पाठारे प्रभू ज्ञातीचे वास्तव्य दक्षिण मुंबईत प्राधान्याने होते. ते स्वतःला अस्सल मुंबईकर मानतात. त्या ज्ञातीमध्ये वर्षभर सर्व सण धूमधडाक्यात साजरे करण्याची परंपरा आहे. दिवाळीत पाठारे प्रभू पद्धतीचे सुकडी, तवसे, शिंगडी, भानवले, पंगोजी, मुम्बरे, बुंदीचे कडक लाडू असे पदार्थ केले जात. त्यांच्या पारंपरिक पदार्थांबरोबरच तेथील विशिष्ट प्रकारच्या रांगोळ्या प्रसिद्ध होत्या. असे म्हणतात, की त्या रांगोळ्या बघण्यास त्या काळी ब्रिटिश अधिकारी घोडागाडीतून येत …
गिरगाव हीच एकेकाळी मुंबई होती. पाठारे प्रभू ज्ञातीचे वास्तव्य दक्षिण मुंबईत प्राधान्याने होते. ती सुरुवात साधारण 1900 सालापासून सांगता येते. ती जमात सुशिक्षित, घरंदाज, श्रीमंत आणि हौशी अशी होती. ती स्वतःला अस्सल मुंबईकर मानते. त्या ज्ञातीमध्ये वर्षभर साजरे होणारे सर्व सण (अगदी ख्रिसमस, पारशांचा नववर्षदिन, 1 जानेवारीसह सर्व उत्सव) धूमधडाक्यात साजरे करण्याची परंपरा आहे. दक्षिण मुंबईचे विभाग पाठारे प्रभू ज्ञातीत विशिष्ट नावाने ओळखले जात. म्हणजे धोबीतलाव ते चिराबाजार विभाग ‘लैनी’, तर चिराबाजार ते ठाकूरद्वारपर्यंतचा विभाग ‘पालव’ आणि मग परभांचे ठाकूर (म्हणजे देव) असलेले द्वार म्हणून ‘ठाकूरद्वार’. ठाकूरद्वारच्या लगत ‘पुष्करणी’ (तलावात असलेले कारंजे), त्याच्या खाली विहीर, बाजूला ऐसपैस कुरण. तेथे गायीगुरे चरण्यास जात, म्हणून ‘चरणीरोड’. म्हणजे ‘चर्नीरोड’ स्थानक. ठाकूरद्वारच्या पुढे तबेला. शिवाय फणसाची वाडी, ताडाची वाडी, झावबाची वाडी, नवी वाडी अशा वाड्या. त्यांतून पाठारे प्रभूंची वस्ती होती.
पाठारे प्रभूंची दिवाळी ‘आठविंद्या’पासून (अष्टमीपासून) सुरू होते. ‘आठविंदा’ जवळ आला की ‘सुकडी’ (दिवाळीचा सुका फराळ) करण्यास घरोघरी विशा भट (विश्वनाथ भट), बहिरंभट यांना आवतण जाई. घराच्या किंवा वाड्याच्या मागील प्रशस्त अंगणात त्या ‘सुकडी’चे घाणे पडत. विटांच्या चुली, त्यात लाकडी वा बदामी कोळसे भरलेले, मोठमोठ्या कढया, भाट्या (अव्हन), मोठमोठे टोप (पातेली), रकाब्या (झाकणी) अशा रामरगाड्यात विविध खाद्यपदार्थांची रेलचेल सुरू होई. जाडी आणि बारीक शेव, बुंदीचे कडक लाडू, कळीचे लाडू असे पदार्थ आधी होत. तांदळाच्या पिठात, साखरेच्या पाकात वेलची, जायफळ घातलेले कळीचे बुंदी लाडू जणू इतिहासजमा झाले आहेत. नंतर ‘घेवर’ (घीवर) आणि जिलबी. घेवर खास परभी पद्धतीने केले जात. जाळीदार, देखणे ! त्यावर बदाम, पिस्त्याच्या पातळ कापांची पेरणी. भाटीत होणारे पदार्थ म्हणजे शिंगड्या (करंज्या), नानकटाई, घरगुती बिस्किटे. परभिणीचे कसब असलेले ते पदार्थ. शिंगडीत गोड सोय (खोबरे) सारण म्हणून असे. दुधी हलव्याच्याही शिंगड्या होत. शिवाय, बळीराजा (बलिप्रतिपदा),भाऊबीज ‘सिवशी’ (सामिष) भोजनाची असेल तर त्या दिवशी खास खिम्याचे सारण भरलेल्या शिंगड्या होत त्या वेगळ्याच. त्या शिंगड्यांसाठी तांदूळ पीठ, तूप (फेसलेले), किंचित बेकिंग पावडर घालून साटा करण्यात येई. मग मैद्याची पोळी लाटून एकावर एक साटा लावून त्याच्या (पापडाच्या लाट्यांसारख्या) लाट्या केल्या जात. त्या लाटीची करंजी किती खुसखुशीत, खमंग म्हणून वर्णावी? त्या करंजीच्या कडेला पीठ वळवून ‘बिरवण’ (कडेची ‘झिगझॅग’ बंदोबस्त असलेले हाताने केलेले शिवण) घातली जाई. त्याच्या दोन्ही टोकांना जणू एक एक शिंगाकृती तयार होई. म्हणून ती शिंगडी ! अनारसे, भाजणीच्या चकल्या, चिवडा हे तर सर्व जमातींत एकसारखे असणारे प्रकार.
पहिल्या अंघोळीच्या दिवशी भाटीत भाजलेले खास ‘तवसे’ केले जाई. श्रावणात मिळणारी मोठ्ठी काकडी आणत. ती घरात टांगून ठेवत. हलके हलके ती तांबूस, जून होत जाई. मग ती किसून त्यात भाजलेला रवा भिजत घालत. त्यात साखर, खिसमिस (बेदाणे), वेलची, बदाम, काजू घालून ती भाटीत भाजत. मग दिवाळीच्या इतर फराळाबरोबर पहिल्या अंघोळीला खमंग तवसे ! शिवाय, इतरही ‘परभी’ पदार्थांचा सुकाळ असेच. जसे की ‘भानवले’, ‘पंगोजी’, ‘मुम्बरे’ वगैरे वगैरे.
‘आठविंद्या’पासून परभांच्या अंगणात विशिष्ट प्रकारच्या रांगोळ्यांचेही सुशोभीकरण असे. सारवलेले मोठे अंगण मोठ्या बायकांसाठी तर छोटे अंगण लहान मुलींसाठी. ‘विशिष्ट प्रकार’च्या असे म्हटले, कारण त्या रांगोळ्यांचे दिवस आणि आकृत्या ठरलेल्या असत (ती प्रथा अनेक घरांत पाळली जाते). पहिल्या दिवशी ‘आसन्या’ काढत. त्यावर मध्ये पणती किंवा दिवा ठेवत. दुसऱ्या दिवसापासून बोंडल्या, तेंडल्या, खांबल्या, पाच देवळे. पहिल्या अंघोळीला पोखरण (विहीर), बळीराजाला बलिप्रतिपदेला नऊ किंवा अकरा स्वस्तिकांची रांगोळी. भाऊबीजेला आरती, तुळशी विवाहाच्या दिवशी वृंदावन, वसुबारसेला (गोवत्स बारस) गोवत्स चित्रण… अशा त्या रांगोळ्यांच्या प्रकारात घरोघरी कलाकारांचे कसब दिसे. असे म्हणतात, की त्या रांगोळ्या बघण्यास त्या काळी ब्रिटिश अधिकारी घोडागाडीतून येत. पाण्यावरील रांगोळी, पाण्याखालील रांगोळी हे तर खास वैशिष्ट्य असे ! शिवाय, रांगोळीची ‘बॉर्डर’ काढली जाई ती दोन बोटांच्या फटीतून रांगोळी झिरपत अखंड दोन रेघा एकदम रेखत. त्या रांगोळ्यांना ‘कणा’ असेही म्हणतात. त्या कण्यांचे प्रदर्शन 1938 साली गिरगावच्या जगन्नाथ शंकरशेटच्या वाड्यात भरले होते; तेव्हा ते पाहण्यास त्यावेळचे गव्हर्नर आणि त्यांच्या सोबत सुभाषचंद्र बोसही आले होते !
