सोलापूरचा आजोबा गणपती

carasole1

बहुभाषिक, बहुधर्मी आणि अठरापगड जातींचे शहर हे सोलापूरचे वैशिष्ट्य आहे. याच शहराची आणखी एक ओळख म्हणजे, आजोबा गणपती. १८८५ साली स्थापन करण्यात आलेल्या सार्वजनिक मंडळाचा हा गणपती खऱ्या अर्थाने आजोबा गणपती आहे. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आधीपासूनच आजोबा गणपती सार्वजनिक स्वरुपात साजरा होतो आहे.

गणरायाच्या आगमनाची चाहूल लागली की एक उत्साहाची अनुभूती मिळते. गणेशोत्सव हा अधिकाधिक ‘कमर्शियल’ होत चालल्याचा व उत्सवापेक्षा ‘फेस्टिव्हल’च्या स्वरूपात दिसत असल्याचा टीकात्मक सूर ऐकायला मिळत आहे. हे काही प्रमाणात खरे असेलही, पण त्याचे लोण सोलापूपर्यंत पोहोचले हे मात्र नक्की; परंतु त्याला बरीच मंडळे अपवाद आहेत. सोलापूरच्या गणेशोत्सवात आजही उत्साहाबरोबर भक्ती आणि सेवा पाहावयास मिळते. त्याचे उत्कट उदाहरण म्हणजे येथील आजोबा गणपती. तब्बल १२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेला हा आजोबा गणपती सोलापूरच्या धार्मिक, आध्यात्मिक तथा सांस्कृतिक पातळीवरचा मानबिंदू ठरला आहे. लोकमान्य टिळकांनी सन १८९३ पासून सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा सुरू केली खरी; परंतु त्याअगोदरपासून सोलापूरच्या आजोबा गणपतीचा उत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्याची परंपरा होती आणि ती आजही सुरू आहे. किंबहुना लोकमान्य टिळकांना सोलापूरच्या या आजोबा गणपतीपासूनच सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना सुचली असावी. लोकमान्यांचे सोलापूरकरांशी घनिष्ठ व जिव्हाळ्याचे संबंध होते. ते अधूनमधून सोलापूरला येत असत. सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा सुरू करण्यापूर्वी लोकमान्यांची स्वारी सोलापूरला आली होती. इतिहासात त्याचा संदर्भ सापडतो. असो, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होण्याअगोदरपासून सोलापुरात आजोबा गणपतीच्या रूपाने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा उज्ज्वल असूनदेखील त्याची दखल इतिहासकार घेत नाहीत, हे दुर्दैव आहे.

श्रद्धानंद समाजाचा मानाचा समजला जाणारा हा आजोबा गणपती आणि ग्रामदैवत श्रीसिद्धरामेश्वर म्हणजे सोलापूरचे जणू वैभव मानले जातात. शुक्रवार पेठेत सुरुवातीला मल्लिकार्जुनप्पा शेटे यांच्या निवासस्थानासमोर सार्वजनिक आजोबा गणपतीची प्रतिष्ठापना होत असे. त्यानंतर जवळच्या त्रिपुरांतकेश्वर मंदिरात आजोबा गणपतीच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत असे. स्वांतत्र्योत्तर काळानंतर दिवंगत माजी महापौर विश्वनाथप्पा बनशेट्टी यांनी स्वत:च्या तेलगिरणीच्या जागेत आजोबा गणपतीला आणले. तेथे अनेक वर्षे गणेशोत्सव होत असे. नंतर मंडळाच्या विश्वस्तांनी मंदिर उभारण्याचा संकल्प सोडला. शुक्रवार पेठेतीलच माणिक चौकात पुरेशी जागा मिळाली व त्याच ठिकाणी १९९४ साली आजोबा गणपतीचे भव्य मंदिर उभारले गेले. सोने-चांदीचे अलंकार लेवून ऐटीत स्थानापन्न झालेली आजोबा गणपतीची मूर्ती आकर्षक व तेजस्वी दिसते.

सुरुवातीला शेटेंचा गणपती म्हणून आजोबा गणपतीची ओळख होती. नंतर तो सार्वजनिक श्रद्धानंद समाजाचा म्हणून ओळखला जाऊ लागला. शुक्रवार पेठ, माणिक चौक भागातील तरुणवर्ग स्वातंत्र्य चळवळीकडे ओढला जात असताना १९२६ च्या सुमारास आर्य समाजाशी निगडित स्वामी श्रद्धानंद यांची हत्या झाली. या घटनेची प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक होते. शुक्रवार पेठेतील सिद्रामप्पा फुलारी, रेवणसिद्धप्पा खराडे, नागप्पा शरणार्थी, नागप्पा धोत्री, ईरय्या कोरे आदींनी त्रिपुरांतकेश्वर मंदिरात एकत्र येऊन श्रद्धानंद समाजाची स्थापना केली. या समाजाच्या माध्यमातून केवळ गणेशोत्सव साजरा न करता तरुणांमध्ये आत्मविश्वास व राष्ट्रप्रेम निर्माण करण्याचा संकल्प हाती घेतला गेला. श्रद्धानंद समाजाच्या नावाने व्यायामशाळाही सुरू करण्यात आली. सोलापूरच्या १९३० साली मार्शल लॉ चळवळीत अजरामर झालेल्या चार हुतात्म्यांपैकी मल्लप्पा धनशेट्टी यांनी काही काळ श्रद्धानंद समाजाची धुरा वाहिली होती. या कार्याच्या रूपाने आजोबा गणपतीचा बोलबालाही वाढत गेला.

