ऐसे उगार माझे गाव ! (Ugar – My town)

2
2127

उगार खुर्द हे भूतपूर्व सांगली संस्थानातील छोटेसे खेडेगाव. गाव स्वतंत्र भारतात गेल्या पाऊणशे वर्षांत पूर्ण पालटून गेले आहे. त्या गावची लोकसंख्या सहाशे-सातशे 1938-39 साली होती. मूलत: दक्षिणवाहिनी असणारी कृष्णा नदी उगारजवळ उत्तर वाहिनी होते. अशा वळणाला तीर्थक्षेत्र मानले जाते. त्यामुळे नदीला प्रशस्त दगडी घाट वरपासून खाली, अगदी पात्राच्या मध्यभागापर्यंत आहे. शंभर वर्षे झाली तरी त्या घाटाचे बांधकाम अभंग आहे. घाटाच्या वरील भागात महादेवाचे मोठे मंदिर आहे. लक्ष्मीचे मंदिर वर गावात आहे. त्याच्याभोवती गुरुवारी आठवडी बाजार भरतो. गाव हे पूर्वी तेवढेच होते. नंतर मात्र गावाचा पूर्ण कायापालट होऊन, ते सर्व सोयींनी युक्त सुंदर, स्वच्छ असे शहर बनले आहे. लोकसंख्या वीस हजारांवर पोचली आहे. कारण तेथे स्थापन झालेला साखर कारखाना ! उगार खुर्द गाव कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्याच्या अथणी तालुक्यात उत्तर भागात आहे. तेथून जवळच महाराष्ट्राची सरहद्द लागते. उगार खुर्दला भाषिक सलगतेच्या तत्त्वावर सीमेलगतचे गाव म्हणून राज्य सरकारने भाषिक सवलती दिल्या आहेत.

उगार शुगर वर्क्सचा स्थापना दिन 11 सप्टेंबर 1939 हा होय. त्या कारखान्यामुळे हजारोंना रोजगार मिळाला. त्या काळी सबंध कर्नाटक राज्यात ‘उगार साखर कारखाना’ एकमेव होता. सांगलीचे राजेसाहेब चिंतामणराव पटवर्धन यांनी उगारला साखर कारखाना काढण्याचे ठरवून, कोल्हापूरचे साखरधंद्यातील मुरब्बी उद्योजक एस.आर. शिरगावकर यांना पाचारण केले. त्यांनी कारखान्याची जागा, ऊसशेतीच्या जमिनी, कृष्णा नदीच्या पाण्याची उपलब्धता या गोष्टींचा अभ्यास करून कारखान्याची जबाबदारी घेतली. त्यांनी त्यांचे पुतणे विनायक सीताराम शिरगावकर या पदवीधर तरुणास त्या कामी मदतीस आणले. ते 15 एप्रिल 1907 रोजी जन्मलेले बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचे विज्ञान शाखेचे पदवीधर होते. विनायकरावांच्या पत्नी दुर्गा यांनी त्यांच्या कामात सक्रिय सहकार्य केले. त्यांचे धाकटे बंधू सुरेश एस. शिरगावकर हेही उगारला 1954 साली आले. त्यांना सर्वजण बाबुकाका या नावाने ओळखत. ते कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर होते. बाबुकाका विज्ञान शाखेचे पदवीधर व निसर्गप्रेमी प्रगतिशील शेतकरी होते. कोणासही भेटण्यासाठी त्यांचे मुक्तद्वार असे. ते व त्यांच्या पत्नी तारा ही दोघे बाहेरून आली, पण उगार खुर्द गावाची शान ठरली. बाबुकाका नंतर कंपनीच्या चेअरमनपदी काम पाहत होते. जी.एम. आणि बाबुकाका यांच्या कारकिर्दीतच राजाभाऊ शिरगावकर (कंपनी मॅनेजिंग डायरेक्टर), प्रफुल्ल शिरगावकर (कंपनी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर), शिशिर शिरगावकर यांनी उगार वर्क्समध्ये प्रवेश केला.

