कोलटकरांच्या भिजकी वहीची नवी आवृत्ती

4
431

अरुण कोलटकर यांच्या ‘भिजकी वही’ या कवितासंग्रहाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन 20 डिसेंबर रोजी सायंकाळी मुंबईतील गोरेगाव येथील ‘केशव गोरे स्मारक ट्रस्ट’मध्ये रसिकांच्या गर्दीत झाले. ज्ञानपीठ सन्मानित भालचंद्र नेमाडे आणि ‘प्रास’चे जनक अशोक शहाणे हे दोघे प्रमुख पाहुणे होते. रेखा शहाणे आणि अंबरीश मिश्र यांचे नियोजन नेटके व प्रसंगाचे महत्त्व अधोरेखित करणारे होते.

अरुण कोलटकर यांच्या वयाला नोव्हेंबर 2022 मध्ये नव्वद वर्षे तर ‘प्रास’ला पंचेचाळीस वर्षे पूर्ण होत होती. या मुद्यावर शहाणे उभयतांत चर्चा झाली आणि त्यांनी ‘भिजकी वही’च्या ‘चौथ्या खेपे’च्या बाळंतपणाला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. रेखा यांच्या नेतृत्वाखाली एक टीम पुस्तक- निर्मितीच्या तर दुसरी समारंभ-नियोजनाच्या कामाला लागली. नियोजनाची जबाबदारी अंबरीश मिश्र यांनी स्वीकारली. ‘मुद्रा’चे सुजित पटवर्धन अनेक वर्षांपासून ‘प्रास’ची पुस्तके छापत आले आहेत. चौथ्या आवृत्तीचा घाट घालण्यात आला तेव्हाही ते आघाडीवर होते, पण त्यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर मुद्रणतज्ज आमोद भोईटे यांनी ती जबाबदारी खांद्यावर घेतली. भोईटे म्हणाले, की अशोक शहाणे आणि सुजित पटवर्धन यांच्यातील पन्नास वर्षाचा ऋणानुबंध लक्षात घेऊन आम्ही ही जबाबदारी चिकाटीने आणि श्रद्धापूर्वक पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे.

रेखा शहाणे यांनी समारंभात आरंभी ‘प्रास’च्या वाटचालीची माहिती दिली. आपण पुस्तक वाचतो पण ते ‘पाहायला’देखील शिकले पाहिजे असे त्या म्हणाल्या. ‘प्रास’च्या पुस्तकांचे आकार आणि त्यातील मजकुराची मांडणी वेगळी असते ती त्यामुळेच असे त्यांनी ठासून सांगितले. त्या म्हणाल्या, की आमच्या पुस्तकांचा आकार आम्ही ठरवत नाही तर तो पुस्तकातील मजकूर ठरवतो. एखादी ओळ लांबलचक का, एखादी ओळ एक-दोन शब्दांचीच का, एखाद्या ओळीखाली खूप मोठी स्पेस का हे सारे त्यांनी ‘वही’तील उदाहरणे देऊन स्पष्ट केले. त्या स्वतः एक उत्तम कवयित्री आहेत. शिवाय, त्या फुलपाखरांच्या निष्णात अभ्यासक आहेत. त्यामुळे त्या ले-आउटच्या आणि निर्मिती-मूल्यांच्या बाबतीत आग्रही आणि चोखंदळ असणार हे उघडच आहे. अशोक शहाणे हा तर त्यातील ‘बाप माणूस’. एखादा अनुस्वार कमी-जास्त झाला तरी नेमाडे यांच्यासारख्या माणसाला ते धारेवर धरत असत, म्हणे. हे खुद्द नेमाडे यांनी त्याच कार्यक्रमातील त्यांच्या भाषणात सांगितले !

