अचलपूरच्या जीवनपुरा भागातील बालाजी मंदिर उत्सवात समारोपाला सादर होणारे राम अवतार व त्राटिका वध हे ‘नाट्य’ त्या उत्सवाची खासीयत मानली जाते. त्या परंपरेस नऊशे वर्षे 2018 साली पूर्ण झाली. लोटांगणे घालण्याची परंपराही बालाजी मंदिरात आहे. भाविक-भक्त मंदिरापासून एक किलोमीटर दूर असलेल्या सर्पीण नदीच्या पात्रापर्यंत लोटांगणे घालत जातात…
जीवनपुरा भागातील राम अवतार व त्राटिका वध हे नाट्य सादरीकरण व लोटांगण; तसेच, देशपांडे वाड्यातील नृसिंह जन्म नाट्य सादरीकरण, केशव नारायण मंदिर यात्रा, नागपंचमीची मिरवणूक यात्रा अशा काही परंपरा अचलपूरला अखंडपणे सुरू आहेत. त्यापैकी एक म्हणजे अचलपूरच्या जीवनपुरा भागातील राम अवतार, त्राटिकावध व लोटांगण हे तिन्ही कार्यक्रम अश्विन महिन्यात बालाजी उत्सवात सादर होत असतात. त्या परंपरेस नऊशे वर्षे 2018 साली झाली. बाराव्या शतकात गनु टाकसाळ नावाची व्यक्ती जवळच, बोरगाव पेठच्या मंदिरात गेली. त्यावेळी त्यांचा फेटा पडला. ते नाणी पाडण्याचे काम करायचे. त्यांना फेटा पडला म्हणजे अपशकून वा अपमान झाला असे वाटले. त्यांनी त्याविषयी मंदिरातील पुजाऱ्याला विचारले. पुजाऱ्यांनी त्यांना तसेच एक मंदिर तुमच्या गावाला बांध, उत्सव सुरू कर व त्या मंदिरात फेटा परत बांध असे सुचवले. पुजाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, टाकसाळ यांनी जीवनपुरा-अचलपूर येथे बालाजी मंदिर बांधले. त्यांनी फेटा बांधून बोरगाव पेठच्या मंदिराप्रमाणे सर्व उत्सव तेथे सुरू केले. अशी या परंपरेमागील कथा बालाजी मंदिराच्या संदर्भात तेथील पुजारी, तसेच स्थानिक ज्येष्ठ व्यक्ती सांगतात!
बालाजी उत्सव अश्विन महिन्यात नऊ ते दहा दिवस साजरा केला जातो. त्यातील समारोपाचे नाट्य ही त्या उत्सवाची खासीयत मानली जाते. एरवी, दररोज पालखी, भजन, आरती असे सुरू असते. समारोपाला सकाळी राम अवतार व त्राटिका वध हे ‘नाट्य’ घडते. त्यापूर्वी तेथे हनुमान व गरुड यांचे मुखवटे धारण केलेले कलाकारही आलेले असतात. तेव्हाच प्रदक्षिणा असते. ती प्रदक्षिणा हनुमान, गरुड, दोन हत्ती यांच्यासह पंचायतन असलेली पालखी घेऊन संपूर्ण मंदिराला ढोलकी, टाळ या वाद्यांच्या घोषामध्ये भाविक-भक्त करत असतात. त्या पालखीतील पंचायतन मूर्तिशिल्पातील गरुड, हनुमंत, हत्ती, घोडा व श्री मूर्ती अतिशय सुंदर आहेत. मंदिरात बालाजी मूर्ती; तसेच, राम-लक्ष्मण-सीता यांचीही मूर्ती आहे. मंदिरात एक ताम्रपट असून त्यावर दशभुज हनुमंत कोरलेला आहे; सर्वांगावर विविध मंत्रांसहित काही शब्द देवनागरी लिपीत कोरलेले आहेत. त्याचा अभ्यास पुरातत्त्वीय दृष्टिकोनातून केल्यास त्या लिहिलेल्या शब्दांचा उलगडा होऊ शकतो. शिवाय, एक पितळी बिल्ला आहे. तो पितळी बिल्ला मंदिराच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेणाऱ्याच्या कमरेला लावला जात असे.