कृष्णा नदीचे पाणी उन्हाळ्यात कमी होऊन ऊस पिकाला फटका बसू लागला. ती अडचण विचारात घेऊन कंपनीने 1968 मध्ये नदीवर चारशेचौऱ्याहत्तर फूट लांबी, त्र्याहत्तर फूट उंची, तेहतीस फूट तळाची जाडी, बारा फूट वरील जाडी आणि पाचशेऐंशी टीएमसी फूट पाणीसाठ्याची मर्यादा असे धरण फक्त शंभर दिवसांत बांधले. ऊसाची मळी वाया जाते म्हणून कंपनीने मोलॅसिसपासून अल्कोहोल तयार करण्याच्या दृष्टीने 1983 मध्ये डिस्टिलरीसाठी उत्तुंग इमारत बांधली. बर्गेसद्वारे वीजनिर्मिती करणारा उगार शुगर हा भारतातील पहिला कारखाना होय. खुद्द कारखानाच बर्गेसपासून मिळणारी वाफ व वीज या शक्तीवर चालतो.

कारखान्यामुळे रोजगारासाठी सर्व जातिधर्मांचे हजारो लोक बाहेरून व जवळच्या स्थानिक ठिकाणांहून आले आणि उगारच्या प्रेमात पडून तेथीलच झाले ! माझे बाबा सुरुवातीला इलेक्ट्रिशीयन म्हणून नोकरीला होते. ते फॅक्टरीत रात्रीचेसुद्धा काही यंत्र वगैरे बंद पडले तरी धावतपळत दुरुस्तीला जात, दोन-दोन शिफ्टमध्ये काम करत. कंपनीने कामगारांसाठी सुंदर अशी घरे बांधली होती. आम्ही पाच भावंडे तेथील ‘न्यू कॉलनी’त जन्मलो. आम्ही लहानाचे मोठे ‘न्यू कॉलनी’त झालो. फळाफुलांची झाडे प्रत्येकाच्या अंगणात होती- आंबा, चिकू, संत्री, पेरू, जांभळे, सीताफळ अशी सर्व फळे अंगणातच मिळत. आम्हाला विकतचे चॉकलेट खाण्याची गरज कधी भासली नाही. आम्हाला शेण आणून अंगणात सडा मारणे, झाडांना पाणी घालणे असली कामे आवडत. अंगणातील फुलांचे गुच्छ बनवून, त्यात दोन पाने खोवून ग्लासमध्ये तयार केलेला फ्लॉवरपॉट… टेबलवर ठेवलेल्या रूम फ्रेशनरपेक्षा सुंदर वास घरात दरवळत असे. आमच्या लांब वेणीत बागेतील मोगऱ्याचा गजरा रोज असे.

आम्ही मैदानी खेळ खेळलो. प्रत्येक घरात तीनचार भावंडे असल्याने खेळासाठी मोठी टीम होई. कब्बडी, खोखो, लपंडाव खेळताना तर मजा येई. कारण झाडावर चढून लपणे, खेळून भूक लागल्यावर झाडावरून स्लॅबवर बसून तेथे भाकरी-भाजी खाणे किंवा ऊसाच्या सीझनमध्ये शाळेहून येताना ऊसाचे दोन भाले आणावे, सगळे बसून ऊस खाण्याची शर्यत लावावी असे खेळ चालत. हाताच्या कोपरातून रस ओघळत असे, त्याची पर्वा कधी केली नाही. नागपंचमीला सगळ्यांच्या दारात झोपाळा व बग्गी असे. बग्गी म्हणजे छोटा जाड बांबू जमिनीत रोवायचे. दुसरा बांबू मध्यभागी छिद्र पाडून आडवा बांधायचा. दोन टोकांना सायकलचे टायर बांधायचे. त्यात बसून गोल गोल फिरायचे. खूप मजा यायची ! सभोवती जागा भरपूर असल्याने शाळेला सुट्टी पडली, की आपापल्या बाबांची मोठी जेण्टस सायकल दहादा पडून शिकणारच.

