आचार्य भागवत – लोकांतातील एकांत (Acharya Bhagwat – Gandhi Thinker)

0
366

आचार्य भागवत हे त्यांचा एकांत सत्यनिर्भय वृत्तीसेवाभावसत्याग्रही समाजवादअहिंसानैतिकता या जीवनमूल्यांवर दृढ निष्ठा ठेवून लोकांतात जपत ! ते मानवतेवर प्रेम करत अलिप्तपणे जगले. त्यांनी साहित्याभिरुची जपली. ते मित्र-नातेवाईक-परिवार यांच्याशी जोडलेले राहिलेपण कशातही गुंतून पडले नाहीत...

आचार्य भागवत म्हणजेच सखाराम जगन्नाथ भागवत. त्यांचा जन्म 26 एप्रिल 1903 रोजी महाड येथे झाला. ते गांधीवादी विचारसरणी स्वतःच्या प्रज्ञेत आणि आचरणात पुरेपूर मुरवलेले विचारवंत होते. त्यांनी लोकशिक्षण हे ध्येय ठेवून आयुष्यभर अध्यापन, व्याख्याने, वैचारिक चर्चा यांद्वारे आदर्श जीवनपद्धतीचा पुरस्कार केला. भागवत यांच्या विचारांत सुस्पष्टता होती. त्यांचा महत्त्वाचा विशेष म्हणजे विचारातील स्वागतशीलता आणि रसिकता. गांधीवादी विचारसरणी म्हटले, की चाकोरीबद्ध रुक्ष जीवनशैली आठवते- खादीचे कपडेहातसडीच्या तांदळाचा भातगाईचे दूध-तूपचमचमीत पदार्थ वर्ज्यकाव्यसंगीतनाटक इत्यादी कलांपासून कोसो दूर असा समज असतो. पण भागवत हे त्याला अपवाद होते. ते केशवसुत यांच्यापासून मर्ढेकर यांच्यापर्यंतच्या मराठी काव्याचा आस्वाद अभ्यासपूर्ण रसिकतेने घेत. त्यांना त्यांचा स्वतःचा प्रपंच नसला तरी ते प्रापंचिकांच्या घरात सहजतेनेआपुलकीने वावरत. ते गृहिणीला त्रास होऊ नये याविषयी दक्ष असत. त्यांचा आग्रह विशिष्ट खाण्यापिण्याचा नसे. ते साहजिकच मुलाबाळांच्या कुटुंबात सामावले जात.

आचार्य मूळचे गरीब कुटुंबातील. त्यांनी त्यांच्या वडिलांजवळ घरीच शिक्षण सुरुवातीला घेतले आणि एका वर्षात तीन इयत्ता करून महाडच्या मिशनरी शाळेत आठव्या इयत्तेत प्रवेश घेतला. ते मॅट्रिक 1920 मध्ये झाले. त्यांनी नातलगांच्या आधाराने मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यापूर्वी त्यांचा विवाह झाला होता. त्यांनी असहकारितेच्या चळवळीची हाक आल्यावर शिक्षणाला रामराम ठोकला आणि ते महाडच्या राष्ट्रीय शाळेत संस्कृत, मराठी हे विषय शिकवू लागले. त्यांनी त्या शाळेत अध्यापन 1921 ते 1926 या काळात केले. ते शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांच्या नाशिकच्या मठातील संस्कृत विद्यापीठात विद्यार्थी म्हणून गेले. तेथे त्यांना केशव लक्ष्मण दप्तरी या विद्वान मुख्याध्यापकांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