‘प्रास’चे पुस्तक मुखपृष्ठापासून सुरू होते असे सांगून रेखा यांनी ‘भिजकी वही’च्या मुखपृष्ठाचे सौंदर्य आणि त्या मागील विचारधारा स्पष्ट करून सांगितली. पुस्तकाच्या स्पाईनवर असलेल्या त्या मुलीचा (नापाम गर्ल) डावा हात मुखपृष्ठावर तर उजवा हात मलपृष्ठावर अशा तऱ्हेने आला आहे, की या पुस्तकातील साऱ्या कविता (जणू जगातील साऱ्या स्त्रियांचे दुःख) ती आपल्या कवेत घेत आहे असे वाटावे ! त्यांनी टिपं, आय फरगिव्ह आणि शेवटचा अश्रू या कवितांतील काही भाग वाचून दाखवला. त्यांचा आणि कोलटकर यांचा अनेक वर्षांचा ऋणानुबंध. त्यामुळे त्यांच्या भाषणाला या नात्याची एक हळवी बाजूही होती. त्या एकदा आजारी असताना दस्तूरखुद्द कोलटकर यांनी बैठकीत ‘भिजकी वही’तील सर्व कविता त्यांना दोन बैठकांत वाचून दाखवल्या होत्या ! त्यामुळे रेखा यांच्या तोंडून कोलटकर यांच्या कविता ऐकताना खुद्द कोलटकरच त्या म्हणत आहेत असे समजावे असे वाटत होते.

रेखा म्हणाल्या, शहाणे त्यांचे प्रत्येक काम शिस्तीत आणि त्यांच्या स्वत:च्या मनाप्रमाणे करतात. त्यासाठी ते कमालीचे आग्रही असतात. घरात कपडे वाळत घालतानाही पंचा किंवा टॉवेल याची दोन्ही टोके एका ओळीत कशी राहतील याची काळजी ते घेत असतात. पोळ्या करतानाही त्यांच्या पोळीला चार पापुद्रे सुटलेले असतात. त्यांनी त्यांच्या भाषणात एक गोष्ट आवर्जून सांगितली, की आमचा हा सारा हौसेचा मामला असतो; ‘प्रास’च्या पैशावर शहाण्यांचे घर चालत नाही !

नेमाडे यांनी त्यांच्या भाषणात प्रारंभी त्यांच्या ‘देखणी’ या कविता संग्रहातील ‘कवी लोक’ ही कविता वाचून दाखवली. त्यांनी ती कविता कवी कसा उन्मुक्‍तपणे, निरंकुशपणे, निरूद्देशपणे लिहीत असतो (आणि कसा जगतही असतो) याची आठवण करून देण्यासाठी स्मरणरंजनाच्या पातळीवर वाचली असावी असे मला वाटले. कविता अशी:

कवी लोक

मधमाशांसारखे जमलो आम्ही मधमाशांसारखे उडवले गेलो
कामकरी हेल घालून मोहोळावर बसलो की धूर धडाधडा चूड गळालो
लोळचे लोळ जोहार करे तो आम्ही सहदाचे गोळे तटलो
उरलेलो पुन्हा एकत्र येत गेलो परस्पराच्या आक्रोशाकडे धावलो
दुसरीकडे पुन्हा बेवारस लटकलो उलटे आढ्यावर बळबळ
पुन्हापुन्हा फेकले गेलो मागे टाकत जुनं हिरीरीनं बांधत नवं पोळं
पोटातून नवं मेण उत्पादून षट्कोन रचत गेलो आतलच तर होतं सगळं
घोंघावत आलो चलबिचल निजलो जबरदस्ती पेलत बुळं प्रेम आंधळं
अदृश्य समाजाचं साकडं साभाळत उरात मधुर उषःकाल बाळगत लटकणं
एवढ्या मोठ्या व्यवस्थेत कुणाच्या नशिबी सुस्त नर कोणाच्या नशिबी मादी होणं?
पहिल्या सूर्यकिरणात सहस्त्रमखी गणगुणणं जीव पखावर घेऊन कणकण घेऊन येणं
रंजन की बोध कलावाद जीवनवाद दैशीविदेशी हिशेबी नव्हते कठलेच वाद
क्रांतीच्या थोरवीच्या पावत्या खोट्या होत्या. खरा होता तो फलाहारी माद
कोणत्या राणीमादीखातर हेही माहीत नव्हतं जैविक व्यवहारप्राप्त रोजचा जेहाद

नेमाडे यांनी कोलटकर यांच्या कवितेचे सौंदर्य, शब्दकळा, शैली या अनुषंगाने विवेचन केले. शब्द हे कोलटकर यांचे मोठे शस्त्र होते, ते शब्द त्यांच्याकडे कोठून येत असतील तर अर्थातच त्यांच्या अफाट वाचनातून असे त्यांनी सांगितले. नेमाडे आणि कोलटकर यांच्या प्रदीर्घ मैत्रीतील कोमल आणि कठोर अशा दोन्ही छटा त्यांच्या भाषणातून उमटल्या. नेमाडे यांनी कोलटकर यांनी इंग्रजीत केलेल्या लेखनाबद्दलची त्यांची नाराजी नेहमीच व्यक्‍त केली आहे, त्यांनी तिचा पुनरुच्चार या भाषणातही केला. “जेव्हा तुम्ही दोन भाषा वापरता तेव्हा तुमची स्वतःची भाषा परकी होते.” असे ते म्हणाले.

