कोजागिरी पौर्णिमा मी इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या लोकांबरोबर साजरी केली आहे की बस ! कधी शेतात, कधी गच्चीवर, कधी नदीकाठी; तर कधी कोणाच्या अंगणात. या प्रत्येक पौर्णिमेची आठवण माझ्यासाठी खास आहे. मात्र या प्रत्येक पौर्णिमेचा अगदी ठरलेला मेन्यू म्हणजे आटीव मसालेदार गरम दूध, कच्चा चिवडा किंवा चुरमुरे/ फरसाण/ कांदा-कोथिंबीर घातलेली भेळ हाच असणार. त्या दिवशी त्या दूधाची आणि खाण्याची चव ही सामुदायिक आनंदाच्या गुणाकाराच्या पटीत असायची.
आमच्या घरी त्या दिवशी पहिल्या अपत्याला, म्हणजे मला ओवाळायचे, नवे कपडे घ्यायचे. काहीतरी गोडधोडाचे जेवण करायचे. त्या दिवशी आई आणि बाबा, दोघेही माझे खूपच लाड करत. अर्थातच कोजागिरी पौर्णिमेचा दिवस हा माझ्यासाठी माझ्या वाढदिवसापेक्षाही अधिक खास असतो. कोजागिरीच्या दिवशी मोठ्या अपत्याला नवे कपडे घ्यायचे आणि ओवाळायचे ही प्रथा अनेक मराठी घरांमध्ये असते. माझ्या आजीकडे हिंगणघाटला, त्या दिवशी पांढऱ्या चक्रीच्या कळ्यांनी आणि फिकट गुलाबी फुलांच्या माळांनी शंकर आणि पार्वती यांची पूजा बांधायचे. देवाला पाच तरी पांढऱ्या रंगाच्या पदार्थांचा नैवेद्य असायचा. दहीभात, खोबरे-साखर, बत्तासे, मलई पेढे, पांढऱ्या कचोऱ्या, नारळाच्या पांढऱ्या शुभ्र करंज्या असे पदार्थ असत. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मसाल्याचे आटीव दूध प्यायची आणि जागरण करायची पद्धत तर भारतात सर्व ठिकाणी आहे.

कोजागिरीच्या या दिवसांत पावसाळी पीक तयार झालेले असते. भरघोस पिकाचा आनंद शेतकऱ्यांनाच विचारावा ! कामाची धांदल असते आणि मनही तृप्त असते. नवरात्र ते कोजागिरीचा हा काळ सुगीचा हंगाम साजरा करण्याचा असतो. त्यात थोडासा थंडीचा शिडकावा असणारा, शरद ऋतू म्हणजे सर्वांसाठी उत्साहाची पर्वणीच ! हा काळ रब्बी हंगामासाठी बियाणे निवडून तयार करण्याचा असतो. घरोघरी, दिवसभर शेतातली कामे करतात आणि रात्रीच्या चंद्रप्रकाशात पुढल्या हंगामासाठी सकस बियाणे निवडत, गेल्या हंगामाबद्दल चर्चा करत पुढील हंगामाची स्वप्ने पाहिली जातात.
मराठवाडा आणि विदर्भातील काही खेडेगावांत मातीच्या शिड्या करून त्या शिड्यांवर या दिवसांत पणत्या लावतात. तेथे कोजागिरीला ‘माडी पौर्णिमा’ असेही म्हणतात. त्या पणत्या अगदी दिवाळीपर्यंत लावतात. शिड्यांसमोर पाट ठेवून त्यावर रांगोळीने ‘कार्तिक मास’ काढतात. त्यात सूर्य, चंद्र, रथ, चक्र, शंख, गदा, त्रिशूल, शिव-पार्वती, गरूड, नागोबा, मासा, कासव, गोपद्म वृक्ष, कमळ आणि अमृतकुंभही काढलेला असतो. त्यावर हळद-कुंकू वाहतात. कार्तिक मास काढल्यामुळे घरातील अदृष्ट टळते अशी समजूत आहे.
आंध्र किनारपट्टीच्या भागात कोजागरी पौर्णिमेला ‘नवान्न पौर्णिमा’ म्हणतात. त्या दिवशी तेथे लक्ष्मी-नारायणाची आणि इंद्राची पूजा करतात. सर्व पदार्थ नवधान्याचेच असतात. विशेषतः कोवळ्या भाताची, गव्हाची किंवा बाजरीची खीर करतात.