विश्वामित्र ऋषी दशरथ राजाकडे, राम-लक्ष्मण यांना यज्ञाचे रक्षण करण्याकरता येण्याची विनंती करतात. राम-लक्ष्मण विश्वामित्र ऋषींच्या विनंतीला मान देऊन त्यांच्याबरोबर जातात. यज्ञस्थानी, त्राटिका ऋषिमुनींना त्रास देते, तेव्हा प्रभू श्रीराम बाण मारून तिचा वध करतात. त्यामुळे ऋषिमुनींचे यज्ञ निर्विघ्नपणे पार पडतात. रामायणातील त्या प्रसंगाचा देखावा मंदिराबाहेर सकाळी पाच वाजता सादर करतात. राम-लक्ष्मण उभे असतात आणि विश्वामित्र पँट घालून यज्ञाचे रक्षण करतात. पूर्वी, ते धोतर घालून असायचे, पण ‘राक्षस’रूपी प्रेक्षक त्यांचे धोतर-उपरणे काढून टाकत; त्यावर उपाय म्हणून विश्वामित्रांनी पँट घालून नाट्य सादरीकरणास सुरुवात केली. त्राटिका तोंडात मोठी काठी घेऊन येते, या काठीच्या दोन्ही बाजूंना मशाली पेटवलेल्या असतात. यज्ञ करणाऱ्या ऋषिमुनींना ती त्रास देते, हे पाहून प्रभू श्रीराम तिचा वध करतात. शेवटी त्राटिका खाली पडते. तो देखावा ढोल, डफ या वाद्यांच्या गजरात पंधरा ते वीस मिनिटे चालतो. तोवर त्राटिकेची भूमिका करणारा कलाकार युद्ध करून थकलेला असतो. तो शांतपणे निपचित पडतो. अशा प्रकारे तो कलाकार अंगात संचारलेल्या- त्यात मुखवटा घातलेल्या त्राटिकेच्या भूमिकेतून बाहेर पडतो. नंतर सर्व भाविक-भक्त मंदिरात येऊन बालाजीची आरती करतात. उत्सव प्रसाद वितरणाने त्या दिवसापुरता संपतो.
लोटांगणे घालण्याची परंपरा बालाजी मंदिरात आहे. तो विधी दुसर्या दिवशी सूर्योदयापासून होतो. भाविक-भक्त मंदिरापासून एक किलोमीटर दूर असलेल्या सर्पीण नदीच्या पात्रापर्यंत लोटांगणे घालत जातात. काहींचे नवस असतात, तर काही उत्तम आरोग्यासाठी, तर काही भक्तिभावाने लोटांगणे घालतात. लोटांगणे घालणाऱ्या भाविक-भक्तांची रांग लागते. ‘गोविंदा गोविंदा वेंकटरमणा गोविंदा’ असा बालाजीचा नामघोष मंदिरात चालू असतो. लोटांगणे घालणाऱ्यांच्या बाजूने त्यांचे आप्तस्वकीय त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बाजू बाजूने चालत असतात. ते तसे चालत असताना लोटांगणे घालणाऱ्यांच्या अंगांवर फुलाने गोमूत्र शिंपडतात. एक किलोमीटरचा लोटांगण मार्ग आदल्या दिवशीच स्वच्छ करून काही अंतरापर्यंत त्यावर चटयाही पसरलेल्या असतात. पुढे मात्र दगडगोट्यांचा मार्ग असतो. भक्त त्यावरून नदीपात्रापर्यंत लोटांगणे घालत जातात. काही स्वयंसेवकांची ‘सेवा’ वेगळ्याच तऱ्हेची असते. ते नदीच्या पात्रात लोटांगणकर्त्यांना उठून बसवणे, हार घालून त्यांचे अभिनंदन करणे अशा प्रकारच्या ‘सेवे’त गुंतलेले असतात. लोटांगणकर्त्या पुण्यवान व्यक्तीस नमस्कार करण्याचाही प्रघात आहे. तेथून सगळे उत्साहाने परत मंदिरात दर्शनाला येतात. लोटांगणे घालण्याच्या या प्रक्रियेत, विशेषतः तरुण वर्ग जास्त उत्सुक असतो. अशाच लोटांगणाची प्रथा सुलतानपुरा मंदिरातही आहे.
– अनुपमा खवसे 9420235506, 8999141901anukhawase29@gmail.com
——————————————————————————————————————————