मानवाने वाहणारे पाणी अडवून, साठवून, ते उपसून अगर पाटबंधाऱ्याचे तंत्र शोधून प्रवाहाने गरजेप्रमाणे वापरण्याचे काढले आहे; तसे जमिनीखाली मुरलेले पाणी विहिरी खोदून व खोलवरील पाणी विंधनविहिरींतून उपसून काढण्याचे तंत्रही विकसित केले आहे. मात्र त्या प्रमाणात पाणी जमिनीत मुरवण्याकडे मात्र माणसाचे दुर्लक्ष झाले आहे. पाणीवापराच्या तुलनेत ते मुरण्याचे प्रमाण व्यस्त होत चालल्याने भू-जलसाठा कमी कमी होत गेला आहे. विहिरी पूर्वीच्या तुलनेत लवकर आटतात, तर विंधनविहिरींचे पाणी प्रतिवर्षी खोल-खोल जात चालले आहे.
भूस्तर व प्रामुख्याने वनस्पती यांचा जमिनीत पाणी मुरण्यामागे महत्त्वाचा सहभाग असतो. भू-स्तरांमध्ये सच्छिद्र दगडात पाणी उत्तम प्रकारे साठवले जाते. महाराष्ट्रातील बऱ्याच भागांत असणारा काळ्या दगडाचा थर हा भूमिगत पाणी साठवण्यासाठी योग्य नाही. त्यामुळे महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी विंधन विहिरींना पाणी लागत नाही. काही ठिकाणी, काळ्या खडकाच्या खूप मोठ्या जाड थरानंतर मांजऱ्या खडकाचा थर लागतो. पाणी त्या थरात मोठ्या प्रमाणावर साठवले जाते. अशा जागा चाळीस-पन्नास फुटांपासून दोनशे-तीनशे फुटांपर्यंत तुरळक ठिकाणी सापडतात. महाराष्ट्रात भूजलसाठा होण्याच्या दृष्टीने खडकाचा सर्वांत चांगला थर तापी खोऱ्यात आहे. त्या ठिकाणी पन्नास वर्षांपूर्वी बारा फुटांवर पाणी लागत होते. तेथील पाणीपातळी साठ फुटांवर गेली आहे!
पाणी जमिनीत मुरण्यासाठी वनस्पतींचा सर्वात मुख्य सहभाग असतो. लहानमोठी गवते, झुडपे व लहान-महाकाय वृक्ष अशा विविध प्रकारच्या वनस्पती त्यांच्या मुळांचा पसारा जमिनीतील वेगवेगळ्या थरांपर्यंत नेत असतात. वनस्पती जितकी मोठी तितका तिला उभे राहण्यासाठी मुळांचा पसारा खोलवर करावा लागतो. पाऊस पडत असताना तो जमिनीत मुरण्याच्या वेगापेक्षा जास्त वेगाने पडू लागल्यास पाणी आडवे वाहू लागते. पाणी मुरण्याचा वेग मातीचा प्रकार, मुरण्याच्या थरांचे अस्तित्व व जमिनीचा उतार; तसेच, वनस्पतींच्या मुळांचे जाळे यांच्याशी संबंधित असतो. मुळांचा पसारा जितका खोलवर तितके पाणी त्या मुळांना धरून खोलवर पाझरू शकते. मुळांचा पसारा पृष्ठभागावरील मातीचा थर घट्ट धरून ठेवतो. परंतु बहुतेक डोंगर उघडेबोडके झाले आहेत. त्यामुळे जमिनीवरील मातीच्या थरांची धूप होऊन कातळ अगर खडक यांचा थर उघडा झाला आहे. तशा ठिकाणी पाणी अजिबात मुरत नाही. त्यामुळे कोकणात चार-पाच हजार मिलिमिटर पाऊस पडूनही, विहिरी पाण्याचा तळ जानेवारी-फेब्रुवारीतच गाठतात.
वृक्षराजी नाही, अशा परिस्थितीत भू-जलसंवर्धनाची गरज लक्षात आल्याने जमिनीवर आडवे वाहणारे पाणी अडवणे व जमिनीत मुरवणे हा एकमेव उपाय जलद करण्याचा ठरतो. महाराष्ट्रात अनेकांनी तसे वेगवेगळे प्रयोग केले आहेत. समतळ चर खणून, त्यात पाणी साठवून मुरवणे व भरावावर वृक्ष लावणे याला माथा ते पायथा असे म्हणतात. डोंगरावर वरपासून खालपर्यंत असे समांतर चर काढल्यास चांगले पाणी सखल भागातील विहिरींना वर्षभर राहते. जालना जिल्ह्यातील कडवंची प्रकल्प, नगरमधील राळेगणसिद्धी, हिवरेबाजार असे प्रकल्प हे त्याचे प्रात्यक्षिक मानावे लागतील. त्याच्याच जोडीला सखल भागातील ओढे, नाले यांवर नालाबंडिंगची कामेही अनेक ठिकाणी झाली आहेत. डोंगर व माळरानयांवरील धूप यांमुळे ओढे-नाले गाळाने भरून गेल्याने पाणी मुरण्याचा वेग कमी झाला आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील सुरेश खानापूरकर
– प्रताप र. चिपळूणकर
(‘शेतीप्रगती’ वरून उद्धृत, संपादित – संस्कारित)
8275450088