गोष्ट आहे 1916 सालची. सांगलीजवळच्या कवलापूर गावात गरीब अस्पृश्य समाजात जन्मलेल्या एका मुलाची. त्याचे नाव डॉक्टर जय नारायण भोरे. ते अमेरिकेत मानसोपचार तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. भोरे कुटुंब गरिबी व अस्पृश्यता यांना कंटाळून ख्रिश्चन झाले. जय डॉक्टर होऊ शकले. त्यांनी गावात प्रॅक्टिस सुरू केली. परंतु अस्पृश्यता आडवी आली. प्रॅक्टिस चालली नाही. त्यांनी 1958 साली अमेरिकेचा रस्ता धरला. तेथेच त्यांचा मेरी नावाच्या अमेरिकन बाईशी विवाह झाला. ते स्वत: मानसोपचार तज्ज्ञ म्हणून अमेरिकेत प्रसिद्ध झाले.
ते स्वत:च्या भावाला भेटण्यासाठी अमेरिकेतून तब्बल सतरा वर्षांनी, 1975 साली स्वत:च्या गावी म्हणजे कवलापूरला परत आले. तेथे काय काय घडले हे त्यांच्याच शब्दांत –
मी भावाच्या घरी रात्री दोनच्या सुमारास पोचलो. भावाशी बोलता-बोलता झोपण्यास पहाट झाली. मला जाग माणसांच्या गलबल्यामुळे आली. गावातील माझे अनेक हितचिंतक माझ्या भावाच्या घरी गोळा झाले होते. त्यात उच्चवर्णीय हिंदू, गावातील पुढारी-सरपंच, नेहरु विद्यालयाचे मुख्याध्यापक असे अनेक लोक उपस्थित होते. माझ्या भावाने मला त्यांचा परिचय करून दिला. जो तो माझ्याशी हस्तांदोलन करू पाहत होता. मी आश्चर्यचकित झालो. मी अस्पृश्याला स्पर्श करण्यासाठी धडपडणारा जमाव बघून थक्क झालो. मी अमेरिकेत भारतातील खेड्यात अजून अस्पृश्यता पाळली जाते हे ऐकून होतो. परंतु कवलापूरचा अनुभव वेगळाच होता. नेहरू विद्यालयाचे मुख्याध्यापक- मोहिते यांनी ‘तुमच्या आगमनार्थ आम्ही एक चहापानाचा कार्यक्रम ठेवला आहे’ असे सांगून मला आग्रहाचे निमंत्रण दिले. माझ्या चेहऱ्यावर उमटलेले आश्चर्य पाहून कुलकर्णी म्हणाले, की आम्ही गावातील सर्व ब्राह्मणसुद्धा तुम्हाला या समारंभाला येण्याचे आग्रहाचे निमंत्रण देत आहोत. समारंभात चहा व बिस्किटे घेताना, अस्पृश्यतेचा ठसा व मनात खोलवर दडून बसलेली भीती उफाळून वर आली. माझे हात थरथरू लागले. परंतु सगळ्यांनी मला सांभाळून घेतले. समारंभाच्या शेवटी, निरोप घेणार इतक्यात ब्राह्मण समाजातील प्रमुख महादेव मंदिराचे पुरोहित सर्वांना उद्देशून म्हणाले, ‘आपण गावातील अस्पृश्य बांधवांना आपल्या मंदिरात का बरे प्रवेश देऊ नये?’ त्या सूचनेवर ग्रामस्थांनी एकमुखी ठराव केला, की दोन दिवसांनी, आपण सर्वांनी म्हणजे स्पृश्य व अस्पृश्य अशा सर्वांनी मिळून मंदिर प्रवेश करू ! तो सोनियाचा दिवस उगवला. गावातील दोन्ही समाज एका मोठ्या मिरवणुकीने महादेवाच्या मंदिरात प्रवेश करते झाले. मी मंदिराच्या पायरीवर पाऊल ठेवले आणि आम्ही उंबरठ्यावर नतमस्तक होऊन महादेवाच्या मंदिरात प्रवेश केला. पुरोहितांनी स्मित वदनाने आमचे स्वागत केले. त्यांनीच सर्वांच्या कपाळावर महादेवाचे नामस्मरण करत शेंदूर लावला. माझे अनेक जातबांधव महादेवाचे नामस्मरण करत जणू काय अलिबाबाच्या गुहेत प्रवेश केल्याप्रमाणे आनंदयुक्त आश्चर्याने मंदिरात प्रवेश करत होते. मी ते दृश्य पाहून आश्चर्यचकित झालो. मला खूप आनंद झाला. मी लहानपणी आईबरोबर ज्या मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरून दंडवत घालत होतो त्याच मंदिराचे द्वार माझ्यासाठी व माझ्या जातबांधवांसाठी खुले झाले होते !