कारखान्याचे भोंगे हे आमच्या सवयीचे. त्यांच्या आवाजावर जीवन चाले. त्यामुळे घड्याळाची जरुरी भासली नाही. आमच्या सवयी पत्रे घेऊन येणाऱ्या पोस्टमन‘काकां’ची वाट पाहणे, नातेवाईकांना पत्रे लिहिणे, रात्री अंगणात उभे राहून चांदणे मोजणे, एकमेकांना गोष्टी सांगणे आणि लवकर उठणे-लवकर झोपणे अशा होत्या.

कंपनीने स्टेशन रोडला कॉलनीजवळ सुंदर, प्रशस्त असे पांढरेशुभ्र विठ्ठल मंदिर बांधले आहे. विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीसोबत दोन्ही बाजूंना श्रीराम-गोपालकृष्ण, समोर प्रशस्त सभामंडप, प्रवेशद्वारात गरुडाच्या मूर्ती, सभोवती आंब्याची झाडे, अतिशय स्वच्छता… त्यामुळे विठ्ठल मंदिर हे उगारचे आकर्षण बनून गेले आहे. कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य परम पूज्य चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामी यांचे गावी आगमन 1980 साली झाले. त्यावेळी त्यांनी त्या मंदिराला भेट देऊन मंदिराच्या आवारात छोट्याशा झोपडीत थोडा वेळ आराम केला होता. कंपनीने त्या भेटीच्या स्मरणार्थ त्या जागी एक छोटेसे मंदिर बांधून स्वामींचे तैलचित्र लावले आहे. गावात लक्ष्मीचे मोठे मंदिर आहे. तेथे दरवर्षी मे महिन्यात यात्रा भरते. जत्रेमध्ये बैलांचा बाजार भरतो. त्याखेरीज जादूचे खेळ, सर्कस, पायानेच सर्व काही करणाऱ्या मुलीचे खेळ पाहणे, मौत का कुवाँ, ताबडतोब फोटो काढून देणारे स्टॉल्स, भांड्यांच्या खेळांची दुकाने… आम्हा मुलांना त्या सर्व गोष्टींचे अप्रूप होते. जत्रा पाच-सहा दिवस चाले. आता, लग्ने झाली तरी सर्व माहेरवाशिणी जत्रेला येतात. त्याचे कारण त्यामुळे एकमेकींची भेट होते, ख्यालीखुशाली कळते, लहानपणच्या आठवणींनी नॉस्टॅल्जियात रमणे होते.

आमची शाळा मराठी माध्यमाची होती. मात्र तेथील शिक्षण इंग्लिश मीडियम शाळांना लाजवेल असे होते. उगारचे समाजसेवक, पत्रकार प्रभाकर हरि खाडिलकर यांनी प्रथम छोटी शाळा काढली. विद्यार्थिसंख्या वाढू लागल्याने कंपनीने शाळेसाठी प्रशस्त अशा तीन-चार इमारती बांधल्या. आमच्या वेळी तेथे दहावीपर्यंत शिक्षण होते. उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागे. म्हणून कंपनीने नंतर कॉलेज ‘आय टी आय’, आर्ट्स-कॉमर्स विद्याशाखा अशा सर्व सुविधांसह स्थापन केले. शाळेचे नाव आहे श्री हरि विद्यालय. रामतीर्थकर हे शिक्षक, मुख्याध्यापक म्हणून शाळेत 1950 साली नियुक्त झाले होते. नंतर त्यांना राष्ट्रपती पदक प्राप्त झाले. तेथील शिक्षण, शिस्त, शिक्षक… सर्वच अविस्मरणीय आहे. शाळेला मोठे ग्राउंड होते. त्यामुळे भरपूर खेळ होते. मुलींनासुद्धा फूटबॉल, हॉकी, कब्बडी खेळण्यास शिकवत. पी.टी. परीक्षेला महत्त्व असे.

गावात ब्राह्मण लोक जास्त असल्याने बाबांचे मित्र व माझ्या मैत्रिणी ब्राह्मणच ! त्यामुळे माझ्या-बाबांच्या सवयीसुद्धा तशाच. सर्व शुद्ध मराठी बोलणारी माणसे. त्यामुळे आम्ही मुस्लिम आहोत हे ओळखता येत नसे. सर्वजण मिळून-मिसळून राहत असत. बाबा कंपनीच्या लायब्ररीतून खूप सारी पुस्तके आणून देत. त्या काळी मी ‘मृत्युंजय’, ‘बाजीराव पेशवे’, ‘मी गोडसे बोलतोय’, ‘हिटलर’, ‘स्वामी’, ‘तीन मुले’ अशी बरीच पुस्तके वाचली आहेत.

