स्टीफन्स यांचे ‘ख्रिस्त पुराण’ – प्रतिभेचे अद्भुत लेणे (Christ Puran: Stephens Great Marathi Literary Work)

 

ख्रिस्त पुराण महाकाव्याचे कवी फादर थॉमस स्टीफन्स हे मूळचे इंग्लंडमधील. ते वयाच्या तिसाव्या वर्षी रोम व लिस्बन मार्गे 24 ऑक्टोबर 1579 रोजी गोव्यात आले. थॉमस स्टीफन्स यांचे नाव मराठी वाङ्मयात प्रामुख्याने घेतले जाते ते त्यांच्या क्रिस्त पुराण महाकाव्याबद्दल. त्यांनी बायबलमधील जुना करारनवीन करार महाकाव्यात शब्दबद्ध केला आहे. क्रिस्त पुराण प्रथम 1616 साली रोमन लिपीत प्रकाशित झाले. स्टीफन्स यांचे वास्तव्य 1611-1612 या काळात वसई किल्ल्यात होते. तदनंतर, ते त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे 1619 सालापर्यंत गोव्यात राहिले होते. गोवा ही त्यांची कर्मभूमी. त्यांनी त्यांचे सारे आयुष्य तेथेच व्यतीत केले. त्यांची चारशेवी पुण्यतिथी 2019 साली होऊन गेली.
ते धर्मप्रसारार्थ भारतात आले. धर्मप्रसार हे त्यांचे उद्दिष्ट असल्यामुळे त्यांनी मराठी भाषा आत्मसात केली आणि मराठी शिकू इच्छिणाऱ्या इतर युरोपीयन मिशनरी धर्मगुरूंना उपयुक्त व्हावे म्हणून आर्ते दा लिंगाओ कॅनारिम् या नावाचे व्याकरणाचे पुस्तक लिहिले. नंतर त्यांनी प्रश्नोत्तर रूपाने ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे डॉक्ट्रीना क्रिस्ता हे पुस्तकही लिहिले. ती दोन्ही पुस्तके रोमन लिपीत असून तत्कालीन कोकणी भाषेत आहेत.
थॉमस स्टीफन्स यांनी गोव्याहून रोमला त्यांच्या वरिष्ठांना 5 डिसेंबर 1608 रोजी लिहिलेल्या पत्रात त्या काव्यग्रंथाबद्दल सूतोवाच केले आहे. त्यांनी गोव्यात स्थायिक होऊन दोन दशकांचा काळ गेल्यानंतर क्रिस्त पुराण हे महाकाव्य लिहिण्यास प्रारंभ केला असावा. त्यांनी ते कथन केले व त्यांच्या शिष्यांनी ते उतरवून काढले. बायबलच्या नव्या करारात मत्तय, मार्क, लूक आणि योहान अशी चार शुभवर्तमाने आहेत. ती चारही शुभवर्तमाने ख्रिस्ताच्या जीवनकार्याचा परिचय करून देतात. त्यांपैकी मत्तय या शुभवर्तमानात ख्रिस्ताच्या जन्माचा फक्त उल्लेख आढळतो. परंतु ख्रिस्ताचा जन्म गाईच्या गोठ्यात झाला यासंबंधी काही वर्णन आढळत नाही. तर मार्कच्या व योहानाच्या शुभवर्तमानात ख्रिस्ताच्या जन्मासंबंधी काहीच उल्लेख नाही. लूकच्या शुभवर्तमानात ख्रिस्ताच्या जन्माचा पुढीलप्रमाणे उल्लेख आढळतो : “आणि असे झाले, की ती दोघे तेथे असताना तिचे प्रसूतीचे दिवस भरले आणि ती तिचा पहिला मुलगा प्रसवली. तिने त्याला बाळंत्यात गुंडाळून गव्हाणीत निजवले, कारण त्यांना उतारशाळेत जागा नव्हती.(पवित्र शास्त्र जुना व नवा करार. मराठी भाषांतरकर्ती पंडिता रमाबाई).
