सोलापूरचे डिसले सर यांची क्यूआर कोड पद्धत संपूर्ण भारतात

5
25

सोलापूर जिल्ह्यातील रणजित डिसले या शिक्षकाने विकसित केलेली ‘क्यूआर कोड’ पद्धत महाराष्ट्र शासनाने क्रमिक पुस्तकांमध्ये 2015 पासून वापरण्यास सुरुवात केलेली आहे. डिसले यांनी शिक्षणाची उद्दिष्टे विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोचवण्यासाठी हा यत्न केला आहे. त्याचे सकारात्मक दृश्य परिणाम दिसत आहेत. त्यामुळे ‘क्यूआर कोड’ पद्धत जून 2019 पासून संपूर्ण भारतात राबवण्यात येणार आहे. हा महाराष्ट्रातील एका शिक्षकाचा मोठाच बहुमान होय.

रणजित डिसले मूळ साकत (तालुका बार्शी) येथील. त्यांची जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून नेमणूक 2009 साली परितेवाडी (तालुका माढा) येथे झाली. तेव्हा त्या शाळेचा उपयोग जनावरांसाठी केला जात असे. विद्यार्थीच नव्हते ना! डिसले यांनी त्यामुळे नाउमेद न होता, प्राप्त परिस्थितीला संधी मानून काम केले. पालकांचे प्रबोधन, गृहभेटी; तेवढेच नव्हे तर, त्यांनी विद्यार्थी शेतांमध्ये, गुरांमागे जेथे असतील तेथून गोळा केले. त्यांनी मुलांना शाळा म्हणजे आनंदाचे ठिकाण वाटावे यासाठी पाठ्यपुस्तक हातात न घेता मोबाईल व लॅपटॉप तंत्रज्ञानाचा वापर चालू केला. त्यांनी दुकानात वस्तूंच्या किंमतीसाठी बारकोड पद्धत वापरत असल्याचे पाहून तशीच पद्धत अध्यापनात वापरण्याचे ठरवले आणि त्याकरता ‘क्यूआर कोड’ पद्धत शोधून काढली. ती प्रथम त्यांच्या स्वतःच्या शाळेत वापरली गेली. नंतर माढा तालुक्यात आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात वापरण्यात येऊ लागली. विशेष म्हणजे डिसले गुरुजींची ‘क्यूआर कोड’ पद्धत जगातील अकरा देशांमध्ये सध्या वापरली जात आहे!

