सुचेता-राजेंद्र धामणे डॉक्टर दांपत्याचे मनगाव

5
772

राजेंद्र आणि सुचेता धामणे ह्या डॉक्टर दांपत्याचे सहजीवन सुरू झाले तेच मुळी समाजासाठी काहीतरी करावे या समविचाराने. दोघेही एकत्र होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयात शिकलेले. कॉलेजमध्ये शिकत असतानाच गरजूंना मदत करत असत. वैद्यकीय पदवी पंचवीस वर्षापूर्वी 1998 मध्ये घेतल्यानंतर त्यांनी दोघांनी मिळून लगेच माऊली या संस्थेची स्थापना केली. ‘माऊली’ या नावामागील उद्देश डॉ.राजेंद्र यांच्या अकाली निधन झालेल्या आईच्या आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाच्या उदात्त स्मृती तेवत ठेवणे हा होता. त्यांनी शिंगवे तालुक्यात (जिल्हा नगर) मोबाईल क्लिनिक चालवले. वाड्यावस्त्यांवर, आदिवासी वस्त्यांवर जाऊन तेथील रुग्णांवर मोफत वैद्यकीय उपचार केले. दोघांनी वीस बेडचे रुग्णालयही सुरु केले. तेथे सगळ्या सोई सुविधा होत्या. दोघे अवघ्या तीनशे रुपयात बाळंतपण करत !

दरम्यान राजेंद्र यांना पदव्युत्तर पदवीसाठी (एम डी) प्रवेश मिळाला. रुग्णालय धर्मांदाय होते. आर्थिक विवंचना जाणवे. सुचेताने तिच्या गळ्यातील दागिने एम डी च्या फी साठी मोडले. नंतर बँकेचे कर्ज मिळाले आणि शिक्षण पूर्ण झाले. त्याच सुमाराला राजेंद्र यांच्या ‘अनवाणी काम करणाऱ्या शेतकऱ्यांचे आजार, स्वरूप आणि उपचार’ या  संशोधन प्रकल्पाची निवड जपानमधील एका आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी झाली. राजेंद्र जपानला जाऊन आल्यानंतर त्यांना येथे बऱ्याच संधी मिळाल्या. रुग्णालय सुरु होते. सोबत विविध विषयात संशोधन आणि अनुसंधानाचे काम आणि लेखनही सुरु होते. डॉ.सुचेता वैद्यकीय महाविद्यालयात ‘कम्युनिटी मेडिसिन’ या विषयाचे अध्यापन करत होत्या. राजेंद्र यांनी अहमदनगरमध्ये प्रॅक्टिस सुरु केली. दोघे दुचाकीवर दररोज नगरला जात. त्या प्रवासात त्यांना रस्त्यावर खूप माणसे विमनस्क अवस्थेत दिसत. नगरपासून शिर्डी, शनीशिंगणापूर जवळ असल्याने देवाच्या दारी बरे होतील म्हणून किंवा मरण आले तरी देवाच्या दारी येईल म्हणून घरातील वृद्ध, मनोरूग्ण व गंभीर आजारी स्त्रीपुरुषांना आणून सोडले जाते. ते त्या परिसरात इकडेतिकडे फिरत असतात. महामार्गावर भटकत असतात. बऱ्याचदा ट्रक्स त्यांना परराज्यांमधून इकडे आणून सोडतात. एकदा, त्या दोघांना नगरला त्यांच्या कामासाठी जात असताना, रस्त्याच्या कडेला एक महिला उकिरड्यावर स्वतःचीच विष्टा खाताना दिसली. तिला कशाचेच भान नव्हते. त्यांनी तिला त्यांचा पोळीभाजीचा डबा दिला. तिने तोही हरवलेल्या नजरेने खाल्ला. बाजूच्या गटारातील पाणी पिऊन टाकले !