क्रिस्त जन्माची बायबलमधील कथा क्रिस्त पुराणात वर्णन केली आहे. तेथे स्टीफन्स यांच्या वाग्विलासाचा अद्भुत आविष्कार वाचण्यास मिळतो. बायबलमधील चार ओळींची क्रिस्त जन्माच्या वेळेची कथा क्रिस्त पुराणात रसभरित शब्दांत वर्णन केली आहे. ख्रिस्तजन्माच्या वेळी रात्री आकाश निर्मळ झाले, सर्वत्र तेज फाकले, चंद्र मरियेची प्रसूती पाहण्यास उतावीळ झाला –राहिले मेघाचे वरूषण | निर्मळ जाहले गगन तेज फाकले गहन | तारा मंडळी आंकुवारियाचा प्रसूतकाळु | पाहवया लागी निर्मळु चंद्रु जाहला उताविळु | तारांगणेसि मरियेने ख्रिस्ताचा जन्म झाल्यानंतर त्याला साष्टांग नमस्कार घातला. ती बाळाला पाहून सद्गदित झाली, तिचे हृदयकमळ गहिवरले, डोळ्यांत आनंदाश्रू आले, तंव येसुबालक जल्मले| तें पुत्र-रत्न मरियेने देखिले मग साष्टांग भूमी घातले| आंकुवारी मातेन सद्गतित जाहले कंठनाळ| गहिंवरले हृदय-कमळ प्रगटले आनंदजळ| नयन-कमळी मनुष्या कारणे मरियेचे उदरी जन्म घेतलेल्या वैकुंठ-नायकाचे, विश्व तारकांचे उपकार मानताना कवीने मरियेचे हृद्य स्वगत देत पुढे म्हटले आहे,आता घेई ही दुर्बळआंची लुगडी| पांगुरावेआ तुझी पवित्रिकुडी शैत्यवेळा हि अवघडि| निस्तरावेया नंतर येशूबाळ तिने तिच्या फटिकाहोउनि निर्मळ, माणिक मुक्तफळ|’ सारख्या स्तनांतून दिलेले दूध घुटूघुटांप्याला. येशुबाळाला गव्हाणातील गवतावर झोपवले, तेव्हा तेथे एक गाढव व बैल होता. त्यांनी रचणाऱ्या स्वामीला ओळखले आणि तोंडातील गवत बाहेर टाकून ते नाच करू लागले.वृषभु आणि गर्धउ दोगइ| ओखळती रचणारू ते स्वामीठाई मुखेचें तृण सांडोनि तेसमई| डिंबिया घालिती|
क्रिस्तजन्माची शुभवार्ता देवदुतांनी व गोपाळांनी सर्वत्र पसरवली तेव्हा बेथलेममधील चराचर सृष्टीला किती आनंद झाला त्याचे वर्णन करताना कवीने म्हटले आहे, जैसा सुर्ये उदये अवस्वरी| पाखुरूवे क्रीटा करिती वृक्षावरि काव्य करितो नाना स्वरी| काससमई तैसा येसु सूर्य उदयला भोडुवेआंआनंदु वर्तला
स्टीफन्स यांनी मराठी सारस्वतात अकरा हजार ओव्यांचे अद्भुत प्रतिभेचे हे लेणे निर्माण करून ठेवले आहे. स्टीफन्स यांनी दोन दशकांच्या पहिल्या काळात गोव्यातील मराठी भाषा चांगल्या रीतीने आत्मसात केली होतीच, पण त्यांनी गोव्यातील सामाजिक-सांस्कृतिक परिस्थिती चांगली अनुभवली होती. त्याची प्रचीती त्या महाकाव्यात वाचण्यास मिळते. मुळात ख्रिस्ती धर्मप्रचारकास भारतातील पुराण हा साहित्य प्रकार अनुसरावा असे वाटावे हीच गोष्ट ते या भूमीशी किती एकरूप झाले होते याची द्योतक आहे. त्यांनी येथील लोकांच्या सवयीही नीट जाणल्या होत्या.   
