होलार समाजाचे वाजप

12
114
carasole

सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यातील सदुसष्ट गावांत होलार समाजाची सत्तावीस हजारांच्या आसपास लोकसंख्या आहे. वाद्ये वाजवणे हा होलार समाजाचा पारंपरिक व्यवसाय. वाद्य याला समानार्थी बोलीभाषेतील शब्द वाजप असा आहे. अलगूज, सनई, सूर, सुंद्री आणि डफ ही त्यांची पारंपरिक वाद्ये तर झांज, ताशा, ढोल बॅण्ड, बँजो हे वाजपाचे आधुनिक साहित्य होय. सनई, सूर वाजवणाऱ्या पार्ट्या तालुक्यात तीसपेक्षा अधिक आहेत.

अलगूज म्हणजे पावा, मुरली अथवा बासरी. होलार समाजातील काही कलाकार चाळीस वर्षांपूर्वी बासरीवादन करत होते. बासरीचे मंजुळ ध्वनी वातावरणात चैतन्य पसरवतात; त्यातून गंभीर स्वरही काढले जातात. बासरीवादन कलेस म्हणावी तेवढी मागणी नसल्यामुळे ते वादन काळाच्या ओघात मागे पडले. तालुक्यात अलगूजवादन तर फारच दुर्मीळ दिसून येते.

सनई  हे मंगलवाद्य आहे. तालुक्यातील लोक आठ बोटी आखूड सनई वाद्यासाठी सर्रास वापरतात. हळद, लग्न, यात्रा, जत्रा, घोड्यांचा नाच, गजढोल नृत्य इत्यादी कार्यासाठी सनईवादन होते. गण, गौळण, पोवाडा, भारूड, अभंगरचना, हिंदी-मराठी चित्रपट गीतांचा समावेश सनई वादनात असतो. त्यामध्ये तबला व सूर यांच्या साथीने ताल व नाद निर्माण होतो. सनईच्या स्वरातून प्रत्यक्ष आवाज बाहेर पडत असल्याचा भास होतो. संवेदना जागृत झाल्याने पूर्वी ऐकलेल्या गीतांची रचना समोर उभी राहते. त्यामुळे पूर्वानुभूती पुनरुज्जीवित होते. सनईचे मंगल स्वर कानात साठले, की मान डोलू लागते, हातपाय थिरकू लागतात. त्यामुळे आनंदाचा आविष्कार घडतो. सनईवादन करणाऱ्या कलाकारांपैकी काहींना तोडी, शिवरंजनी, मालकंस, भूप, यमन, मेघ या शास्त्रीय रागांचे ज्ञान आहे तर निरक्षर कलाकारांना स्वर सांगता येत नाहीत. केवळ ऐकिवेतून ते विविध स्वर काढतात हे त्यांचे विशेषत्व नोंदवता येते.

सूर हे सनईवादन चालू असताना आधार स्वर म्हणून वाजवले जाणारे वाद्य. त्या वाद्यामध्ये अखंड फूंक ठेवून आधारस्वर सतत गुंजत ठेवला जातो. सूर वाद्याची लांबी तीन फूटांपर्यंत असते. रंग काळसर असतो. ते वाद्य खालच्या टोकाला टाळाच्या आकाराचा गोल तर वरच्या टोकाला साधारणपणे निमुळते होत गेलेले असते.

सुंद्री हे सनईसारखे दिसणारे पण वेगळे जुने वाद्य आहे. ते ओठांनी फुंकून वाजवण्याचे म्हणजे ओष्ठस्वनित असे सनईसदृश वाद्य आहे. त्याची लांबी एक वीतभर असते. सुंद्रीतून सनईसारखे स्वर निघतात. सुंदरीची रचना व वादन पध्दती सनईसारखीच असते. सनईच्या दुप्पट वरच्या सप्तकात वाजणारी सुंदरी वीतभर लांबीची असून हिचा कर्णा धातूचा असतो. दोन पत्तींच्या (वाजत्या जिव्हाळ्या) मुखवीणा वाद्यवर्गात सुंदरीचा समावेश होतो. मुखवीणा सामान्यत: दुसऱ्या टोकाला काहीशी रुंदावत गेलेली लांब नळी असते. सुंदरी वाद्यात ही नळी २५ सेंटीमीटर लांब असते. तिच्यावर स्वरांसाठी सात छिद्रे असतात. वाद्यशास्त्रीय वर्गातील कंपित वायुस्तंभ (ओठांनी फुंकर मारुन पोकळ नळीतील हवेचा पट्टा हालवून निर्माण केले जाणारे नादध्वनी) प्रकारात हे वाद्य मोडते. ध्वनिनियंत्रण हे ओठांची हालचाल व फूंक मारताना दिलेला दाब यांच्याद्वारे करता येते. संगीतसार या ग्रंथात ‘सुनारी’ नामक वाद्याचे जे वर्णन आहे, ते बहुधा महाराष्ट्रातील सुंदरी वाद्याचे असावे. सुंदरी हे लोकवाद्य उत्तरेकडे – विशेषः महाराष्ट्रात – जास्त प्रचलित होते. स्वतंत्र वादनापेक्षा वाजंत्रीच्या सामूहिक वादनात या वाद्याचे महत्त्व जास्त आहे. त्याचा आवाज सनईइतका मधूर नसला, तरी त्यात सर्व कमगत होऊ शकते. सनई, सुंदरी व तत्सम प्रकारची वाद्ये देऊळ, कौटुंबिक पूजाअर्चा, धर्मविधी, मिरवणुका, समूहनृत्ये वा लोकनृत्ये इत्यदी प्रसंगी वापरली जात असे. मात्र आज सुंद्रीवादन दुर्मीळ झालेले आहे.

