Home व्यक्ती आदरांजली सोलापूरचा ‘मार्शल लॉ’ आणि चार हुतात्मे (True Story of British Martial Law...

सोलापूरचा ‘मार्शल लॉ’ आणि चार हुतात्मे (True Story of British Martial Law in Solapur During Freedom Struggle)

सोलापुरातील चार हुतात्मे

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सोलापुरला मार्शल लॉचे महाभारत घडून आले. त्याआधी तेथे चक्क चार दिवस स्वराज्य होते. त्याला सोलापूरकर गांधीराज म्हणत होते. अर्थात ते अचानक, एकाएकी घडले नाही. त्या पाठीमागे सोलापूरच्या राष्ट्रीय चळवळीची चार दशकांची परंपरा होती. सोलापूरची राष्ट्रीय चळवळ ही प्रामुख्याने उच्चशिक्षित वर्गापुरती मर्यादित पहिल्या तीन दशकांत होती. त्या चळवळीचा नूर गांधीयुग सुरू झाल्यावर पालटला. त्यानंतर, त्या चळवळीत युवकांचा व सामान्य जनतेचा सहभाग वाढतच गेला. त्याचे प्रत्यंतर 1930 साली मोठ्या प्रमाणावर आले. संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव रावीच्या तीरावर पास झाला. युवक संघाची स्थापना ही महत्त्वाची घटना होती. साऱ्या देशभर युवक संघाच्या शाखा निर्माण झाल्या. सोलापूरातही शाखा स्थापन झाली. युवक संघाने हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्यात सविनय कायदेभंगाच्या चळवळीत मोलाची कामगिरी बजावली आहे. भारतातील तरुण वर्ग राष्ट्रीय प्रवाहात आणणाऱ्या युवक संघाचा अध्यक्ष होता, युवकांचा कंठमणी जवाहरलाल ! म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू. त्याच जवाहरलालने रावी नदीच्या काठी लाहोरात संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केलेली होती आणि तेव्हापासून या देशामधील प्रत्येक तरुण राष्ट्रीय चळवळीतील त्याचा भार नेटाने उचलू लागला होता. स्वातंत्र्य अगदी हाकेवर आले आहे असे तरुणांना वाटत होते. सोलापूर शहरामधील युवकदेखील त्याला अपवाद नव्हता. सोलापूरकरांनी 26 जानेवारी 1930 चा पहिला स्वातंत्र्यदिन दीपोत्सवाने साजरा केला. त्या सालच्या यात्रेच्या कुस्त्यांमधील विजयी पैलवान भरजरी फेट्यांऐवजी गांधी टोपी घालून मिरवले गेले ! तसेच, गुढीपाडव्याला घराघरांवर गुढ्यांऐवजी राष्ट्रीय निशाण उभारले गेले. महात्माजी मिठाचा सत्याग्रह 6 एप्रिलला करणार होते. सोलापूरकरांनी त्यावेळी सोलापूरच्या म्युनिसिपालटीवर राष्ट्रीय निशाण फडकावले. कायदेभंगाची चळवळ टिपेला पोचली. सरकारने महात्माजींना अटक केली. देशभर हरताळ, निषेध मोर्चे, मिरवणुका यांचा आगडोंब उसळला. सोलापुरातही निषेध मिरवणुका, सभा होतच होत्या.