झारखंडमधील आदिवासी भागातही दसऱ्यापासून कोजागिरीपर्यंत नवधान्याची तोरणे घरांवर बांधतात आणि तुळशीसमोर दिवा लावतात. स्वर्गातील, विशेषतः इंद्रलोकातील देव या दिवसांत नवधान्ये चांगली पक्व होण्यासाठी आकाशातून मोत्यांची पखरण करतात अशी समजूत आहे. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेला, ‘मोत्याची पौर्णिमा’ असेही म्हणतात. विदर्भ आणि मध्यप्रदेशातील काही आदिवासी भागात यालाच ‘माळी पौर्णिमा’ असेही म्हणतात.
माझ्या कॉलेजच्या दिवसांतच माझा भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतातील विद्यार्थ्यांशी संपर्क आला. एकच सण वेगवेगळ्या ठिकाणी कसा साजरा केला जातो याविषयी कुतूहल निर्माण झाले. वृंदावन आणि राजस्थानात चंदेरी खडीच्या निळ्या चुनऱ्या लेवून तरुणी आणि गुलाबी फेटे घातलेले तरुण ठिकठिकाणी फेर धरतात. प्रेमिकांना ही पर्वणीच असते. दसऱ्यापासून कोजागिरीपर्यंत, मध्यप्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातील आदिवासी पाड्यात घरोघरी अंगणात शंकर आणि पार्वती यांच्या मूर्ती ठेवून त्यांच्यासाठी ऊसाची, धानाची किंवा ज्वारीच्या धाट्याची मंडपी तयार करतात. त्या मंडपीत मऊ गवताची बिछायत घातलेली असते. गवताची उशी, लोड, तक्के केलेले असतात, काही घरी झुलाही बनवलेला असतो. त्यामध्ये शंकर-पार्वती, गणपती, कार्तिकेय, नंदी असा सर्व परिवार बसवलेला असतो. प्रत्येक घरी शंकर-पार्वती वस्तीला येतील या समजुतीने त्यांच्यासाठी मंडपीसमोर दूध आणि पाणी ठेवलेले असते. त्यावेळी रानभर पिवळी, लाल, केशरी आणि जांभळी फुले फुललेली असतात. त्या फुलांच्या माळांनी रोज त्या मंडपी सजवतात. रोज संध्याकाळी त्या मंडपीवर छोट्या छोट्या पणत्याही मांडलेल्या असतात. त्या पणत्यांना ‘दिवणाल’ असे म्हणतात. दसऱ्यापासून पौर्णिमेपर्यंत रोजच सूर्योदयाच्या वेळी त्या दिवणाल ताज्या ताज्या बनवतात. दिवसभर वाळवून रात्री त्यात दिवे लावून आरास करतात. दिवणालीत करंजीचे तेल घालतात. ते तेल वर्षभर साठवलेले असते. अगदी 2000 साली सुद्धा तेथील कितीतरी पाड्यांत वीज आलेली नव्हती. त्यावेळी माळी, मंडपी आणि त्यावरच्या दिव्यांची आरास प्रत्येक घरात सजलेली दिसायची. सगळा परिसर गूढरम्य दिसायचा. आता मात्र पाड्यांवर वीज पोचली आहे. मंडपींवर दिवणालाऐवजी चायनीज छोट्या लाईटच्या माळा सोडतात. अजूनही रोज संध्याकाळी घरातील आणि शेजारपाजारची सर्वजण मिळून वस्तीतील प्रत्येक घराच्या मंडपीसमोर बसून गाणी गातात आणि फेर धरतात. ही गाणी साधारण आपल्याकडच्या भुलाबाईच्या गाण्यासारखीच असतात. पण त्यामध्ये स्त्री, पुरुष, मुले-बाळे सगळी सामील होतात.
