अण्णा हजारे यांनी त्यांच्या राळेगण सिद्धी या मूळ गावात पावसाचे नाल्यातून वाहून जाणारे अतिरिक्त पाणी अडवून आणि जमिनीच्या पोटात ढकलून नंतर ते गावातील विहिरींमार्फत शेतीसाठी उपयोगात आणण्याचा धडाकेबंद कार्यक्रम ऐंशीच्या दशकात यशस्वी रीत्या राबवला. त्या उपक्रमामुळे राळेगण सिद्धी गावाचा कायापालट झाला. एका ओसाड दुष्काळग्रस्त गावाचे रुपांतर बहरलेली शेती असणाऱ्या समृद्ध गावात झाले! अण्णांच्या कामापासून स्फूर्ती घेऊन देशामध्ये अनेक गावांत जलसंधारण व ग्रामविकास या कामांची मुहूर्तमेढ रोवली गेली. महाराष्ट्र राज्य सरकारने आदर्श गाव योजना सुरू केली तेव्हा त्या योजनेचे कार्याध्यक्ष अण्णा हजारे हेच होते. परंतु अण्णांची तेथे घुसमट झाली असावी, त्यामुळे त्यांनी त्या पदाचा त्याग केला. अण्णांनंतर कार्याध्यक्षपदाचा कार्यभार त्यांचे पट्टशिष्य पोपटराव पवार सांभाळत आहेत.
मी अण्णांबद्दल बरेच काही वाचले होते, टीव्हीवर पाहिले होते; त्यामुळे प्रसिद्ध व वादळी व्यक्तिमत्त्व असणाऱ्या त्या व्यक्तीला भेटण्यास गेलो, तर प्रत्यक्षात गाठभेट न होता, लांबून ‘देव’दर्शन होईल असे मला वाटत होते. त्यामुळे मी राळेगण सिद्धीला जाण्याचा कार्यक्रम आखला नव्हता. आम्ही दोघे जण जलसंधारणाची कामे पाहण्यासाठी ‘कडवंची’, ‘गावडेवाडी’, ‘जांभरूण महाली’, ‘साखरा’ अशा गावांना भेटी दिल्या आहेत. आम्ही पोपटराव पवार यांच्याशी हिवरेबाजार गावात त्यांना भेटण्यास आणि त्यांचे ग्रामविकासाचे काम पाहण्यास गेलो होतो. तेथे पवार यांच्याशी संभाषणाच्या ओघात कळले, की अण्णा हजारे राळेगण सिद्धीमध्ये आहेत. तेव्हा दुसऱ्या दिवशी त्या गावात जाऊन अण्णांना भेटण्याचे ठरवले.
आम्ही राळेगण सिद्धीला पोचलो. अण्णांचे निवासस्थान शोधणे ही बाब अवघड नव्हती. सरकारने त्यांना ‘झेड’ सुरक्षाकवच दिले आहे. त्यामुळे अण्णांच्या निवासासमोर पोलिसांची मोठी व्हॅन आणि गणवेशधारी पोलिसांचा ताफा सुसज्ज असतो. अण्णा यादवबाबा मंदिरात राहतात. आम्ही आमची माहिती अभ्यागत नोंदवहीत नोंदवली. तेवढ्यात तेथील कार्यकर्त्याने ‘तुम्हाला गाव बघण्यासाठी टॅक्सी हवी काय?’ असे विचारले. आम्ही तत्काळ होकार दिला आणि दुपारी दोन ते पाच अशी तीन तासांसाठी टॅक्सी केली.
अण्णा दहा-पंधरा मिनिटांतच आले. त्यांनी त्यांच्या खोलीत आम्हाला भेटण्यासाठी बोलावले. खोलीमध्ये अण्णा एका सतरंजीवर बसले होते. त्यांच्या उजव्या व डाव्या बाजूंना भेटीसाठी आलेल्या लोकांना बसण्यासाठी सतरंज्या अंथरलेल्या होत्या.
अण्णा- “काय काम काढलेत माझ्याकडे?”
मी उत्तरलो, “काम काही नाही. पंढरीला गेल्यावर जसे विठोबाचे दर्शन घ्यायला जातात, तसे आम्ही तुमचे दर्शन घ्यायला आलो आहोत.”