         नरीमन व बजाज यांच्या अटकेची बातमी सोलापुरात 8 मे रोजी पोचली आणि युवक संघाने मोठ्या मिरवणुकीचे आयोजन केले. मिरवणुकीत सोलापूरच्या राजकारणातील साऱ्या गटातटांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. ती मिरवणूक शांततेत पार पडली. मिरवणुकीचे विसर्जन झाल्यानंतर त्यामधील काही कार्यकर्ते रुपाभवानी मंदिराकडे शिंदीची झाडे तोडण्याकरता धावले. मद्यपान बंदी हा त्या कार्यक्रमाचा एक भाग होता. सशस्त्र पोलिसांची तुकडी त्या कार्यकर्त्यांना अडवण्यासाठी तेथे पोचली. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यांनीदेखील अटक करून घेतली. बघ्यांचा मोठा जमाव त्या ठिकाणी होता. त्यांनी पोलिसांच्या गाड्या अडवल्या. त्यांनी कार्यकर्त्यांच्या सुटकेची मागणी केली. त्या साऱ्या गदारोळात दगडफेकीस सुरुवात झाली. तेव्हा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट हेन्री नाईट यांनी गोळीबार सुरू केला. गोळीबारात शंकर शिवदारे हा मरण पावला. त्यामुळे खवळलेल्या जमावाने पोलिसांच्या गाड्या वेढल्या. अधिकारी प्राणसंकटात सापडले. तेव्हा मल्लप्पा धनशेट्टी यांनी पुढाकार घेतला. त्यांनी जमावाला काबूत आणले. अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी पकडलेल्या लोकांची नावे टिपून घेऊन त्यांना सोडण्यात यावे अशी तोड काढली. त्याप्रमाणे पोलिसांनी पकडलेल्या लोकांना सोडून दिले. मल्लप्पा धनशेट्टी यांनी पोलिस गाड्यांना रस्ता मोकळा करून दिला. पोलिसांच्या गाड्या निघाल्या, पण जाता जाता, त्यांनी पुन्हा एकदा गोळीबाराच्या फैरी झाडल्या. त्यात बरेच जण जखमी झाले. हा विश्वासघात होता. त्यामुळे जमाव जास्तच संतप्त झाला. खवळलेला तो जमाव मल्लप्पा धनशेट्टी यांनाही आवरेना. जमावाने जवळ असणाऱ्या पोलिस चौकीवर हल्ला चढवला. त्यावेळी जमावाच्या मारहाणीत दोन पोलिस मरण पावले. जमावाने पोलिस चौकीला आग लावली. जमावाने जवळच असणाऱ्या कोर्टाच्या इमारतीसदेखील आग लावली. नंतर जमाव पांगला. सोलापुरात 8 मे रोजी घडला तो प्रकार एवढाच होता. सरकारने मात्र त्याची दंगा, जातीय दंगा व बंड अशी वेळोवेळी संभावना केली.

        परंतु या प्रकाराने सोलापुरातील ब्रिटिश अधिकारी खरोखरीच घाबरले असावेत. नाईट यांनी शहरातील सर्व पोलिस काढून घेतले आणि शहरात असणाऱ्या युरोपीयन अधिकाऱ्यांची बायकामुले रेल्वे स्टेशनवर गोळा केली. त्या कामात अडथळा येऊ नये व लोकांचे लक्ष दुसरीकडे वेधावे यासाठी सशस्त्र पोलिसांकडून दुपारी एक वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत दोन गाड्यांमधून गोळीबार केला गेला. त्यात पंचवीस माणसे मरण पावली व पन्नासच्यावर जखमी झाली. सोलापूरकर त्या हत्याकांडाचा प्रतिशोध घेतील याचे भय युरोपीयन अधिकाऱ्यांना वाटले. त्यांनी बायकामुलांना पुण्याला पाठवले आणि ते स्वत: रेल्वे स्टेशनवर पोलिस पहाऱ्यात बसून राहिले. अधिकारी शहर वाऱ्यावर सोडून असे पळाले आणि सोलापूर स्वतंत्र झाले !  मुंबईचीवृत्तपत्रेही सोलापूर शहर गुंडांच्या ताब्यात गेल्याची हाकाटी करत होती. त्यांनी 8 मे च्या दुपारी झालेल्या सरकारी हत्याकांडाची कोठलीच वाच्यता केली नाही. त्यांनी मारले गेलेले दोन पोलिस मुसलमान असल्याचा उल्लेख करून त्या प्रकाराला जातीय दंग्याचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. वास्तव तसे नव्हते.

त्यानंतर 9 ते 12 मे असे चार दिवस सोलापुरात गांधीराज होते. राज्ययंत्र काँग्रेस स्वयंसेवकांनी चालवले ते केवळ अपरिहार्यता म्हणून ! शहर हस्तगत करणे वा समांतर प्रशासकीय यंत्रणा उभी करणे असा उद्देश त्यात नव्हता; तशी त्यांची तयारीही नव्हती. गांधी टोपी घातलेले कार्यकर्ते पोलिसांनी पळून जाताना फेकलेल्या रायफली हातात घेऊन ट्रेझरीवर पहारा देत होते. रहदारी नियंत्रण वगैरे कामे सुरळीत चालू होती. त्या साऱ्या यंत्रणेचे नियंत्रण सोलापूर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामकृष्ण जाजू यांनी केले. ते कपाळावर तिलक लावत व म्हणून वैष्णव असे ओळखले जात. त्यांना त्या घटनेनंतर मार्शल जाजूम्हणून नवी ओळख मिळाली. सोलापूरला 10 मे रोजी बकरी ईदचा नमाज नेहमीप्रमाणे शांततेत पार पडला. स्वातंत्र्य मिळाल्यावर भारतीय त्यांचे राज्य कसे चालवतील याचा वस्तुपाठ सोलापूरकरांनी त्या चार दिवसांत घालून दिला. मात्र तो इतिहास त्याच्या योग्य महत्त्त्वासह जगापुढे मांडला जात नाही.

