अचलपुरात जयपूरच्या राजा मानसिंग यांची समाधी

1
160

माणसाचे आयुष्य त्याला कोठे घेऊन जाईल, काहीच सांगता येत नाही. सम्राट अकबराच्या काळात मुघल साम्राज्याचा विस्तार करण्यात ज्या राजा मानसिंग यांचा सिंहाचा वाटा होता, त्या मानसिंग यांच्या आयुष्याची अखेर विदर्भातील अचलपूर या एका छोट्या शहरात झाली. मानसिंग अकबराच्या नवरत्नांपैकी एक मानले जातात. त्यांनी अमरावती जिल्ह्यातील अचलपूरमध्ये 6 जुलै 1614 मध्ये अखेरचा श्‍वास घेतला. राजा मानसिंग यांच्या समाधीचा शोध मागील शतकाच्या पूर्वार्धात लागला. ती समाधी शहरालगतच्या एका शेतात जवळपास तीनशे वर्षांपेक्षा अधिक काळ पडक्या अवस्थेत होती. जयपूरचे राजे सवाई मानसिंग (दुसरे) यांनी पाठवलेल्या मदतीतून 1935 मध्ये समाधीभोवती दगडी चौथरा बांधण्यात आला.

राजा मानसिंग यांनी अकबराचे साम्राज्य देशभर काबूलपासून बंगाल, ओरिसा आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत सर्वत्र विस्तारले. त्यासाठी पराक्रमाची शर्थ केली. त्यांच्या आयुष्याची कहाणी विलक्षण आहे.

मानसिंग 21 डिसेंबर 1550 रोजी जन्मले. त्यांचे बहुतांश आयुष्य हे रणभूमीवर गेले. त्यांनी आयुष्यात कोठलीही लढाई हरली नाही असा लौकिक त्यांचा होता. राजा मानसिंग हे अकबराचे सर्वात पराक्रमी सेनानी मानले जातात. महाराणा प्रताप यांच्या विरूद्धच्या हल्दी घाटीच्या गाजलेल्या लढाईत मुगल सैन्याचे नेतृत्व राजा मानसिंग यांनीच केले होते. राणा प्रताप यांच्या अतुलनीय शौर्याने गाजलेली ती लढाई इतिहासाच्या पानांमध्ये अजरामर झाली आहे. त्या लढाईनंतर तीन वर्षांतच मानसिंग हे जयपूरचे राजा झाले. त्यानंतर काही काळातच, काबूलमध्ये काही सरदारांनी अकबराविरूद्ध बंड पुकारले. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी राजा मानसिंग यांनाच पाठवण्यात आले होते. अकबराचा मृत्यू 1605 मध्ये झाला. त्यानंतर राजा जहांगीर हा नवीन सम्राट झाला.

त्या नंतरच्या दरबारी राजकारणात मानसिंग यांच्याविरुद्ध अनेकांनी जहांगीर यांचे कान भरले. मानसिंग हे बंड करून त्यांचे साम्राज्य उलथून लावू शकतात हा विरोधकांचा मुख्य दावा होता. त्यामुळे जहांगीरने मानसिंग यांना राजधानीपासून दूर ठेवले. त्यांनी मानसिंगांचे प्रभावक्षेत्र कमी केले. त्यांचे अनेक निर्णय फिरवले. त्यांची बंगालची सुभेदारी 1606 मध्ये काढून घेण्यात आली. त्यांच्या जागेवर कुतुबुद्धीन खान याला बंगालचा सुभेदार करण्यात आले.

दक्षिणेत मलिक अंबरने मुघल साम्राज्याला आव्हान 1611 मध्ये दिले, तेव्हा मलिक अंबर याचा बंदोबस्त करण्यासाठी राजा मानसिंग यांची रवानगी अहमदनगर आणि खानदेश या दोन प्रदेशांत करण्यात आली. मलिक अंबरसोबत संघर्ष जवळपास तीन वर्षे चालला. ती मोहीम फत्ते केल्यानंतर उत्तरेतील सुभेदारीकडे परतताना विदर्भातील अचलपूर येथे मुक्कामी मानसिंग यांचा नैसर्गिक मृत्यू झाला. त्यावेळी त्यांचे वय त्रेसष्ट होते. मानसिंग यांची छावणी ज्या ठिकाणी होती तेथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तेथे समाधी स्वरूपात एक दगड रोवण्यात आला. त्यानंतर जवळपास तीनशे वर्षे मानसिंग यांच्या समाधीची कोणालाही आठवण नव्हती. काही इतिहासप्रेमींनी जयपूर राजघराण्यासोबत पत्रव्यवहार विसाव्या शतकाच्या पूर्वाधार्त केला. त्यानंतर तेव्हा सवाई मानसिंग (दुसरे) जयपूरचे राजे होते. त्यांनी समाधीच्या जीर्णोद्धारासाठी एका दूतासोबत काही रक्‍कम पाठवली. त्या पैशांतून समाधीला दगडी चौथरा बांधण्यात आला. त्या चौथऱ्यावर मंदिररूपी घुमडी उभारण्यात आली. तेव्हापासून समाधीवर नियमित दिवाबत्ती व नैवैद्य दाखवण्यासाठी जयपूर राजघराण्याकडून एका पुजाऱ्याची नेमणूक करण्यात आली. लालबहादूर ठाकूर यांनी ती जबाबदारी अनेक वर्षे सांभाळली. त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा सुरेशसिंग ठाकूर ती जबाबदारी सांभाळत आहे. त्यांना अठराशे रुपये मानधन आणि दिवाबत्ती आणि साफसफाई यासाठी पंधराशे रुपये नियमित पाठवले जातात. मात्र कोरोनाकाळात त्यात अनियमितता आली असे ते सांगतात.

अविनाश दुधे 8888744796 avinashdudhe777@gmail.com

———————————————————————————————————————————

About Post Author

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here