डफ हे चर्मवाद्य आहे. ते तीन बोटे रुंद, पाव इंच जाड व सुमारे एक फूट लांबीच्या गोलाकार रिंगाच्या आकाराचे असते. डाव्या हातात अडकावण्यासाठी एक दोरी असते. डाव्या हाताने छातीशी धरून, दुसऱ्या हातातील छडीने त्यावर प्रहार करून त्याचे वादन केले जाते. सांगोला तालुक्यातील यात्रा-जत्रा, पोवाडा अशा अनेक ठिकाणी त्याचा उपयोग होतो. डफाच्या खणखणीत आवाजामुळे सुराला उठाव येतो. गीताला रंजकता येते. वाद्यांच्या ताफ्यात दोन डफ वापरले जातात. वाद्यांमध्ये जरी आधुनिकता आली असली तरी होलार लोक कातड्यापासून बनवलेले पारंपरिक डफ वापरतात.

होलार समाज गेल्या वीस वर्षांपासून झांज, ताशा, ढोल, बँड आणि बँजो या आधुनिक वाद्यांचा उपयोग वाजपासाठी करत आहे. सूर, सनई, डफ या वाद्यांच्या साथीने ती वाजवली गेल्याने संगीत श्रवणीय होते, मनोरंजकता वाढते, नृत्यगायनास ताल निर्माण होतो.

सांगोला तालुक्यातील होलार समाजाचा वाजंत्री हा व्यवसाय असला तरी वर्षाचे बारा महिने काम मिळत नसल्यामुळे आणि यांत्रिक प्रगतीमुळे त्या लोकांना ऊसतोड, शेतमजुरी, रोजगार हमीची कामे; तसेच, कातडी विकणे, चप्पल बनवणे असा व्यवसाय करावा लागतो. तालुक्यातील काही वादकांनी उदाहरणार्थ, पाचेगाव येथील आबाजी भंडगे यांनी शास्त्रीय क्लासेसचे धडे देऊन अनेक कलाकार घडवले. चिंचोली येथील भगवान ऐवळे यांनी ‘मी अहिल्यादेवी होणार’ या मराठी चित्रपटासाठी सनईवादन केले. तर चोपडीचे नंदकुमार केंगार यांनी राज्यस्तरावरील शासकीय कार्यक्रमात सुंद्रीवादन करून त्यांच्या कलेचा ठसा उमटवला आहे.

– प्रा. लक्ष्मण साठे

Last Updated On – 6th Dec 2016

About Post Author

12 COMMENTS

  1. varil sanshodhit mahiti
    varil sanshodhit mahiti vachun holar samajachya paramparik vadyanchi mahiti samjali
    sathe siranche he karya asech avirat suru raho yasathi shubhecchha tasech hi mahiti uplabhadh karun dilyabaddal think maharashtra che he abhar.

  2. artical is very good. sound
    artical is very good. sound of sundari is excellant.
    all the best for your bright future and thanks to think maharashtra.

  3. होलार समाजाबद्दल दिलेली…
    होलार समाजाबद्दल दिलेली माहिती महत्वपूर्ण आहे

  4. Holar samajabaddal khup chan…
    Holar samajabaddal khup chan mahiti milali, yacha pudhchya pidhila nakkich upyog hoil. Dhanyawad Sathe Sir, tumhi changla kaam karat ahat.
    Smita Karade:-Badlapur-Thane.

  5. Holar samjachi sanskrutik…
    Holar samjachi sanskrutik parampara changli mandli ahe.apan adik sashodhan karun mahiti pude anavi.

