कौस्तुभ ताह्मनकर यांच्या घराची बेल वाजवण्यापूर्वी त्यांच्या बंद दारावरील शीर्षकातील पाटी पाहुण्यांचे लक्ष वेधून घेते. घर टापटीप असते. तेथेच एक मुलगी खिडकीच्या तावदानाच्या काचा कागदाने पुसत असते. ती काचा पुसल्यावर कागदाचा बोळा फेकून देत नाही, तर कागदाची घडी व्यवस्थित करून तो कागद रद्दीत ठेवते. शून्य कचऱ्याचे ते एक उदाहरण! घर आहे अर्थातच ‘शून्य कचरा मोहिमे’चे उद्गाते कौस्तुभ ताह्मनकर यांचे.
कौस्तुभ ताह्मनकर मूळ कोल्हापूरचे. ते व्यवसायानिमित्त ठाण्यात स्थायिक झाले. कचऱ्याच्या गंभीर प्रश्नासंदर्भात सतत कोठे कोठे बातम्या यायच्या आणि ते अस्वस्थ व्हायचे. त्यांना त्या कचऱ्याचे काय करता येईल हा प्रश्न सतावत असे. त्यांनी घरातील डस्टबिनमध्ये बारा-तेरा वर्षांपूर्वी एकदा डोकावले. त्यांना त्यात वेगवेगळ्या प्रकारचा कचरा दिसला. त्यांच्या मनाने ‘ते कचरा करायचे आणि पत्नी तो काढणार. ते पसारा करणार आणि ती आवरणार. हे कोठे तरी बदलायला पाहिजे’ असे घेतले. त्यांच्या मनानेच पुढे जाऊन ठाम निर्धार केला, की डस्टबिन घरात ठेवूच नये!
ते तितकेसे सोपे नव्हते. कारण कचऱ्याच्या प्रत्येक प्रकाराचा योग्य प्रकारे विनियोग केल्यावरच तो कचरा ‘कचरा’ उरणार नव्हता! ते सांगतात, “मी डोक्यावरून मैला वाहून नेणारी माणसे बघितली आहेत. तेव्हा पाटीचे संडास असायचे. तो सामाजिक अन्याय नाहीसा होण्यामध्ये ड्रेनेज सिस्टिमचा वाटा मोठा आहे. मात्र ती योजना यशस्वी झालेली नाही. कारण ड्रेनेज सिस्टिमने तो कचरा नदीत, समुद्रात सोडला जातो. तो तेथे न सोडता त्यापासून खत किंवा ऊर्जानिर्मिती केली असती तर ती खऱ्या अर्थाने स्वच्छता झाली असती! नागरिकांनी रस्त्यावर किंवा रस्त्याच्या कडेला कचरा टाकणे किंवा महानगरपालिकेने तो उचलून शहराबाहेर टाकणे या दोन्ही क्रिया; खरे तर, एकसारख्याच आहेत. त्यामुळे प्रत्येकाने ‘टाकणे’ ही क्रिया प्रथम बंद केली पाहिजे.”
ताह्मनकर यांच्या मते, कोठलीही गोष्ट कचरा नसतेच. व्यक्तीने जर संपूर्ण स्वच्छतेचा ध्यास घेतला, स्वच्छता स्वत:च्या अंगी भिनवली आणि वस्तू टाकून देण्याऐवजी त्याचे पद्धतशीरपणे व्यवस्थापन केले, तर स्वच्छता आपोआप होईल. ताह्मनकर यांनी ते मनाशी ठरवले आणि दुसऱ्याला सांगण्यापेक्षा, स्वतः कृती करून त्याची अंमलबजावणी केली, त्यातून त्यांच्या ‘शून्य कचरा’ या संकल्पनेचा जन्म झाला.