         ब्रिटिश सरकारने 12 मेच्या रात्रीपासून मार्शल लॉ जारी केला. त्याचा अंमल एकोणपन्नास दिवस होता. त्या काळात लष्करी कोर्टाने कित्येक कार्यकर्त्यांना दीर्घ मुदतीच्या सक्तमजुरीच्या शिक्षा व जबर दंड ठोठावले. लष्कराने सारे शहर भरडून काढले. दरम्यान, मुलकी कोर्टापुढे दोन पोलिसांची हत्या व बेकायदेशीर जमाव जमवून दंगा केला यासाठी खटला उभा केला गेला. 8 मे च्या सकाळी निघालेल्या मिरवणुकीत सहभागी असलेल्या राष्ट्रीय चळवळीतील चार प्रमुख कार्यकर्त्यांना साधे खुनी म्हणून फासावर चढवले गेले. मार्शल लॉ जारी असल्याने त्या चौघांना साधे साक्षीदारदेखील मिळाले नाहीत. तो खटला सेशन्स कोर्टापासून ते प्रीव्ही कौन्सिलपर्यंत एकतर्फी चालला. चार आरोपी

 

1. मल्लप्पा रेवणसिद्धप्पा धनशेट्टी (वय 33). मल्लप्पा धनशेट्टी यांचे सोलापूर शहरातील स्थान हे सार्वजनिक काकाअशा स्वरूपाचे होते. ते सविनय कायदेभंगाच्या चळवळीत अनेक वेळा सभांचे अध्यक्ष वा प्रमुख वक्‍ते म्हणून असत. सोलापूरमधील कोणताही कार्यक्रम असा झाला नाही की ज्यात मल्लप्पा धनशेट्टी यांनी सहभाग घेतला नाही. त्यांचा लोकांवर विलक्षण वचक होता. त्यांचा संचार सिद्धेश्वर प्रासादिक मंडळ, श्रद्धानंद समाज असा सर्वत्र होता. ते सिद्धरामेश्‍वराच्या यात्रेमधील नंदीध्वज वाहकाचे काम करत असल्याने त्यांच्याभोवती धार्मिक महात्म्याचे वलय होते. मल्लप्पा बोले व सोलापूर चाले अशी काहीशी स्थिती त्यावेळी होती. मल्लप्पा धनशेट्टी यांच्यामुळे सोलापूर शहरातील विविध संघटनाचे कार्यकर्ते राष्ट्रीय चळवळीशी जोडले गेले.

2. श्रीकिसन लक्ष्मीनारायण सारडा (वय 38). सोलापूर शहरात व्यापारात आघाडीवर असणारे ते घराणे. सारडा घराण्याचा सोलापूरच्या अनेक सार्वजनिक उपक्रमांना मदतीचा हात लाभला होता. सारडा हे शहरात होणाऱ्या यात्रा, सार्वजनिक उत्सव, त्या निमित्ताने होणारे कुस्त्यांचे आखाडे या साऱ्यांना सढळ हाताने मदत करत. सारडा व मल्लप्पा धनशेट्टी यांचा स्नेह सार्वजनिक कार्यातील सहभागामुळे होता. सारडाच राष्ट्रीय चळवळीची आर्थिक बाजू सांभाळत असत. त्यामुळे साम्राज्यशाहीचा त्यांच्यावर रोष होता. सारडा यांना ते 8 मे च्या सकाळी निघालेल्या मिरवणुकीत सहभागी असल्याने आरोपी केले गेले.

3. जगन्नाथ भगवान शिंदे (वय 25) यांनी सोलापूरात राष्ट्रीय चळवळीला सामान्य माणसांच्या घराघरांत पोचवण्याचे काम केले. शिंदे यांनी राष्ट्रीय चळवळीतील प्रत्येक कार्यक्रम कल्पकतेने राबवला. त्यांचे शिक्षण फारसे नव्हते, तरी त्यांची अभ्यासू वृत्ती व शैलीदार वक्तृत्व ही वैशिष्ट्ये होती. शिंदे यांच्यामुळे गांधी टोपी आणि राष्ट्रीय निशाण या दोन्ही प्रतीकांना सोलापूरकरांच्या मनात आगळे स्थान निर्माण झाले. शिंदे युवक संघ व मजूर संघ यांचे सेक्रेटरी म्हणून काम पाहत असत. ते तालीम संघाचेही सेक्रेटरी होते. शिंदे यांनी सोलापुरातील युवक वर्ग, कापड गिरणी कामगार व तालीम संघाची पैलवान मंडळी अशी ताकद राष्ट्रीय चळवळीमागे उभी केली.