डिसले सरांची संशोधक बुद्धी फक्त शिक्षणापुरती मर्यादित राहिली नाही. त्यांनी त्यांच्या तंत्रबुध्दीच्या साहाय्याने त्यांच्या गावच्या इतर काही क्षेत्रांमध्येही हस्तक्षेप सुरू केला. त्यांना त्यांच्या गावात झाडे लावून जगवण्याचा प्रयोग करायचा होता. परंतु त्यांना त्यांच्या अखत्यारीतील गाव माळढोक अभयारण्य परिसरात असल्यामुळे तेथील नियमांमुळे तेथे झाडे लावणे शक्य झाले नाही. तेव्हा त्यांनी त्यांच्या गावात झाडे आहेत तरी किती, ते मोजण्याचे ठरवले. तसेच, वन्यक्षेत्र किती आहे तेही जाणून घेण्याचे ठरवले. त्यांनी त्यात विद्यार्थ्याना गुंतवले. त्यांनी झाडाचे क्षेत्रफळ काढण्याचे तंत्र विद्यार्थ्याना शिकवले. दोराचे एक टोक झाडाच्या बुंध्यापर्यंत व दुसरे टोक त्या झाडाची सावली जेथपर्यंत जाते तेथपर्यंत ठेवायचे. त्याला झाडाची त्रिज्या म्हणतात. त्या त्रिज्येच्या आधारे वर्तुळ काढायचे. त्यांनी तशा प्रकारे प्रत्येक झाडाचे क्षेत्रफळ काढले. त्यांना ती कल्पना आपोआप सुचली नव्हती. ते सांगतात, की एकातून एक नव नव्या कल्पना सुचत गेल्या. एकट्याने ते क्षेत्र वाढवणे गावात शक्य होणार नव्हते. त्यांनी त्या गावातील लोकांची मीटिंग बोलावली. त्या गावातील झाडांची मोजणी केली. त्यात दोन-अडीच महिने गेले. तेव्हा वनक्षेत्र एकवीस टक्के आहे हे कळले. त्यांना त्यावरून ती योजना मोठ्या प्रमाणावर करावी असे वाटले. झाडे वाचवण्याची लोकचळवळ उभारावी. त्यासाठी पूर्ण गावाचा सर्व्हे केला आणि गावचे एन्व्हायर्नमेंटल रिपोर्ट कार्ड तयार केले. प्रत्येक घरात गाड्या किती आहेत, चूल-गॅस किती घरांत आहे. मग दुचाकीतून निघणारा धूर व चारचाकीतून निघणारा धूर किती असेल हे काढण्यात आले. त्यात असाही प्रश्न होता, की तुम्ही (परिवाराने) झाडे किती लावली? आणि किती तोडली? त्यातून असे दिसून आले, की झाडे तोडण्याचे प्रमाण अधिक आहे. प्रत्येक झाड तोडण्याचे कारण क्षुल्लक होते. कोणी पैशांसाठी तर कोणी लग्नाच्या स्वयंपाकासाठी जळण म्हणून झाडे तोडली होती! शेताच्या बांधावर झाड असल्यामुळे त्या क्षेत्रात काही करता येत नाही म्हणून ते तोडण्यात आले होते. काही झाडांसंबंधी भांडणे होती. ज्या पालकांनी झाडे तोडली होती त्यांच्या मुलांना ती झाडे दत्तक देण्यात आली. विद्यार्थ्यांकडून पालकांना अशा तऱ्हेने झाडे तोडण्यापासून परावृत्त करण्यात आले. त्यांनी एक झाड तोडल्यावर काय परिणाम होतो ते प्रेझेन्टेशन करून सांगितले. त्यानंतर सरांनी वन अधिकाऱ्यांची मदत घेऊन प्रत्येक झाडाचे वयोमान काढले. त्यानुसार ए गटात चार ते पाच वर्षे, बी गटात पाच ते सात वर्षे, सी गटात सात ते पंधरा वर्षे आणि डी गटात पंधरा वर्षापुढील झाडे अशी वर्गवारी केली. गेले. गावकऱ्यांचा प्रश्न असा होता, की कोणते झाड कोणत्या गटात आहे हे कळणार कसे? म्हणून झाडांना तसे टॅग लावले. त्यांनी सर्व झाडांची पर्यावरणीय महत्त्व व त्यांच्या वयोमनानुसार विविध गटांत वर्गवारी केली. डी गटातील झाडे तोडण्यावर पूर्णतः बंदी असून इतर गटांतील प्रत्येक झाड तोडल्यास नवी पाच झाडे लावणे व ती जतन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तरीदेखील चिंचेची चार-पाच झाडे तोडली गेली. ती पन्नास हजार रुपयांसाठी तोडण्यात आली होती. त्यावेळी ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे आणि कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण निसर्गात वाढल्यास कशी परिस्थिती उद्भवू शकेल ते वेगवेगळ्या उदाहरणांसह गावकऱ्यांना समजावले गेले. डी गटातील झाडांवर विशेष सेन्सर लावण्यात आले असून, ती झाडे तोडण्याचा प्रयत्न केल्यास मुलांच्या मोबाईलवर झाडाच्या जीपीएस लोकेशनसह मेसेज जातो. त्या अभिनव तंत्रज्ञानाच्या मदतीने पाच वर्षांत गावातील वनाच्छादित क्षेत्रात वाढ झाली आहे. तो प्रयोग 2013 ते 2018 या कालावधीत राबवण्यात आला.

‘अराउंड द वर्ल्ड’ या उपक्रमाअंतर्गत आकुंभे (तालुका माढा) या गावातील झाडांना ‘क्यूआर कोड’ पद्धत वापरून तेथील वृक्षलागवडीखालील क्षेत्र एकवीस टक्यांवरून तेहतीस टक्यांपर्यंत वाढवले गेले आहे. त्या अंतर्गत आकुंभे गावातील चारशे- अठ्ठ्याऐंशी झाडांना ‘क्यूआर कोड’ लावण्यात आले आहेत.

डिसलेगुरुजी यांचे नाव तंत्रज्ञानातील नाविन्यपूर्ण प्रयोग व असामान्य कार्य यासाठी जगभरातील सर्वोत्तम पन्नास इनोव्हेटिव्ह शिक्षकांच्या यादीत विराजमान झाले आहे. ते मायक्रोसॉफ्ट, गुगल, ब्रिटिश कौन्सिल, फ्लिपग्रीड, प्लीकेर्स यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबर कार्यरत आहेत. त्यांना त्यांच्या नऊ वर्षांच्या सेवाकाळात बारा आंतरराष्ट्रीय आणि सात राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या नावावर बारा शैक्षणिक पेटंट आहेत. मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी डिसलेगुरुजींच्या कार्याची ‘हीट रिफ्रेश’ ही विशेष चित्रफीत प्रकाशित केली आहे. ते तसा मान मिळालेले जगातील एकमेव शिक्षक आहेत. ‘हिट रिफ्रेश’ हे सत्या नाडेला लिखित पुस्तक आहे. त्यांनी त्या पुस्तकात इनोव्हेटिव्ह कार्य करणाऱ्या तीन शिक्षकांची माहिती लिहिली आहे. त्यांनी शिक्षणक्षेत्रात टेक्नोलॉजी वापरून पुन्हा नव्याने समाजात काही तरी घडत आहे हे सांगण्यासाठी ‘रिफ्रेश’ हा शब्द वापरला आहे.