ताह्मनकर सांगतात, घरातून तयार होणारा कचरा फक्त दहा प्रकारचा असतो. तो पुढीलप्रमाणे –
१. निसर्गनिर्मित – बायोडिग्रेडेबल, २. कागद, ३. काच, ४. नारळाच्या करवंट्या, ५. चिनी मातीची भांडी, ६.जाड प्लॅस्टिक, ७. हाडे, ८. पातळ प्लॅस्टिक, ९. सॅनिटरी नॅपकिन्स, १०. E- Waste. खरे तर, वापरून झाल्यानंतर नको असलेल्या वस्तूंची यादी केवढी तरी मोठी होईल! परंतु त्यांत प्रामुख्याने तीन प्रकार पडतात.
१. ज्याच्या कचऱ्यातून लगेच पैसे मिळतात अशा वस्तू विकून रद्दीतून पैसे कमावले जातात, घरातील बरेचसे ‘नकोसे’ कागदही स्वच्छ करून त्यामधून पैसे कमावले जाऊ शकतात. अनेक कागदांची आयात सकाळपासूनच होत असते. वर्तमानपत्रे, टपाल, सायंकाळी हिशोब करण्यास बसल्यावर अनेक चिठ्ठ्या-चपाट्या… या सर्व वस्तू बघून झाल्या, की त्यांची गरज नसते. त्यांपैकी फक्त वर्तमानपत्रांचे पैसे रद्दीतून मिळतात, म्हणून फक्त तेवढी ठेवली जाऊन बाकी सर्व वस्तूंना कचऱ्याची बास्केट दाखवली जाते. रद्दीवाला छोटे कागद, पॅकिंग बॉक्सेस या वस्तू घेत नाही हा समज चुकीचा आहे. रद्दीवाला ज्या वस्तू ‘रि-सायकल’ होतात त्या सर्व घेतो. रद्दीवाला व्यवस्थित ठेवलेला अगदी बारक्यातील बारीक कागदसुद्धा घेतो. त्याशिवाय, धातूच्या वस्तूंना तर चांगलीच किंमत मिळते.
२. या प्रकारात ‘टूथपेस्टचे टोपण, काचेच्या किंवा प्लास्टिकच्या बाटल्या, बाटल्यांची बुचे-झाकणे, दाढीचे रेझर, अॅल्युमिनिअचे खोके, थर्माकोलचे पेले, रेडिमेड कपड्यांसोबत येणारे प्लास्टिक, डिस्पोझेबल प्लास्टिकचे पेले, प्लास्टिकच्या पिना, नको असलेले अथवा वापरून झालेले किंवा मशिन्सचे मोडलेले छोटे-छोटे भाग, दाढीची पेस्ट, मशिन्सचे मोडलेले भाग, औषधाच्या स्ट्रिप्स, प्लास्टिकचे चमचे, प्लास्टिकची भांडी, रिफिल्स, पेन, बल्ब, ट्यूब, प्लास्टिकची घासणी, सेल, फ्लॉपी, सीडी, कॅसेट इत्यादी वस्तूंचा समावेश होतो. या वस्तू सहजच कचऱ्यात टाकून दिल्या जातात. परंतु त्यावर पोट भरणारे लोकही समाजात आहेत. त्यांना जमा झालेला तसा ‘वाव’ देऊन टाकावा.
