पुण्यापासून पन्नांस किलोमीटर अंतरावर असलेले भुलेश्वर हे ठिकाण तेथे तेराव्या शतकात बांधण्यात आलेल्या शंकराच्या प्राचीन मंदिरासाठी ओळखले जाते. देवगिरी राजांच्या कालखंडात हेमाडपंथी मंदिरे मोठ्या संख्येने बांधण्यात आली होती. भुलेश्वरचे मंदिर इ.स. 1230 मध्ये निर्माण करण्यात आले असे मानले जाते. त्या मंदिरातील शिल्पे हा शिल्पसौंदर्याचा उत्तम आविष्कार आहे. भुलेश्वरच्या मंदिरात स्त्रीरुपातील गणेशमूर्तीचे दुर्मिळ शिल्प पाहता येते.
भुलेश्वरचे मंदिर पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावाजवळ आहे. ते मंदिर दौलतमंगल या किल्ल्यामध्ये सामावलेले आहे. पुणे शहराच्या दक्षिणेकडे असलेली सह्याद्री पर्वताची उपरांग ‘भुलेश्वरची रांग’ म्हणून ओळखली जाते. ती रांग पूर्व-पश्चिम अशी पसरलेली आहे. त्या रांगेत सिंहगड आणि मल्हारगड यांच्या सोबतीने दौलतमंगल किल्ला उभा आहे. त्या किल्ल्याचे काही बुरूज आणि प्रवेशद्वार वगळता केवळ भग्नावशेष उरले आहेत.
भुलेश्वर मंदिराबाबत एक दंतकथा प्रसिद्ध आहे. देवी पार्वतीने भगवान शंकरासाठी नृत्य केले आणि महादेवांना पार्वतीची भुरळ पडली. त्यानंतर त्यांचा हिमालयात विवाह झाला. महादेवाला पार्वतीच्या सौंदर्याने भूल पाडली, म्हणून ते ठिकाण भुलेश्वर नावाने ओळखले जाऊ लागले.
भुलेश्वरच्या मंदिराची वास्तुशैली दक्षिणेकडील होयसळ मंदिराप्रमाणे आयताकृती आणि पाकळ्यासदृश्य आहे. इतर हेमाडपंती मंदिरांच्या तुलनेत भुलेश्वर मंदिरातील शिल्परचना उच्च प्रतीची आहे. पूर्वाभिमुख असलेल्या त्या मंदिराच्या बाहेरील प्राकाराची रचना उत्तरेतील जैन मंदिरांच्या धर्तीवर आहे. अर्धखुला मंडप, मधला भाग आणि मुख्य गाभारा असा त्या मंदिराचा परिसर आहे. तेथील शिवमंदिरास भुलेश्वर-महादेव किंवा यवतेश्वर म्हणतात. मंदिराच्या गाभा-यात शिवलिंग आहे. मंदिराच्या सभोवतालची भिंत, नगारखाना व शिखरे अठराव्या शतकातील मराठा शैलीतील आहेत. पूर्वी, मूळ मंदिरास भव्य प्राकार होता व नंदीचा मंडप स्वतंत्र होता. अठराव्या शतकात झालेल्या जीर्णोद्धारानंतर हे मंदिर एकाच छताखाली आले.
मंदिरात मोठ्या प्रमाणात मानवी व देवतांची शिल्पे आहेत. देवळाभोवती असलेल्या ओवऱ्यांमध्ये देवतांच्या अनेक मूर्ती आहेत. काही ओवऱ्या रिकाम्या आहेत. भिंतींवर कोरीवकाम, मूर्तीकाम केलेले आहे. मुख्य सभामंडपाच्या भोवती असलेल्या अर्धभिंतींवर युद्धप्रसंग, सिंह, हत्ती इत्यादी प्राणी व रामायण-महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत. महाभारतातील प्रसंग भारतातील इतर मंदिरांपेक्षा तेथे जास्त रेखीव आहेत. द्रौपदी-स्वयंवर, शरपंजरी भीष्म, हत्तीला आकाशात फेकणारा भीम ही कथानकशिल्पे, तसेच मातृकादेवी, गणपती, विष्णूंचे अवतार, योद्धे, पक्षी इत्यादी विविध प्रकारचे शिल्पांकन त्या मंदिरात आढळते. कुंभ, कमळ कीर्तिमुख, मकर, पाने-फळे, वेलबुट्ट्या, घंटा ही शुभचिन्हे मंदिराच्या सुशोभनात वापरलेली आहेत. तेथील दर्पणधारी स्त्रीमूर्ती शिल्पकलेचा सुंदर नमुना आहे. दक्षिण दरवाज्यावर असलेल्या भरत-शत्रुघ्नाच्या डाव्या बाजूस दोन चौघडावाले उंट दाखवलेले आहेत. दक्षिणेकडील मंदिरात उंटाचे शिल्प क्वचितच आढळते. माळव्यात प्रचलित असलेल्या भूमिज उपशैलीचा प्रभाव तेथील काही शिल्पांवर ठळक रीत्या आढळतो. यादव साम्राज्य संपुष्टात आल्यानंतर यवनांकडून महाराष्ट्रातील अनेक मंदिरांची, शिल्पांची नासधूस करण्यात आली. भुलेश्वर मंदिरातील शिल्पांचेही त्या काळात नुकसान झाले.
