारतीय पुनरुज्जीवनवादी शैलीत अनेक चित्रे 1921 पासून रंगवली. त्यांनी स्वत:ची स्वतंत्र शैली ‘वॉश टेक्निक’मध्ये भारतीय पद्धतीने विकसित केली होती. त्यांना पारितोषिकेही भारतातील अनेक प्रदर्शनांतून मिळाली. त्यांची चित्रे परदेशांतील प्रदर्शनांतून प्रदर्शित झाली. त्यांनी दिल्लीतील इंपीरियल सेक्रेटरिएटमधील प्रिन्स चेंबरसाठी भित्तिचित्रे 1928 मध्ये रंगवली. ती हिंदू धर्म आणि वर्णाश्रम व्यवस्था या विषयावर होती. त्याबद्दल नामवंत अभ्यासक व कलासमीक्षक सी. पर्सीब्राउन यांनी गौरवाने लिहिले होते, “संस्थानिकांसाठी असलेल्या प्रतीक्षा दालनाच्या छताचे सुशोभीकरण ही एक चांगली संधी होती व तिचा मुंबईच्या जी.एच. नगरकर यांनी पूर्ण फायदा उठवला. त्यांनी ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास अशा आश्रमाधिष्ठित हिंदू आर्य जीवनपद्धतीचा विकास मानवाकृतींमधून दाखवला आहे. त्यांची एकूण तंत्रपद्धत त्या विषयासाठी अनुरूप अशीच आहे. त्यांनी वास्तुकलेचे भान ठेवत चित्ररचना योग्य तऱ्हेने केलेली आहे, त्यांचे मानवाकृतींचे आरेखन चांगले आहे, पारंपरिक कल्पना चांगल्या प्रकारे योजली आहे, अंगकांती नैसर्गिक आहे. त्यांनी चित्रांकित केलेले रंगांचे सपाट अवकाश आणि रेखांकनाची गुणवत्ता विशेष आल्हाददायक आहे. त्यांच्या चित्रकृतींमधून भारतीय जीवनपद्धतीत रस असलेल्यांना, प्रत्येक वर्ण्य विषयातील अर्थाची खोली आणि प्रतीकात्मकता भरभरून प्रत्ययाला येते.
नगरकर यांच्या ‘वॉश टेक्निक’मधील चित्रांना ‘मद्रास फाइन आर्ट सोसायटी’ व ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’ यांची बक्षीसे 1921 मध्ये मिळाली. त्यांचे ‘राधाज रिकन्सिलिएशन’ हे चित्र (1926) गाजले. ते 1927 च्या लंडनमधील साम्राज्य प्रदर्शनासाठी निवडण्यात आले. त्यांचे ‘दिव्य स्पर्श’ (divine touch) हे चित्र 1934 मध्ये ‘मॉडर्न इंडियन आर्ट’ या लंडनमधील प्रदर्शनात प्रदर्शित केले गेले. त्या चित्राची प्रतिकृती कुचबिहार या संस्थानाच्या राणीने करून घेतली होती. नगरकर यांची स्वत:ची, भारतीयत्व व्यक्त करणारी चित्रनिर्मितीही सातत्याने सुरू होती. त्यांचे ‘वन-गमन आदेश’ (बॅनिशमेंट ऑफ राम अँड सीता) हे चित्र मुंबईच्या ‘प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम’ने 1920 मध्ये खरेदी केले.
नगरकर कॉम्पोझिशन हा विषय शिकवत. त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवताना मोकळ्या मनाने व काहीही लपवाछपवी न करता चित्रे काढण्याचे ज्ञान दिले. नगरकर यांचा कटाक्ष पारदर्शक जलरंग वापरण्यावर असे. ते दागिने व डोळे यांसाठी मात्र ‘चायनीज व्हाइट’ वापरत. नगरकर यांच्या चित्रशैलीचा प्रभाव नंतरच्या पिढीतील चिमुलकर या चित्रकाराच्या चित्रांवर जाणवतो. नगरकर 1949 मध्ये निवृत्त झाले. त्यानंतर त्यांचा वर्ग बंद करण्यात आला.
नगरकर यांचे वास्तववादी पाश्चात्य शैलीवरही प्रभुत्व होते. नगरकर यांना नागपूर विद्यापीठातर्फे त्यांचे आश्रयदाते रावबहादूर लक्ष्मीनारायण यांचे पूर्णाकृती व्यक्तिचित्र रंगवण्यासाठी 1938 मध्ये आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी बडोदा नरेश प्रतापसिंह गायकवाड यांच्या राज्यारोहण प्रसंगाचे 8’ x 6’ आकाराचे भव्य चित्र संस्थानाच्या आमंत्रणानुसार 1940 मध्ये रंगवले. त्यांनी भारतीय शैली व भारतीय संस्कृती यांवरील चित्रे उद्योगपतींसाठी रंगवली. त्यांनी ‘शकुंतला व तिच्या सखी’ हे चित्र उद्योजक रामनारायण रुइया यांच्यासाठी 1940 मध्ये रंगवले (आकार 10’ x 5’). ते विशेष गाजले.
नगरकर यांची ‘द्रौपदी वस्त्रहरण’ व ‘द्रौपदी स्वयंवर’ ही चित्रे विलक्षण अशी आहेत. द्रौपदी स्वयंवर हे चित्र तर 5’ x 3’ अशा भव्य आकारात आणि ‘वॉश टेक्निक’सारख्या अवघड माध्यमात केलेले आहे. त्या चित्रात अक्षरश: असंख्य मानवी आकृती असून त्यांतील प्रत्येक व्यक्तिरेखेचे आविर्भाव व त्यातून होणारे भावदर्शन यांतून द्रौपदी स्वयंवराचे नाट्य फुलत जाते. ते चित्र म्हणजे चमत्कारच वाटतो. त्यांच्या ‘भक्तिप्रताप’ या चित्रालाही बॉम्बे आर्ट सोसायटीचे पारितोषिक मिळाले. नगरकर चित्रे तैलरंगासारख्या माध्यमातही समर्थपणे रंगवत. त्यांची ‘दिव्य स्पर्श’, ‘राधाविलास’ किंवा दिल्लीच्या इंपीरिअल सेक्रेटरिएटमधील चित्रे याची साक्ष देतात. नगरकर यांची चित्रे संख्येने कमी आहेत, पण त्यांची कलानिर्मिती, त्यामागचा विचार व त्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम महत्त्वाचे असून भारतीय कलेच्या इतिहासात त्याची नोंद होते.
नगरकर वृत्तीने धार्मिक व साधे होते. ते कोट, पँट व डोक्यावर टोपी घालत. कपाळावर गंध लावत. नगरकर कामाला बसले की तासन् तास तल्लीन होऊन जात. नगरकर यांचे व्यक्तिमत्त्व अभ्यासू होते. त्यांनी तत्कालीन विविध नियतकालिके, मासिके यांमधून लेखन केल्याचे आढळते. ते कधी कवितालेखनही करत असत.
नगरकर यांचा मृत्यू 1956 मध्ये झाला. त्यानंतर तब्बल चोपन्न वर्षांनी, 2010 मध्ये त्यांची चित्रे जहांगीर आर्ट गॅलरीच्या ‘मास्टर स्ट्रोक्स’ या प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आली होती. त्यावेळी नगरकर यांची कलाकामगिरी यथार्थपणे लोकांसमोर आली.
– सुहास बहुळकर 9820942165 suhasbahulkar@gmail.com