त्या कण्यांना सुशोभित करणारे, अंगणात शुभ्र प्रकाश पाडणारे आकाशकंदीलही घरीच केले जात. दिवाळीचा प्रत्यक्ष सण उगवला, की आनंदाची, प्रथांची लयलूटच. ‘धनतेरस’ला सायंकाळी घरोघरी धनाची पूजा होई. मोगलाई, पेशवाई, ब्रिटिशकालीन खास जुनी नाणी घरोघरी संग्रही आहेत. ऐतिहासिक, पारंपरिक मूल्य असलेली ती नाणी; शिवाय, अस्सल सोन्या-चांदीची नाणी वा रुपये (टके) दरवर्षी आणखी धनाची भर घालून पूजली जात. लक्ष्मीपूजनाला घरचे दागिने पूजतात. शेराचे (एक शेर वजनाचे) तोडे, सरी, ठुशी बायका घालत. बाजूबंदाला परभी भाषेत ‘खेळणे’ म्हणतात; तेही शेराचे किंवा कमीत कमी बारा तोळ्यांचे असे. गोठ, पाटल्या, पिछोड्या, जाळीच्या बांगड्या, बिलवर, तोडे हे नुसते कोपरापासून मनगटापर्यंतच्या कांकणांचे प्रकार होत. त्या दागिन्यांची पूजा त्यात आणखी एकाची भर घालून केली जाई. अंगणात ‘जावई’ येत. थोडा वेगळाच तो प्रकार. निवडुंगाचे करवे (तुकडे) करून, वरील भाग थोडा खोलगट करून त्यात तेलवात घालून बत्तीस दिवे चांदीच्या किंवा पंचधातूंच्या ‘बाजवटा’वर (चौरंग) लावले जात. घरची लक्ष्मी ते दिवे लावी. मग खेळ म्हणून घरचा ‘रामागडी’ त्यातील चार ‘जावई’ पळवत अन् इतर चार घरांतील जावयांत ठेवत (त्या घरातील मुलगा त्याचा खरोखरीचा जावई होई अशी त्यामागील सुप्त इच्छा !)
पहिली अंघोळ थाटामाटात होई. बेलिया तेल, नारळाचे दूध, उटणे लावून गरम गरम पाण्याने घरातील वडील बाई घरातील मंडळींना पाठबीठ चोळून अंघोळ घाली. अंघोळ चालू असताना, बाहेर फटाक्यांची माळ आणि फुलबाज्या, अनार लावले जात. मग नवीन कपडे, दागिने, फुले-वेण्या घालून सजणे होई. दारात, दाराबाहेर आणि अंगणात ‘कोडी’ असे (एका टोकाला तेलकुंकू लावलेले कणकेचे दिवे). तेथे घरातील लक्ष्मी सर्वांना आरती करी. प्रत्येक जण स्वत:चा पाय त्या कोड्यावर शेकवत. निवडुंगाचा एक दिवा खास ‘बळीराजा’साठी राखला जाई. कारण त्या दिवशी आख्ख्या घराचा कचरा काढून त्याची पूजा केली जाई. जुनी केरसुणीही कचऱ्याबरोबर सुपात ठेवत. तो कचरा सूप, पोळीपाट हातात घेऊन, त्यावर लाटण्याने आवाज करत करत सर्व बाळगोपाळांसह ‘इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो’ असे म्हणत म्हणत घरभर फिरवत. मग त्या कचऱ्याच्या सुपात राखलेला निवडुंगाचा दिवा ठेवून घरची लक्ष्मी त्याला ओवाळी. एखादी दक्षिणा त्यात ठेवून तो कचरा, केरसुणी घराबाहेर ठेवून येई. मग सगळ्यांच्या अंघोळी. नवीन कपडे, दागदागिने घालून, सजून मग बळीराजा काढला जाई. चौरंगावर बत्तीस कोडी. त्यात मधोमध घोड्यावर बसलेला, हाती त्रिशूल असलेला बळी. चौरंगाखाली अकरा किंवा एकवीस स्वस्तिकांची शुभंकर रांगोळी. तो राजा जितक्या पहाटे काढता येईल तितक्या लवकर चुरशीने काढला जाई. तो निघाला की वाड्याबाहेर, घराबाहेर फटाक्यांचा ‘कोट’ (फटाक्यांची लांबच लांब माळ) लागे. वेलकर, जयकर, झावबा… अनेकांत ती चुरस असे. अनार, ‘पणती’ यांसारखे दारूकाम असलेले फटाके घरी बनवत. नवीवाडीतील मानकर यांच्याकडे त्या ‘पणत्या’ होत. त्यांचे वैशिष्ट्य असे, की फटाक्यांची दारू उडाली, की लाल उजेड होई. त्याची उरलेली ‘राळ’ (राख) औषधी म्हणून बरणीत भरून ठेवत. ते औषध फार गुणकारी भाजल्यावर असे.