मात्र त्या घटनेने धामणे पतीपत्नी अस्वस्थ झाली. दोघांना त्याक्षणी पुढील आयुष्यात काय करायला हवे ते स्पष्ट झाले. रस्त्यावर तशा रुग्णांचा उपचार करणे आणि जेवू घालणे सुरु झाले. ती दोघे अशा विमनस्क भटकणाऱ्यांना शोधून डबा देऊ लागली. त्यांनी काही वेळा कॉलेजला जाताना अशा सत्तर जणांना डबा दिलेला आहे ! आढळणाऱ्या रूग्णांमध्ये महिलांची अवस्था भयानक असे. सतत रस्त्यावर राहिल्याने विविध आरोग्याचे प्रश्न तर असतच, पण त्यासोबत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार सतत होत त्यामुळे त्यांच्या आजारचे स्वरूप गंभीर होई. काही वेळा, त्यामधून त्यांच्यावर सक्तीचे मातृत्व लादले जाई.

दोघांना जाणवले, की तशा बेघर मनोरुग्ण बायकांना नुसते खाणे देऊन उपयोग नाही. त्यांना कायम स्वरूपाचा आसरा देण्यास हवा. त्यासाठी जागा हवी होती आणि घर बांधणे गरजेचे होते. राजेंद्र यांचे वडील बा.ग.धामणे यांनी त्यासाठी स्वतःची सहा गुंठे जागा दिली. सुरुवात अशी स्वतःपासून झाली. त्याचवेळी पुण्याचे शरद बापट वर्तमानपत्रामधील या कामाची माहिती वाचून हे काम प्रत्यक्ष बघावे म्हणून पुण्यावरून तेथे आले. त्यांनी खात्री केली आणि ‘माऊली’सोबत काम सुरू केले. पुण्यातील स्ट्रक्चरल डिझाईनर वाय.एस.साने  यांना या कामाशी जोडून घेतले. अशा तऱ्हेने, झिडकारलेल्या महिलांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी ‘माऊली सेवा प्रतिष्ठान’चे वाय एस. साने इंद्रधनू प्रकल्प हे छोटेसे हक्काचे घर उभे राहिले ! मन आणि घरे हरवलेल्या माऊलींना छप्पर मिळाले.

महिला ‘माऊली’मध्ये येतात तेव्हा त्यांची अवस्था हलाखीची असते. अंगावरच्या कपड्यांची शुद्ध नाही, अंगभर जखमा, गुप्तांगावर  जखमा, केसांचा गुंता झालेला… काही महिला एड्स, क्षयरोग, कर्करोग, न्यूमोनिया अशा आजारांनी त्रस्त असतात. त्यांना संस्थेत आल्यावर दैनंदिन जीवनात आणण्यासाठी कित्येक दिवस लागतात. ‘माऊली’मध्ये प्रथम त्यांची शारीरिक स्वच्छता करतात. त्यांच्या विविध वैद्यकीय तपासण्या केल्या जातात. अनेकदा, रस्त्यावर कोणी कोणी त्यांना मारहाण केलेली असते. त्यामधून झालेल्या जखमांमध्ये किडे असतात, मांस कुजलेले असते, त्यामुळे त्या जखमा साफ केल्या तरी तेथे पुन्हा तोच त्रास होतो. काही जखमा बऱ्या होण्यास कित्येक दिवस लागतात. काही भगिनींना रक्तदाब, मधुमेह असे नित्य विकार असतात. त्यावर उपचार करावे लागतात. पुढील काम असते त्यांच्या लक्षणांचे मानसशास्त्रीय पृथक्करण करण्याची. डॉ. राजेंद्र यांनी त्यासाठी एम डी नंतर क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. पीडित स्त्रियांना बोलते करण्याचे आणि त्यांच्या सर्व तपासण्या करून घेण्याचे काम सोपे नसते. त्यांना नरपशूंनी त्रास दिलेला असतो, त्या घाबरलेल्या असतात. सुरुवातीला, तर त्या त्यांच्या शरीराला हातही लावू देत नाहीत. तेथून पुढे फक्त वैद्यकीय उपचार करुन त्यांना हळुहळू सर्वसामान्य पातळीवर आणले जाते. त्यांनतर मग त्यांच्या प्रश्नांना समजावून घेत समुपदेशन आणि सायकोथेरपी सुरु होते.