गोवा आणि मद्यपान हे अभेद्य नाते चारशे वर्षांपूर्वीही प्रचलित असावे. स्टीफन्स यांना ती गोष्ट प्रकर्षाने जाणवली असावी. बायबलच्या नव्या करारात असा उल्लेख आहे, की येशू त्यांच्या आईसमवेत काना नावाच्या गावी लग्नसमारंभासाठी गेला होता. तेथे मेजवानीच्या वेळी द्राक्षरस संपल्याने यजमानाची धावपळ झाली. ते लक्षात येताच येशूच्या आईने येशूला पाण्याचे रूपांतर द्राक्षरसात करण्याची विनंती केली. ती घटना स्टीफन्स यांनी महाकाव्यात वर्णन केली आहे, पण त्यामधून गोव्यातील स्थानिक लोकांना चुकीचा संदेश मिळेल आणि स्वत: ख्रिस्तच द्राक्षरस म्हणजे मद्य पिण्यास प्रोत्साहन देतो असा त्यांचा गैरसमज होईल अशी भीती स्टीफन्स यांना वाटली असावी. म्हणून त्यांनी लिहिले, की फिरंग्यांच्या देशात थंड हवा असल्याने तेथील लोकांनी द्राक्षरसासारखे मद्यपान करणे योग्य असते, पण आपण लोक येथे हिंदुस्थानात उष्णप्रदेशात राहतो. त्यामुळे त्यांना मद्यपानाची आवश्यकता नाही. उष्ण हवेत मद्यपान करणारे लोक मूर्ख असतात. ते मद्यपानामुळे कर्जबाजारी होतात, बायकोला मारहाण करतात, त्यांचे संसार धुळीला मिळतात. ते त्यांची शेती विकतात. जी काही शेती शिल्लक राहील ती कसण्याची त्यांच्यात शक्ती उरत नाही. मती भ्रष्ट होते, प्रकृती बिघडते. संतमहंतांना मद्यपानामुळे दु:ख होते. मद्यपान करणाऱ्यांप्रमाणेच ताडीपासून मद्य करणारे व ती विकणारे देखील अधम होत. त्या ओळी अशा आहेत-
फ्रिंग्रियांचे देशी | शुद्ध पाणी सदां न घेती त्रृषेसि  तेथें सूर्य आकाशीं | दूर राहे शैत्यपडे म्हणोनि द्राक्षरसा मिसळिती पाणी प्राशन करिती प्राणी | एक वटुनु पण जो मधु हिंदुस्तानाप्रति | कल्पवृक्षाचा रसु काढिती
अग्नीवरउनु कडविती | तातउनिया आपुलेआ लोभा काढिती दुकाना | देंती अधम जातिचेआं जनां
तो मधु कवण | म्हणेल बरवा ऐसी मधुरा घेंती मूर्ख | पाणी न करिता भिस्त्रादिक लुळतु पडती अस्प सुखा | साटि घुमारियें कन्या-पुत्रांथे कष्टविती | भृहाश्रमु विभाडिंती सर्वसंपदा हारपिती | ये मधुकारणे
अपरात्री रिघती घरीं | खावेया न मेळे ते अवस्वरी म्हणोनि स्त्रियेथें मारी | नर्दैवु पुरुषु तें देखोनि लेंकरींबाळ | करिती बोंभाट कुल्हाळ धावोनि येंती सकळा | सेजीवासि मधुरापिवन करितेयां | आणी लोभियां दुकानियां
देंती गाळी शिवेया | मेळले जनु या पिवळापासोनि |आपुला वृति-भूमि विकुनि उरली तिही सांडुनि|
न करिती कृषी राज्यकरू द्यावेयासि | शक्तीउपानो नाही तेयासि द्रव्य नाही गाठिसि | कपाळा नाही मति