कोलटकर यांनी त्यांच्या द्विभाषिक कवित्वाविषयी जोरदार समर्थन करणारे लेखन केले आहे. ते त्यांच्या ‘बोटराईड’ या कवितासंग्रहात वाचण्यास मिळते. असे असताना आणि कोलटकर हयात नसताना त्यांच्या इंग्रजीतील लेखनाचा मुद्दा नेमाडे यांनी का काढला हे लक्षात आले नाही.

कोलटकर त्यांच्या शेवटच्या आजारात एकदा नेमाडे यांना भेटण्यास गेले होते. ती भेट लोकवाङ्मय गृहाच्या कार्यालयात होणार होती. नेमाडे यांनी ‘ती भेट म्हणजे आमची फक्त काही क्षणांची नजरानजर होती’ असे सांगितले. नेमाडे पुढे म्हणाले, “ती भेट त्याने कशासाठी घेतली ते मला कळलेच नाही, मीही आता असाच जाईन तेव्हा माझ्या लक्षात येईल.” तेव्हा मात्र संपूर्ण सभागृह गलबलून गेले. एकेक माणसे नाहीशी होत गेली आता आम्ही एक-दोघेच उरलो असे सांगत आपण कफल्लक असल्याच्या काळात अरुण आपल्याला भेटला याबाबत त्यांनी कृतज्ञतेची भावना व्यक्‍त केली. ते ‘अरुण आणि अशोक यांच्याकडून मी खूप काही शिकलो’ असे म्हणाले. अशोक तर शिवी दिल्याशिवाय माझ्याशी बोलतच नसायचा हेही सांगण्यास ते विसरले नाहीत.

कोलटकर वर्तमानकाळावर प्रेम करत असत, कारण भूतकाळापासून आपण खोटे शिकत असतो हे त्याने ओळखले होते आणि आम्ही त्यांच्याकडून हेच शिकलो असे नेमाडे म्हणाले.

त्यांनी ‘कोणत्या क्रौंचासाठी स्रवत आहेत हे अनष्ठुभ अश्रू’ या कोलटकर यांच्या ओळींची आठवण करून देत त्यांच्या प्रतिभेचा पल्ला किती विलक्षण होता याची जाणीव करून दिली ! एवढ्या मोठ्या कवीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला तेव्हा ते कैलासवासी झाले होते; हे आपले दुर्दैव होय ! अशी जाणीवही त्यांनी साऱ्यांना करून दिली.

अशोक शहाणे यांनी “मी गुन्हेगार आहे, मी पुस्तक काढून चुकलो आहे” असे त्यांच्या खास शैलीत नमूद केले. त्यांनी प्रेक्षकांवर जणू एक गुगलीच टाकली ! ज्ञानेश्‍वर तुकाराम यांनी त्यांचे काम झाल्यावर ‘आता आपल्याला येथे थांबायचे नाही’ असे म्हणून ते आपल्यातून निघून गेले. कवी आपले काम करून जातो पण वाचक पुढे त्याचे काय करतात हे समजून घेणे महत्त्वाचे असते. तो विचार करण्याची वेळ आली आहे असे शहाणे यांना सुचवायचे होते. त्यांनी कवी लिहून जातो, पण पुढे वाचकाची काही जबाबदारी आहे की नाही असा थेट प्रश्न उपस्थित केला. कवी कविता लिहितो, वाचक ती वाचतो पण त्याचे पुढे काय होते; याचा कोणीतरी व्यवस्थित अभ्यास करण्यास पाहिजे असे त्यांनी सुचवले. त्यांनी कवींना हाकलून लावण्याच्या मार्गाने आपण निघालो आहोत असेही एक विधान केले.