कोणीही जन्मत: ‘वेडे’ नसते. घरातून किंवा समाजाकडून माणसावर मानसिक किंवा शारीरिक अत्याचार होत असतात. ते सतत होत राहिले तर कणखर स्वभावाची माणसेसुद्धा ढेपाळतात. ती हळुहळू भूतकाळ विसरतात. वर्तमानाची शुद्ध नसते. त्यामुळे त्यांचा स्वत:च्या मनाशी संवाद तुटतो. अशा व्यक्तींना घर, समाज कोसो दूर लोटतो. त्या महिला असतील तर त्यांची अवहेलना फारच होते. त्यांतील काही महिला येतात तेव्हा गरोदर असतात. तशी बहुतेक बाळंतपणे राजेंद्र व सुचेता यांनी स्वतःच पार पाडलेली आहेत. कधी कधी, काही भगिनींना उकिरड्यावरचे खाल्ल्याने कुपोषण झालेले असते. प्रथिनांचे शरीरातील प्रमाण धोकादायक असते. त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करून अगदी सात सात हजारांचे ह्युमन अल्बुमिनसारखे इंजेक्शन सलग पाच सहा वेळा द्यावे लागते. तशा महिलांचे बाळंतपण आणि मुलांचे संगोपन ‘माऊली’मध्ये आस्थेने होते. ‘माऊली’मध्ये जन्मलेली सगळ्या वयोगटातील चाळीस मुले आहेत. ती सर्व माऊलीची मुले म्हणजे धामणे कुटुंबच होय !

काही महिलांना साधारण अवस्थेत आल्यावर घराची ओढ लागते. त्या घरी जाण्यासाठी हट्ट करतात. परंतु त्यांना त्यांच्या कुटुंबामध्ये स्वीकारण्यास कुटुंबीय तयार होत नाहीत. तत्क्षणी स्वीकारण्याची तयारी दर्शवली तरी वास्तव जीवणात पुन्हा ती निराधार होते. रस्त्यावर भटकताना बलात्कार झालेल्या आणि त्यातून कधी गर्भवती झालेल्या महिलेला कोण स्वीकारणार? त्यामुळे कोणीही ‘माऊली’मधून परत घरी जात नाही. त्यामुळे ‘माऊली’तील महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

अशा महिलांसाठी ‘मनगाव’ हे घर आणि मन हरवलेल्या माणसांचे आगळेवेगळे गाव तयार करण्यात आले आहे. नाट्यकर्मी आणि उद्योजक आबाजी व सौ.मेघमाला पठारे यांनी त्यांची अहमदनगर-शिर्डी महामार्गालगतची तीन एकर जागा या गावासाठी 2015 मध्ये दान केली. राजेंद्र व सुचेता यांची “THE ONE International Humanitarian Award 2016” या जागतिक पातळीवर मानवतावादी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी दरवर्षी एका व्यक्तीला दिल्या जाणाऱ्या हाँगकाँग येथील पुरस्कारासाठी 2016 साली निवड झाली. त्यांनी त्यामधून मिळालेली एक कोटी रुपयांची रक्कम या कार्यासाठी समर्पित केली आणि मनगाव या गावाची उभारणी झाली. मनगाव हे सेल्फ सस्टेनेबल गाव म्हणून उभे राहत आहे. तेथे चारशेपंच्याहत्तर माता भगिनी आणि त्यांची चाळीस मुले राहतात !

‘माऊली’ भगिनी ते गाव विविध उद्योग उभे करून स्वयंपूर्णपणे चालवतात. त्यात बेकरी, इमिटेशन ज्वेलरी निर्मिती, शेती, आधुनिक गोपालन आणि शेळीपालन असे उद्योग आहेत. ‘माऊली’चा स्वतंत्र अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज अतिदक्षता विभाग व दवाखाना आहे. राजेंद्र व सुचेता यांचा मुलगा डॉ.किरण अतिदक्षता विभागाची धुरा संभाळतो. मनगावचा परिसर शंभर टक्के ‘ग्रीन’ परिसर झाला आहे. शक्य तेथे सौर ऊर्जेचा वापर आहे. स्वयंपाकही सौर ऊर्जेवर होतो. संस्थेत उत्तम झाडे लावली आहेत. महिला  त्यांची निगा ठेवतात. सुचेता म्हणतात, “आतापर्यंत त्या महिलांनी खूप अत्याचार भोगले आहेत. महिला मनोरूग्ण झाली तर तिला तिचा नवरा, भाऊ, वडील कोणीच आसरा देत नाही. मात्र एखादा नवरा मनोरूग्ण झाला तर त्याची बायको त्याचा स्वीकार करते, त्याची सेवा करते. हे दारुण सत्य आहे.”