पाठारे प्रभू स्त्रीचे वर्णन नाकात वाळी (नथ), कानात कुडी | अंगी ल्यायला कसबी साडी | गळ्यास सरी, कपाळाला चिरी | अंगावर लपेटला शेला भरजरी || असे खरे तर अपुरेच. धनदिव्याला शालू आणि बळीराजाला कसबी साडी जवळजवळ ठरलेली असे (गंमत म्हणजे कसबी नऊवारी नेसताना साडी घट्ट राहवी म्हणून चक्क ‘टाय’ बांधलेला असे; ज्याचा उल्लेख दुर्गा भागवत यांनीही केला आहे. चंद्रहार, चपलाहार, कोल्हापुरी साज, मोहनमाळ, गळ्यातील ‘चोकर’, अंबाड्यावर सोन्याची बार (वेणी), फूल, सोन्याचा कमरपट्टा हे तर प्रत्येक गृहिणीच्या दिवाळीला अलंकृत करत. पाठारे प्रभूंनीच बसवलेले एखादे नाटक बळीराजाच्या रात्री सादर होई. ते नाटक म्हणजे ‘गेट टुगेदर’च. मग येई भाऊबीज. त्या भाऊबीजेचे वैशिष्ट्य म्हणजे बहीण भावाबरोबर वहिनीलाही ओवाळते. भावाला, वहिनीला स्वतंत्र नारळ, मिठाई दिली जाते. खास म्हणजे भाऊ ओवाळणी घालतोच. पण बहीणही भाऊ-भावजयीला चीजवस्तू भेट म्हणून देते. म्हणजे भाऊबीजेची ओवाळणी भेटवस्तूंच्या बाबतीत अरस-परस असते. समजा, बहीण विधवा असेल तर बहिणीची मुलगी त्या दिवशी आईच्या वतीने मामाला ओवाळते (ती प्रथा कालमानाप्रमाणे नाहीशी झाली आहे).
माणसांच्या दिवाळीनंतर येते ती देवदिवाळी. त्यातील महत्त्वाचे म्हणजे तुळशीचे लग्न. ते लग्न लागले की मग माणसांची लग्ने लागण्यास सुरुवात होई. तुळशीचे लग्न ही अगदी त्या मानवी लग्नाचीच आवृत्ती असे. लंगड्या बाळकृष्णाबरोबर तुलसीचा विवाह. त्याच्या कुंकुमपत्रिका निघत. नातेवाईक मंडळी जमत. ऊस, चिंचा, आवळे, सागूपुरी (‘सागू’ हा खिरीसारखा एक चविष्ट प्रकार) यांचा नैवेद्य असे. घरातील कर्ता पुरूष पितांबर नेसून यजमानपद भूषवे. तो खांद्यावर शेला, गळ्यात गोफ, हातात तोडा, बोटात अंगठ्या, कानात भिकबाळी असा सजलेला असे. तो पुरुष तुळस आणि बाळकृष्ण यांच्यामध्ये शालीचा अंतरपाट धरून लग्न लावे. ते लग्न लावण्यासाठी त्या त्या घरातील ठरलेले भटजी (गुरुजी) असत. मंगलाष्टके सनई-चौघड्याच्या सुरात म्हटली जात. तुळशीला नववस्त्र, शेवंतीची वेणी, हिरव्या काचेच्या बांगड्यांचे वायन (वाण) असे. लग्न लागले की फटाक्यांचा ‘कोट’ असेच. मग येई त्रिपुरी पौर्णिमा. घरापुढील अंगण रांगोळीने त्या पौर्णिमेपर्यंत देखणे होई. पौर्णिमेच्या दिवशी तुळशी वृंदावनात सवाष्णींचे तीनपदरी, हजार वातींचे ‘जोड’ लागे; तर कुमारिकांचे साडेतीनशे वातींचे (तीन पदर म्हणजे हाताच्या तीन बोटांभोवती तीनदा कापसाची वात गुंडाळून त्याची एक वात असे. अशा हजार वातींचा एक ‘जोडा’). देवदिवाळी झाली, की संपली दिवाळी !