मधुमधुरा आंगी भेदली | तेणे काळिजें करपली आयुष्यासि हानी पडली | हळुहळू हे सेवितां मधुपान | हिंदुस्तानिचेआं क्रिस्तांव जनां थोरि लज्जा अपमानु | हांसती लोकु देवचरासि जाहाले सु|
परमेश्वरू तेयासि विन्मुख सांता मंहता होंताए दुख | मधुपानाचें (दुसरे पुराण अवस्वरू 22)
मोझेसने इस्रायली लोकांची इजिप्तच्या दास्यातून सुटका केल्याच्या घटनेचे वर्णन जुन्या करारात आहे. ते इस्रायली लोक मोझेसने सांगितल्याप्रमाणे ईश्वराची भक्ती करत नाहीत. इस्रायली लोकांच्या त्या वृत्तीचे वर्णन कवीने पुढीलप्रमाणे केले आहे-
जैसा एखादा चांगु भ्रतारू | चपळी स्त्रियेसी मेळला वरू तो तयेसि करी शृंगारू | स्नेहे थोरे
अत्यंत प्रीतति-मोहो करी| वस्त्रे आंळंकारे भरी येरि तेयाथे अव्हेरी| व्यभिचारू करोनि
तो बरवा प्रतिपाळु करित | येरि तयाचे वंचित प्रीति-स्नेहो न करित | काय केलेया (पैलं पुराण अवस्वरू 19)
(एखादा चांगला पुरुष चंचल महिलेशी लग्न करतो, तो तिला चांगले कपडे, अलंकार यांनी मढवतो, तिच्यावर अतिशय प्रेम करतो; पण अखेर, ती महिला व्यभिचारच करते). सन्यस्त वृत्तीचे धर्मगुरू स्टीफन्स यांच्या नजरेतून समाजातील ती चंचल महिलाही सुटलेली नाही!
भक्ताला थोडे कष्ट सहन करावे लागल्याखेरीज त्याला ईश्वरज्ञान प्राप्त होत नाही, हे सांगताना कवीने म्हटले आहे जैसा एखादा कुमरू शाळे | विद्या अभ्यासिते वेळे आदी तयासि काही नकळे | शिखवण गुरूची मग तया सटवेहि मारिता | जे आदी तो नेणता होता तें जाहाला जाणता | मारिलेआखुनि (पैले पुराण अवस्वरू 14) म्हणजे चारशे वर्षांपूर्वी छडी लागे छम् छम् विद्या येई घमघम ही प्रथा रूढ होती तर!
क्रिस्त पुराणात स्टीफन्स यांच्या सामाजिक सूक्ष्म निरीक्षणाची उदाहरणे अनेक आढळतात. त्याचबरोबर त्यांनी त्यांचा विषय भाविक श्रोत्यांना समजावून सांगताना आकाशातील तारे, समुद्राच्या लाटा, मासे, जाई-जुई-मोगरा-शेवंती-चाफा यांसारखी विविध जातींची फुले, भोपळ्यासारखी भाजी यांच्याशी संबंधित दाखले दिले आहेत. त्यामुळे काव्यरसनिर्मितीस परिस्थिती अनुकूल निर्माण झाली आहे.
स्टीफन्स यांच्या निसर्ग परिसराच्या सूक्ष्म अवलोकनाची उदाहरणे अनेक क्रिस्त पुराणात आढळतात.
दुसऱ्या करारातील मरियेच्या जन्माची कथा सांगताना एका श्रोत्याने कथेच्या सत्यासंबंधी शंका उपस्थित केली असता कवीने सांगितले
जैसे अमृत-घटाभितुरि | विष नघलावे थेंबापरी | तेणे आवघे विषासरी | होईल जाणा अवस्वरू
(अमृतघटात एक थेंब विषाचा टाकला तर सारे अमृतच विषमय होईल. पवित्र शास्त्रात खोटी गोष्ट सांगितली तर ते शास्त्रच पवित्र राहणार नाही!).