अण्णा- सगळे लोक सांगतात, की महाराष्ट्रात ऊसाच्या शेतीशिवाय दुसरा किफायतशीर पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध नाही. पण ते बिलकुल खरे नाही. आमच्या गावात एकही शेतकरी ऊस लावत नाही. कोणी कांदा-ज्वारीची पिके घेतात, कोण दुभती गुरे पाळून दुधाचा धंदा करतात. ते सर्व प्रकार किफायतशीर आहेत. ते तशी शेती व शेतीपूरक व्यवसाय करून सुखी जीवन जगत आहेत. तेथील शेतक-यांच्या तीन-चार कोटी रुपयांच्या बँकांत ठेवी आहेत. परंतु ते सारे उघड दिसत असतानाही राज्यातील काही शेतकरी भरमसाट पाणी लागणाऱ्या ऊसाच्या शेतीकडे का वळतात ते मला कळत नाही.
मी – असे मूठभर शेतकरी ऊसाच्या शेतीकडे वळतात म्हणूनच महाराष्ट्रातील शेती तहानलेली आहे आणि शेतीविकासाचा मार्ग जवळपास बंद झाला आहे. राळेगण सिद्धी, हिवरेबाजार, कडवंची अशा शे-पन्नास गावांतील शेतक-यांनी जलसंधारण, पिकांचे योग्य नियोजन या कार्यक्रमांद्वारे उपलब्ध पाण्याचा वापर चांगला करून त्यांनी शेती किफायतशीर केली असली, तरी त्यापासून बोध घेऊन त्याचे अनुकरण करण्याचे प्रयत्न अभावाने झालेले दिसतात.
अण्णा- सगळीकडे सावळागोंधळ आणि भ्रष्टाचार यांचे थैमान सुरू आहे. जलसंधारण व मृद्संधारणाच्या कामांसाठी सरकार वर्षाला शेकडो कोटी रुपये खर्च करते, पण प्रत्यक्ष काम करवून घेणारे अधिकारी त्यांची कामे चोखपणे करत नाहीत. उदाहरणार्थ, नाल्यांमधील पावसाचे पाणी जमिनीच्या पोटात ढकलण्यासाठी नाले खोल करताना मुरुमाचा थर संपेपर्यंतच खोदकाम केले जाते आणि दगडाचा थर लागला व काम कष्टप्रद झाले, की खोदकाम थांबवले जाते. पावसाचे पाणी असे वरवरचे काम करून जमिनीत खोलवर मुरणार कसे? खोदकाम केलेल्या जागेवर दगडांची मोठी रास दिसली, तरच खोलीकरणाचे काम समाधानकारक झाले आहे असे म्हणता येईल. अन्यथा, नाले खोल करण्यासाठी खर्च केलेले पैसे वाया गेले असेच म्हणायला हवे. पण तो मापदंड कोणी वापरत नाही. मी त्या संदर्भात बरीच ओरड केली, पण सरकार व नोकरशाही यांनी त्याची जराही दखल घेतली नाही. आमच्या राळेगण सिद्धी गावाजवळच्या एका गावात माझ्या देखरेखीखाली जलसंधारणाचे काम सुरू आहे. ते काम कसे होते, ते पाहा. मी तसे वरवरचे काम खपवून घेणार नाही.
भ्रष्टाचाराचे थैमान सर्व ठिकाणी सुरू आहे. रोजगार हमी योजनेच्या कामांची पगाराची पत्रके पाहा. मजुरी मिळालेल्या मजुरांनी सही करण्याच्या जागी अंगठे उठवलेले दिसतात. महाराष्ट्रातील लोक सही न करता येण्याएवढे अशिक्षित निश्चित नाहीत. पण सगळ्या मजुरांनी सही करण्याऐवजी अंगठे उठवलेले दिसतात. असे होण्यामागचे एकमेव कारण भ्रष्टाचार! नोकरशहांनी पगारपत्रकांवर अंगठे उठवून घेऊन पैसे हडप करण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. ते गा-हाणे सरकार दरबारी नेले, तर दखल घेण्यास कोणाकडे वेळ नाही!
