उपनयन- शैक्षणिक संस्कार

0
202

हिंदू धर्म-संस्कृतीचे एक अविभाज्य अंग म्हणजे सोळा संस्कार.

चित्रकर्म यथानेकै: रङ्गै: उन्मील्यते शनै : |
मानव्यमपि तद्वत् स्यात् संस्कारै: विधिपूर्वकै: || (पाराशर गृह्यसूत्र, हरिहरभाष्य)

(चित्र जसे वेगवेगळ्या रंगांच्या योगाने हळूहळू आकाराला येते त्याप्रमाणे माणूसपण हेही पद्धतशीरपणे केलेल्या संस्कारांमुळे क्रमाक्रमाने उमलत जाते.)

व्यक्तीच्या विकसनाच्या विविध टप्प्यांवर केले जाणारे संस्कार हे व्यक्तीच्या घडणीसाठी उपयुक्त असेच आहेत. त्यांचा आशय समजून घेणे आवश्यक आहे. व्यक्तीला तो समजला तर त्यानुसार आचरण करून ती स्वत:चे व्यक्तिमत्त्व अधिक समृद्ध करू शकेल.

व्यक्तिविकासाचा विचार पाच प्रमुख पैलूंच्या संदर्भात केला जातो- शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक आणि नैतिक. मुलांच्या घडणीच्या वयातील टप्प्याचे महत्त्व ओळखून प्राचीन अभ्यासकांनी उपनयन संस्काराची योजना केली असावी. मुले पूर्वी उपनयनानंतर गुरुच्या घरी ब्रह्मचारी म्हणून निवास करत आणि अभ्यास पूर्ण करून मग स्वत:च्या घरी परत येत असत. तो काळ ब्रह्मचारी म्हणून आयुष्य जगत असताना, अभ्यास करून स्वत:च्या भावी जीवनाची दिशा निश्चितपणे घडवण्याचा होय. विद्यार्थ्याची जडणघडण वयाच्या आठव्या ते दहाव्या वर्षांपासून वय वर्षे सुमारे पंचवीसपर्यंत गुरूच्या मार्गदर्शनाखाली होत असे. त्या जडणघडणीचा पाया उपनयन संस्कारात घातला जात असे. परंतु उपनयन संस्कारामागील मूळ हेतू मागे पडत चालल्याचे अनुभवास येत आहे. त्याकडे केवळ एक सोहळा या स्वरूपात पाहिले जात आहे.

उपनयन म्हणजे गुरूच्या जवळ जाणे. गुरूच्या जवळ राहून, ब्रह्मचारी म्हणून चांगल्या प्रकारे, एकाग्र चित्ताने अभ्यास करण्यासाठी काही नियम पाळणे आवश्यक असते. त्या नियमांनी स्वत:ला बांधून घेणे म्हणजेच व्रतबंध. ती व्रते नियमाने पाळण्यासाठी त्याला निश्चयशक्तीची जोड द्यावी लागते. सारांश, ब्रह्मचारी म्हणून स्वत:च्या शरीराला, मनाला आणि बुद्धीला जाणीवपूर्वक वळण लावावे लागते. ज्याप्रमाणे कंदिलाच्या बाहेरची काच जर खराब असेल तर दिव्याच्या वातीचा प्रकाश बाहेर नीट पडत नाही; त्यासाठी कंदिलाची काच स्वच्छ करावी लागते. भारतीय संस्कृतीत ब्रह्मचर्याचे स्वरूप प्रत्येक आश्रमानुसार वेगवेगळे सांगितले आहे. प्रत्येक टप्प्यावर ब्रह्मचर्याचा अभ्यास करत असताना संयमशक्ती वाढवण्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते.

उपनयन संस्कार प्रामुख्याने बटूसाठी मेखलाधारण, दंडधारण, अग्निस्थापना, अग्निप्रार्थना, सूर्यदर्शन, व्रतांचा उपदेश, हृदयालम्भन, मेधाजनन आणि सर्वात महत्त्वाचा विधी म्हणजे व्रतचिह्न धारण आणि सावित्री मंत्राचा उपदेश अशा स्वरूपाचा आहे. मेखला आणि दंड यांचा स्वीकार करण्यामागे इंद्रियसंयमनाचा विचार दिसून येतो. ब्रह्मचारी म्हणून अभ्यासपूर्वक आयुष्य जगत असताना विषयावासनेचा त्याग अपेक्षित आहे. वैषयिक सुखांच्या मागे लागून मन अशुद्ध आणि मलिन होऊ न देणे हे त्यामध्ये आवश्यक मानले आहे; तरच मन नियोजित कामात पूर्ण लागेल आणि प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता वाढेल. मनाला चांगल्या सवयी लावून घेणे आणि संयमाच्या अभ्यासाने मन शुद्ध करणे हे ब्रह्मचर्याचे विधायक अंग होय. ब्रह्मचर्य हे काया- वाचा- मने  पाळले गेले पाहिजे. त्याचे प्रतीक म्हणून बटूला मेखला आणि दंड दिले जात असावे.