मंडपीचा रोजचा नैवेद्य म्हणजे रोट्या आणि भाजी असा असतो. ही भाजी मुख्यतः पालेभाजी किंवा कंदभाजी असते. ही भाजी पाचही दिवस वेगळ्या ठिकाणांवरून गोळा करून आणतात. ही भाजी अंगणात उगवलेली, शेतातली, ओढ्याकाठची, नदीकाठची आणि रानातील अशी ठिकठिकाणची असते. कधी भाजीची फुले आणि शेंगा असेही आणतात. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी, आपापल्या घरच्या मंडपी घेऊन सर्व लहानथोर जवळपास असलेल्या नदीकाठच्या देवळात जमतात. तिथे सगळेजण मिळून स्वयंपाक करतात. स्वयंपाक म्हणजे भात, आमट, बरा म्हणजे डाळीचे वडे, मक्याच्या रोट्या, गोड पदार्थ म्हणजे नव्या धानाची खीर करतात. ती खीर एका पसरट मातीच्या भांड्यात ठेवतात. रात्री ११ ते १२ च्या दरम्यान पौर्णिमेच्या चंद्राचे अमृतकण त्यामध्ये पडतात आणि मग प्रत्येकाला द्रोणामधून ती खीर वाटली जाते. बायका आणि मुली रानफुलांच्या माळांनी सजलेल्या असतात. लहान मुले गणपती आणि कार्तिकेय यांच्या रुपात असतात. एखादे नवसाचे मूल नंदीसारखेही सजवलेले असते. मोठी बारा-तेरा वर्षांची मुले भूतगण बनतात. सगळीकडे नुसती धमाल असते.
वस्तीचा मुखिया सर्वप्रथम शंकर-पार्वतीसमोर त्या वर्षीच्या पाऊसपाणी आणि शेतातल्या पिकांबद्दल निवेदन करतो. त्या वर्षभरात समाजात घडलेल्या चांगल्यावाईट गोष्टी देवाला सांगितल्या जातात. त्यानंतर जमलेल्या स्त्रिया आणि पुरूष यांच्या गटांमध्ये एकमेकांवर कुरघोडी करत गाणी म्हटली जातात. ही गाणी खूपच गंमतीदार असतात, त्यामध्ये शंकर-पार्वतीच्या भांडणाच्या आणि रुसण्याच्या आणि चंद्र, गंगा, गणपती आणि कार्तिकेय यांच्या खोड्यांच्या अशा कथा असतात. त्यातली एक कथा तर मला फारच आवडली.
शंकरदेव, कैलासात राहणारा, सतत तपश्चर्येत दंग. आपले पोट भरण्यासाठी तो कोणत्याही चवीचे, काहीही दिले, तरी कटकट न करता खात असे. देवी पार्वती म्हणजे हिमालयाची राजकन्या, तिला चवीढवीचे खाण्याची आवड. पण राजकन्या असल्याने तिला काही फारसा स्वयंपाक यायचा नाही. कैलासातले रहिवासी म्हणजे गणेश, कार्तिकेय आणि भूतगण; सगळेच खाणारे जबरे. त्यामुळे पार्वती आपली दहीभात, रोट्या, भाजी किंवा लचका यापैकी एखादाच पदार्थ, पण भरपूर प्रमाणात करे. शंकराला एकदा कुठेतरी पुरणपोळ्यांचा नैवेद्य खायला मिळाला. झाले ! त्याने आणि नंदीने कैलासावर त्या पोळ्यांचे असे काही रसभरीत वर्णन केले की गणेशबाळ आणि कार्तिकेय तर नाचायलाच लागले. मग पार्वतीने नंदीला पुरणपोळीची कृती विचारायला पिटाळले. त्याने धांदरटपणाने अर्धवट ऐकून काहीतरी सांगितले. मग पार्वतीने मोठ्या पातेल्यात डाळ शिजवायला ठेवली, त्यात साखर घालून पुरण शिजवले. त्यात त्या पोरांनी येताजाता भरपूर सुका मेवा ओतला. त्यामुळे पोळ्या काही जमेनात. गणेश तर रडायलाच लागला. मग कार्तिकेयाने युक्ती करून पुरण कणकेत भरून ते गोळे तळायला सांगितले. तेव्हापासूनच म्हणे गणपतीला मोदक आवडायला लागले. ते तळलेले मोदक सगळ्यांनी खाल्ले, खरे. पण शंकर नंदीला म्हणाले…, ‘पुरणपोळी नाही जमली तुमच्या मातेला. शेवटी मोदक खायला घातला… ‘यावर सगळे हसू लागले. पार्वतीला राग आला. दुसऱ्या दिवशी तिने पुन्हा पुरणाचा घाट घातला, पोरांना सक्त ताकीद दिली की तिथे फिरकायचे नाही ! पहिली पोळी नंदीला खायला घातली, नंदी बिचारा काहीच बोलला नाही. गणपती, कार्तिकेय आणि भूतगण तर काय काहीही खायचे. त्यांना सगळेच आवडायचे. पण शंकराने मात्र पार्वतीची खूप चेष्टा केली. पार्वतीला पहिल्यांदा राग आला पण नंतर तिला वाईट वाटले. खरे तर, तिचे पदार्थ साधे असले तरी रूचकर असायचे. तिने स्वतःच्या अन्नपूर्णा रुपात प्रगट व्हावे यासाठी दसऱ्यापासून पाच दिवस शिवाची आराधना केली आणि कोजागिरीला ती काशीक्षेत्रात अन्नपूर्णेच्या रुपात प्रगट झाली. आता ती केवळ दृष्टीने पदार्थातील मर्म जाणू लागली आणि तिच्यासारखा उत्तम रांधणारा त्रिखंडात कोणी उरला नाही. एवढेच कशाला चांगले रांधता यावे, यासाठी लोक तिची प्रार्थनाही करू लागले.