जगातील सुख हे क्षणभंगूर आहे. ते एका क्षणात नष्ट होऊन जाते, हे संसारिकेच सुख |स्थिर न्हवे सकलैक क्षणा एका नंदणुक | नासोनि जाए
सागराची लाट एकावर एक पडावी तसे जगातील दु:ख सुखावर पडत असते. जैसे आ सागरिचे आ लाहारि? एकी पडती एकावरि | तैसे दुख सुखावरि | पडे प्राणियाथे  – अवस्वरू 12
कीटक वस्त्र भक्षित असतो, त्याचप्रमाणे दोष पापी मनुष्याचे मन खात असतो, रात्रंदिवस दुष्कृत्य त्याला ग्रासत राहते. जैसा किटकु वस्त्रे भक्षितासे | तैसा दोषु पापियाचे मन खाये दोषांचे दुकृत तेया ग्रासिताये | रात्रिदिनु – अवस्वरू 13
येशू सर्व मृतांना जगाच्या अंताच्या वेळी उठवण्यास येईल व सर्वांचा न्याय करील. त्यावेळी लुसिफरही असेल, तो त्याचा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करील. परंतु त्याचा प्रभाव येशूच्या प्रभावळीपुढे तो काय? जैसी नवरत्नांचेआ हारा फुडारी | हिन धातुची राशी थोरि कि कवडियाचेआ पुंजा मोहरी | युक्तांचेआ माळा सूर्या फुडां स्वद्योतांचे भार | कि सिंहा फुडां जंबुक अपार कि राजहंसा सामोर | असंख्य काक जैसे |
येशू ख्रिस्त आणि लुसिफर यांची तुलना करताना कवीने म्हटले आहे, नवरत्नांच्या हारापुढे अर्थात येशूपुढे हीन धातूंची थोरवी काय? मुक्ताफळांच्या (मोती) माळेपुढे मोहरीचे मूल्य काय? सूर्यापुढे (येशू) काजव्याचे (लुसिफर) तेज काय? सिंहापुढे कोल्हा, राजहंसापुढे असंख्य कावळे यांचे श्रेष्ठत्व काय?
ईश्वर नवीन सृष्टी जगाचा लय झाल्यानंतर निर्माण करील. येशूने त्या नवीन जगातील माणसे ही पापी लोकांमधून निवडलेली असतील, म्हणजे ती कशी असतील?  की कमळां जैसीं कंटकांतुनि | कि हरळांमधें मुक्तफळें वेंचुनि नागवेलीं माजि निवडुनि | जैसी कर्पुरवेलि जैसेआ मेंढिया व्याघ्रां आंतुनि | तैसे तुमां काढिलें वेंचुनि आता या तुमीं चालुनि | मजसवे अवस्वरू 44
काट्यांमधून कमळ, गारगोट्यांमधून मोती, नागवेलीमधून कापराची वेल, वाघांमधून मेंढी निवडून घ्याव्यात त्याप्रमाणे या (सद्गुणी) लोकांना निवडून येशू त्यांना सांगेल, “तुम्ही माझ्यासवे चला!”
येशूचे निरपराधीत्व मान्य असूनही पिलात येशूला वधस्तंभाची शिक्षा देण्यासाठी यहुद्यांच्या स्वाधीन करतो. पिलाताच्या त्या वृत्तीचे वर्णन पुढील ओळींत मिळते- कडुआ भोपळा नेउनि जरि | बुडवुनि काढिजे अमृत-सागरी तरि तो न घाली बाहिरी | कडुवाणी आपुली अवस्वरू 48
कडू भोपळा अमृताच्या सागरात जरी बुडवला तरी तो त्याची कडू वाणी काढून टाकत नाही.
येशूच्या निकटवर्ती महिला येशूला थडग्यात ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी येशूच्या थडग्याला भेट देतात व थडग्यावर फुले टाकतात. कोणती ती फुले? मळेयाचीं पुष्पे घेऊनि नारी  | जाई-जाई शेवंती चांफां मोगरी वरपविती ते पेटेवरि | सेपुस्क्रांसहित अवस्वरू 50
स्टीफन्स यांच्या निसर्ग परिसराच्या सूक्ष्म अवलोकनाची ही काही उदाहरणे नमुन्यासाठी दिली आहेत.