कंपनीचे जी.एम. शिरगावकर यांनी ‘उगार शुगर जिमखाना’ 1940 मध्ये स्थापन केला. त्यामुळे उगारवासियांचे मनोरंजन, बौद्धिक भूक भागवणारी उत्तम संस्था विकसित झाली. कामगारांना क्रिकेटचे कीट आणून दिले. ‘विहार’ ही भव्य वास्तू बांधण्यात आली. तेथे गणेशोत्सवात भरपूर कार्यक्रम होत. मोठमोठ्या नामांकित कलाकारांची नाटके, प्रसिद्ध गायकांचे गायन, वक्त्यांची व्याख्याने अशी मेजवानी असे. आमच्या उगार खुर्द गावात इंदिरा गांधी-राजीव गांधी, मोरारजी देसाई आले असताना मी त्यांना जवळून पाहिले आहे. कामगारांच्या कल्याणासाठी मोठी सोसायटी बांधली आहे. तेथे माफक व्याजात कर्जसुविधा उपलब्ध आहे. तसेच, योग्य दरात (किंवा उधारीवरसुद्धा) कपडे, धान्य, भांडी, औषधे, बेकरी, रेशन असे सर्व काही मिळते.

गावाच्या मध्यभागी, शाळेसमोर सुंदर असा बगीचा आहे. त्याच बागेत उगार महिला मंडळासाठी कंपनीतर्फे इमारत बांधण्यात आली आहे. तेथे महिला मंडळातर्फे नर्सरी, बालमंदिर चालवण्यात येते. दुर्गा शिरगावकर यांनी त्या महिला मंडळाची स्थापना केली. त्यांच्या नंतर बाबुकाकांच्या पत्नी ताराकाकी या मंडळाच्या अध्यक्ष होत्या. त्यांच्यानंतर त्यांच्या सुना-स्मिता व मीना यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळला. मंडळात महिलांसाठी विविध करमणुकीचे कार्यक्रम होत. त्यात भजन-कीर्तनही असे. मी दहावी 1985 साली उत्तीर्ण झाल्यावर तेथेच लघुउद्योगाचे प्रशिक्षण घेतले. कामगारांच्या आरोग्यसुविधेसाठी सर्व सोयींनी युक्त असे आरोग्यमंदिर (दवाखाना) बांधण्यात आले आहे. ‘उगार शुगर वार्ता’ हे मासिक गावातील सर्व घडामोडींच्या माहितीसाठी निघते.

फड्या निवडुंगात लपलेले हे छोटेसे गाव खूप विस्तारले आहे. आरंभी फक्त मीटरगेज ट्रेन हे वाहतुकीचे माध्यम होते. आता ब्रॉडगेज लाइन टाकण्यात आली आहे. अर्ध्या अर्ध्या तासाला ट्रेन, एस टी बसेस, रिक्षा, भरपूर वडाप गाड्या अशा वाहनांनी गाव गजबजले आहे. झेंडा चाळ, न्यू कॉलनी, हौसिंग सोसायटी, एक्स क्वार्टर्स, विनायक स्मृती या नावांच्या तीन मजली इमारतींची कॉम्प्लेक्स बांधली आहेत. तसेच, रेल्वे लाइनच्या पलीकडे मंगसुळी मार्गावर माळरान पडिक जमीन ओलिताखाली आणण्याच्या दृष्टीने कृष्णा नदीपासून मंगसुळीपर्यंत पाइपलाइन टाकण्यात आली आहे. त्यासाठी ‘उगार नीरावरी सहकारी संघ’ स्थापन करण्यात आला. कर्नाटकमधील ती एकमेव मोठी इरिगेशन स्कीम आहे. त्या स्कीमचा फायदा स्थानिक लोकांना खूप झाला.