प्लास्टिकच्या पातळ पिशव्यांचा कचरा हा मोठा गंभीर प्रश्न आहे. त्या पिशव्यांचे नैसर्गिकरीत्या विघटन होत नसल्याने ती समस्या भविष्यात गंभीर रूप धारण करते. ताह्मणकर यांनी ‘वापरून झालेली प्लास्टिकची पिशवी टाकून द्यायची नाही’ असा पण केला आहे. त्यासाठी ते सोपा उपाय अवलंबतात. ते सर्वप्रथम प्लास्टिकची पिशवी सुरीने तिन्ही बाजूंनी कापून उघडतात. त्यामुळे एक मोठे सपाट प्लास्टिक गवसते. ते प्लास्टिक सहज धुऊन कोरडे करता येते. ताह्मणकरांनी तशा प्लास्टिकपासून ‘पॅकिंग पाऊच’ हे नवे उत्पादन साकारले आहे. पॅकिंग पाऊच एका वेगळ्या जाड प्लास्टिकच्या पिशवीतून बनवावा लागतो. ते जाड प्लास्टिक सहजासहजी फाडता येत नाही आणि पाऊच चारही बाजूंनी सीलबंद असल्यामुळे आत भरलेले पातळ प्लास्टिक बाहेरही येत नाही. कारखान्यांतून तयार मालाचे पॅकिंग करण्यासाठी गवत/पेपरवूल/फोमचे तुकडे/थर्माकोलचे तुकडे असे विविध पदार्थ वापरले जातात. पॅकिंग उघडले, की त्या पदार्थांचे काय करायचे असा प्रश्न असतो. त्या प्रश्नाला खरेदीदार व्यक्तीकडे उत्तर नसते. त्यावर हा ‘पॅकिंग पाऊच’ उपयोगी पडत असल्याचे ताह्मणकर सांगतात. पाऊच वापरून झाल्यावरही पुन:पुन्हा वापरता येतो. तो कोठेही टाकून दिला जाऊ नये, यासाठी ताह्मणकरांनी त्याचा आकार लहान ठेवलेला नाही आणि ठेवण्यास अडचण नको म्हणून त्याचा आकार मोठाही केलेला नाही. पाऊच घरी ठेवण्यासाठीही उपयोगी पडू शकतो आणि एखाद्या कारखानदारालाही देता येऊ शकतो. ताह्मणकर यांचा स्वतःचाच केमिकल कंपन्यांना लागणारे टर्निंग मीटर, फ्लो मीटर बनवण्याचा कारखाना आहे. त्यामुळे त्यांनी त्याचा उपयोग प्रभावी रीत्या अंमलात आणला आहे. शिवाय, प्लास्टिकपासून उशा, गाद्या, रजयासुद्धा बनवता येऊ शकतात असे ताह्मणकर सांगतात.
३. जैविक पदार्थ (निसर्गतः ज्यांचे मातीत रूपांतर होऊ शकते अशा वस्तू) या प्रकारामध्ये प्रामुख्याने स्वयंपाकघरात तयार होणाऱ्या कचऱ्याचा समावेश होतो. उदाहरणार्थ टरफले, फळांच्या साली, भाज्यांचे देठ; तसेच, उष्टे-खरकटे किंवा शिळे अन्न इत्यादी. अशा सर्व वस्तू जैविक वस्तू असतात. तशा उरलेल्या पदार्थांसाठी ताह्मणकरांनी ‘अविरत पात्र’ बनवले आहे. त्यात घरच्या घरी गांडुळ खत बनवू शकतो हे ताह्मनकर यांनी त्या योगे दाखवून दिले आहे.
साहित्य- चाकू – अर्धा इंच रुंद गुणिले दोन इंच लांब;
चार पाय असलेली प्लास्टिकची जाळीदार बास्केट – सुमारे पंधरा गुणिले अकरा इंच गुणिले नऊ इंच.
अविरत पात्र – फोटो रोल ज्या डबीतून मिळतो, त्या वाया गेलेल्या प्लास्टिकच्या चार डब्या,
प्लास्टिकचा ट्रे सुमारे एकोणिस इंच गुणिले बारा इंच गुणिले चार इंच, कातरी, प्लास्टिकची मोठी पिशवी आणि झोळणा.
अविरत पात्र तयार करण्याची पद्धत – प्लास्टिकच्या जाळीदार बास्केटला खालच्या बाजूला भोके नसल्यास भोके पाडून घ्यावीत. प्लास्टिकच्या बास्केटला चार टोकांस चार फोटो रोल डब्या जोडून घ्याव्यात. चार पाय असलेली प्लास्टिकची बास्केट प्लास्टिकच्या ट्रेमध्ये ठेवावी. प्लास्टिकच्या बास्केटमध्ये नारळाच्या शेंड्या व उसाची चिपाडे पसरावीत. त्यावर थोडेसे सुकलेले शेण, गांडूळखत टाकावे व हलकासा पाण्याचा फवारा मारावा आणि या प्लास्टिकच्या बास्केटमध्ये चार-पाच गांडुळे सोडावीत. प्लास्टिकची ही बास्केट घरातील नको असलेले सर्व जैविक पदार्थ पचवण्यास सज्ज होते!