  6. होलार समाजावर वाद्य…
    होलार समाजावर वाद्य संस्कृतीवर लेख लिहल्याबद्दल धन्यवाद होलार समाजावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे परंतु आपण सुरवात केली हे हि नसे थोडके. आपल्या संशोधनपर लिखाणाला व वस्तुस्थितीदर्शक मांडणीला मनापासून धन्यवाद आपला स्नेही राजेंद्र होनमाने 8652320523

  7. सदरील लेख अतिशय ऊपयुक्त आहे…
    सदरील लेख अतिशय ऊपयुक्त आहे त्याबद्दल लेखकाचे मनपुर्वक आभार…..

    परंतु समाजाच्या एतिहासिक संदर्भाबद्दल काही माहिती असेल तर त्या विषयी लिहावे हाच अपेक्षा….

    At post Gangakhed Dist parbhani, Maharashtra
    Contact us
    9822074491, 8888415519

  8. छान माहिती दिलीय होलार…
    छान माहिती दिलीय होलार समाजाबद्दल…
    धन्यवाद?

  9. प्रथमतः मला प्रा. लक्ष्मण…
    प्रथमतः मला प्रा. लक्ष्मण साठे सरांचे मनापासून आभार मानायला आवडेल. मी स्वतः होलार जाती समूहाचा घटक आहे. खर तरं मला जातीपाती बद्दल बोलायला आवडत नाही…असं करताना आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या जाती अंताच्या विचाराशी फारकत करत असतो असं नेहमी वाटतं…असो.
    होलार जाती समूह हा अल्पसंख्याक आहे त्यामुळे त्याच्या बद्दल कोणी जास्त लिहित नाही आणि बोलतही नाही…शंकरराव खरात यांच्या तराळ अंतराळ आणि त्रिंबक नारायण अत्रे यांच्या गावगाडा या पुस्तकात आणि व्यंकटेश माडगूळकर लिखित बनगरवाडी इ. या पुस्तकात होलार जात समूहाचा थोडाफार उल्लेख आला आहे……तथापी आपण ‘होलार समाजाचे वाजप’ हा उत्कृष्ट लेख लिहून संगित क्षेत्रातील होलार समाजाचे अमूल्य योगदान प्रकाशात आणले आणले आणि ‘सुंद्री’ हे सनई सदृश्य सूरवाद्य होलार जाती समूहाच्या पूर्वजांनी कसे शोधले आणि निर्माण केले या बद्दल खूपच चांगले संशोधन केले आहे…..या माहितीमूळे मला स्वतःला माझ्या होलार जाती समूहा विषयी सार्थ अभिमान वाटतो आहे….सर आपल्या कौतुकासाठी शब्द अपुरे आहेत……पुन्हा एकदा आपले मनोमन धन्यवाद,अभिनंदन आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!!!

  10. प्रथमतः मला प्रा. लक्ष्मण…
    प्रथमतः मला प्रा. लक्ष्मण साठे सरांचे मनापासून आभार मानायला आवडेल. मी स्वतः होलार जाती समूहाचा घटक आहे. खर तरं मला जातीपाती बद्दल बोलायला आवडत नाही…असं करताना आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या जाती अंताच्या विचाराशी फारकत करत असतो असं नेहमी वाटतं…असो.
    होलार जाती समूह हा अल्पसंख्याक आहे त्यामुळे त्याच्या बद्दल कोणी जास्त लिहित नाही आणि बोलतही नाही…शंकरराव खरात यांच्या तराळ अंतराळ आणि त्रिंबक नारायण अत्रे यांच्या गावगाडा या पुस्तकात आणि व्यंकटेश माडगूळकर लिखित बनगरवाडी इ. या पुस्तकात होलार जात समूहाचा थोडाफार उल्लेख आला आहे……तथापी आपण ‘होलार समाजाचे वाजप’ हा उत्कृष्ट लेख लिहून संगित क्षेत्रातील होलार समाजाचे अमूल्य योगदान प्रकाशात आणले आणले आणि ‘सुंद्री’ हे सनई सदृश्य सूरवाद्य होलार जाती समूहाच्या पूर्वजांनी कसे शोधले आणि निर्माण केले या बद्दल खूपच चांगले संशोधन केले आहे…..या माहितीमूळे मला स्वतःला माझ्या होलार जाती समूहा विषयी सार्थ अभिमान वाटतो आहे….सर आपल्या कौतुकासाठी शब्द अपुरे आहेत……पुन्हा एकदा आपले मनोमन धन्यवाद,अभिनंदन आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!!!

Comments are closed.