कृष्णाकाठच्या महादेव मंदिरात संन्यास दीक्षा घेतलेले श्रीयती महाराज म्हणत, उगारचा पहिला अर्थ- उस गाळत राहा आणि दुसरा अर्थ- उपनिषदे गात राहा. पहिला अर्थ शिरगावकरांनी सार्थ केला आहे तर दुसरा श्रीयती महाराजांनी स्वत: तडीस नेला आहे. गावाच्या व कारखान्याच्या दैदिप्यमान वाटचालीत समस्त शिरगावकर बंधूंचे स्थान मोलाचे आहे. त्यांच्या कार्यात त्यांच्या पत्नींचाही मोठा सहभाग आहे. गावचे लोक कारखाना आपला व त्यांना मालक आपले समजत. सर्व जातिधर्माची माणसे रिटायर्ड झाल्यावर सुद्धा तेथेच घर बांधून राहत आहेत !

माझ्या मनातील उगार गावाचे वर्णन उगारचेच असलेले गावकरी राजा मंगसुळीकर यांनी कवितारूपात सुंदर केले आहे.

ऊस उभा हा उंच शिवारी, डोई खोवूनी तुरा
हिरवा शालू नेसून सजली अवघी येथील धरा
संथ वाहते कृष्णामाई – फुलवित सारे जीव
ऐसे उगार माझे गाव ||धृ||

कृष्णातीरी प्रशस्त सुंदर – महादेवाचे मंदिर
योगीवर ते येऊन गेले – पावन झाला ओंकार
आणि तीरावर मठी शोभते – कलावती माता
बालोपासना नित्य चालते – संस्कारे फुलता
राघवेंद्र गुरू त्यांचाही मठ – थोडासा दूर
आराधनेचा होता उत्सव – नामाचा गजर
तुंगातीरी असे समाधी – मंत्रालय नाव
ऐसे उगार माझे गाव ||1||

मशीदीतून पहाटेस ती – येईल मोठी बांग
साखर झोपेमधूनी येईल – अवघ्या गावा जाग
सुरेख-सुंदर नवीन देऊळ – उगारच्या लक्ष्मीचे
वरदहस्त हा तिचाच आहे – वैभव गावाचे
नतमस्तक त्या देवीपुढती – रंक आणखी राव
ऐसे उगार माझे गाव ||2||

सर्व तऱ्हांची येथे दुकाने – शहरासम सजली
सुखदु:खाचा निरोप घेऊन टपाल दारी येते
पोस्टापुढती महावीराची बस्ती ही शोभते
त्रिगुणात्मक हा रस्ता घेई – मीरजेकडती धाव
ऐसे उगार माझे गाव ||3||

माळावरती गुलाब ज्यांनी घामाने फुलविले
उगारास या फुलवित आले हेच दोन बंगले
कर्तृत्वाची गाथा ज्यांची शिरावरी घ्यावी
असे विनायक बाबूकाका यांची हो थोरवी
घाम गाळिता कामामधूनी प्रसन्न झाला देव
ऐसे उगार माझे गाव ||4||

देऊळ ऐसे शोभे जणू की हेचि मुक्तिधाम
कैवल्याचे फुले चांदणे हृदयी भक्तिभाव
ऐसे उगार माझे गाव ||5||

आता वाढले उगार गाव मोठे – छोटे ना राहिले
उजाड राना सजवित जाती मोठे हे बंगले
स्टेशनावरी मोठी गाडी तोऱ्यातच येते
अन् प्रश्नांचे वादळ माझ्या मनात घोंगावते
मी कोठला? अन् कसा? असा मी उगारात आलो
या मातीशी जीव लावला मीच असा फुललो
प्रवास आपुला गाडी आपुली परी स्टेशन नाही ठाव
उगारात या रंगुनी जावे उगार माझे गाव
ऐसे उगार माझे गाव ||6||

खुर्शीद दस्तगीर लाटकर 7620925595 minalatkar@gmail.com
———————————————————————————————-

About Post Author

2 COMMENTS

  1. खूपच छान लिहिलं आहे, तुमचे मनापासून आभार 🙏🏼

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here