अधिक व निज श्रावण मास !

0
154

अधिकमास कसा आणि का येतो? हिंदू पंचांग गणना चांद्र महिन्यानुसार होते. चांद्र महिना एकोणतीस दिवसांचा असतो. इंग्रजी कॅलेंडर आणि भारतीय ऋतुचक्र हे मात्र सौर महिन्याशी जोडलेले आहे. सौर महिना तीस/एकतीस दिवसांचा असतो. यामुळे प्रतिवर्षी चांद्र आणि सौर या दोन पद्धतींमधील वर्षाच्या एकूण दिवसांमध्ये तेरा ते चौदा दिवसांचा फरक पडतो. तो फरक भरून काढण्यासाठी हिंदू पंचांगामध्ये दर तीन वर्षांनी अधिकमासाची योजना करण्यात आली आहे. त्यामुळे हिंदू सणांचा मेळ ऋतुचक्राशी राहतो. मुस्लिम कालगणनाही चांद्र महिन्यानुसार आहे. पण त्यात अधिकमासासारखी उपाययोजना नाही. त्यामुळे मुस्लिम सण विशिष्ट ऋतूत येत नाहीत, एक ऋतू वेगवेगळ्या महिन्यांत येऊ शकतो. त्यांचा सौर वर्षाशीही मेळ बसत नाही.

अधिकमास चैत्रापासून आश्विन महिन्यांपर्यंतचा कोणताही एक महिना म्हणून येऊ शकतो. कारण सूर्याची गती त्या महिन्यांतच मंद असते. त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यास जास्त वेळ लागतो. क्वचित, अधिकमास कार्तिक वा फाल्गुन महिन्यातही आल्याचे उदाहरण आहे. तशा वर्षी एका नावाचे दोन चांद्र महिने असतात, जसे 2023 साली श्रावण ‘अधिक’चा आला आहे. अगोदर येतो तो अधिकमास आणि नंतर नियमित महिना येतो तो निजमास अशी कॅलेंडरची मांडणी त्या वर्षी असते. एखादा विशिष्ट महिना अधिकमास आला की एकोणीस वर्षांनंतर तोच महिना अधिकमास म्हणून येऊ शकतो, जसे यंदा श्रावणमास आला आहे.

ज्या वर्षी चैत्र हा वर्षारंभाचा महिना अधिकमास असतो, त्यावर्षी अधिकमासाच्या सुरुवातीलाच शक संवत्सराचा आकडा एकने पुढे जातो, मात्र गुढी पाडवा अधिकमासाच्या प्रतिपदेस साजरा करत नाहीत. तो लगेचच नंतर येणाऱ्या निजचैत्र महिन्यात साजरा करतात. म्हणजे त्यावर्षी चैत्र प्रतिपदा हा नववर्षाचा आरंभ दिवस असतो. परंतु पाडवा हा सण निज चांद्रमासात असतो.

काही वेळा एकाच चांद्रमासात सूर्याची दोन संक्रमणे येतात, म्हणजे सूर्य दोनदा रास बदलतो. अशा वेळी क्षयमास येतो. मार्गशीर्ष, पौष आणि माघ या तीन महिन्यांत अधिकमास कधीही येत नाहीत, मात्र त्या तीन महिन्यांत क्षयमास येऊ शकतो. क्षयमासाच्या आजूबाजूच्या महिन्यांमध्ये केव्हातरी थोड्या अंतराने दोन अधिकमास येतात. चांद्र वर्ष आणि सूर्य ऊर्फ सायन वर्ष यांच्यात मेळ घालण्याच्या उद्देशाने, पंचांगकर्त्यांनी कालगणनेसाठी जरी चंद्राचे भ्रमण प्रमाण मानले तरी महिन्यांची नावे मात्र सूर्याच्या भ्रमणाप्रमाणे ठेवली आहेत. म्हणजे सूर्य मीन राशीत असताना जेव्हा अमावास्या येऊन महिना संपेल तेव्हा चैत्र महिन्याला सुरुवात होईल. सूर्य मेष राशीत असताना आलेल्या अमावास्येनंतर वैशाख सुरू होईल, वगैरे.