मंदिराचे गर्भगृह खोल असून गर्भगृहासमोर उंचावर काळ्या दगडातील कोरीव काम केलेला नंदी आहे. नंदीच्या उजव्या बाजूस ओटा असून त्यावर कासवावर बसलेला नंदी असावा. हल्ली त्याचे फक्त डोके शिल्लक असल्यामुळे तो प्राणी कोणता असावा ते कळत नाही. गर्भगृहातील शिवलिंगाच्या संगमरवरी बाणावर पितळी मुखवटा बसवलेला आहे. बाण काढल्यानंतर खाली आत तीन मुख्य लिंगे, तीन कोपऱ्यांत उंचवट्याच्या स्वरूपात असून ती ब्रह्मा, विष्णू व महेश यांची प्रतिके आहेत. पिंडीच्या खाली असलेल्या खोलगट भागात नैसर्गिक रीत्या पाणी पाझरत असते. अन्य शिवमंदिरांपेक्षा भुलेश्वर येथे अनेक वैशिष्ट्ये आढळतात. कीर्तिमुख, उंबरठ्यांच्या मध्यभागी न काढता दोन्ही अंगांस कोरलेली आहेत. गाभाऱ्याच्या गणेशपट्टीवर गणपतीचे चित्र असले तरी देवळाभोवती असणाऱ्या दक्षिणाभिमुख पट्ट्यांवर गणेशाऐवजी भैरवाचे शिल्प कोरलेले आहे. ओवऱ्या व दगड यामध्ये कोरलेल्या खिडक्या यांची एकाआड एक मांडणी केलेली आहे.
मंदिराच्या गाभा-याच्या बाहेरील बाजूस वर तीन सप्तमातृकांच्या समूहात गणेशाचे स्त्रीरूपी दुर्मीळ शिल्प आहे. वेरूळच्या कैलासलेण्यात त्या प्रकारचे शिल्प आढळते. प्राचीन वाङ्मयात व स्कंदपुराणाच्या पंधरा हजार श्लोक असलेल्या काशिखंडात चौसष्ट योगिनींच्या यादीत या गणेशाचा ‘वैनायकी’ असा उल्लेख आढळतो. देवीसहस्त्रनामात त्या देवतेस ‘विनायकी, लंबोदरी, गणेश्वरी’ अशा विशेषणांनी संबोधले आहे. ‘शिल्परत्न’ या ग्रंथात वैनायकीचा उल्लेख ‘शक्तिगणपती’ असा केलेला आहे. गुप्तकाळात प्रथम सप्तमातृका शिल्पाचा उगम झाला. मध्ययुगात शक्तिपूजक संप्रदायात वैनायकी पूजनाचे महत्व वाढले. वैनायकी शिल्पे गजमुख, चतुर्भुज आणि गणपती यांच्याप्रमाणे आयुधे धारण केलेली आढळतात. भुलेश्वर येथील वैनायकी शिल्पे पद्मासनात बसलेली असून सालंकृत आहेत. खाली मूषक हे वाहन आहे. तेथे वेरूळच्या लेण्याप्रमाणे पूर्ण शिल्पपट्टीका नसून तीन सप्तमातृकांच्या शिल्पपट्टीत वैनायकीची शिल्पे आहेत.
भुलेश्वरला पोचण्यासाठी पुणे–सोलापूर महामार्गाद्वारे उरुळी कांचन, लोणी काळभोर मार्गे यवतजवळ यावे. यवतच्या अलिकडे उजवीकडे भुलेश्वर आणि माळशिरस यांच्याकडे जाणारा फाटा आहे. त्या रस्त्याने घाट चढून आठ किलोमीटर गेले, की पठारावर सपाटीकडे जाणारा रस्ता सोडून उजवीकडे चढावर दूरध्वनी मनो-याच्या शेजारीच भुलेश्वराचे मंदिर आहे.
मंदिराच्या आत छायाचित्रणास बंदी आहे. महाशिवरात्रीला तेथे भाविकांची गर्दी होते. पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावातून श्रावण महिन्यात मंदिरात भुलेश्वराची पालखी नेली जाते.
पुरातत्त्व खात्याने ते मंदिर राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.
– आशुतोष गोडबोले
(छायाचित्रे – विकिपिडीया आणि निशिकांत पटवर्धन यांकडून साभार)
उत्तम व संग्रहणीय माहिती
उत्तम व संग्रहणीय माहिती दिलेली आहे. लेख अतिशय आवडला.
नमस्कार, खुप चांगले सदर आहे.
नमस्कार, खुप चांगले सदर आहे.
Comments are closed.