दिवाळी आनंदाने हसत-नाचत येते. पण पाठारे प्रभूंची काही घरे सोडली तर दिवाळी साजरी करण्याच्या त्या पद्धतीत बरीच काटछाट झाली आहे. मराठी माणूस आकाशकंदील, पणत्या, बरीचशी सुकडी विकत आणण्यावर विसावला आहे. आठविंद्यापासून सुरू होणाऱ्या रांगोळ्या दिवाळीचे चार दिवस आणि मग काही विशिष्ट दिवसांपुरत्या अंगणात अवतरतात. गिरगावची कुटुंबे उपनगरात सरकली, कुटुंबपद्धत विभक्त झाली. काही कुटुंबे परदेशस्थ झाली… अन् मग अनेक रिवाजांना बंदिस्त व्हावे लागले. पहिल्या अंघोळीच्या दिवशी देवळात जाणारा, एकमेकांना भेटणारा गिरगावकर ‘व्हॉट्स अॅप’वर शुभेच्छा देऊ लागला. भाऊबीजेचा दिवस गाठणे भावांना मुश्किल होऊ लागले. मग त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत कधी तरी सोयीसवडीने ओवाळणी होते. पूर्वी सणासुदीला घेतले जाणारे नवीन कपडे, दागिने सर्वकाळी व कधीही मॉलमध्ये खरेदी केले जातात. त्यामुळे नवीनतेचा आनंद सांघिक उरलेला नाही. दिवाळीचे उटणे लावण्यातील गंमत ‘पार्लर’मुळे नाहीशी झाली. वाडे उरले नाहीत, अंगणे उरली नाहीत… चार घरचे जावई पळवण्याची वेळही येत नाही; कारण आता लग्न जुळवण्यातही घरातील वडील व्यक्तीचा शब्द अंतिम असत नाही. हां ! आनंद एकत्रितपणे घेण्यासाठी समस्त परभू नाटकाला जातात, भेटतात, शुभेच्छा देतात. पुढील काळात तेही ‘नाटकी’ होऊ नये. कारण आता गिरगावात ‘दिवाळी पहाट’ नावाचे सांगितिक कार्यक्रम असतात.
ठाकूरद्वार हा दक्षिण मुंबईचा एक भाग झाला. गिरगाव त्यापुढे पोर्तुगीज चर्चपर्यंत छान वसत गेले. चाकरमानी मंडळी वस्तीला आल्यावर महत्त्वाची अशी चाळ संस्कृती तेव्हा उदयाला आली. चाळीत सण साजरा करणे म्हणजे सहजीवनाचा आदर्श. सामाजिक उत्सवच ! सगळ्या चाळी एकसमान कंदिलांनी उजळत. पण त्यांच्या लांबच लांब रांगा प्रकाश उजळत देखण्या होत. दिवाळीचा फराळ सगळे मिळून एकत्रित तयार करत. फटाके एकत्रित फोडत. दिवाळीच्या पहाटे नारळाच्या दुधातील उटणे लावणे, अंघोळ करणे, चिरोटे फोडणे (नरकासुराचा वध म्हणून प्रतीकात्मक), नवीन कपडे घालणे, देवळात जाणे… त्यात आनंदाला भरती येई. पहिल्या पाडव्याला नवीन लग्न झालेल्या मुलीने तिच्या पतीराजांना ओवाळणे हे खास असे; सर्वांसाठी. काही ठिकाणी गल्लीत, वाडीत दिवाळी संमेलनेही साजरी होत. शारदासदन शाळेच्या आवारात, ठाकूरद्वारच्या मराठा मंदिर शाळेत, पोर्तुगीज चर्चजवळच्या भीमाबाई शाळेत सुंदर रांगोळ्यांची भव्य प्रदर्शने भरत. भीमाबाई शाळेत आजही ते रंगावली प्रदर्शन भरते.
