छायाचित्रकार अथर्व दीक्षित या कल्याणमधील (ठाणे जिल्हा) युवकाने त्याच्या अमित बाळापुरकर आणि मयुरेश देसाई या मित्रांसह ‘प्रकृती कला मंच’ संस्थेची स्थापना केली आहे. हौशी कलाप्रेमींना त्यांची कला सादर करता यावी, त्यांना त्यांचे हक्काचे व्यासपीठ मिळावे हा उद्देश संस्था स्थापन करण्यामागे आहे. संस्थेच्या कार्याला छायाचित्रे व चित्रे यांचे एकत्रित असे प्रदर्शन भरवून 2 ऑक्टोबर 2015 पासून सुरुवात करण्यात आली. ते प्रदर्शन ‘गायन समाज’ (कल्याण) येथे तळमजल्यावर मांडण्यात आले होते. त्यामध्ये अठरा नवीन कलाकार सहभागी झाले होते. दीडशेच्यावर चित्रे व छायाचित्रे प्रदर्शनात समाविष्ट होती. प्रदर्शनाचे उद्घाटन शिल्पकार भाऊ साठे यांच्या हस्ते झाले. त्यामध्ये कलाकारांच्या वीस फ्रेमची विक्रीदेखील झाली.
‘प्रकृती कला मंच’ची चार प्रदर्शने तीन वर्षांत झाली आहेत. त्यांपैकी तीन कल्याणमध्ये तर एक डोंबिवली येथे भरवले गेले होते. पहिल्या प्रदर्शनानंतर, ‘प्रकृती कला मंच’ला नवीन कलाकारांचे सहकार्य काही प्रमाणात उत्स्फूर्त मिळू लागले. दुसरे प्रदर्शन 20 ते 22 नोव्हेंबर 2015 पर्यंत आंबेडकर हॉल (डोंबिवली) येथे ठेवण्यात आले. तिसरे व चौथे प्रदर्शनेही पुन्हा कल्याण येथे ‘गायन समाज हॉल’च्या (कल्याण) तळमजल्यावर अनुक्रमे डिसेंबर 2015 मध्ये व जानेवारी 2017 मध्ये भरवण्यात आली. पहिल्या व दुसऱ्या प्रदर्शनांचा विषय निसर्ग हा ठेवण्यात आला होता. तसेच, तिसऱ्या प्रदर्शनासाठी व्यक्तिमत्त्व व जीवनशैली हे विषय होते. चौथ्या प्रदर्शनातील चित्रे व छायाचित्रे यांचे विषय मिश्र होते. त्यात अथर्व दीक्षित यांची थ्रीडी छायाचित्रे प्रामुख्याने होती. मंचाने भरवलेल्या प्रदर्शनांत फोटो, पेंटिंग, स्केचेस पाहण्यास मिळतात. प्रदर्शन भरवण्यापूर्वी थीम ठरवली जाते. निसर्ग, व्यक्तिरेखा इत्यादी विषयांवर जी थीम ठरेल त्यानुसार प्रदर्शनातील फोटो चित्रे असतात. ‘प्रकृती कला मंच’ची स्थापना झाली तेव्हा संस्थेत पाच ते सहा सदस्य होते. त्यांची संख्या तीस झाली आहे.
संस्थेची प्रसिद्धी ही फेसबुकवरील ‘प्रकृती कला मंच’ या पेजद्वारे होते. ‘माऊथ पब्लिसिटी’ही असते. कल्याणडोंबिवलीमधील सर्व वयोगटांतील कलाप्रेमी व कलाकार प्रदर्शनांमध्ये भाग घेऊन त्यांची कला सादर करतात. चाळीस कलाकारांच्या कलाकृती अद्याप मंचावर सादर झाल्या आहेत. संस्था ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर चालू आहे. संस्थेला प्रदर्शनासाठी दोन स्पॉन्सरही मिळाले आहेत. त्यामुळे प्रदर्शनासाठी कमी प्रवेश फी आकारणे शक्य होते.
अथर्व दीक्षित हा कल्याण येथे राहतो. त्याच्या वडिलांनी त्याला त्याचे इंजिनीयरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यावर ‘कॅमेरा घेऊन देऊ’ असे वचन दिले होते. वडिलांनी अथर्वला त्याची परीक्षा झाल्या झाल्या, पहिल्याच आठवड्यात कॅमेरा देऊन वचनपूर्ती केली. तेव्हापासून अथर्वमध्ये फोटोग्राफीची आवड रुजली. त्याला ‘वाईल्ड लाइफ’ फोटोग्राफी करण्यात रस आहे; परंतु ती बाजू खर्चिक असल्याने त्याने फोटोग्राफीचा कल निसर्ग अशा व्यापक विषयाकडे वळवला. त्याने “सह्याद्री इतका विशाल आहे, की तो मानवी नजरेत सारे काही भरून देऊ शकतो” असे मनात निश्चित करून ‘सह्याद्री’वर फोटोग्राफी केली. त्यातून ‘प्रकृती कला मंच’ हे नावही उदयास आले. अथर्व दीक्षित ‘वेब इंडिया 123 (वन टू थ्री)’ या संस्थेतर्फे झालेल्या ऑनलाईन स्पर्धेत ह्यांच्या छायाचित्रांना सलग दोन महिने जीवनशैली या विषयात पहिला क्रमांक मिळाला. तर त्याच्या मध्ये लँडस्केप या विषयावरील छायाचित्रांना ‘वोटर चॉईस’मध्ये जास्त मते मिळाली. अथर्व दीक्षित पाच खासगी क्लासमध्ये इंजिनीयरिंग विषय शिकवतो त्यामुळे अथर्व दीक्षित याच्या छायाचित्रकार व शिक्षक अशा दोन ओळखी निर्माण झाल्या आहेत.
‘प्रकृती कला मंच’तर्फे फेब्रुवारी 2017 पासून चित्रे, भित्तिचित्रे, छायाचित्रे यांचे बेसिक ज्ञान देण्याकरता अभ्यासवर्ग सुरू करण्यात आले आहेत. त्यामध्ये फी कमीत कमी घेण्याकडे कल असतो; परिस्थिती गरीब असल्यास प्रशिक्षण मोफतही दिले जाते. अथर्व दीक्षित फोटोग्राफी संदर्भात कार्यशाळा घेतो. दोन दिवसांची ती कार्यशाळा रोज तीन तास असते. त्यामध्ये बेसिक फोटोग्राफीचे प्रशिक्षण दिले जाते. दीक्षित एक दिवसाचे आउटडोअर फोटोग्राफीचे सत्रही घेतात. सोहळा इवेंट्सने भरवलेल्या फोटोग्राफी स्पर्धेमध्ये साधारण अडीचशे स्पर्धकांतून अथर्व दीक्षित याने काढलेल्या छायाचित्राने प्रथम क्रमांक पटकावला.
अथर्व दीक्षित – 9769298038
supernova.atharva@gmail.com
– नेहा जाधव