अशोक शहाणे यांची ओळख करून देताना अंबरीश मिश्र यांनी गालिबचा एक शेर म्हणून दाखवला होता. त्याचा अर्थ असा : ‘माझ्या हातात लगाम नाही, माझा पाय रिकिबीत नाही, माझ्या आयुष्याचा घोडा कसा कोठे जाईल ते मला माहीत नाही.’ त्यांनी गालिब यांनी हा शेर खास अशोक शहाणे यांच्यासाठीच लिहिला असावा अशी टिप्पणीही केली. त्यांनी नेमाडे यांची ओळख करून देताना Poets are unacknowledged legislators of the world या शेलीच्या वचनाची आठवण करून दिली होती. नेमाडे एकेकदा वरच्या पट्टीत बोलतात असा त्यांच्यावर आक्षेप आहे, असा संदर्भ देत भ्रष्ट आणि बेगुमान पुढाऱ्यांचे ऐकण्यापेक्षा नेमाड्यांचे ऐकणे केव्हाही चांगले नाही का असा रोकडा प्रश्नही त्यांनी विचारला आणि त्याला अर्थातच श्रोत्यांनी चांगली दाद दिली.

‘भिजकी वही’च्या कण्यावर (स्पाईन) व्हिएतनामवरील बॉम्बस्फोटात सापडलेल्या किम नावाच्या मुलीचे ते जगप्रसिद्ध छायाचित्र छापण्यात आले आहे. एखाद्या पुस्तकाचा स्पाइन हे त्याचे कव्हर व्हावे ही जगातील एकमेवाद्वितीय अशी घटना आहे. कोलटकर यांचे ते स्वप्न अखेर पूर्ण करू शकलो याचे समाधान शहाणे यांनी या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीत शेवटी एक टिप्पणी देऊन व्यक्‍त केले आहे ते म्हणतात : “आधीच्या दोन खेपांच्या नि या खेपेच्या ‘वही’त बदल काय तो फक्त दर्शनी आहे. मुळात मुखपृष्ठाबद्दलच्या नाना पर्यायांत निक यूटनं काढलेला किम फुकचा प्रख्यात फोटोपण होता. तो फोटो जायचा होता पुस्तकाच्या ‘स्पाईन’वर. बाकी प्रत्यक्ष मुखपृष्ठ जवळपास कोरंच — काळंकट्ट — राहणार होतं. पण असोसिएटेड प्रेसकडून परवानगी मिळण्याचे सोपस्कार वेळेवर उरकता येण्याजोगे नसल्यामुळे इजिप्तच्या चित्रलिपीतील रडणारा डोळा ‘लोगो’ बनून मुखपृष्ठावर आला होता. दरम्यान, परवानगीचे सगळे सोपस्कार पार पाडण्यात ‘न्यूयॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स’च्या क्लासिक माळकेचे संपादक फ्रँक एडविन आणि अरुण कोलटकर यांच्या कवितांची अमेरिकेतील अभ्यासक अंजली निर्लेकर यांचा हातभार मोलाचा आहे. एरवी किमचा फोटो इथं अजूनही अवतरला नसता. ‘स्पाईन’ हेच या पुस्तकाचं मुखपृष्ठ ही अरुणची कल्पना इतक्या वर्षांनी का होईना प्रत्यक्षात आली आहे.”

‘भिजकी वही’ची पहिली आवत्ती 2003 मध्ये, दुसरी 2006 मध्ये, तिसरी जानेवारी 2016 मध्ये आणि आता चौथी 2022 मध्ये प्रसिद्ध झाली. नव्या आवृत्तीची किंमत नऊशेसाठ रुपये इतकी आहे. प्रकाशनाच्या दिवशी ती प्रत आठशे रुपयांना मिळत होती. समारंभात तीस-पस्तीस प्रती विकल्या गेल्या. एखाद्या मराठी कवीच्या कवितासंग्रहाची किंमत सुमारे एक हजार रुपये आणि एखाद्या समारंभात त्यांच्या तीस-पस्तीस प्रती विकल्या जाणे हा काय प्रकार आहे यावर अभ्यास होणे गरजेचे आहे. ‘प्रास’ने प्रकाशित केलेल्या सगळ्या पुस्तकांचा संच विकत घेणारे सहा ते सात ग्राहकही तेथे निघाले.