सूर्यदर्शन या विधीमध्ये बटूला सूर्य आणि प्रजापती यांच्या स्वाधीन केले जाते. आचार्य या विधीमध्ये बटूसाठी सवितादेव, जलदेवता, औषधी, स्वर्ग, पृथ्वी आणि सर्व देव यांनी बटूचे संरक्षण करावे अशी प्रार्थना करतात. त्यानंतर त्याला व्रतांचे स्मरण करून दिले जाते. बटूला विविध नियम उदाहरणार्थ- दिवसा न झोपणे, शरीराची स्वच्छता राखणे, आळस न करता कामे पूर्ण करणे, खरे बोलणे, ज्ञान मिळवणे वा ते इतरांस देणे, बलाची उपासना करणे, अग्नीत आहुती देणे, संध्या नियमित करणे, ब्रह्मचारी व्रताचे पालन करणे असे सांगितले जातात. त्या सर्वांमध्ये बटूला व्यक्तिगत विकासाबरोबर समाजविकासाचीही दिशा दाखवण्याचा प्रयत्न आहे.

उपनयन विधीमध्ये बटू प्रज्वलित अग्नीवर स्वत:चे तळवे फिरवून ते हात स्वमुखावरून फिरवतो. त्या ठिकाणी तो जणू अग्नीच्या तेजाने स्वत:ला माखून घेतो अशी कल्पना आहे. बटूने स्वत:चा विकास करण्यासाठी तेजस्वी शरीर-मन-बुद्धीने सज्ज व्हावे अशी अपेक्षा त्यामागे आहे.

मेधाजनन या विधीमध्ये बटूची धारणाशक्ती वाढावी अशी प्रार्थना केली आहे. जे ज्ञान ग्रहण केले आहे ते योग्य प्रकारे वापरता यावे यासाठी ते नीट लक्षात राहवे लागते. ती ही प्रक्रिया होय. त्यासाठी आचार्य जे ज्ञान देतील ते लक्षपूर्वक वा एकाग्रतेने समजून घ्यावे लागते. त्यासाठी शिष्याला विशेष परिश्रम घ्यावे लागतात. त्याची ही पूर्वतयारी आहे.

सावित्री उपदेश म्हणजे गायत्री छंदातील सविता देवतेचा मंत्र आहे. आचार्य बटूला हा उपदेश उपनयन संस्कार झाल्यावर तीन/सहा दिवस वा त्यानंतर करत असत. सद्यस्थितीत तो उपदेश उपनयन संस्काराच्या दिवशीच दिला जातो. सविता म्हणजे विश्व निर्माण करणारी चैतन्यशक्ती. अनंत कोटी ब्रह्मांडांना प्रकाश देणारा जो सविता त्याची उपासना बटूने नियमित करायची आहे. त्या श्रेष्ठ तेजाच्या ध्यानाने आमच्या बुद्धीला चांगल्या कामाची प्रेरणा मिळो अशी प्रार्थना त्यामध्ये आहे. या परब्रह्माची धारणा व्हावी यासाठी त्याचे ध्यान करावे लागते.

भारतीय संस्कृतीत मोक्षाची उपासना ही महत्त्वाची मानली आहे. ती अवस्था प्रत्येक साधकाच्या आयुष्यात येणे ही आनंदाची परमावधी मानली जाते. व्यक्तीने तिच्या परीने ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थी आणि संन्यासी या चार अवस्थांमध्ये साधना करून स्वत:चा विकास साधणे आणि अंतिम सत्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करणे हे तिचे ध्येय होय असे भारतीय संस्कृती सांगते. त्यामुळे पुढील तीन आश्रमांची पूर्वतयारी म्हणून बटूने स्वत:ची साधना नियमित करणे येथे अभिप्रेत आहे. यालाच समाधी अवस्थेची पहिली पायरी म्हणावे लागेल.

ऋग्वेद या प्राचीन ग्रंथात सूक्त लिहिणाऱ्या ऋषिका दिसतात. विश्वावरा, आत्रेयी, गार्गी, मैत्रेयी, सुलभा या ब्रह्मवादिनी स्त्रियांना भारतीय संस्कृतीत आदराचे स्थान आहे. किंबहुना, येणारा काळ हा स्त्रीप्राधान्याचा आहे. त्यासाठी महिलावर्गास सिद्ध असणे गरजेचे आहे. तर त्यांच्यासाठी या विधीचा विशेष उपयोग होऊ शकतो. स्त्रीउपनयनाची ही परंपरा आधुनिक काळातही सुरू ठेवण्याची आवश्यकता आहे.

मूलत:, उपनयन हा एक शैक्षणिक संस्कार आहे अशा अर्थी त्याकडे पाहण्यास हवे. मुला-मुलींच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक आणि नैतिक विकसनाच्या दृष्टीने उपयुक्त असा विचारपूर्वक तो केला तर त्यातून विकसित व्यक्तिमत्त्व घडू शकेल !

आर्या जोशी  94220 59795 jaaryaa@gmail.com
———————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here