आमची बैठक रंगात आली होती, पण त्याच वेळी अण्णांकडे गा-हाणी घेऊन आलेली माणसे आमचे बोलणे कधी संपते यांची वाट पाहत होती. तेव्हा मी अण्णांना निरोपाचा नमस्कार केला आणि आम्ही खोलीबाहेर आलो. अण्णांना भेटण्यासाठी बाहेरगावच्या मंडळींची सदैव वर्दळ असल्यामुळे तशा लोकांची भूक भागवण्यासाठी एक छोटे उपाहारगृह जवळच सुरू आहे. तेथे जाऊन जेवलो. तेवढ्यात टॅक्सीवाल्याचा फोन आला, की टॅक्सी मिळणार नाही; टॅक्सीऐवजी रिक्षा मिळू शकेल. आम्ही त्याचे आभार मानले आणि गावात पायी फेरफटका करण्याचा निर्णय घेतला. गावातील रस्ते दृष्ट लागावी असे स्वच्छ होते. घरे पक्की व टुमदार होती. कोठेही सांडपाण्याचे ओघळ दिसत नव्हते. गावातील लोक आरोग्यदायी जीवनमान अनुभवत होते.
जलसंधारण, ग्रामविकास आणि भ्रष्टाचारनिर्मूलन यांचा ध्यास घेतलेली अण्णांसारखी दुसरी व्यक्ती माझ्या तरी पाहण्यात नाही. अण्णा ग्रामविकासाचे काम करताना नशाबंदी, नसबंदी, कु-हाडबंदी, चराईबंदी आणि श्रमदान या पाच सूत्रांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात कमालीचे आग्रही आहेत. त्यामुळे त्यांच्या गावात पानसुपारीची एकही टपरी नाही. आजच्या वातावरणात तशी कामगिरी म्हणजे मोठा पराक्रमच म्हणायला हवा!
मी राळेगण सिद्धी वगळता इतर पाच गावांना जलसंधारणाची व ग्रामविकासाची कामे पाहण्यासाठी भेटी दिल्या. त्यांतील तीन गावांमधील कामांचा शुभारंभ अण्णांनी केला आहे. अण्णांनी एवढे मूलगामी काम केले असले आणि त्याचा बोलबाला देशभर झाला असला, तरी त्यांच्या बोलण्यात अहंकाराचा लवलेश नाही. ते त्यांच्या भ्रष्टाचारनिर्मूलनाच्या लढ्यामुळे देशातील तरुण-तरुणींचे लाडके नेते बनले होते. त्यांच्या बोलण्याला राजकारणाचा वास येत नाही. त्यांच्याकडे पाहिले, की ती एक साधीभोळी कर्मयोगी व्यक्ती असल्याची खूणगाठ क्षणार्धात पटते.
‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन’ या ख्यातनाम संस्थेच्या प्रोफेसर श्रीमती आशा कपूर-मेहता आणि त्या संस्थेच्या एक अधिकारी श्रीमती तृष्णा सत्पथी या दोन अभ्यासकांनी राळेगण सिद्धी या गावाच्या परिवर्तनाचा आढावा विस्तृत घेतला आहे. अण्णा हजारे यांनी दारिद्य्रनिर्मूलनाचे व नवसमाजनिर्मितीचे काम कसे यशस्वी केले आहे, हे दाखवणारा त्या दस्तऐवजातील सत्तेचाळीस पानांचा प्रदीर्घ लेख वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्या लेखामध्ये अण्णांनी गावाच्या आर्थिक उन्नतीबरोबर जातिभेद नष्ट करण्यासाठी, गावातील गरिबांना मदतीचा हात देण्यासाठी गावातील तरुण मंडळाच्या सहकार्याने कशी यशस्वी वाटचाल केली त्याचे सुरेख वर्णन आहे. तसेच, सुमारे दोन हजार तीनशे वस्ती असणाऱ्या त्या छोट्या गावात सुमारे बाराशे पटसंख्या असणारी बारावीपर्यंत शिक्षण देणारी चांगली शाळा उभारण्याचे श्रेय अण्णांना द्यायला हवे. अण्णा स्वत: फारसे शिकलेले नाहीत, परंतु त्यांना नव्या पिढीला दर्जेदार उच्च शिक्षण मिळाले पाहिजे असे वाटते. त्यामुळेच दर्जेदार शिक्षण देणारी शाळा त्यांच्या गावात लोकसहभागातून उभारण्यात आली आहे. बाहेरगावची नाठाळ व नापास होणारी मुले त्या शाळेत शिकण्यासाठी येतात आणि ती तेथे येताच सुतासारखी सरळ होऊन अल्पावधीत त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून, चांगले नागरिक बनून त्यांच्या त्यांच्या गावी परत जातात.