या प्रकाशन सोहळ्यासाठी मुंबई-पुण्यातील बिनीचे रसिक तर उपस्थित होतेच, पण बाहेर प्रांतांतूनही काही लोक आले होते. सुमारे दोनशे माणसांचे ते सभागृह पूर्णपणे भरून गेल्यामुळे काही जणांना बाहेरही उभे राहवे लागले. कवी, लेखक चित्रकार, शिल्पकार, समीक्षक, नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते, मुद्रण-प्रकाशनाच्या क्षेत्रातील व्यक्‍तींची मांदियाळी जमली होती. शिवाय, सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या गटांतील अनेक सदस्यही उपस्थित होते. काही नावे अशी – अक्षय शिंपी, यशवंत देशमुख, कैलास वाघमारे, अरुण शेवते, नीरा आडारकर, आनंद करंदीकर, आनंद अवधानी, विद्याधर दाते, युवराज मोहिते, वंदना बोकील, दत्ता म्हेत्रे, दिलीप भेंडे, शशिकांत सावंत, अस्मिता मोहिते, नीरजा, येशू पाटील, मुकुंद कुळे, सरिता आव्हाड, विजया चोहान, अमरेंद्र धनेश्‍वर, अभिराम भडकमकर, विजय केंकरे, उमा नाबर, गणेश कनाते, प्रशांत दळवी, प्रतिमा जोशी, संजीव खांडेकर, उदय तानपाठक, शेखर आठल्ये, शलाका देशमुख, शेखर देशमुख, प्रताप आसबे, सुनील तांबे, सतीश तांबे… पण तेथे आलेला प्रत्येक माणूस कोलटकर यांच्याशी आणि त्यांच्या कवितेशी घट्टपणे जोडला गेलेला होता. उदाहरणार्थ, वरील यादीत दत्ता म्हेत्रे हे नाव ! या माणसाने कोलटकर यांच्या आणि ‘प्रास’च्या पुस्तकांच्या आर्टवर्कचे कामे नेहमीच अतिशय मेहनतीने आणि हुशारीने केली आहेत. ‘भिजकी वही’चे पहिले मुखपृष्ठ दक्षिण मुंबईत ज्यांच्या ऑफिसमध्ये तयार झाले ते दिलीप भेंडे हेही उपस्थित होते. ते कोलटकर यांच्या जगप्रसिद्ध ‘थर्सडे गॅदरिंग’चे सदस्य.

मान्यवरांचे सत्कार करताना त्यांना ‘झीझी’ची रोपे देण्यात आली. या झाडाचे वैशिष्ट्य असे, की ते चोवीस तास प्राणवायू देणारे झाड म्हणून ओळखले जाते (कवी मंडळींनी उत्तमोत्तम कविता लिहून आणि भूमिका घेऊन विकलांग झालेल्या समाजाला प्राणवायू द्यावा अशी अपेक्षा तर यामागे नसेल?).

प्रकाशित करण्याच्या प्रती वेताच्या टोपलीतून व्यासपीठावर आणल्या गेल्या. त्या टोपलीचा आकार पालखीसारखा होता आणि ती पालखी मल्लिगेच्या फुलांनी सुशोभित करण्यात आली होती (मल्लिगेची फुले केरळमधून विमानाने मुंबईत येतात).

सर्व मान्यवरांना बकुळीच्या फुलांचे वळेसर आणि दहिसरच्या विठ्ठल मंदिरातून आणलेला बुक्का वाटण्यात आला. कोलटकर यांच्या कविता, वारकरी संप्रदाय आणि बुक्का यांतील नाते रसिकांना वेगळ्याने उलगडून सांगण्याची गरज नाही.

अशोक शहाणे यांनी त्यांचे भाषण संपवून खुर्चीवर पुन्हा बैठक मारली तेव्हा आपोआपच त्यांचा हात खिशात गेला त्यातील ‘ती स्टीलची चकचकीत चपटी डबी’ बाहेर आलेली सर्वांना पाहण्यास मिळाली.

भालचंद्र नेमाडे यांची पत्नी प्रतिभा नेमाडे यादेखील समारंभाला उपस्थित होत्या. त्यांनाही उदाहरणार्थ ‘झीझी’चे रोप देऊन त्यांचाही सत्कार वगैरे करण्यात आला.