नदीकाठी लोक अशा प्रकारच्या अनेक गंमतशीर कथा मंडपीभोवती सांगतात. देवांचे मनुष्यरूप कल्पून गाणी गातात. शेवटी सर्वजण फेर धरून नाचतात. शंकर-पार्वतीची मनोभावे पूजा करून, वर्षभर खाण्याची ददात पडू नये असे आशीर्वाद मागितले जातात. दुसर्या दिवशी सर्व मंडपी तिथेच धावड्याच्या किंवा मोहाच्या झाडाखाली ठेवून परत घरी जातात. तिसऱ्या दिवशी पुन्हा तिथे रोटी आणि भाजीचा नैवेद्य घेऊन जातात आणि आपापल्या मंडपी आणि एखादी दिवणाल घरच्या अंगणात ठेवण्यासाठी घेऊन येतात. असे म्हणतात की त्या मंडपीत शंकर-पार्वती पाखरांच्या रूपात येऊन भाजीपाल्याचे बियाणे ठेवतात. त्यामुळे पावसाळ्यात जेव्हा धान्याचा साठा संपत आलेला असतो आणि धुवांधार पावसामुळे बाहेर जायची सोय नसते, त्यावेळी अंगण भरून रानभाज्या उगवतात. तेव्हा भूकेची आणि आजारपणाच्या वेळी औषधांचीही तरतूद झालेली असते.
जगातल्या सर्वच आदिम संस्कृतींमध्ये तिन्ही ऋतूंच्या नानाविध विभ्रमांचे उत्सव साजरे होतात. त्यामध्ये नवधान्यांचे स्वागत केले जाते आणि निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. असा हा कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव; आनंदाचा तर आहेच..निसर्गापुढे नतमस्तक होणारा… मनातली जळमटे झटकणारा… आणि कृतज्ञतेची शिकवण देणाराही आहे.
– मंजूषा देशपांडे 9158990530 dmanjusha65@gmail.com
—————————————————————————————-
वा खूपच छान. सकाळ खूप छान गेली हे वाचून
धन्यवाद 🙏☺️
मंजुषा, लेख खूपच सुरेख आणि नवनवीन माहिती आणि वेगवेगळया रीतीभाती यांचा सप्तरंगी सांस्कृतिक गोफ !
हा लेख वाचून मला पुन्हा विदर्भ आणि आसपासची कोजागिरी पौर्णिमा आठवली. भुलाबाई, शिड्या करून दिवे लावणे, कार्तिक मासाची पूजा, अंगणात रोज थोडे शेण ठेऊन दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी त्याचा महिषासुर करून गायीच्या पावलाने मर्दन करणे इत्यादी…
छान लेख. हिंगणगावच्या आठवणी निघाल्या.
रंजक आणि माहितीपूर्ण झाला आहे लेख. झाबुआमधली मंडपी पहायला जायलाच हवे अशी उत्सुकता वाटली.
पार्वतीच्या स्वैपाक कौशल्याची कथा गमतीशीर.
मोत्यांची पौर्णिमा फारच छान. रंजक आणि माहितीपूर्ण. सांस्कृतिक ठेवाच.