अण्णांनी राळेगण सिद्धीमधील जातिभेदाची दरी नष्ट करण्यासाठी गावकुसाबाहेरील अस्पृश्य कुटुंबांना थेट त्यांच्या निवासस्थानाजवळ- यादवबाबा मंदिराजवळ वसवले; गावात सवर्ण आणि दलित यांचे विवाह एकाच मांडवात आणि एकाच मुहूर्तावर करण्याचा पायंडा पाडला; गावजेवणामध्ये अस्पृश्य व सवर्ण एका पंगतीत जेवतात. तेवढेच नाही, तर स्वयंपाक करण्याच्या कामात अस्पृश्यांचा सहभाग असेल याची खातरजमा केली जाते. एका खेडेगावात असे बदल घडवून आणणे म्हणजे सामाजिक क्रांतीच होय!
एकदा गावातील काही गरीब दलित शेतक-यांनी त्यांच्या शेतीचा विकास करण्यासाठी शेतजमीन गहाण ठेवून बँकेकडून कर्ज काढले, परंतु काही कारणामुळे त्या कुटुंबांना शहरामध्ये मजुरीसाठी स्थलांतर करावे लागले. तेव्हा त्या कुटुंबांनी त्यांची शेतजमीन दुसऱ्या शेतकऱ्याला कसण्यासाठी दिली. त्या दुसऱ्या शेतकऱ्याने त्याच्यावर सोपवलेले काम चोखपणे केले नाही. परिणामी, कर्जाचे हप्ते तुंबले आणि बँकेने गहाण ठेवलेल्या जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी कारवाई सुरू केली. अण्णांना ती गोष्ट कळताच त्यांनी गावच्या तरुण मंडळावर ती शेती ताब्यात घेऊन ती नीट पद्धतीने कसण्याचे फर्मान सोडले. तसेच, बँकेला त्यापुढे कर्जाचे हप्ते फेडण्याचे आश्वासन दिले. बँकेने सुरू केलेली कारवाई थांबवली. तरुण मंडळाने परिश्रम करून शेती किफायतशीर केली व कर्जाची सव्याज परतफेड केली. तेवढे झाल्यावर, अण्णांनी ती शेते मूळ मालकांकडे सुपूर्द केली आणि भविष्यात व्यवहार करताना काळजी घेण्याचा सल्ला दिला.
अण्णा काही गोष्टींसंदर्भात फारच आग्रही आहेत. उदाहरणार्थ गावातील कोणत्याही व्यक्तीने नशापाणी केल्यास अण्णांचे पित्त खवळते आणि तरुण मंडळाच्या मदतीने अण्णा त्या व्यक्तीला चौदावे रत्न दाखवतात. तसेच, लोकांनी टीव्ही पाहण्यात, सिनेमा पाहण्यात वेळ घालवू नये असे अण्णांना वाटते. त्यामुळे राळेगण सिद्धी गावात तुम्हाला टीव्ही दिसणार नाही. थोडक्यात, त्या गावात अण्णांचे अधिराज्य आहे. राळेगण सिद्धी गावाच्या वाटचालीचा मागोवा घेणारे डॉक्टर रमेश अवस्थी या अभ्यासकाची ही निरीक्षणे आहेत. कोणाला ती अण्णांची हुकूमशाही वाटेल.
चार-सात इयत्ता शिकलेल्या माणसाने त्याचे आयुष्य सर्वस्वाचा त्याग करून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी खर्ची घातलेले दुसरे उदाहरण सापडणार नाही. त्यांनी त्यांचा भविष्यनिर्वाह निधी, ग्रॅच्युइटी, सरकारकडून मिळालेली दहा एकर जमीन- अशा सर्व गोष्टी गावाला अर्पण केल्या आहेत. त्यांची संपदा एका छोट्या ट्रंकेत मावतील एवढे कपडे एवढीच आहे. अण्णांसारखे व्रतस्थ जीवन जगणे, ही गोष्ट सोपी नाही. त्यांच्यासारखे जलसंधारणाचे व ग्रामविकासाचे काम करणारे लोक इतरत्र सापडतील; परंतु एखाद्या गावाचे मुळापासून परिवर्तन करणारे उदाहरण कितीही शोध घेतला तरी सापडणे शक्य नाही. अण्णांच्या त्या कामगिरीसाठी त्यांना सलाम करायला हवा.
– रमेश पाध्ये
Nice information
Nice information
Comments are closed.