घरात निर्माण होणारे सर्व जैविक पदार्थ अविरत पात्रात बारीक करून टाकावेत. त्यासाठी घरातील चाकू, विळी अथवा कातरी यांचा वापर करावा. मिक्सर किंवा फूड प्रोसेसरवर हे पदार्थ बारीक करून टाकल्यास अतिउत्तम. शक्य असल्यास, ते पदार्थ मातीत घोळून घ्यावेत.
अविरत पात्र चांगले दिसावे आणि जोमाने चालावे यासाठी त्यात टाकलेल्या अविरत पात्रावर मातीचा थर द्यावा. मातीऐवजी पन्नास टक्के गांडूळखत अधिक पंचवीस टक्के कोकोपिट अधिक पंचवीस टक्के ऊसाच्या चिपाडाची भुकटी यांचे मिश्रण वापरल्यास अतिउत्तम.
दररोज हलक्या हाताने साधारण दोन-चार पेले पाणी शिंपडावे. त्यासाठी शक्यतो स्प्रेचा वापर करावा म्हणजे माती पाण्याबरोबर वाहून जाणार नाही. खाली असलेल्या पसरट भांड्यात मावेल इतकेच पाणी घालावे. खाली स्रवलेले म्हणजे द्रवरूप खतच असते. झाडांना पाणी घालताना त्यात ते द्रवरूप खत मिसळावे.
अविरत पात्रात हवा आवश्यक असते. त्यासाठी अविरत पात्रावर छोटासा पंखा लावावा. पंख्याचा उपयोग अविरत पात्रात तयार होणाऱ्या चिलटांना हाकलण्यासाठीसुद्धा होतो.
अविरत पात्र सुरू केल्यापासून त्यातून खतरूपी माती बाहेर पडण्यास महिना- दीड महिना जाईल. ताह्मणकर यांनी बनवलेल्या अविरत पात्रातील ट्रेला खालील बाजूस कोनाकृती आकार दिला आहे. त्यामुळे बास्केटमधून खताच्या रूपात बाहेर पडणारी माती ट्रेखालील पसरट भांड्यात आपोआप गोळा होते. परिणामी अविरत पात्रात आपोआप नव्या कचऱ्यासाठी जागा निर्माण होते आणि अविरत पात्र भरत कधीच नाही. थोडक्यात, एकदा हे अविरत पात्र काम करू लागल्यावर ते नावाप्रमाणे अविरत चालूच राहते. ते पात्र केवळ पाण्याच्या सहाय्याने आठ-पंधरा दिवसांनी बाहेरून साफ करावे लागते.
अविरत पात्रातून मिळालेले खत घरी असलेल्या झाडांसाठी वापरता येईलच; शिवाय, घरी पाहुणे आल्यास त्यांना भेट देण्यासाठी तो उत्तम पर्याय ठरू शकेल असे ताह्मणकर सांगतात. अविरत पात्रातून बाहेर पडणारे खत पाण्यामुळे ओले झालेले असते. ते कोणाला द्यायचे असल्यास, ते सुकवणे हे एक कामच होईल, पण या श्रमांनी पाहुणा आनंदित होईल, हे नक्की, हेही ताह्मनकर आवर्जून सांगतात.
अविरत पात्र मंद गतीने चालत आहे असे वाटल्यास त्यात नारळाच्या शेंड्या, उसाची चिपाडे व शेणखत यांचा थर द्यावा.
ताह्मनकर एक मात्र बजावतात, या अविरत पात्रात केवळ कचरा टाकून कचरा निर्मूलन होणार नाही. त्या पात्राकडे जागरुकपणे सतत लक्ष दिले पाहिजे, तरच कचरा निर्मूलनाची ही मोहीम खऱ्या अर्थाने सक्षम होईल!