4. अब्दुल रसूल कुर्बान हुसेन ( वय 21) वीस-एकवीस वर्षांच्या आयुष्यात कुर्बान हुसेन सातत्याने रयतेचे कोतवाल व वकील राहिले. लोकमान्यांचा वसा घेतलेला हा तरुण संपादक. कुर्बान हुसेन यांनी सोलापूरमधील कापड गिरण्यांमधून विखुरलेल्या अठरापगड जातींचा गिरणी कामगार सर्वप्रथम कामगार संघाच्या माध्यमातून एकत्र आणला. त्या गिरणी कामगाराला अंत्रोळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय चळवळीशी जोडून घेतले. हजारोंच्या संख्येमध्ये असणारे सोलापूरचे गिरणी कामगार राष्ट्रीय चळवळीत सामील झाल्याने राष्ट्रीय चळवळीची ताकद कमालीची वाढली. कुर्बान हुसेन यांचे ते कार्य साम्राज्यशाहीच्या नजरेत खुपेल असेच होते. कुर्बान हुसेन यांना लेखणीएवढीच प्रभावी वाणी लाभली होती. सोलापुरात युवक संघाचा कोणताही कार्यक्रम असा झाला नाही, की ज्यामध्ये कुर्बान हुसेन यांचे भाषण झाले नाही. (अधिक माहिती.)

सोलापूरचे चार नंदीध्वज येरवड्यात मिरवले.

 

साम्राज्यसरकारने सोलापूरच्या चार सुपुत्रांना फाशी देण्यासाठी 12 जानेवारीचा दिवस जाणीवपूर्वक निवडला. 12 जानेवारी  1931 सोमवार ! सोलापूरच्या सिध्देश्वर यात्रेचा हा पहिला दिवस या दिवसाला शेकडो वर्षापासून नंदीध्वज मिरवणूकीची परंपरा होती. स्वातंत्र्य भोगणाऱ्या सोलापूरकरांवर दहशत बसवण्याची ही खुनशी कल्पना होती. सुस्नात मस्तकांनी मातृभूमीला अखेरचे वंदन करुन ‘वंदे मातरम्’च्या जयघोषात सोलापूरचे चार नंदीध्वज येरवड्याच्या फाशीगेटातून निघाले. सिद्धेश्वराच्या यात्रेत नंदीध्वज मिरवण्याचा मान मल्लप्पा धनशेट्टींचा. त्यातही मल्लप्पा अग्रभागी होते. प्राणप्रिय इंग्रज सरकारने ठीक सहा वाजता शिक्षा अंमलात आणली. अत्यंत धीरोदात्तपणे सोलापूरच्या चार समिधा स्वातंत्र्यलढ्याच्या होमकुंडात अर्पण झाल्या.

सोलापुरात हे वृत्त येताच गिरणी कामगारांनी गिरण्या बंद पाडल्या. सोलापुरात 144 कलम जारी केले गेले. शेकडो वर्षांची परंपरा असणाऱ्या नंदीध्वजाच्या मिरवणुकीला डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटने परवानगी नाकारली; पण सोलापूरचे चार नंदीध्वज त्याच दिवशी येरवड्यात मिरवले होते, परंपरा अबाधित राहिली.

 

अनिरुद्ध बिडवे (02182) 220430, 9423333912 bidweanirudha@gmail.com

अनुप्रभा’, 1873, महेन्द्रनगर करमाळा, (सोलापूर) 413203

अनिरुद्ध बिडवे यांनी एम कॉम, एम ए, एलएल बी असे शिक्षण घेतले आहे. ते एलआयसीमध्ये विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील आघाडीच्या वृत्तपत्रांत व नियतकालिकांत दोनशेहून अधिक इतिहासविषयक लेखांचे लेखन केले आहे. त्यांची बखर रावरंभाची’, ‘ऐक महाराष्ट्रा’, ‘विमाशास्त्राची ओळख ही पुस्तके प्रकाशित आहेत. तसेच, ‘शिवशाहीतील अज्ञाताचा शोधसोलापूर मार्शल लॉ – 1930’ ही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.

———————————————————————————————————————

About Post Author

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here