ख्रिस्ती तत्त्वज्ञानाप्रमाणे रविवार हा प्रार्थनेचा दिवस असून त्या दिवशी कोणीही काम करू नये असा संकेत आहे. ते नवख्रिस्ती लोकांना पटवून देताना कवींनी चक्क रहाटाला जोडलेल्या बैलाचा दाखला दिला आहे. तसा तो रहाट कवींनी त्यांच्या वसईतील वास्तव्यात तर पाहिला नसेल! आणि येक नवल आइका तेथे | वृषभ जोडोनि राहाटाथें पाणी काढिताति वरूते | सिंपनेआ लागी पण आदित्य वाराचे दिवसीं | ते बैल बांदिले राहाटासि केती मारिले तरि तेयांसि | पाणी न काढितां सर्वथा | ( अवस्वरू 12)   
जुना करार विश्वनिर्मितीपासून ख्रिस्ताच्या जन्मापर्यंतचा इतिहास. तो ज्यू, ख्रिश्चन व मुस्लिम, तिन्ही धर्म मानतात.
नवा करारख्रिस्तजन्मापासून ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणापर्यंतचा इतिहास. त्यात त्याची शिकवण वगैरे सर्व येते.
पवित्र शास्त्रजुना करार, नवा करार मिळून पवित्र शास्त्र तयार होते.
शुभ वर्तमाननव्या करारातील घटनाक्रम लुसिफर हा दैत्य, दानव, सैतान. देवाने विश्वनिर्मिती करताना देवदूतांमार्फत या जगाशी संपर्क ठेवला. लुसिफर हाही देवदूत होता, परंतु तो शेफारला. त्याच्या मनी अहंकार जागा झाला व त्याने देवास जुमानण्याचे नाकारले. त्याने त्याची स्वतंत्र फौज उभी केली व देवांचा दूत मायकेल याच्याशी युद्ध पुकारले. त्यामुळे लुसिफर हा सैतानांचा प्रमुख झाला.
पिलात हा रोमन साम्राज्याचा पॅलेस्टाइनमधील गव्हर्नर होय.
क्रिस्त-ख्रिस्त जुन्या मराठीमध्ये ख्रिस्ताला क्रिस्त असे म्हणतात. फादर स्टीफन्स यांनी क्रिस्तपुराण सांगितले/कथन केले. ते नंतर लेखी स्वरूपात आणण्यात आले, तेही रोमन लिपीतून. ख्रिस्तपुराणाची देवनागरीतील पहिली छापील प्रत 1952 साली नगरला तयार झाली. त्या प्रतीत क्रिस्त असाच उल्लेख आहे. आता मात्र ख्रिस्त असेच सर्वत्र म्हटले जाते.
अण्ड्र्यू कोलासो
saptahik.janpariwar@gmail.com
(जनपरिवार, नाताळ विशेषांक 2019)
अण्ड्र्यू कोलासो हे साठ वर्षांपासून पत्रकारिता करत आहेत. त्यांनी आचार्य अत्रे यांच्या ‘दैनिक मराठा’मधून पत्रकारितेला सुरुवात केली. ते ‘साप्ताहिक जनपरिवार’चे संस्थापक संपादक आहेत. त्यांच्या कथा, कविता आणि लेख विविध नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले आहेत. ते फादर स्टीफन्स अकॅडमी स्कूल या शाळेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.  
——————————————————————————————————————————–

About Post Author

2 COMMENTS

  1. फादर स्टिंफन यांनी ख्रिस्तपुराण काव्यंकित केल्याचे श्री. कोलासो यांनी छान पध्दतीने सांगितले आहे –

  2. अत्यंत सुरेख सुबोध मराठी स्टीफन यांनी लिहिलीय त्यांच्या लडिवाळ भाषेचा गोडवा श्री.कोलासो यांच्या लेखात दिसतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here