डिसलेसर जे कार्य करत आहेत त्याचा डेमो सोलापूर येथे एका समारंभात दाखवण्यात आला. त्या वेळी त्यांनी पत्रकार आणि उपस्थित शिक्षक यांचा रशियातील शिक्षणतज्ञ अॅना झुबकोव्हस्काया यांच्याशी पाऊण तास संवाद घडवून आणला. त्यावेळी रशियन व भारतीय शिक्षणपद्धत यांविषयी तुलनात्मक चर्चा घडून आली.

त्यांनी भारत, पाकिस्तान, इराण, इराक यांसारख्या आठ अशांत देशांमध्ये प्रत्येकी पाच हजार विद्यार्थ्यांची ‘पीस आर्मी’ तयार केली आहे. त्यांचा मानस ती संख्या पन्नास हजारापर्यंत नेण्याचा आहे. त्या माध्यमातून युद्धसदृश परिस्थितीत त्या-त्या देशांमध्ये शांतता व सलोखा असे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न साधला जातो.

डिसलेसरांनी सुरू केलेल्या या ‘लेट्स क्रॉस द बॉर्डर’ या शैक्षणिक उपक्रमाची दखल घेत मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या वतीने त्यांना पॅरिस येथे तो उपक्रम सादर करण्यासाठी आमंत्रित केले गेले. ते तो शैक्षणिक प्रोजेक्ट 1 एप्रिल ते 5 एप्रिल दरम्यान पॅरिस येथे आयोजित एज्युकेशन एक्सचेंज या परिषदेत सादर करणार आहेत. त्यात शिकवताना तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण रीतीने वापर करणाऱ्या अठ्ठ्याहत्तर देशांतील तीनशे इनोव्हेटर शिक्षकांना आमंत्रित करण्यात आले आहे. तो सहा दिवसांचा कार्यक्रम आहे. त्यात भारतातील तेरा शिक्षकांचा समावेश आहे.
रणजितसिंह डिसले 9404665096, onlyranjitsinh@gmail.com

नितेश शिंदे 9323343406, Info@thinkmaharashtra.com

 

 

 

About Post Author

5 COMMENTS

  1. आश्चर्य वाटले. प्रतिभा कुठे…
    आश्चर्य वाटले. प्रतिभा कुठे कशी जागृत होईल सांगता येत नाही. याला जातीपंथांचे काही बॅरियर्स नसतात. डिसलेसरांचे काम वेगळ्याच श्रेणीचे वाटते. खूप शुभेच्छा. ज्या मुलांना असे शिक्षक मिळतात ती खरोखरच भाग्यवान !

  2. सर,
    अभिनंदन
    सर मला केवळ…

    सर,
    अभिनंदन
    सर मला केवळ पस्तीस वॅट सोलर पॅनलवर फाऊंडेशन सिस्टम,प्रोजेक्ट अथवा चाळीस इंच स्मार्ट टी,व्ही.संगणक वापरण्याचे तंत्रज्ञान विकसित करत आहे.त्यात कांही प्रमाणात मी यशस्वी झालो आहे,ब_याच प्रयोगात मी खुप खर्च केला पण नविन कल्पना स्वस्थ बसू देत नाहीत पर्याने मी पुन्हा प्रयत्नाला सुरूवात करतो.त्यामुळे मी माझ्या आगारातील बराचसा खर्चही नकळत यावर करतो.मला आपणही यात काही आर्थिक हातभार द्याल का?

    देवरे सर
    स्क्रीन ता.राहाता

  3. Sar Really proud of you…
    Sar Really proud of you
    आपल्या कार्याला मानाचा मुजरा,
    आपल्या कार्याला सलाम!!!

  4. सर्वांना उपयुक्त मार्गदर्शन
    सर्वांना उपयुक्त मार्गदर्शन

  5. डिसलेसरांचे काम वेगळ्याच…
    डिसलेसरांचे काम वेगळ्याच श्रेणीचे वाटते. खूप शुभेच्छा. ज्या मुलांना असे शिक्षक मिळतात ती खरच खूप भाग्यवान आहेत!!

Comments are closed.