आचार्य भागवत यांनी पुण्याला टिळक महाराष्ट्र विद्यापीठात शिक्षक म्हणून काम 1927 मध्ये सुरू केले. आचार्य शं.द. जावडेकर हेही त्या विद्यापीठात कार्यरत होते. त्या दोघांनी जोडीने अनेक वैचारिक उपक्रम महाराष्ट्रात केले. आचार्य भागवत यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठात मराठी साहित्याच्या बरोबर तर्कसंग्रह, सांख्यकारिका या विषयांचेही अध्यापन तीन वर्षे केले. ते 1930 च्या राष्ट्रीय चळवळीत पडले. ते कुलाबा जिल्हा सत्याग्रह मंडळाचे प्रमुख होते. त्यांना एक वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा पेण येथील सत्याग्रहात भाग घेतल्याबद्दल झाली. त्यांना त्रिचनापल्ली, येरवडाबेळगाव येथे तुरुंगवास 1930 ते 1943 या काळात घडला. त्यांना तुरुंगात साने गुरुजीरावसाहेब पटवर्धन, एस.एम. जोशी यांचा आणि महात्मा गांधी यांचासुद्धा सहवास मिळाला.

आचार्य भागवत यांना साने गुरुजींची आंतरभारतीची कल्पना फार आवडली. आचार्य भागवत आंतरभारती संस्थेचे पहिले अध्यक्ष 1952 मध्ये झाले. भागवत यांची कुलपती म्हणून नेमणूक गारगोटी येथील मौनी विद्यापीठात झाली. विद्यापीठ शिक्षणतज्ज्ञ जे.पी. नाईक यांच्या पुढाकाराने आणि भागवत, जावडेकरशंकरराव देव या तीन आचार्यांच्या मार्गदर्शनाने सुरू झाले होते. ते प्रकृतीच्या कारणास्तव घटप्रभेला जाऊन राहिले. ते सासवड येथील आश्रमातही काही काळ राहिले होते.

निकोप साहित्यदृष्टीरसिकतासुसंस्कृततासेवाभाव ही भागवत यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती. बा.सी. मर्ढेकर यांच्यावर, त्यांच्या काही कविता अश्लील असल्याचा आरोप ठेवून मुंबई सरकारने 1951 मध्ये खटला भरला तेव्हा आचार्य भागवत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. त्यांनी न्यायालयात मर्ढेकर यांचा बचाव करणारी प्रभावी साक्ष दिली आणि मर्ढेकर यांची मुक्तता झाली. भागवत यांचा मराठी व संस्कृत या विषयांचा अभ्यास तर होताच; पण ते बंगाली, कन्नड, उर्दू या भाषाही शिकले होते. त्यांनी त्यांचे मित्र विनायक गोखलेजावडेकरशंकरराव देव या तिघांची त्यांच्या आजारपणात मनोभावे सेवाशुश्रूषा केली. त्यांचा तो सेवाभाव विलक्षण वाटतो.

 भागवत यांचा भर व्याख्यानेवैचारिक चर्चासंवाद यांवर असे. त्यांनी ग्रंथलेखन फारसे केले नाही, पण काही ग्रंथांना सुंदर प्रस्तावना लिहिल्या. त्यात जावडेकर यांचा आधुनिक भारत हा ग्रंथ, मंगेश पाडगावकर यांचा धारानृत्य हा काव्यसंग्रह व प्रॉफेट हा अनुवादित ग्रंथ अशांचा समावेश आहे.

 ते त्यांचा एकांत सत्यनिर्भय वृत्तीसेवाभावसत्याग्रही समाजवादअहिंसानैतिकता या जीवनमूल्यांवर दृढ निष्ठा ठेवून लोकांतात जपत ! ते मानवतेवर प्रेम करत अलिप्तपणे जगले. त्यांनी साहित्याभिरुची जपली. ते मित्र-नातेवाईक-परिवार यांच्याशी जोडलेले राहिले, पण कशातही गुंतून पडले नाहीत. त्यांनी विरागी वृत्ती जोपासली होती. ती त्यांच्यात संत साहित्याच्या संस्कारांतून आलेली होती. सगळ्यात असूनही कशात नसणे हे तिचे लक्षण होते. त्यांनी अखेरचा श्वास 8 जानेवारी 1973 रोजी पुणे येथे घेतला.

– मेधा सिधये 9588437190

———————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here