सूर्य एका राशीत साधारणपणे एक महिना राहतो. तो रास साधारण चौदा ते सतरा तारखेला बदलतो. सूर्य एका अमावास्येला ज्या राशीत असतो, तो त्याच्या पुढील राशीत नंतरच्या अमावास्येला असतो. मात्र अशी एक अवस्था साधारण तीन वर्षांनी येते, की सूर्य एका अमावास्येला ज्या राशीत असेल त्याच राशीत तो असतो. नियमाप्रमाणे, सूर्य अमावास्येला ज्या राशीत असेल त्या राशीप्रमाणे त्या महिन्याला नाव दिले जाते. पण दोन लागोपाठच्या अमावास्यांना सूर्य एकाच राशीत असेल तर, म्हणजे सूर्य रासच बदलत नसेल तर त्या दुसऱ्या अमावास्येनंतर सुरू होणाऱ्या महिन्याला नाव काय द्यावे असा प्रश्न पडतो? अशा वेळी नाव ‘रिपीट’ करण्यात येते. वैशाख महिना सूर्य मेषेत असताना येणाऱ्या अमावास्येनंतर सुरू होतो. परंतु जर सूर्याचे राशिसंक्रमण त्यानंतरच्या चांद्रमासात होत नसेल तर तो चांद्रमास वैशाख नसून अधिकवैशाख असतो. तेव्हा लक्षात ठेवावे की चांद्रमासाचे नाव सूर्याच्या शुक्ल प्रतिपदेच्या स्थितीवरून नव्हे तर त्याच्या अमावास्येच्या स्थितीनुसार ठरते. जसे सूर्य मेषेत असताना जी अमावास्या येते ती चैत्र अमावास्या. सूर्य मीनेत असताना जी अमावास्या येते ती फाल्गुन अमावास्या. अर्थात सूर्य मीनेत असताना अधिकचैत्र अमावास्या किंवा मेषेत असताना अधिकवैशाख अमावास्या आणि याप्रमाणे इतरही येऊ शकतात. ज्या चांद्र महिन्यात सूर्यापासून संक्रमण होत नाही, तो महिना अधिकमहिना मानतात आणि त्यानंतरचा निजमहिना. त्याच नियमाने ज्या चांद्र महिन्यात सूर्य दोन राशींनी पुढे सरकतो, त्या महिन्याला क्षयमास म्हणतात.

पौर्णिमेला महिना संपतो अशा पद्धतीच्या पंचांगात निजमासाच्या एका (कृष्ण) पक्षानंतर अधिकमासाचे दोन पक्ष येतात आणि त्यानंतर निजमासाचा शुक्ल पक्ष (दुसरा पंधरवडा). त्या पंचांगातील अधिकमास आणि अमान्त पद्धतीच्या पंचांगातील अधिकमास एकाच वेळी असतात. हिंदू पंचांगातील प्रत्येक महिन्यात दोन (वा अधिक) एकादश्या असतात; त्या चोवीस एकादश्यांपैकी प्रत्येकीला स्वतंत्र नाव असते. अधिकमहिन्यात येणाऱ्या दोन्ही एकादश्यांना मात्र ‘कमला एकादशी’ हेच नाव असते. ज्या वर्षी श्रावण, भाद्रपद किंवा अश्विन महिन्यात अधिकमास येतो, त्या वर्षी चातुर्मास पाच महिन्यांचा असतो. विनायकी आणि संकष्टी या दोन्ही चतुर्थ्या अधिकमासातही निजमासांप्रमाणे असतात.

  • माघी अमावास्या जर चौदा ते चोवीस या तारखांदरम्यान असेल तर पुढील इंग्रजी महिन्यात अधिकमास असतो.
  • जेव्हा सूर्य त्याची रास विशिष्ट महिन्यात कृष्ण पंचमीच्या आसपासच्या दिवशी बदलतो त्याच्या पुढील वर्षी त्या विशिष्ट महिन्याच्या आधीचा महिना अधिकमास असतो. उदाहरणार्थ, सूर्याने मिथुन राशीत प्रवेश 15 जून 2006, आषाढ कृष्ण चतुर्थीच्या दिवशी सकाळी 9:85 ला केला, म्हणून 2007 साली आषाढाच्या अलिकडचा ज्येष्ठ महिना हा अधिकाचा होता.