ताह्मनकर यांच्या घरात कचऱ्याची टोपली कोठेच नाही. विशेष म्हणजे त्यांचा देव्हाराही अगदी स्वच्छ. ना तेथे दिवा तेवताना दिसणार ना एखादी अगरबत्ती. इतकेच नव्हे, तर साधे फूलही तेथे दिसणार नाही. फूल हे झाडावरच शोभून दिसते हे तत्त्व त्यांनी पाळले आहे. त्यामुळे त्यांच्या घरात निर्माल्यही तयार होत नाही. ताह्मनकर सांगतात, की “आम्ही साधा कागदही बोळा करून टाकत नाही. जितकी एनर्जी कागद बोळा करण्यास लागते, तितकीच तो सरळ करण्यासाठी लागते. मग तो बोळा का करायचा? सरळ केलेला तो कागद रद्दीत जमा होतो. त्यामुळे सुक्या कागदाचा प्रश्न आपोआप मिटतो.’ त्यांनी ओल्या कागदाचा प्रश्नही सोडवला आहे. बाहेरून आणलेल्या वडा-भज्यांचा तेलकट, चटणीने ओला झालेला कागदही हलक्या पाण्याने धुऊन काढून तो सुकवला जातो आणि मग त्यांची रवानगी रद्दीत होते. त्यांच्या गॅलरीत प्लास्टिकच्या दुधाच्या पिशव्या, कागद सुकत घातलेले दिसतात. त्यांच्याकडे तुटलेली काच, तुटलेली ट्युबलाइट आदी भंगारचे सामानही साठवले जाते. त्यांचा एकच फंडा आहे, जे सामान भंगारवाला घेऊन जाण्यास नकार देत असेल त्या वस्तू भंगारवाल्याकडे स्वतःहून घेऊन जायच्या. तो हे भंगार घेण्यास नकार देत असला तरी त्याच्या दुकानाबाहेर मात्र अशा असंख्य वस्तूंचा कचरा पडलेला असतो. तो नित्यनेमाने अन्य कारखान्यात जात असतो. त्याच्याकडे असणाऱ्या एका पोत्यात सगळे भंगाराचे सामान ठेवलेले असते. त्यात ते सामान टाकले, की काम फत्ते. त्या भंगार सामानाचे पैसे मिळत नसले तरी घरातील भंगार भंगाराच्या दुकानापर्यंत पोचते आणि ते त्याच्याकडे येणाऱ्या ट्रकमधून इष्ट स्थळी जाते. गंमत म्हणजे ताह्मणकर यांच्या घरी करवंट्याही टाकून दिल्या जात नाहीत. त्यांना त्यांच्याकडे घरकामाला येणाऱ्या बायका चुलीवर पाणी तापवतात हे जेव्हा कळले, तेव्हा त्यांनी त्या करवंट्या त्यांना देणे सुरू केले.
ताह्मनकर म्हणाले, ‘वापरून झालेली वस्तू टाकायची नाही, हा माझा शरीरधर्म झाला आहे. माझाच नव्हे तर आमच्या घरातील सर्वांचा. शरीरधर्म म्हणजे आम्ही श्वास जितक्या नकळत घेतो, आम्ही सकाळी उठल्याबरोबर दात जितक्या सहजपणे घासतो, आम्ही बाहेर जाताना जितके नकळत आरशासमोर उभे राहून केसातून कंगवा फिरवून चेहऱ्याला पावडर लावतो, तितक्या सहजपणे आम्ही वापरून झालेल्या वस्तूंचे व्यवस्थापन करतो. त्यासाठी आम्हाला वेगळा विचार करावा लागत नाही. असा आहे कौस्तुभ ताह्मणकर यांच्या ‘शून्य कचरा’ या संकल्पनेचा मंत्र.
संपर्क :
कौस्तुभ ताह्मनकर – 9819745393
kdtamhankar@gmail.com
– सुचित्रा सुर्वे
suchitra.surve@gmail.com
Very good
Very good
तुमचे हे सर्व कष्ट जवळून…
तुमचे हे सर्व कष्ट जवळून पाहिले व अनुभवलेत.ऊपक्रमास शुभेच्छा…
उपयुक्त आणि अनुकरणिय
उपयुक्त आणि अनुकरणिय
उपयुक्त follow in pilot unit
उपयुक्त follow in pilot unit.
Comments are closed.