मंदिर प्रवेशाचा प्रसंग संपता संपता देवळातील पुरोहितांनी मला आश्चर्याचा दुसरा धक्का दिला. ते मला म्हणाले, की आम्ही उद्या तुमची मुंज करणार आहोत ! बरीच वर्षे अमेरिकेत राहिल्याने, मला मुंज या शब्दाचा अर्थ कळेना. तेव्हा ते म्हणाले, की उद्या आम्ही तुम्हाला ब्राह्मण करणार आहोत. दुसऱ्या दिवशी, पहाटे ठरल्याप्रमाणे एक पुरोहित व दोन सुवासिनी माझ्या घरी आल्या. पुरोहितांनी चंदन-उटणे व सुवासिक तेल सर्वांगाला लावून मला सचैल स्नान घातले. सुवासिनींनी मला ओवाळले. तेथून आम्ही गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी जो मांडव घातला होता तेथे पोचलो. मी लेंगा-झब्बा-टोपी अशा पूर्ण भारतीय पोशाखात होतो. अनेक ग्रामस्थांच्या उपस्थितीत, पवित्र मंत्रोच्चारात मुंज लावून मला जानवे घालण्यात आले. आम्ही हे मंत्रोच्चार ऐकणेसुद्धा हा एके काळी अपराध होता. मी तेच मंत्र कानात प्राण आणून ऐकत होतो. त्यांनी प्रसाद म्हणून मला नारळ दिला व अंगावर शाल पांघरली. सर्व ब्राह्मण माझ्याभोवती गोळा झाले व म्हणाले, ‘आता तुम्ही आमच्यापैकी एक झालात.’
दुसऱ्या दिवशी, गावाचा सुपुत्र म्हणून माझा शाळेत सत्कार करण्यात आला. विविध जातीच्या पुढार्यांनी फुलांचे सुंदर हार घालून माझ्याबरोबर हस्तांदोलन केले. काहींनी आलिंगन दिले. सत्काराला उत्तर देताना माझ्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. मी सर्वांचे व परमेश्वराचे आभार मानले. मी म्हणालो, तुम्ही केवळ माझा नव्हे तर माझ्या जातिबांधवांचा स्वीकार केला आहे. आपणा सर्वांना एकमेकांपासून अलग करणारी जातिभेदाची ही भिंत कोलमडून पडली आहे.
माझ्या कुटुंबातील मंडळी माझ्याकडे वरकरणी समाधानाने पाहत होती, की मी अजून एक ख्रिश्चन आहे. परंतु मी मात्र होतो अस्पृश्य असणारा ब्राह्मण ख्रिश्चन !
(डॉक्टर जय नारायण भोरे यांनी लिहिलेल्या ‘द अनटचेबल ब्राह्मिन ख्रिश्चन’ या लेखाचा स्वैर अनुवाद डॉक्टर दिलीप देशमुख यांनी केला व तो 9 जुलै 1991 रोजीच्या ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या मैफल या रविवार पुरवणीत प्रसिद्ध झाला.)
– सुधीर दांडेकर 9823133768 dandekar.rg@gmail.com