योगाचार्य आणि समुपदेशक गजानन शंकर योग यांनी 2023 साली उद्भवलेल्या निजमास व अधिकमास या संभ्रमासंदर्भात सविस्तर मतप्रदर्शन केले आहे : उत्तर भारतातील, महाराष्ट्रामधील कालगणनेत फरक आहे. त्या भागांत पौर्णिमा ते पौर्णिमा असा महिना असतो तर महाराष्ट्रात अमावस्या ते अमावस्या असा महिना असतो. अमावास्या 17 जुलै 2023 ला मध्यरात्री संपून 18 जुलै 2023 पासून अधिक महिना सुरू झाला. तर अधिक महिना 16 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 03 वाजून 07 मिनिटांनी संपून नेहमीप्रमाणे निजश्रावण महिना सुरू होत आहे. जावयाला वाण देणे, गरीब ब्राह्मणाला, गोशाळेला, सामाजिक संस्थेला, गरजूंना मदत म्हणून दान देणे, ‘अधिक’ महात्म्य वाचणे, आईची पूजा करून आईची ओटी भरणे, देवालयांतील देवांना, गंगेला वाण देणे हे सर्व 18 जुलै ते 15 ऑगस्ट ह्या दरम्यान करायचे आहे. श्रावणातील व्रत-वैकल्ये, सोमवार व इतर उपवास, पारायण वाचन हे सगळे 17 ऑगस्ट ते 18 सप्टेंबर 2023 ह्या दरम्यान करायचे आहे. अधिक महिन्यांत दशमी, एकादशी, द्वादशी, पौर्णिमा ह्या विशेष तिथींना दान देण्याचे अधिक महत्त्व आहे. त्याच प्रमाणे पंचपर्वातील- म्हणजेच वैधृती योग, व्यतिपात योग, अमावस्या, पौर्णिमा, द्वादशी तिथी हे पंचपर्व- त्यांची दानेही महत्त्वाची आहेत. अधिकमासात गंगास्नानाचेही महत्त्व आहे. काहीजण गंगास्नान अधिकमासांत संपूर्ण महिनाभर करतात. दाने अनारसे, बत्तासे, रेवड्या, मोदक, सप्त धान्याची दिली जातात. अनारसे, बत्तासे ह्यांसारख्या वस्तू तेहतीस नग ह्या प्रमाणांत देतात. दान शक्यतो तांब्याच्या पात्रात द्यावे. तांब्याचे ताम्हण घेऊन त्यावर पळसाच्या पानाची पत्रावळ ठेवावी. त्या पत्रावळीवर थोडेसे गहू ठेवून त्यावर दान वस्तू ठेवावी. हळद-कुंकू वाहून वस्तूवर तुळशीपत्र ठेवावे. त्यावर रुमाल किंवा उपन त्यावर दीपदान ठेवून तुपाची वात लावावी. वस्त्रदानही देता येते. काय द्यावे- किती प्रमाणात द्यावे हा प्रश्न प्रत्येकाच्या इच्छाशक्तीचा व आर्थिक कुवतीचा आहे. आईने केलेल्या कन्यादानाबद्दलची कृतज्ञता म्हणून अधिकमासात मुलगी तिच्या आईची साडी, खण-नाराळाने ओटी भरते.

विष्णुस्वरूप देवतांचे, विशेषतः कृष्णाचे महत्त्व अधिकमासात जास्त. कृष्णाला महिनाभर तुळस वाहणे, दररोज थोड्याशा लोण्याचा नैवैद्य दाखवून तो लहान बाळ-गोपाळाला देणे असे उपक्रम करता येतात. श्रावण महिना हिंदू धर्मात पवित्र मानला जातो. तो महिना भगवान शंकराला समर्पित असून संपूर्ण श्रावण मासामध्ये महादेवाची पूजा आणि व्रतवैकल्ये केली जातात. श्रावणी सोमवारी दिवसभर शक्यतो केवळ फलाहार केला जातो आणि रात्री जेवण करून उपवास सोडला जातो. तसेच श्रावणामध्ये मांसाहार केला जात नाही. या उपवासांमागे काही वैज्ञानिक कारणेदेखील लपलेली आहेत. या काळात पचनशक्ती मंद झालेली असते. सामिष आहार, कांदा, लसूण वर्ज्य समजतात. त्यामुळे पचनेंद्रियांना विश्रांती मिळते. पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांच्या मतानुसार श्रावणी सोमवारचे उपवास, मंगळागौरी पूजन, नागपंचमी वगैरे श्रावणातील सण आणि व्रतवैकल्ये अधिकश्रावण महिन्यात न करता निजश्रावण महिन्यात (18 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2023) करावीत. पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनीही तसेच म्हटले आहे. ‘दाते पंचांग’चे मुख्य मोहन दाते यांचेही मत तसेच आहे. त्यांनी म्हटले आहे की महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक इत्यादी राज्यांत श्रावण महिना एकच पाळायचा असून श्रावण महिन्यातील उपवास, सण आणि व्रत-वैकल्ये 18 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या काळात येणाऱ्या निजश्रावण महिन्यातच करावी.

– विलास पंढरी 9860613872 vilas_pandhari@yahoo.com
(लेखात संबंधित तज्ज्ञांशी झालेल्या चर्चेतील निष्पन्न आणि विकिपीडियावरील माहिती यांचा आधार घेतला आहे.)
—————————————————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here