यात्राउत्सवांतील विविधता गावागणिक बदलते. तशीच परंपरा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील अणे या गावाने जपली आहे. रंगदास स्वामींची तपोभूमी ही त्या गावाची ओळख. स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी डिसेंबरात तेथे तीन दिवस यात्रोत्सव भरतो. पंचक्रोशीतील प्रत्येक घरातील करगुट्यामागे दीड किलो भाकरी तेथे भाविक आणतात. गावागावांतून आलेल्या भाकऱ्यांची ट्रकमधून मिरवणूक निघते, तर आगळ्या चवीची रस्सा आमटी मंदिर परिसरात बनवून हजारो भाविकांना आमटी-भाकरीचा महाप्रसाद स्टीलच्या ठोकीव पितळ्यांतून दिला जातो.
अणे हे गाव मुंबई-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर आळेफाटा येथून वीस किलोमीटरवर आहे. रंगदास स्वामी यांनी वाराणसीतून येऊन त्या परिसरात तीन तपे व्यतीत केली. ते वयाच्या अठराव्या वर्षी अणे गावाच्या पश्चिम वेशीजवळील मारुती मंदिरात आले. तेथे असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली बसून साधना करू लागले. स्वामींनी गावाच्या पूर्व वेशीजवळ बारवे शेजारील पिंपळवृक्षाच्या सभोवती सुंदर बाग तयार केली. तेथे तब्बल तीन तपे साधना केली. स्वामींनी पुढे पिंपळवृक्षाखाली समाधी घेतली. त्यामुळे तो परिसर ही त्यांची तपोभूमी आणि कर्मभूमी आहे. रंगदास स्वामींच्या पुण्यतिथीचा यात्रोत्सव दीडशे वर्षांपासून अव्याहत सुरू आहे. मुंबईकर निवासी झालेले, जुन्नर तालुक्यातील भाविक अणे येथील यात्रेला आवर्जून येतात.
यात्रेचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे महाप्रसाद. भाकरी-आमटीच्या महाप्रसादाकडे नवलाई म्हणून पाहिले जाते. शिंदेवाडी, पेमदरा, नळवणे, आनंदवाडी, गुळूंचवाडी, अणे या परिसरातून भाविक घरून भाकरी घेऊन स्वामींच्या दर्शनाला येतात. पहिल्या दिवशी धार्मिक कार्यक्रम, दुसऱ्या दिवशी महाआरती झाल्यावर नैवेद्य दाखवून महाप्रसाद सुरू होतो. तो दुसऱ्या दिवशी काल्याचे कीर्तन झाल्यानंतर रात्रीपर्यंत सुरू राहतो. गावागावातून भाविकांनी भाकऱ्या अणे येथे आणल्यानंतर त्या ट्रकमध्ये जमा केल्या जातात आणि त्यानंतर महाआरती करताना मंदिरापर्यंत भाकऱ्यांची वाजतगाजत मिरवणूक निघते.
भाविकांना पंगतीत प्रसाद वाटपासाठी मंडप टाकला जायचा. मात्र, दिवसेंदिवस यात्रेचे महत्त्व वाढत गेले. लाखो भाविक यात्रेला येऊ लागले आणि त्यामुळे मांडवातील पंगत अपुरी पडू लागली. ही अडचण ध्यानात घेऊन गावकऱ्यांनी लोकवर्गणी काढून दोन कोटी रुपये खर्चांतून बारा हजार चौरस फुटांचा दोन मजली भव्य हॉल बांधला. त्यात पंगती घातल्या जातात.
आमटी शिजवण्यासाठी चार मोठ्या कढया आहेत. प्रत्येक कढईत पाचशे लिटर आमटी शिजवली जाते. पाण्याची मोटार लावून पाइपने पाणी कढईत सोडावे लागते. दोन दिवसांत बत्तीस कढया आमटी तयार केली जाते. विश्वस्तांच्या निगराणीत ते काम केले जाते. त्यावेळी त्रयस्थ व्यक्तीला भटारखान्यात प्रवेश नसतो. प्रसाद वाटपासाठी पाच हजार पितळ्या आहेत. साधारण एका पंगतीत तीन ते चार हजार भाविकांना त्या पितळ्यांतून महाप्रसाद दिला जातो.
गावकऱ्यांसाठी घरातील व्यक्तींच्या संख्येनिहाय बादलीतून आमटी नेण्याची मुभा असते. त्यामुळे ग्रामस्थ आणि त्यांचे पाहुणे यांच्यासाठी घरोघरी पंगती उठतात.
आमटीचे अन्नदाते म्हणून प्रत्येक वर्षी तीन भाविक आमटीचा खर्च देतात. हे अन्नदान करणाऱ्या भाविकांची २०२६ सालापर्यंतची नोंदणी पूर्ण झाल्याचे रंगदास स्वामी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष पोपट दाते यांनी सांगितले. आमटी तयार करण्यासाठी यंदा साडेसात पोती तूरडाळ, शंभर किलो मिरची, तीनशे किलो गूळ, अडीच पोती शेंगदाणे, अडीचशे किलो खोबरे, तीस डबे तेल वापरले गेले. मसाल्याचा खर्च पन्नास हजार रुपयांच्या आसपास असतो. त्याशिवाय करणावळ वेगळी. यंदाच्या आमटीचा खर्च हरिभाऊ दाते, रंगनाथ कांबळे आणि बाळशीराम दरेकर या तीन भाविकांनी दिला आहे.
अणे येथील यात्रेचा वाढता लौकिक आणि तेथे भरणारी तीन दिवसांची यात्रा यामुळे त्या स्थानाला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे.
मुंबईहून नगरकडे येणारी एसटी बस माळशेज घाटात कोसळून सत्तावीस प्रवासी 2013 साली ठार झाले. त्यात त्या यात्रेस आलेले त्याच गावातील आठ मुंबईनिवासी होते. त्यातही एकाच कुटुंबातील सात होते. त्यामुळे 2013 साली त्या यात्रेवर शोककळा होती. मात्र, त्या भाविकांचे स्मरण करत ही परंपरा आता पुढे वाटचाल करत आहे.
– धर्मेंद्र कोरे
(मूळ लेख महाराष्ट्र टाइम्स, शनिवार, 20 डिसेंबर 2014)
Last updated on 25th July 2017
Dharmendra Saheb,Aaple Phat
Dharmendra Saheb, Aaple Phar Phar Dhanyvvad. Ha lekh prakarsheet Karun aapan aamchya gavachi khyatee vaadavli..
DHARMEDRA SAHEB,SHREE
DHARMEDRA SAHEB, SHREE RANGADAS SWANI AAPNAAS UDAND AAYUSHYA DEVO!!!
ASECH SWAMINVISHAYI LEKH PRADARSHEET KARAT RAHA..AAPLA.SHUBHECXHUK, .SANTOSH LAXMAN DATE,ANE
Ane gavcha rahivashi aslyacha
Ane gavcha rahivashi aslyacha abhiman vatato………sundar varnan kelay yatrecha………..ani Maharashtratil sarv bhavikanna vinanti ki aapan akda tari mazya gavchya “aamti” chya mahaprasadacha aasvad ghenyas ya….
glad to read it abhiman ahe
glad to read it! abhiman ahe mala mi ane yethe jalm ghetlyacha bola shri rangdas swami maharaj ki jay
कोरे साहेब, आपण
कोरे साहेब, आपण श्रीरंगदासस्वामी महाराज यांची जी माहिती आपल्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली ती खुप छान होती. आपले हार्दिक अभिनंदन !!!!
आपणास भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा !!!
Comments are closed.