– सुहासिनी कीर्तिकर 9820256976 vaijayanti.kirtikar@gmail.com
—————————————————————————————————————————————————————
पाठारे प्रभुंच्या दीपवाळीचे इतके वेशिष्ठ्यपूर्ण वर्णन प्रथमच वाचनात आले . काय सर्वांगसुदर लेख . ही दिवाळी आम्ही वर्षानुवर्षे अनुभवत असल्याने आम्हाला ती पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला.तशी आमची पाठारे प्रभु ज्ञात ऊत्सवप्रियच .सर्व सणवार साजरे करण्याची आमची पध्दतच न्यारी . अप्रतिम लेखाबद्दल लेखिका सुहासिनी किर्तीकरांचे मनःपूर्वक अभिनंदन .
पाठारे प्रभुंच्या दीपवाळीचे इतके वेशिष्ठ्यपूर्ण वर्णन प्रथमच वाचनात आले . काय सर्वांगसुदर लेख . ही दिवाळी आम्ही वर्षानुवर्षे अनुभवत असल्याने आम्हाला ती पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला.तशी आमची पाठारे प्रभु ज्ञात ऊत्सवप्रियच .सर्व सणवार साजरे करण्याची आमची पध्दतच न्यारी . अप्रतिम लेखाबद्दल लेखिका सुहासिनी किर्तीकरांचे मनःपूर्वक अभिनंदन .
पाठारे प्रभुंच्या दीपवाळीचे इतके वेशिष्ठ्यपूर्ण वर्णन प्रथमच वाचनात आले . काय सर्वांगसुदर लेख . ही दिवाळी आम्ही वर्षानुवर्षे अनुभवत असल्याने आम्हाला ती पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला.तशी आमची पाठारे प्रभु ज्ञात ऊत्सवप्रियच .सर्व सणवार साजरे करण्याची आमची पध्दतच न्यारी . अप्रतिम लेखाबद्दल लेखिका सुहासिनी किर्तीकरांचे मनःपूर्वक अभिनंदन .
पाठारे प्रभुंच्या दीपवाळीचे इतके वेशिष्ठ्यपूर्ण वर्णन प्रथमच वाचनात आले . काय सर्वांगसुदर लेख . ही दिवाळी आम्ही वर्षानुवर्षे अनुभवत असल्याने आम्हाला ती पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला.तशी आमची पाठारे प्रभु ज्ञात ऊत्सवप्रियच .सर्व सणवार साजरे करण्याची आमची पध्दतच न्यारी . अप्रतिम लेखाबद्दल लेखिका सुहासिनी किर्तीकरांचे मनःपूर्वक अभिनंदन .
घङ
पाठारे प्रभंच्या वैशिष्ठ्यपुर्ण दिवाळीचे इतके सर्वांसुंदर वर्णन केल्याबद्दल सुहासिनी कार्तीकरांचू मनःपुर्वक अभिनंदन. आम्ही ही दिवाळी वर्षानुवर्षे स्वानुभवलेली असल्याने आम्हाला पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला . खूप छान !
खुप सुंदर लेख आहे… बालपणीच्या सर्व आठवणी जाग्या झाल्या व डोळ्यासमोर एखाद्या चित्रपटाप्रमाणे दिसल्या…. रम्य ते दिवस आणि रम्य त्या आठवणी….👍
फारच छान लेख. वाचताना त्या काळात मन रमून गेले. धन्यवाद 🙏
पुस्तक करावं.
पुणेकर असत्या तर इथे वाचायलाच मिळाले नसते,
पुस्तकातच खरेदी करून वाचावे लागले असते. 😂🐊
पाठारे प्रभु ज्ञातीच्या वैशिष्ट्यपूर्ण दिवाळीचे माहिती पुर्ण
वर्णन वाचले, हे मी स्वतः लहानपणी अनुभवले आहे, मी स्वतः गिरगावात रहात होतो, त्यामुळे शाळा कॉलेज मध्ये अनेक पाठारे प्रभु मित्र होते, या सुंदर लेखामुळे लहानपणीच्या अनेक आठवणी जाग्या झाल्या, मजा आली, लेखिकेचे आभार..!