सार्वजनिक गणेशोत्सवात आजोबा गणपतीचा थाट सुरुवातीपासून काही और आहे. विशेषत: गणपतीपुढे होणारे मेळे आजही संस्मरणीय ठरतात. कवी संजीव, अंबण्णा शेडजाळे, माधवराव दीक्षित, चिकवीरय्या स्वामी, शिवलिंगप्पा जिरगे यांच्या उत्तमोत्तम संवादामुळे हे मेळे त्या काळात लोकप्रिय झाले होते. संभाजी महाराजांचा वध, आगऱ्याहून सुटका, बाजीप्रभू यांसारख्या मराठ्यांच्या पराक्रमांची गाथा सांगणाऱ्या मेळ्यांबरोबर महाराष्ट्राचा मुकुट, तेजस्वी तारा, राणी कित्तूर चन्नम्मा ही नाटके सादर केली जात होती. ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला मूळ सोलापूरच्या. शुक्रवारपेठेत त्यांचे बालपण गेले. गणेशोत्सवात त्यांनी आजोबा गणपती मंडळात मेळ्यांमध्ये भाग घेऊन आपल्या अभिनय कलेची मुहूर्तमेढ रोवली होती. त्या अलीकडे सोलापुरात आल्या असता शुक्रवारपेठेत आवर्जून गेल्या आणि आजोबा गणपतीपुढे नतमस्तक होऊन बालपणीच्या आठवणींमध्ये अक्षरश: रमून गेल्या होत्या.

सोलापूर मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत आजोबा गणपतीला प्रमुख मान असतो. प्रारंभीच्या काळात आजोबा गणपती म्हणजे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक समजला जात होता. ही परंपरा स्वातंत्र्योत्तर काळात लोप पावली. माणिक चौकातील प्रसिद्ध सूफी संत मगरीबशाह बाबा हे मोठ्या श्रद्धेने आजोबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत गणपतीच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून सश्रद्ध भावनेने दर्शन घेत असत. एवढेच नव्हे तर मिरवणुकीत गणपतीपुढे बाबांचा हिरवा ध्वजही असे. हजरत मगरीबशाह बाबा हे मूळचे इराणचे. हैदराबादहून ते सोलापुरात आले व येथेच स्थायिक झाले होते. परंतु त्यांच्या पश्चात ही परंपरा खंडित झाली. ती पुन्हा सुरू होण्यासाठी कोण पुढाकार घेणार, हा प्रश्न आहे.

आजोबा गणपती मंडळाने भक्ती व सेवा यांचा सुरेख संगम साधत उत्तम प्रकारे वाटचाल ठेवली आहे. मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा वाहणारे अॅड. गौरीशंकर फुलारी, सचिव अनिल सावंत आणि कमलाकर करमाळकर व त्यांचे सहकारी विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम राबवितात. ३० सप्टेंबर १९९३ रोजी मराठवाड्यात किल्लारी-सास्तूर भागात झालेल्या भूकंपाच्या वेळी तेथील आपद्ग्रस्तांना निवाऱ्यासाठी ताडपत्र्या उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच भोजनसेवाही पुरविण्यात आली. कुष्ठरुग्णांना गोडधोड जेवण देताना आजोबा गणपती मंडळाचा सेवाभाव ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा’ या काव्यपंक्ती सार्थक ठरवितो. रक्तदान शिबिरांचा उपक्रम अधूनमधून चालविला जातो. रक्तदात्यांची सूचीही प्रसिद्ध करण्यात आल्यामुळे त्याचा चांगला उपयोग होतो. शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले जाते. वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना शिबीर, बालसुधारगृहाला मदत, मुक्या जनावरांसाठी जलकुंभ, कर्करुग्णांना अर्थसाह्य यासह इतर उपक्रम मंडळामार्फत चालतात. धार्मिक व अध्यात्माबरोबर सामाजिक सेवाकार्याची दिलेली जोड प्रशंसनीय आहे.

– इजाज हुसेन मुजावर

(मूळ लेख, लोकप्रभा, २८ सप्टेंबर २०१२)

Updated On – 8th Mar 2016

About Post Author

1 COMMENT

  1. खुपच छान माहिती.
    खुपच छान माहिती.

Comments are closed.