संस्थेत महिलांसाठी करमणुकीचे कार्यक्रम, विविध थेरपी सेशन होतात. त्यासाठी ‘विठाई सभागृह’ आहे. दरवर्षी आठ मार्चला महिला दिनी ‘माऊली सुंदरी’ ही स्पर्धा असते. ‘माऊली’ भगिनींच्या कार्यकुशलतेवर त्यांना छान बक्षीसे दिली जातात. त्यांचे गॅदरिंग होते. महिला कधी डिप्रेशनमध्ये जातात, पण सावरतात. त्यासाठीही उपचार असतातच.

‘माऊली’च्या स्वतंत्र संशोधन केंद्र आणि रुग्णालयाचे कामही सुरु करण्यात आले आहे. तेथे महाराष्ट्रातील पहिली “Psychology Research laboratory” आहे. राजेंद्र व सुचेता यांना युरोपातील विविध विद्यापीठांमध्ये संशोधन प्रबंध सादर करण्यासाठी बोलावले जाते. त्यांनी सलग तीन वर्ष स्वीत्झरलँडमधील वेगवेगळ्या विद्यापीठात त्यांचे संशोधन प्रबंध सादर केले आहेत. ‘माऊली’तील काम देणगीदारांच्या मदतीवर सुरु आहे.

‘माऊली’ला पंचवीस वर्षे होऊन गेली आहेत. काही महिला ज्येष्ठ, वयोवृद्ध झाल्या आहेत. डिमेन्शिया आणि अल्झायमर असणाऱ्या वयस्कांसाठी स्वतंत्र विभाग आहे. साधारण ऐंशीपेक्षा जास्त आज्या ‘बेडरिडन’ आहेत. त्यांची जागेवर काळजी घेतली जाते. एकेक पान गळतीलाही लागले आहे. त्यांचे सर्व सोपस्कार, तसेच कधी कधी पोस्टमॉर्टेम व अंत्यसंस्कार तेथेच होतात. जागा रिकामी झाली तर नवी महिला येते! जगण्या-मरण्याचा खेळ ‘माऊली’त सुरू असतो. प्रत्येकीच्या आयुष्यात जगण्याची उर्मी ठेवणे आणि तिला शेवटपर्यंत निरामय जगवणे हे एक नवीन आव्हान असते. राजेंद्र व सुचेता ताणतणावात स्वतःला सतत सावरत डॉक्युमेंटरी आणि लघुचित्रपट बनवत असतात. त्यांच्या काही लघुपटांची निवड International Film festival मध्येही झालेली आहे. हा व्याप सांभाळून राजेंद्र यांनी तीन नाटके, एक दीर्घकथा संग्रह, एक कादंबरी आणि वृत्तपत्रांत स्तंभलेखन केले आहे ! त्यांची तीन नाटके राज्य नाट्य स्पर्धेत सादर झाली आहेत !

राजेंद्र धामणे 9860847954 rajendra.dhamane@gmail.com सुचेता धामणे 9326107141

– सुलभा आरोसकर 9967179870 sulabha.aroskar@gmail.com

About Post Author

5 COMMENTS

  1. लेखा द्वारे वेगळ्या वाटेवरच आगळं समाज कार्य करणार्‍या डाॅ.दांपत्याचा परिचय घडविला.

    • माणुसकीचा झरा असलेल्या माऊली सेवा संस्थेच्या उपक्रमाला आमचा मनापासून सलाम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here