समारंभ संपल्यावर नेमाडे आणि शहाणे यांनी रसिकांना त्यांनी घेतलेल्या पुस्तकांवर त्यांच्या स्वाक्षऱ्या करून दिल्या. माझ्याकडील प्रतीवर मी शहाणे यांची सही घेतली तेव्हा आधी त्यांनी अंगठा दाखवत ‘अंगठा देऊ का’ असे विचारले आणि मी खुशीत, ‘अरे, मग तर दिवाळीच साजरी होईल’ असे म्हटले तेव्हा ते छान हसले… (अंगठ्याचा ठसा माणसाला हल्ली किती ‘आधार’ देऊ शकतो !)

मुळात सुमारे दीड तासासाठी नियोजित केलेला हा कार्यक्रम अडीच तास चालला. समारंभ संपल्यावरही रसिक बराच वेळ तेथे रेंगाळताना, गप्पागोष्टी करताना, पुस्तके विकत घेताना दिसले.

कार्यक्रम संपल्यावर घरी परतताना मी ‘भिजकी वही’ची ती नवी प्रत उत्साहाने चाळू लागलो. कव्हरवरचा काळाकुट्ट अंधार आणि बॉम्बस्फोटात भाजून निघालेली आठ वर्षांची कोवळी किम हे आजच्या जगण्याचे प्रतीक ठरले आहे, की काय असा विचार मनात आला. ‘ही वही कोरडी नकोस ठेवू’ असे कवीचे एक वाक्‍य मलपृष्ठावरील मजकुरात प्रारंभीच आहे. म्हणजे काय तर कोलटकर वाचकाला त्याच्या संवेदना जाग्या ठेवण्याचे, दुःखाशी जोडून घेण्याचे आवाहन करत आहेत. त्याचाच दुसरा अर्थ असा, की आपण सारे जणू काही एका बधिर कालखंडातून अतिशय कोरडेपणाने आणि एका आत्मकेंद्रित मनोवस्थेतून चाललो आहोत ! या कोरड्या, थंड अलिप्तपणाच्या बाहेर पडून, साऱ्यांना सोबत घेऊन सृष्टीनिर्माणच्या नव्या विश्वात्मक दिशेने पुढे गेले पाहिजे असे तर कवीला सांगायचे नाही? नव्याने सृष्टी निर्माण करण्यासाठी तो ‘शेवटचा अश्रू’च कामाला येणार आहे असे स्वतः कोलटकर यांनीच म्हणून ठेवले आहे. रसिक सारखे सारखे या कविता संग्रहाकडे का वळतात? त्याला लाभलेले महात्म्य कशात आहे याचे तर हे कारण नसेल?

समारंभाच्या ठिकाणी व्यासपीठावर कोलटकर यांचे कृष्णधवल रंगातील छायाचित्र लावलेले होते. कोणाच्याही नजरेला नजर न देता निर्विकारपणे शून्यात पाहणारे कोलटकर ! ते चित्र सारखे नजरेसमोर येऊ लागले. त्यांना हा समारंभ पाहून काय वाटले असते; मुळात कोलटकर-शहाणे-नेमाडे ही मंडळी उत्सवी स्वरूपाच्या कार्यक्रमांना नकार देणारी. ते सारे अखेर मळलेल्या वाटेवर आले की काय असा विचार मनात आला. भूतकाळ नाकारता नाकारता सारे पुन्हा भूतकाळात चालले आहेत, की काय? काळाचे चक्र फिरता फिरता परिस्थितीच्या अजब रेट्याने मध्येच थांबले आहे, की काय? असे विचार मनात येऊ लागले. अरुण कोलटकरही त्यांच्या अखेरच्या दिवसांत अशा समारंभांना निर्विकारपणे आणि सहिष्णू वृत्तीने जात असत हे मी पाहिले आहे… थोडक्यात काय तर कोलटकर कविता लिहून चुकले आहेत, शहाणे संग्रह काढून चुकले आहेत, वाचक कविता वाचून चुकले आहेत, किम होरपळून चुकली आहे. आपण सारेच चुकलो आहोत !

प्रल्हाद जाधव 9920077626 pralhadjadhav.one@gmail.com

————————————————————————————————————————————

About Post Author

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here